येत्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं राज्यभरातल्या तरुणाईचा कानोसा घेतला आणि तरुणाईच्या अनोख्या देशभक्तीचं वेगळंच दर्शन घडलं.
‘प्रजासत्ताक दिनाचं महत्त्व एका दिवसापुरतंच असू नये...’, ‘या दिवशी दिली जाणारी सुटीदेखील रद्द करावी...’, ‘राज्यघटनेचं महत्त्व प्रत्येकानं समजून घ्यावं...’, ‘मी भारतीय’ नव्हे; तर ‘आम्ही सारे भारतीय’ अशी संकल्पना असावी, असे विविध अभिनव विचार तरुणाईनं व्यक्त केले.
स्वतंत्र भारताची राज्यघटना ही कालानुरूप बदलणं आवश्यक आहे. मी स्वतंत्र भारताचा नागरिक आहे म्हणजे या देशाच्या राज्यकारभारापासून सर्व प्रक्रियेत माझा समावेश आहे. नागरिक म्हणून कर्तव्यांची जाणीव असणे अवश्य आहे. एखाद्या तिऱ्हाईत व्यक्तीनं माझ्या देशात येऊन नियोजन करणं वेगळं आणि देशातील व्यक्तीनं नियोजन करणं वेगळं. पारतंत्र्यातून बाहेर पडल्यावर देशात हळूहळू बदल होत गेले. या बदलांची वरवरची चर्चा करण्यापेक्षा प्रत्यक्ष बदलाचे काम प्रत्येकानं हाती घेतलं तरच राष्ट्राचा विकास होतो, अशी माझी धारणा आहे. आजच्या काळात देशभक्ती म्हणजे सतत चुका करणाऱ्या व्यक्तींना दूषणे देणे नसून नागरिक या नात्यानं आपलीही जबाबदारी विसरता कामा नये. कोणताही देश हा परफेक्ट नसतो. एखादी तरी उणीव असतेच, या उणिवांवर मात करत तो शिकतो. त्यामुळे बदलाची प्रक्रिया ही मंद गतीने होते.
- चैतन्य देशपांडे, पुणे
पैशासाठी काम करू नये
सत्तापालटानंतर नव्या सरकारकडून आमच्या खूप अपेक्षा आहेत. भारताचा आर्थिक, सामाजिकदृष्ट्या विकास होण्यासाठी श्रीमंत-गरिबांमधील दरी कमी करणे अतिशय गरजेचे आहे. प्रत्येक तरुणानं पैशासाठी, स्वार्थासाठी काम न करता देशाचा विकास होण्याच्या दृष्टीने एखादं कार्य केल्यास ती आजच्या काळातील देशभक्ती म्हणायला हरकत नाही. सध्या मी एक संकेतस्थळ विकसित करीत आहे. याचा फायदा स्थानिक; तसेच लहान गावातून आलेल्या प्रत्येकालाच उपयोगी पडेल अशी वाहतुकीची, पब्लिक ट्रान्स्पोर्टची, रिक्षांची माहिती यावर उपलब्ध होईल. माझ्या मते, आधुनिक काळात अशी देशसेवा केल्यास तरुणांना चांगली संधी मिळेल.
