दादाजी कोंडदेव

दादाजी कोंडदेव


पंत दादाजी कोंडदेव आणि शिवबा राजे सोन्याचा नागर चालविताना

दादाजी कोंडदेव ह्यांचे मुळचे नाव दादाजी कोंडदेव गोचीवडे कुलकर्णी मलठणकर होत. ह्यांना मलठणचे परंपरागत कुलकर्ण. ह्यांचा इतिहासात उल्लेख दादोजी कोंडदेव असाही येतो परंतु समकालीन पुराव्यानुसार ’ दादाजी कोंडदेउ / दादाजी कोंडदेव ‘ हेच योग्य आहे.

दादाजी कोंडदेव तसे सुरवाती पासून आदिलशाहीचे चाकर,कोंढ़ाण्याचे नामजाद सुभेदार , पण आदिलशहाने वैराण  केलेल्या पुणे परगण्याची पुन्हा घडी बसवण्याकरिता  करीता,  दस्तूर खुद्द शाहजी महाराजानी,  दादाजी कोंडदेव यांची पुण्यावर नेमणूक केली. शाहजी महाराजांचा जो मुलुख – पुणे, इंदापूर, सुपा याचा कारभार दादाजी कोंडदेव पाहत होते.

दादाजी कोंडदेव यांचा पहिला जुना उल्लेख हा,  इ.स. १६३३ मधला मिळतो, पुणे परगण्याच्या महमदवाडी या गावा संबधीचा आहे, त्या गावचा जाऊ  पाटिल याने लिहून दिले आहे –
१)  बापूजी देऊ पाटिल घुले हा आपला भाऊ दुष्काल  पडला म्हणून गाव सोडून परमुलखास  गेला, त्यावर वडिल मेले, आम्ही वाचलो, सुकाळ जाला. “यावर दादाजी कोंडदेव दिवाण  जाले, त्यानी   मुलुख लावला ” असा उल्लेख आहे.

२) छत्रपति शाहू महाराज (पाहिले – छत्रपती शंभूराजांचे पुत्र) यांनी शिरवळ परगण्याच्या देश कुलकर्ण विषयी  एक निवडा केला आहे, त्या परगण्याचा कुलकर्णी  यादित गंगाधर याला दिलेले १ ओक्टोबर १७२८ या तारखेचे अस्सल पत्र उपलब्ध आहे
ह्यावेळी पुरावा म्हणून जी पत्रे शाहू महाराजान्समोर मांडली गेली, त्यात दादाजी कोंडदेव यांनी २ एप्रिल १६४६ ला शिरवळ परगण्याच्या हवालदाराला पाठवलेले पत्र आहे, दादाजी कोंडदेव यांच्या त्या पत्रात जीजाबाई साहेबांचा उल्लेख ” सौभाग्य वती मातुश्री जीजाआऊ साहेब ” असा आहे

काही लोक ते गुरु होते किंवा नव्हते यावर वाद घालत बसतात, महाराज त्याना काय स्थानी मानत होते हे महाराजांनाच माहिती, तुमच्या आमच्या सारख्या सामान्य माणसाला  ते कधी समजणार नहीं कारण आपली ती कुवतच नाही, पण एक मात्र निश्चित की महाराजांचे  बालपणाचे सगळे शिक्षण, हे त्यांच्याच देखरेखीखाली झाले, कुणी गुरु मानत नसेल नसो; पण महाराजाना राजकीय शिक्षणाचे धडे “दादाजी कोंडदेव” यानीच दिले, महाराजांना मार्गदर्शक म्हणुन तेच लाभले, ह्या मागची प्रेरणा मात्र “शाहजी महाराज आणि मातुश्री जिजाबाई साहेब” हे निःसंकोच होतेच.

पंत दादाजी कोंडदेव यांनी घालून दिलेल्या पद्धती सुयोग्य असल्यामुळे त्यात बदल न करणारे  शिवाजी महाराज.
‘दादाजीने केले असेल, ते रास्तच असेल’

पंत शिवाजी महाराजांच्या आदर स्थानी होते हे निश्चित.