- अजिंक्य बच्छाव, पुणे
प्रामाणिक काम ही देशभक्तीच
भारताची राज्यघटना ही जगातील सर्वोत्तम घटनांपैकी एक आहे. ती योग्य प्रकारे न राबविल्याने काही त्रुटी आहेत असे वाटते. मात्र घटनेचे यशापयश हे ते राबविणाऱ्यांवर अवलंबून असते असे मला वाटते. २६ जानेवारीला घटना अमलात आली. मात्र आजही अनेक घटक उपेक्षित राहिलेले दिसतात. घटनेने प्रत्येकाला दिलेले स्वातंत्र्य उपभोगताना मात्र कमालीची बंधनं येतात. स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे; पण जर मला कोणतेही स्वातंत्र्य उपभोगताना अनेक बंधनं येत असतील तर त्याला स्वातंत्र्य मानावं का? आज कोणत्याही विषयावर लिहायचं/बोलायचं म्हटलं तर कोणत्या ना कोणत्या घटकांच्या भावना दुखावल्या जातात; मग नेमकं लिहायचं आणि बोलायचं कसं? पुरोगामी-प्रतिगामी-धर्मनिरपेक्षता या संकल्पनेचा अर्थ समाजातील काही मूठभर लोक ठरवतात आणि त्याचे प्रशस्तिपत्रक देतात. जर तुम्हाला ते मिळवायचं असेल तर त्या पद्धतीनेच तुम्हाला जावं लागतं. मला वाटते की प्रत्येकानं स्वतःचं काम प्रामाणिकपणे करणं हीसुद्धा देशभक्ती असू शकते. देशाला स्वातंत्र्य मिळाले आहे, देशासाठी काहीतरी करायचं ‘प्राणाची आहुती’ हे चित्र बदललं आहे.
- गणेश शेळके, भोसरी
वसुधैव कुटुंबकम्
देशाची खरी ताकद ही एकता आहे. त्याच जोरावर देशाची अखंडता टिकून आहे. महापुरुषांनी त्यासाठी एकच मानवतावादी संदेश दिला आहे. त्याचे कुठे तरी अनुकरण व्हायला हवे. तेच होतानाच दिसत नाही. त्यामुळे आजचा तरुण भरकटलेला दिसतो. सध्या धर्म ही संस्था मानवावर अधिराज्य गाजवत आहेत. सर्वधर्मीयांमध्ये सखोला असणे, ही सध्याची मोठी गरज बनली आहे. तरुण पिढीला जातीय दंग्यांची नव्हे तर शांततामय सहजीवनाची शिकवण मिळायला हवी. ‘वसुधैव कुटुंबकम’ ही संकल्पना रुजली पाहिजे. जात-धर्म यापेक्षा विज्ञान-तंत्रज्ञानाची कास धरणे गरजेचे आहे.
- फरहीन ख्वाजा, नगर
‘मी’पणा घातक!
विज्ञानयुग सुरू झाले आहे. प्रत्येक जण धावतं जीवन जगत आहे. त्यामुळे त्यात ‘मी’पणा आला आहे. प्रत्येक जण कुठे ना कुठे तरी आत्मकेंद्रित बनला आहे. सर्वांगीण विचार करण्याची कल्पना खुंटत चालली आहे. तरुणांमध्ये ही सर्वाधिक भावना दिसते. त्याला भरीत भर जोड म्हणजे पालकांची! आपला मुलगा डॉक्टर, इंजिनिअर बनला पाहिजे. त्यासाठी वाटेल ते करायची तयारी. यात पालकांचा ‘मी’पणा. येथून सुरू झालेला ‘मी’पणा स्वतःबरोबर देशालादेखील घातक ठरू शकतो. आत्मकेंद्रित झालेली व्यक्ती ही स्वतः व घरापुरताच विचार करते. तो सामाजिक जीवन समजू शकत नाही. समस्या जाणून घेऊ शकत नाही. याचे उदाहरण द्यायचे ठरल्यास देशाच्या पंतप्रधानांना स्वच्छतेसाठी करावे लागलेले आव्हान. देशाच्या विकासात आपले योगदान महत्त्वाचे आहे, लक्षात घेऊन सामाजिक जीवनातील कामे सर्वोत्तम कशी करता येतील, याचा प्रत्येकाने विचार केला पाहिजे.
- रणजित कर्डिले, नगर
सतत उपक्रम हवेत
माझ्या मते प्रजासत्ताक दिन फक्त एक दिवस म्हणून साजरा न करता शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम जागृत होईल असे उपक्रम नेहमी सुरू असावेत. राज्यघटनेबद्दल विस्तृत माहिती देत त्याचे महत्त्व तरुणाईला समजायला हवं. २६ जानेवारीकडे हॉलिडे म्हणून न बघता ज्यांनी स्वातंत्र्यासाठी बलिदान दिले त्यांचे विचार आपल्यामध्ये रुजवायला हवेत.
- दिव्या मारू, ठाणे
देशप्रेम कृतीतून दिसावं
२६ जानेवारी माझ्यासाठी ऐतिहासिक आहे. आपले देशप्रेम फक्त एक दिवस न दाखवता नेहमीच कृतीतून व वृत्तीतून दिसायला हवं. माझ्या मते आपल्या पूर्वजांच्या विचारांचा वसा पुढं घेऊन जात देशाच्या सामाजिक, आर्थिक प्रगतीसाठी हातभार लावून विवेकीपणानं प्रत्येक नागरिकानं आपली नैतिक जबाबदारी पार पाडून आपलं देशप्रेम प्रबळ करावं.
- भगवान बोयल, माटुंगा
हक्काचा योग्य उपयोग करा
प्रजासत्ताक दिन फक्त मौजमजेसाठी नसतो; तर त्याचे महत्त्व लोकांना समजायला हवे. प्रजा म्हणजे जनता आणि प्रजासत्ताक म्हणजे जनतेच्या सत्तेसाठी संविधानाने जनतेला प्रदान केलेले हक्क होय. ज्यांचा उपयोग जनतेनं योग्य ठिकाणी योग्य वेळी करून घ्यायला हवा. देशप्रेम म्हणजे राज्यघटनचे महत्त्व ओळखून प्रामाणिकपणे वागणे होय, जे एका दिवसापुरते मर्यादित नाही.
- वैभव पाटील, कामोठे, मुंबई
सुटीच देऊ नये
सरकारने २६ जानेवारीला सुटी न देता समाजासाठी उपयोगी पडतील असे अभियान राबवायला हवे व लोकांनी त्यात मनापासून सहभाग घ्यायला हवा. आपली राज्यघटना स्वतंत्र भारतातील जनतेच्या कल्याणासाठी आहे. माझ्या मते देशप्रेम म्हणजे फक्त देशावर प्रेम किवा देशाच्या रक्षणासाठी कार्यरत होणं, असा अर्थ नाही; तर आपल्या देशात विविध जातीधर्मांचे लोक राहतात त्यांच्यात प्रेम, शांतता राखणे हे देशप्रेमच आहे.
- संकेत शिंदे, मुंबई
मुलींचं योगदान मोठं
देशात राज्यघटनेची अंमलबजावणी झाल्यानंतर विकासाचे टप्पे सुरू झाले. हरितक्रांती, श्वेतक्रांती, दूरचित्रवाणीने देशाचा कायापालट झाला. रस्ते, धरणे, औद्योगिक क्षेत्राचा विकास झाला. देशाचे जगभरात स्थान बळकट केले. क्रीडा क्षेत्रातही देशाने मोठी भरारी घेतली. कोल्हापुरातील खाशाबा जाधव यांनी १९५२ला हेलसिंकी येथे झालेल्या ऑलिंपिक स्पर्धेत कुस्तीतले पहिले कांस्यपदक देशाला मिळवून देत देशाचा लौकिक वाढवला. आजही तोच वारसा चालविला जातो आहे. सुवर्णकन्या तेजस्विनी सावंत, राही सरनोबत, अंजली भागवत या मुलींनी नेमबाजीत आपले कर्तुत्व सिद्ध केले आहे. लोकशाहीच्या या देशात खरोखरच मुलींचे जीवन बदलूनच टाकले आहे.