१) मावळाचा सुभेदार माहादजी सामराज याने कर्यात मावळ तरफेचा हवालदार माहादाजी नरस प्रभू याला पाठविलेले ७ ऑक्टोबर १६७५ या तारखेचे एक पत्र उपलब्ध आहे.  त्यात छत्रपती शिवाजी महाराज यांनी माहादाजी सामराजास पाठविलेले एक पत्र उद्धृत केले आहे. “साहेब (म्हणजे शिवाजी महाराज) कोणाला नवे करू देत नाहीत दादाजी कोंडदेव यांच्या कारकीर्दीत चालत आले असेल, ते खरे’‘, असे शिवाजी महाराजांच्या त्या पत्रात म्हटले आहे.

२) पुणे परगण्याच्या नीरथडी तर्फेतील परिंचे या गावच्या पाटीलकी विषयी शिवाजी महाराजांनी नीरथडी तरफेचा हवालदार तानाजी जनार्दन याला पाठवलेले २६ जून १६७१ या तारखेचे एक पत्र उपलब्ध आहे. त्या पत्रातही  “वैकुंठवासी साहेबांचे (म्हणजे शाहजी महाराजांचे) व दादाजी पंतांचे कारकीर्दीत चालिले आहे ते करार आहे तेणेप्रमाणे चालवणे, नवा कथला करू न देणे”, असे म्हटले आहे.

३) पुणे परगण्याच्या कर्‍हेपठार तरफेतील वणपुरी या गावच्या पाटीलकीवरून चाललेल्या एका तंट्याविषयी त्या तरफेच्या कचेरीतून त्या तरफेतील सासवड वगैरे सहा गावांना पाठविण्यात आलेले २३ जुलै १६७१ या तारखेचे एक पत्र उपलब्ध आहे. त्यात या प्रकरणी “मागे… दादाजी कोंडदेव यांचे कारकीर्दीत ऐसे चालिले असेली, राजेश्री साहेबांचे कारकीर्दीस चालिले असेली तेणेप्रमाणे हाली वर्तवणे, जो न वर्ते त्याची ताकीद करणे’‘ असा हुकूम राजश्री साहेबी (म्हणजे शिवाजी महाराजांनी ) केला असल्याचे नमूद केले आहे.

४) मावळांमधील मुठे या गावच्या पाटीलकीविषयी एक नवा तंटा सुरू झाला होता. त्याविषयी शिवाजी महाराजांनी देशाधिकारी कोन्हेर रुद्र याला पाठविलेले १ नोव्हेंबर १६७८ या तारखेचे पत्र उपलब्ध आहे. या पत्रातही “दादाजी कोंडदेव यांचे वेळेस चालिले असे तेणेप्रमाणे चालवणे” असे म्हटले आहे. हे पत्र तर विशेष वाचावे. शिवचरित्राचे अनेक पैलू उघड करणारे ते पत्र आहे.

५) शिवचरित्र साहित्य खंड ३ मधील ३९९ व्या लेखांकात पुरंदर किल्ल्याची हकीकत आली आहे. तिच्यात शिवाजी महाराजांनी पुरंदरचा किल्लेदार महादाजी नीलकंठराव याला लिहिलेल्या एका पत्राचा उल्लेख आहे. “दादो कोंडदेव आम्हाजवळ वडिली ठेऊन दिल्हे होते, ते मृत्यो पावले, आता आम्ही निराश्रीत झालो’‘ असे त्यात म्हटले आहे.

६) दादाजी कोंडदेव हे शाहजी महाराजांचे सुभेदार होते. त्यांनी शिवाजी महाराजांकरिता खेड येथे वाडा बांधावयाची तजवीज केली आणि शिवाजी महाराजांच्या नावे शिवापूर पेठ वसवली अशी माहिती खेडेबार्‍याच्या देशपांड्यांच्या करिन्यात आहे.