- प्रेरणा शहा, मुरगूड, जि. कोल्हापूर
वंचित घटकांना न्याय
महिलांचे आर्थिक सक्षमीकरण करून त्यांना राजकीय प्रवाहात आणले जात आहे. लोकशाही प्रक्रियेत सर्व घटकांना समान महत्त्व दिले जाते. त्याची प्रचिती आपल्या देशात येत आहे. महिला आपल्या पायावर उभ्या राहत असून, सर्व क्षेत्रांतला त्यांचा वावर अभिमानास्पद ठरतो आहे. देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपतिपदी म्हणून प्रतिभा पाटील विराजमान झाल्या. ही बाब तर देशात लोकशाहीची पाळेमुळे किती खोलवर रुजली आहेत, ही दाखवणारी आहे. वंचित घटकांना मुख्य प्रवाहात आणले जात आहे.
- स्वाती भिडे, कोल्हापूर
लोकशाही प्रगल्भ
लोकांनी लोकांसाठी चालविलेला देश कोणता असेल, तर तो भारत असे अभिमानाने सांगावंसं वाटतं. देशात हिंदू, मुस्लिम, शीख, जैन, पार्शी, बौद्ध असे निरनिराळ्या धर्मांचे लोक गुण्यागोविंदानं राहतात. देशावर कोणते संकट आले, तर त्यांच्यातील एकोप्याचं दर्शन घडतं. पेशावरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शालेय मुलांची हत्या झाली आणि त्यांना आदरांजली वाहण्यासाठी कोट्यवधी भारतवासीय पुढे आले. भारतात इतकी शांतता का, या प्रश्नाचे उत्तर लोकशाहीत सामावले आहे.
- मृणालिनी पाटील, कोल्हापूर
विकासाकडे वाटचाल
आपण जगातल्या मोठ्या लोकशाहीचे घटक आहोत. संघराज्य पद्धतीमुळे देशाच्या प्रत्येक निर्णयात समाजातील प्रत्येक घटकाचा विचार केला जातो; तसेच तरुणाईतील जागरुकतेमुळं देशात मोठे बदल होत आहेत. लोकशाहीची योग्य ती शासनपद्धती असल्याने, समाजाची विचारसरणी बदलून देशाची विकासाकडं वाटचाल सुरू आहे. सर्वच क्षेत्रांत आपला देश प्रगतीच्या वाटेने जाताना, ग्रामीण भागातील लोकांचा जबाबदारीने विचार केला जातो आहे. त्यांच्यासाठी शासन वैविध्यपूर्ण योजना राबवत आहे.
- पवन मुंडे, कोल्हापूर
संशोधनात रमण्याची गरज
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणाच्या जोरावर देशाला घटना बहाल केली. आजच्या तरुणांनी हा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून शिक्षण घेतल्यास देशाची आंतरराष्ट्रीय पातळीवरची प्रतिमा अधिक प्रभावी होईल. शिक्षण क्षेत्राची आजची परिस्थिती पाहिल्यास आजचा तरुण इतरत्रच जास्त रमतो. त्यामुळे आजच्या तरुणांची वैचारिक पातळी ढासळल्याचे दिसते. तंत्रज्ञानामुळे मोबाईल अन् त्यामुळे विद्यार्थ्यांच्या हातात इंटरनेट, अशी आजची स्थिती आहे. हेच आपले जग असा आजच्या विद्यार्थ्यांचा समज होऊन बसला आहे. हा बदल देशाच्या प्रगतीसाठी घातक आहे. विद्यार्थ्यांना संशोधनात रुची राहिलेली नाही. ती वाढावी यासाठी प्रयत्न होत नाहीत. भाषा, ज्ञान, तंत्रज्ञान, विज्ञान आणि त्यातील समरसता याची भेळ विद्यार्थ्यांना आजच्या काळात गरजेची बनली आहे. समाज केंद्रस्थानी मानून, समजून त्या दृष्टीनं विद्यार्थ्यांनी संशोधन केले पाहिजे.