७) पुण्याच्या पांढरीवर सोन्याचा नांगर धरल्याचा उल्लेख हा फक्‍त सहा कलमी शकावलीत आहे. तिच्यातील शेवटचा कलमातील तो उल्लेख असा आहे :

“शके १५५७ युव नाम सवंत्सरी शाहजी राजे भोसले यांसी बारा हजार फौजेची सरदारी इदलशाईकडून जाली. सरंजामास मुलूक दिल्हे त्यात पुणे देश राज्याकडे दिल्हा. राज्यांनी (म्हणजे शाहजी राजांनी) आपले तर्फेने दादाजी कोंडदेव मलठणकर यांसी सुभा सांगून पुणियास ठाणे घातले. तेव्हा सोन्याचा नांगर पांढरीवर धरिला. शांती केली. मग सुभेदार याणी कसब्याची व गावगनाची प्रांतात वस्ती केली.” ( शिवचरित्रप्रदीप, पृ. ७१ )पुण्याच्या पांढरीवर सोन्याचा नांगर धरला असा उल्लेख असलेला हा एकमेव जुना कागद आतापर्यंत उजेडात आला आहे आणि त्यात दादाजी कोंडदेवाचा स्पष्ट उल्लेख आहे.

•●प्रेरणा कशास म्हणतात●•

•●प्रेरणा कशास म्हणतात●•
*न्यूटनच्या वर्गात त्याच्या व्यतिरिक्त अजूनही ५० विद्यार्थी होते!!*

*आईन्स्टाईनचा वर्गही काही रिकामा नव्हता!!*

*बाबासाहेब तर वर्गाबाहेर बसून नुसतंच ऐकायचे!!*

*यांच्या मास्तरांनी सगळ्या वर्गाला एकसारखेच ज्ञान दिले होते!!*

*मग त्यांच्यातले हे एकएकटेच एवढे का शिकले?*

*तुकोबा ज्ञानोबा तर शाळेतच गेले नव्हते!!*

*शिवबांनी युद्धनीती कुठल्या मास्तर कडे शिकली होती?*

*तेंडुलकरच्या मास्तरांनी किती सेंच्युरी मारल्या होत्या?*

*आंबेडकरांच्या मास्तरांना किती घटना लिहिण्याचा अनुभव होता?*

*हे सगळेच शिकले कारण त्यांना शिकायचे होते!!*

*मास्तरांचे क्वालिफिकेशन त्यांच्या दृष्टीने गौण होते!!*

*सिलॅबसचे बंधन त्यांनी स्वतःस घातले नव्हते!!*

*आम्ही त्यांना देव मानून मोकळे होतो आणि आमचेच हात बांधून ठेवतो!!*

*आमच्या अपयशाचे खापर आमच्याच मास्तरांच्या अज्ञानावर फोडून मोकळे होतो!!*

*भरपूर फी घेणाऱ्यांना ज्ञानी म्हणतो आणि त्यांचे खाजगी क्लास लावतो!!*

*पण माझे शिक्षण त्यांच्या ज्ञाना मध्ये नाही हे सोईस्कर विसरतो!!*

*पैसे देऊन प्रयत्न विकत घेण्याचा विनोद आम्ही करतो, आमच्या मनालाच आम्ही फसवत राहतो!!*

*माकडांचे उड्या मारण्याचे क्लासेस कुणी बघितले आहेत का?*

*कि बदकांचे पोहण्याचे क्लासेस कुठे चालू आहेत का?*

*वाघिणीच्या शिकारीच्या क्लासेसच्या ऍडमिशन्स फुल झाल्याच्या बघितल्या आहेत का?*

*लंगड्या माकडीणीची पोरं उड्या मारायला शिकलीच नाहीत असं कुठं झालंय का?*

*आंधळ्या वाघिणीची मुलं कंद मुळं खाऊन राहिलेली कुणी पाहिलीत का?*

*निसर्गामध्ये कुणीच कुणाला शिकवत नसतो, ज्याची त्याची गरज म्हणून जो तो शिकत असतो!!*

*प्रयत्न आणि अनुभव हाच ज्याचा त्याचा मास्तर असतो!!*

*शिक्षक फक्त आपले भरकटलेपण दाखवितो, यशाचा मार्ग आपला आपणच शोधायचा असतो!!*

*आकाशा खालचं सगळं जग हाच ज्याचा त्याचा सिलॅबस असतो!!*

*शिक्षकांचा दर्जा शिक्षणाचा दर्जा *शाळेचा दर्जा कॉलेजचा दर्जा ह्या सगळ्याला दोष दिला जातो कारण माझ्या प्रयत्नांचा दर्जा खूपच खालावलेला असतो!!*

●लेखन-विश्वास नांगरे पाटिल●
__________________________

जोशी वडेवाले (एका वडापाववाल्याची स्टोरी).