- अजय बनसोडे, नगर
स्त्री सुरक्षित हवी
विभिन्नता व वैविध्य हे आपल्या देशाचे वैशिष्ट आहे. जात, धर्म, भाषा, आचार-विचार सर्व काही विभिन्न आहे. या सर्व घटकांचा परिणाम समाजजीवनावर पडलेला दिसतो. आधुनिक युगात सगळ्या संकल्पना बदलल्या आहेत. आजची स्त्री ही कामात पुरुषांनादेखील वरचढ ठरू लागली आहे. तरीदेखील महिला अत्याचाराला बळी ठरत आहेत. त्यामुळे पूर्वीप्रमाणेच आजची स्त्री समाजात असुरक्षित आहे. कायद्याच्या चौकटीकडे बोट दाखवून स्त्री सुरक्षित असल्याचे सांगितले जाते; पण ही खोटी प्रतिमा आहे. स्त्रीला सुरक्षित आणि अभिमानाने जगता येईल, असा समाज निर्माण झाला पाहिजे.
- सीमा उपाध्याय, नगर
महिलांना प्रतिष्ठा हवी
नॅशनल क्राइम रेकॉर्डस ब्यूरोच्या अहवालानुसार देशात बलात्काराचे प्रकार वाढताना दिसतात. देशात महिलांना सुरक्षितता मिळायला हवी. कायदे भक्कम आहेत, पण तरी दोषी मोकाट सुटतात. यामुळेच गुन्हेगारी वाढते. गेल्या काही वर्षांत स्त्री साक्षरता वाढविण्यात यश आले आहे. पण सुरक्षिततेचे वातावरण अद्यापपर्यंत उपलब्ध करून देऊ शकलेलो नाही. सर्वांनी संवेदनशील व सतर्क होणे गरजेचे आहे.
- केतन पाटील, नाशिक
मोफत शिक्षण हवं
जगातील सर्वांत भक्कम लोकशाही म्हणून भारताकडे बघितले जाते, ही गौरवशाली बाब आहे. पण विकसित देश म्हणून देशाची ओळख निर्माण व्हायला हवी. जन्माला आलेले प्रत्येक बाळ, मग तो मुलगा असो किंवा मुलगी, प्रत्येकाला किमान बारावीपर्यंत शिक्षण मिळालं पाहिजे. त्यातही मोफत शिक्षण देऊन साक्षर मुलींची टक्केवारी वाढवायला हवी. युवकांनी देशाचे नेतृत्व करून खऱ्या अर्थाने प्रजेची सत्ता आणण्याची गरज आहे.
- अनिरुद्ध सिद्धगणेश, नाशिक
जातीचं राजकारण थांबावं
भारतीय अद्यापपर्यंत स्वतंत्र होऊ शकलेले नाहीत. आधी इंग्रजांचे राज्य होते, आता देशातीलच काही मूठभर लोक राज्य गाजवीत आहेत. राष्ट्रीय कणखर नेतृत्व, नॅशनल हिरो आज शोधून सापडत नाहीत. अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत तत्त्वासाठी सुरू झालेली पंचवार्षिक योजना आजही या मुद्द्यांवरच काम करत आहे. आजही या मूलभूत घटकांपासून मोठी लोकसंख्या वंचित आहे. जातवार विभागणी करून ठेवली आहे. जातिभेद न करता आर्थिकदृष्ट्या मागासांना मदत करत मुख्य प्रवाहात आणले पाहिजे.
- कोमल गुप्ता, नाशिक
इथली माती प्रेम शिकवते
देशाच्या राज्यघटनेने प्रत्येकाला व्यक्तिस्वातंत्र्य बहाल केलं आहे. लाखो जवानांनी देशासाठी प्राणार्पण केले आहे. इथली माती देशावर प्रेम कसे करावे हे शिकवते. आजही मातीतला हा गुण कमी झालेला नाही. त्यामुळेच परकीय शक्तींनी हल्ला केल्यास त्याविरोधात आपले सैनिक धैर्यानं मुकाबला करतात. त्यामुळे या देशात जन्माला आल्याचा खूप अभिमान वाटतो.
- शिवेंद्र कदम, कोल्हापूर
विविधतेतच एकता
आज आपण जे मुक्तपणे जगतो आहोत, त्याला आपल्या देशाची लोकशाही व्यवस्था कारणीभूत आहे. ती नसती, तर इथल्या माणसांनी काय केले असते, याची कल्पनाच करवत नाही. प्रत्येक राज्याची संस्कृती वेगळी, भाषा वेगळी, तरीही या देशाची एकजूट वादातीत आहे. प्रजासत्ताक म्हणजे प्रजेची सत्ता कशी असते, हे आपल्या देशातच कळू शकते. अन्य देशांना भारताविषयी आदर वाटण्याचं कारण इथल्या लोकशाही तत्त्वात आहे. जगात इतका विविध अंगांना नटलेला कुठला देश नाही. जो आहे तो फक्त आपला भारत देश. -
- गौरिश राव, कोल्हापूर
आम्ही सारे भारतीय आहोत...
प्रजासत्ताक म्हणजे स्वैर स्वातंत्र्य नव्हे, उन्मत्त वागणे नव्हे. स्वातंत्र्याच्या हक्काबरोबरच काही कर्तव्येही निभवावी लागतात. स्वतःला काही हक्क असले तरी इतरांच्या हक्कांवर आघात करण्याचा मुळीच हक्क नसतो. ‘देव नको, धर्म नको, धडपडणारा हात हवा’ असा मंत्र घेऊन युवकांनी आता पुढे यायला पाहिजे. प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्य दिन म्हणजे फक्त सुटी एवढीच काही जणांची मानसिकता आहे. ती बदलली पाहिजे. देशप्रेम आणि देशासाठी काहीतरी करण्याची जिद्द प्रत्येकाच्या विशेषतः युवकांच्या मनात निर्माण व्हावी. कर्तव्याचे पालन करून आपण प्रजासत्ताक दिनादिवशी संविधानाला वेगळी मानवंदना देऊ या आणि अभिमानाने जगाला सांगू, ‘मी भारतीय आहे...नव्हे... आम्ही सारे भारतीय आहोत...!
- सुहासिनी मस्के, सोलापूर
नोकरशाहीचा प्रभाव कमी व्हावा
प्रजासत्ताक म्हणजे प्रजेचा हक्क होय. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी माहिती अधिकार मिळवून दिला. लोकपाल विधेयकासाठी प्रयत्न केले. प्रजेसाठी सर्वार्थानं समृद्धी मिळावी यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. स्वातंत्र्यानंतर काही वर्षांनी जनतेला समता मिळाली, पण लोकशाहीमुळे ग्रामीण जनतेपर्यंत अद्यापपर्यंत कोणालाही यश आले नाही. अनेक वर्षे एकाच पक्षाच्या हाती सत्ता राहिल्यानं नोकरशाही फोफावली. देशात व राज्यात सत्ताबदल झाला आहे. पाहूया हे सरकारतरी देशाला खऱ्या अर्थाने प्रजासत्ताक करण्यात कितपत यशस्वी होतं ते.
- मुमताज इक्बाल शेख, सोलापूर
कायदे सर्वापर्यंत पोचावेत
प्रजासत्ताक म्हणजे काय, हेच आजच्या पिढीला माहिती नाही. आपल्या हक्क आणि कर्तव्याची जाणीव करून देणारा दिवस म्हणजे प्रजासत्ताक दिन. जनतेच्या हाती सत्ता आलेला दिवस. कायदे सर्वसामान्यांपर्यंत प्रभावीपणे पोचावेत. प्रत्येकानं कायद्यांचं पालन करावं यासाठी व्यापक स्वरूपात प्रयत्न होण्याची आवश्यकता आहे. आपल्या राज्यघटनेतील कायद्यांनी व्यक्तीला संरक्षण आणि अनेक अधिकार दिले आहेत. कायद्यांची माहिती सर्व स्तरांतील व्यक्तींना होण्यासाठी मनोरंजनात्मक कार्यक्रमातून जनजागरण मोहीम राबवावी. त्यातून कायद्याने व्यक्तींना दिलेले संरक्षण व अधिकाराबाबत जाणीव निर्माण होईल.