जोशी वडेवाले (एका वडापाववाल्याची स्टोरी).
---------------------------------------------------------
गजरे, फटाके विकणारा, खांद्यावर पाटी घेऊन ‘कवळी काकडी’ अशी आरोळी मारत फिरणारा शैलेश आज १८ हॉटेलचा मालक झालाय. दुसऱ्यांची गाडी धुऊन महिन्याला वीस रुपये कमावणारा शैलेश आज सात गाडय़ांचा मालक झालाय. आजचं आमचं हे सगळं वैभव आम्ही जोडीने मिळवलं.. अनुभवलं. अनेक भयानक अनुभव घेत आम्ही हा मार्ग चाललो आहोत ते तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार आहेस हे तत्त्व मनाशी बाळगत.’’ सांगताहेत माया जोशी आपले पती ‘जोशी वडेवाले’ शैलेश जोशी यांच्याबरोबरच्या ३० वर्षांच्या सहजीवनाविषयी...

बी. कॉम.च्या दुसऱ्या वर्षांला असताना कर्नाळय़ाच्या सहलीला आमची पहिल्यांदा ओळख झाली. या ओळखीचं पुढे मैत्रीत आणि मैत्रीचं पुढे प्रेमात कधी रूपांतर झालं हे माझं मलाही कळलं नाही. आज इतक्या वर्षांनी मागे वळून बघताना वाटतं, केवढी मोठी वाट चालून आलोय आम्ही. ती सुरुवातीला काटय़ांचीही होती, अडचणीची होती, अगदी दरीतही कोसळलोय आम्ही; पण तरीही एकमेकांच्या सोबतीने आज तीच वाट हवीहवीशी झाली आहे. ती वर्षे आठवू नयेत अशी, पण हेही माहीत आहे की त्या वर्षांनीच आम्हाला घडवलंय.

आम्ही दोघं प्रेमात पडलो खरे, पण दोघांच्याही घरची सामाजिक व आर्थिक पाश्र्वभूमी वेगवेगळी असल्याने दोन्हीही घरांतून लग्नाला विरोध होणार हे आम्हाला पक्कं ठाऊक होतं. म्हणून पदवी घेईपर्यंत थांबलो. लग्न करून संसाराला सुरुवात करण्यापूर्वीच काहीतरी उद्योग करून आर्थिक बाजू सांभाळता यावी या हेतूने शैलशने झेरॉक्सचा व्यवसाय सुरू केला. २६ डिसेंबर १९८५ ला कोर्टात लग्न करून आम्ही अक्षरश: फक्त अंगावरच्या कपडय़ांनिशी एका नव्या आयुष्याला सुरुवात केली.

शैलेश दिवसभर वेगवेगळय़ा ऑफिसेसमधून फिरून झेरॉक्स काढण्यासाठी कागदपत्रे गोळा करून आणायचा. दरम्यान, मी त्याच्या झेरॉक्स काढून देई व तो पुन्हा ती सगळी कागदपत्रे जागच्या जागी पोहोचवायचा. सुरुवातीला त्यातही फार कमाई नव्हती, जी मिळायची त्यात अनेकदा दिवसा एकवेळ वडापाव व रात्रीचे एकवेळ जेवण करायचे, असा साधारण दिनक्रम सुरू होता.
या काळात अर्थातच आमची राहायचीही कायमची अशी काहीच व्यवस्था नव्हती, कारण आम्ही केलेल्या आंतरजातीय विवाहामुळे आम्हाला आमची घरं बंद झालेली होती. पण एकमेकांच्या विश्वासावर आम्ही हात हातात घेतले होते. हेही दिवस जातील, हा ठाम विश्वास होता. मुख्य म्हणजे मला शैलेशच्या कर्तृत्वावर विश्वास होता आणि आयुष्याची ही कठीण लढाई आम्ही लढायची ठरवलं.

त्या काळात काही दिवस रात्री पाठ टेकण्यापुरते एका हॉटेलमध्ये व काही दिवस एका मित्राच्या खोलीवर जायचो. मग महिन्याने ते झेरॉक्स मशीन आमच्या घरमालकाला डिपॉझिट म्हणून देऊन आम्ही डेक्कनजवळ एका इमारतीच्या गच्चीत १० बाय १० ची एक पत्र्याची खोली भाडय़ाने घेतली. गच्चीच्या एका कठडय़ाचा आधार घेत तीन बाजूने उभे केलेले पत्रे असं ते घर होतं. आमच्या या घरात एक कॉट, एक चूल आणि चार भांडी इतकंच होतं. पण तो आमचा, आम्हा दोघांचा संसार होता. अनेकदा तर असह्य़ उकाडय़ात जिन्यात झोपून रात्र काढावी लागत होती. पण ते आम्ही स्वीकारलं.. आयुष्य एका वेगळ्या वाटेने सुरू झालं. पुन्हा भाडय़ाने एक नवीन झेरॉक्स मशीन घेतलं आणि व्यवसायाला सुरुवात केली. नोकरी करायची नव्हतीच. अथक परिश्रम, जिद्द, प्रामाणिकपणा या मूल्यांच्या आधारावर आम्ही व्यवसायाची मोट बांधू लागलो.

शैलेशची आर्थिक परिस्थिती फारच कठीण होती. वडील एकटेच कमावणारे, त्यामुळे त्याचं लहानपण कष्टातच गेलं होतं. त्याला कष्टाची सवयच होती. अगदी आठवी-नववीत असताना तो आणि त्याचा भाऊ माउली (जोशी) बसस्टॉपवर काकडी आणि गजरे विकून पैसे मिळवत असे. प्रत्येक दिवाळी इतर मुलांसाठी आनंदाची असे, पण त्याच्यासाठी आणि त्याच्या कुटुंबासाठी पैसे मिळवणे हाच उद्देश असे. तो दिवाळीत फटाके विकायचा आणि सोबत किल्ल्यावरील पोस्टकार्डची घरे तयार करून ती पाच-पाच पैशांना विकायचा. पण खेळ त्याचा आवडीचा. शाळेत असताना तो प्रत्येक खेळात भाग घ्यायचा आणि जिंकायचा. त्यातूनच त्याला ज्यूदोचे वेड लागले आणि त्यानेच त्याच्या आयुष्याला एक वेगळे वळण दिले.

शाळा तर अशी कष्ट करतच गेली, पण पुढचं शिक्षण घेता यावं, कॉलेजमध्ये जाता यावं म्हणून तो रोज सकाळी साडेपाच ते साडेाठ या वेळात गाडय़ा धुण्याचे कामही करायचा. एक गाडी महिनाभर धुतल्यानंतर त्याला त्याचे वीस रुपये मिळायचे. जास्त पैसे मिळावेत म्हणून तो सात सात, कधी जास्त गाडय़ाही धुवायचा. पण तेव्हापासून त्याने आपल्याकडेही गाडी असणारच हे स्वप्न पाहिलं होतं. ते सत्यात आणण्यासाठी तो जिवापाड मेहनत घेत होता. कॉलेजचं शिक्षण होता होता आम्ही प्रेमात पडलो. मी सधन घरातून आल्याने मला त्रास होऊ नये यासाठी तो प्रयत्नांची पराकाष्ठा करत असे. आम्हाला नोकरी करायची नव्हती, हे अगदी नक्की होतं पण हाताशी भांडवलही नव्हतं, मग काय करावं हा प्रश्न आल्यावर आम्ही ठरवलं की, झेरॉक्स करण्याचं काम करायचं. दरम्यान, त्याने मित्रांच्या मदतीने आणखी काही छोटेमोठे उद्योग सुरू करायचा प्रयत्न केला, परंतु यश मिळाले नाही. झेरॉक्सच्या कामाने मात्र हात दिला.