- राकेश धारा, सोलापूर
कर्तव्याची जाणीव हवी
प्रजासत्ताक दिन म्हणजे नागरिकांनी आपले कर्तव्य काय आहे, हे आठवण्याचा दिवसही असावा. देशाचा अभिमान बाळगणे सर्वांत महत्त्वाचं आहे. भारत सर्वच क्षेत्रांत आधुनिक होत आहे. विविध क्षेत्रांत विशेष कामगिरी होत आहे. यापुढे भारताची प्रगतीची झेप अशीच उंचावत जावी. भारताची लोकशाही ही सर्वांत भक्कम बाजू असली तरी आजही तळागाळातील असंख्य लोक अधिकारापासून वंचित आहेत. त्यांचे अधिकार त्यांना मिळणे गरजेचे आहे. अष्टौप्रहर डोळ्यात तेल घालून जिवाची पर्वा न करता भारताच्या सीमारक्षणाचे कार्य करणाऱ्या जवानांबद्दल लोकांमध्ये जागरूकता आणणे महत्त्वाचे आहे.
- पप्पू जमादार, सोलापूर
आरक्षण खऱ्या अर्थानं अमलात यावं
पूर्वी पितृसत्ताक पद्धतीमुळे मुलींना शिकविले जात नव्हते. पण समाजाची मानसिकता बदलत असून, शिक्षणात मुलींचा टक्का वाढला आहे. त्याचबरोबर आरक्षणातून महिलांचा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सहभाग वाढला, हे खरे असले तरी त्याच्या नावाने त्यांचे पती किंवा घरातील पुरुष मंडळी कामकाज पाहते. त्यामुळे महिला आरक्षण नावापुरतं न राहता, आरक्षणाचा प्रत्यक्ष उपयोग व्हायला हवा. कायद्याविषयी जागरूकता निर्माण करायला हवी. कायद्याचे ज्ञान तळागाळापर्यंत पोचले की अन्यायाला वाचा फोडण्यास कायद्याचा आधार घेता येऊ शकेल.
- श्रद्धा अमिन, नाशिक
राज्यघटनेची अमलबजावणी करा
भारताची राज्यघटनेने लोकशाहीला बळकटी दिली आहे. अर्थातच त्यात सामान्य माणूस केंद्रबिंदू आहे. मात्र, घटनेची योग्य अंमलबजावणी होत नाही. ती व्हावी तसेच या दिवसाचे महत्त्व नव्या पिढीला समजावे, यासाठी विविध उपक्रम राबवले जावेत. भारतात युवकांची संख्या जगाच्या तुलनेत सर्वाधिक असल्याने देशाच्या विकासाठी तरुणाईचा उपयोग व्हावा. देशभक्ती जागवण्यासाठी वादविवाद, भाषणे, कविता या माध्यमातून प्रयत्न व्हावेत.
- प्रियांका गढवे, औरंगाबाद
सार्वजनिक सुटी नकोच
देशाने समता, बंधुता आणि लोकशाही स्वीकारली, तो दिवस म्हणजे प्रजासत्ताक दिन! ६५ वर्षे झाली घटना स्वीकारून. मात्र, देशात म्हणावा असा बदल आणि विकास होत नाही. याबद्दल कुणाला दोष न देता तो स्वत: स्वीकारावा. आपणही याच देशाचे घटक आहोत. केवळ सुटी म्हणून प्रजासत्ताक दिन साजरा करण्याचे शहरी भागात फॅड आहे. म्हणूनच या दिवशी सुटी जाहीर न करता शाळा, महाविद्यालयांत देशभक्तिपर गीते, सांस्कृतिक कार्यक्रम घ्यावेत.