लग्नानंतर २-३ महिन्यांनी घरच्यांनी आमच्याशी बोलायला सुरुवात केली. माझं माहेर खरंतर खूप श्रीमंत. घरी नोकरचाकर होते, पण तिथून आम्ही कधीच कोणतीच मदत घेतली नाही. शैलेश नेहमी म्हणतो की, तुझ्या आई-बाबांचा आशीर्वादच आपल्यासाठी लाखमोलाचा आहे.

आमचा संसार एका विशिष्ट वेगाने सुरू झाला. दरम्यान, आमच्या आयुष्यातली अत्यंत आनंदाची गोष्ट घडली. ८ ऑक्टोबर १९८६ ला आम्हाला विजयेंद्र ऊर्फ ‘विकी’ झाला; आणि आठच दिवसांत या आनंदात अजून भर पडली. शैलेशला ज्यूदो खेळण्यासाठी जपानला जाण्याची संधी मिळाली. त्याचं ते स्वप्न होतं. लहानपणापासून पाहिलेलं. प्रत्येक खेळात गोल्ड मेडल मिळवणारा शैलेश यात मागे राहणार नव्हताच. ते गोल्ड मेडल माझे आहे, ते मी मिळवणारच. ही त्याची जिद्द पुढे अनेक गोष्टींत उपयोगी पडली. कष्टाला पर्याय नव्हताच, आणि पैशांची चणचण होतीच, पण त्याच्या बोलण्याने, वागण्याने त्याने अनेकांची मने जिंकलेली होती. त्या सगळ्या मित्रपरिवाराच्या व अनेक हितचिंतकांच्या मदतीने तो जपानला गेला. तीन महिन्यांनी परत आला तो ब्लॅक बेल्ट घेऊनच; पण त्याहीपेक्षा एक नवीन प्रेरणा घेऊन! जपानी माणसाच्या उद्योगी असण्याच्या व सातत्याने कार्यरत राहण्याच्या स्वभावाचा शैलेशवर खूप प्रभाव पडला व परतल्यानंतर आम्ही नव्याने व्यवसायात उडी घेतली.

पुण्याच्या सारसबाग येथे भरलेल्या डिस्नेलँडमध्ये आम्ही खाद्यपदार्थाचा स्टॉल टाकला. त्याला इतका चांगला प्रतिसाद मिळाला की खाद्यपदार्थाचंच दुकान सुरू करायचं आम्ही ठरवलं. आमच्या पूर्वीच्या झेरॉक्सच्या दुकानाशेजारीच आम्ही ‘विकीज स्नॅक्स सेंटर’ नावाने एक छोटंसं हॉटेल सुरू केलं. काही दिवस सारसबागेत खाद्यपदार्थाचा स्टॉल लावला. स्वारगेटजवळ डोशाची गाडी चालवली; पण या स्नॅक्स सेंटरच्या कारभारात म्हणावा तसा जम बसत नव्हता. तेव्हाच माझ्या डोक्यात वडापावचा व्यवसाय सुरू करण्याची कल्पना आली. याला शैलेशचा विरोध होता, पण तरीही मी हट्टाने २ ऑक्टोबर १९८९ ला विकीज स्नॅक्स सेंटरच्या जागी ‘जोशी वडेवाले’ नावाने वडापावविक्रीचा श्रीगणेशा केला, आणि अक्षरश: पहिल्या दिवसापासूनच या उद्योगाला ग्राहकांचा जोरदार प्रतिसाद मिळाला. आमचा उत्साह आणखीनच वाढला. चविष्ट गरमागरम वडापाव, स्वच्छता, ग्राहकांना आपलंसं करण्याची वृत्ती व प्रामाणिकपणा यांच्या जोरावर आम्ही लवकरच पुणेकरांची मनं जिंकली. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून गणपतीसाठी येणाऱ्या भक्तांसाठी ‘जोशी वडेवाले’ हे क्षणभर विश्रांतीचं ठिकाण बनलं. आमच्या इतर शाखाही सुरू झाल्या. जसजशी प्रगती होत गेली तसं
आम्ही स्वत:चं घर, पहिली गाडी घेतली.

विकीच्या पाठीवर १९९२ मध्ये गौरीचा जन्म झाला. इथवरच्या प्रवासात एकमेकांवरचे प्रेम, एकमेकांवर असलेला विश्वास आणि कष्टाच्या जोरावर आम्ही साऱ्यातून निभावून गेलो. हळूहळू आमचे मित्र-मैत्रिणी व सर्व नातेवाइकांचीही साथ मिळू लागली. या सगळय़ांच्या प्रेमाने व आशीर्वादाने आमचं आयुष्य सुंदर बनत गेलं.

कितीही कष्ट करावे लागले तरीही तक्रार न करता आनंदी वृत्ती जोपासण्याची शिकवण मिळाली.

एकापाठोपाठ एक चांगल्या गोष्टी घडत गेल्या. जीवनाला स्थैर्य प्राप्त झालं, पण याच काळात एक प्रकारच्या निराशेने आमचं मन ग्रासून गेलं. गेल्या ७-८ वर्षांचा खडतर प्रवास आणि आता मिळालेलं अपरंपार सुख पाहून नको नको ते विचार मनात येत. ‘आपल्या संसाराला कोणाची दृष्ट तर नाही ना लागणार?’ ‘आपल्याबाबतीत काही वाईट तर नाही ना घडणार?’ अशा अनेक शंकांनी मन भरून जाई. पुढे होणाऱ्या त्या भयंकर घटनेची ती पूर्वसूचना होती की काय कुणास ठाऊक. पण नियतीने आमची परीक्षा पाहिलीच. ११ डिसेंबर १९९३ ला शाळेच्या ट्रिपसाठी गेलेला विकी एका भीषण अपघातात आम्हाला कायमचा सोडून गेला. आमचं सारं आयुष्यच कोलमडून गेलं. सगळंच अर्थहीन वाटायला लागलं. पार खचून गेलो आम्ही. अनेकदा जीवन संपवण्याचेही विचार मनात यायचे. फक्त गौरीमुळे आम्ही स्वत:ला सावरण्याचा प्रयत्न करायचो, पण तोही फक्त प्रयत्नच असायचा. विकीच्या जाण्याने जी पोकळी निर्माण झाली त्याने सगळय़ाच गोष्टींतून मन उडालं. व्यवसायातही रस वाटेनासा झाला.

वर्षभर आम्ही देवधर्म करत राहिलो. अनवाणी प्रदक्षिणा घातल्या, देवळं पालथी घातली, पळवाटा शोधत राहिलो. मन सारखं त्याला शोधत राहायचं. पण तो आता आपल्यात नाही आणि पुन्हा कधी कधी येणार नाही हे सत्य पचवता येतच नव्हतं. मनाची नुसती तगमग तगमग व्हायची. अशा या दु:खातून बाहेर पडण्यासाठी मित्र-मैत्रिणी, नातेवाईक व पुणेकरांची खूप मदत झाली. आम्हाला मानसिक आधार देणारी खूप पत्रं आली. या सगळ्या काळात मला खरी साथ मिळाली ती शैलेशची. त्याने मला खूपच सावरलं. स्वत:चं दु:ख बाजूला ठेवून तो माझ्यासाठी उभा राहिला. वेगवेगळ्या प्रयत्नांनी तो मला या दु:खातून बाहेर काढायचा प्रयत्न करत होता. आम्ही अनेकांना भेटत होतो. अनेकांशी बोलत होतो. शेवटी त्यानं एक रामबाण उपाय काढला. आमच्यासारखीच ज्यांची मुलं अपघातात गेली होती अशा पालकांना भेटायला मला तो घेऊन गेला. अशा अनेक आई-बाबांना भेटल्यावर समदु:खीपणावर फुंकर मिळाली. थोडा आधार मिळाला.