- हृषीकेश सकनुर, परभणी
प्रत्येकाचा विकास व्हावा
कल्याणकारी कायद्याचे राज्य प्रस्थापित झाल्याचा २६ जानेवारी हा मोलाचा दिवस आहे. बहुतांश शाळा-महाविद्यालयांत प्रजासत्ताक दिन साजरा होतो; परंतु त्याला केवळ सोहळ्याचे स्वरूप आले आहे. सोहळ्यापलीकडे जाऊन प्रजासत्ताक दिनाचे महत्व जाणले पाहिजे, असे माझे मत आहे. प्रजासत्ताकाकडे पाहताना ‘सुजलाम् सुफलाम्’ देश व मानवीय भूमिकेतून प्रत्येकाचा विकास, हेच आपले उद्दिष्ट आहे. किमान प्रजासत्ताकदिनी याची आठवण होते.
- प्रज्ञा तोडगिरे, लातूर
मूलभूत हक्कांचं रक्षण हवं
राज्यघटनेने बहाल केलेल्या स्वातंत्र्यामुळे आज प्रत्येक नागरिक आपले आयुष्य समाधानाने जगत आहे. त्यामुळे हा दिवस नागरिकांचा नवीन जन्म आहे, असे म्हटले तरी वावगे ठरू नये. राज्यघटनेने प्रत्येक नागरिकाला एका धाग्यामध्ये ओवल्याने कोणताही धर्मभेद, जातिभेद, लिंगभेद न मानता सर्व नागरिक गुणवत्तेने यशाची शिखरे गाठत आहेत. घटनाकारांनी ज्या उदात्त ध्येयाने राज्यघटना तयार केली, त्याच्या अंमलबजावणीस मात्र शासन, प्रशासन कमी पडत आहे. राज्यघटनेने सामान्यांना मुलभूत हक्के दिले आहेत. त्याचे रक्षण व्हावे.
- कनिष्क उजगरे
सामाजिक काम करावं
गणराज्य दिनाच्या निमित्ताने केवळ एकच दिवस राष्ट्रप्रेम व्यक्त करणे चुकीचे आहे. घटनेने आपल्याला मूलभूत हक्क दिले आहेत. त्याचा वापर करून प्रत्येकाने एक चांगला नागरिक म्हणून समाजात वावरावे. मात्र, आज कुणाचा हक्क कसा मारायचा, याकरिताच चढाओढ लागल्याचे बघून वाईट वाटते. ते बदलण्यासाठी प्रत्येकानेच समाजाच्या कल्याणासाठी काम करण्याची शपथ घ्यावी. या दिवशी तरुणांनी हुंदडण्यापेक्षा काही सामाजिक उपक्रम हातात घेऊन काम करावे.
- सुरभि गोडबोले, नागपूर
आता सामाजिक कामात सहभाग घेणार
प्रत्येक वर्षी मित्रांसोबत २६ जानेवारीला फिरायला जात असे. मात्र, या वर्षीपासून ते करणार नाही. महाविद्यालयातील एनएसएसद्वारे एखादा उपक्रम हातात घेऊन तो पूर्ण करणार आहे. २६ जानेवारी म्हणजे सुटीचा दिवस असून त्यादिवशी कुठेतरी बाहेर जावे असेच वाटते. ते चुकीचे आहे. घटनेमुळे आज स्वातंत्र्य उपभोगायला मिळत आहे. यावर्षीपासून २६ जानेवारीला मी सामाजिक उपक्रमांत सहभागी होणार आहे.
- सुरभि ठक्कर, नागपूर