त्याच दरम्यान, एका कुटुंबात आम्हाला सद्गुरू श्री वामनराव पै यांच्याविषयी माहिती मिळाली. त्यांच्या तत्त्वज्ञानाने तर जणू नवी दिशाच मिळाली. त्यांनी सांगितलेले ‘तूच आहेच तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ हे तत्त्व पटले. आपण जसा विचार करतो तसाच आपल्या जीवनाला आकार मिळत जातो, हे मनोमन पटले. आम्ही खूप सकारात्मक विचार करायला लागलो. विकीच्या जाण्याने आमची शारीरिक अवस्थाही अशी झाली होती की डॉक्टरांनी पुन्हा मूल होऊ शकणार नाही असं सांगितलं होतं; पण सकारात्मक विचार आणि प्रार्थनेमुळे १९९६ मध्ये माझ्या मुलीचा- जीवनविद्याचा- जन्म झाला. तिच्या पाठीवर दोन वर्षांनी आनंदचा जन्म झाला. पुन्हा एकदा आनंद, सुख या गोष्टी भरभरून मिळाल्या.. आयुष्य पुन्हा एकदा मार्गी लागलं.

दरम्यानच्या काळात आमचं आमच्या व्यवसायात काहीसं दुर्लक्ष झालं होतं ते पुन्हा आम्ही एकाग्र केलं. पुण्यातल्या ‘जोशी वडेवाले’ या एका हॉटेलापासून झालेली सुरुवात हळूहळू १८ हॉटेलपर्यंत वाढत गेली. इतकंच नाही तर १९९८ मध्ये आम्ही आणखी एका व्यवसायाला सुरुवात केली आणि आमचं ‘गौरी मस्तानी हाऊस’ डौलात उभं राहिलं. श्री वामनराव पै यांचा अनुग्रह घेतल्यानंतर त्यांची तत्त्वे पटल्यानंतर आमच्या जीवनाला आध्यात्मिक जोड मिळाली. आता आमच्यामध्ये मतभेदाचे प्रसंग फार क्वचित येतात. आमच्या सुखी जीवनाचे रहस्य विचारलं तर मी सांगते, ‘शैलेश जर चिडला असेल तर मी शांत राहते आणि मी चिडलेले असेन तर तो शांत राहतो आणि राग शांत झाल्यावर चुका एकमेकांना समजावून सांगतो. त्या दिवशीचं चिडणं, राग त्या दिवशीच संपतो. पुन्हा तो विषय मुद्दाम काढून उगाळला जात नाही. त्यामुळे एकमेकांची साथ असते. परस्परांची मने जाणून घेऊन त्या पद्धतीनं वागणं हाच सहजीवनाचा खरा गाभा असतो. आमच्या लग्नाला ३० वर्षे झाली असली तरीही या सगळय़ामुळे आम्हाला रोजचा दिवस नवा वाटतो.

मुलांबद्दल बोलायचे झाले तर माझी तीनही मुलं खूप गुणी आहेत. अर्थात प्रत्येक आईला तसेच वाटते. गौरी सध्या होमिओपॅथीच्या शेवटच्या वर्षांला शिकत आहे. जीवनविद्या कला शाखेत पहिल्या वर्षांला, तर आनंद अकरावीत शास्त्र शाखेत शिकत आहे. असं हे आमचं कुटुंब एकमेकांवरच्या प्रेमाचं, विश्वासाचं म्हणून दिवसेंदिवस जगण्यातली रंगत वाढवणारं आहे. समाधान देणारं आहे.

एक काळ असा होता जेव्हा शैलेश कुणीच नव्हता. फक्त आणि फक्त कष्टच त्याच्या नशिबी होते. गजरे, फटाके विकणारा, खांद्यावर पाटी घेऊन ‘कवळी काकडी’ अशी आरोळी मारत फिरणारा शैलेश आज १८ हॉटेलांचा मालक झालाय. दुसऱ्यांची गाडी धुऊन महिन्याला वीस रुपये कमावणारा शैलेश आज सात गाडय़ांचा मालक झालाय. आजचं आमचं हे सगळं वैभव आम्ही जोडीने मिळवलं.. अनुभवलं. एक काळ असा होता जेव्हा त्याच्याशी लग्न करायचं म्हणून मला माझ्या घरच्यांना दुखवावं लागलं. तो नाइलाज होता, परंतु आज वाटतं, शैलेशशी लग्न केलं म्हणूनच अनेक संकटांवर मात करत का होईना मी खूप खूप काही मिळवलं. आज मी माझ्या संसारात सुखात आहे.
आणखी काय हवं असतं माणसाला जगायला?
-------------------------------------------------------------------------------