हट्ट पडला महागात
- विजय कोलते
पूर्वीच्या
काळी घरात मुलांची संख्या जास्त असायची. १९७५ नंतर कुटुंब नियोजनाचा
प्रसार सुरू झाला. आणीबाणीच्या काळात लोकसंख्येला आळा घालण्याचे धाडशी
प्रयत्न झाले. खेड्यापाड्यात आरोग्य केंद्रांना कुटुंब नियोजनाची उद्दिष्टे
होती. ती साध्य करण्यासाठी काहीवेळा जोडप्यांवर बळजबरी करण्यात आली.
त्याचा फटका काँग्रेस पक्षाला बसला. सत्ता गेली; पण त्यानंतरही लोकसंख्या
फार कमी झाली नाही.
नंतरच्या
काळात शिकलेल्या तरुण-तरुणींनी स्वतः होऊनच कुटुंबनियोजनाचा मंत्र
अंगिकारला व लोकसंख्येला आळा बसायला लागला. खूप मुलांच्यामुळे सर्वांची
आबाळ होत होती. आई-वडिलांना मुलांना शिस्त लावण्याचा प्रयत्न करताना काही
वेळा आघोरी उपाय योजना करावी लागायची. त्यातूनच मुलांचं नुकसान होतं का?
याचा विचार केला गेला नसावा. असाच प्रकार लहानपणी माझ्या बाबतीत माझ्या
वडिलांकडून झाला. खेड्यापाड्यात जन्म होऊनही प्रतिकूल परिस्थितीवर मात करून
अनेकांना यशस्वी होता आले. आई-वडिलांचे संस्कार लहानपणीच होत असतात.
आई-वडिलांनी मुलांचे लाड करण्याची पद्धत अलीकडं रूढ झाली आहे. एक मुलगा व
एक मुलगी घरात असेल, तर दोघांनाही खूप प्रेम मिळतं. रागावलं जात नाही.
आई-वडील व कुटुंबीयांची भीती वाटत नाही म्हणून सध्याची पिढी बिघडली, असं
लोक म्हणतात. मी नेहमी सांगत असतो, की जी मुलं लहानपणी आजी-आजोबा यांच्या
मांडीवर खेळून नीतीकथा ऐकत झोपी गेली. ज्यांनी आई-वडिलांचा राग सहन केला.
गुरुजींची छडी खाल्ली. तीच मुलं भविष्यात गुणी ठरली, असं मला वाटतं. हे
म्हणणं माझ्यासाठीसुद्धा खरं ठरलं.
माझे
वडील (कै.) विनायक रामभाऊ कोलते फारसे शिकलेले नव्हते. परिस्थिती अत्यंत
नाजूक असल्यानं तिसरी-चौथीपर्यंत शिक्षण झालेले. गावातच प्राथमिक शाळा
होती. पूर्वीच्या काळी मुले १५-१६ वर्षांची असतानाच व्यवसायासाठी व
नोकरीसाठी मुंबईला जाण्याचा शिरस्ता होता. वडील मुंबईला गिरणीत कामाला
गेले. सोनोरी गावच्या कृष्णाजी कामठे यांच्या कन्या अनसूयाबाई बरोबर लग्न
झालं. चार मुले व मुलगी असा विस्तार झाला. घरामध्ये खाण्यापिण्याची आबाळच
होती. मेटाकुटीला येऊन (आई हयात आहे) कसातरी प्रपंच चालवित होती. माझा जन्म
१९५५मध्ये पिसर्वे (ता. पुरंदर) या खेड्यात झाला. १९६३पर्यंत पिसर्वे
येथील दुर्गम अशा वस्तीत म्हणजेच ‘नाईक मळ्यात’ आमचं एकत्र कुटुंब राहत
होतं. मी चार वर्षांचा असताना मला भात खाण्याची इच्छा झाली. त्या काळी
वर्षातून फक्त सणावारालाच जेवणात भात असायचा. मी कधीतरी भात खाल्ला होता,
म्हणूनच मला आठवलं, मी भाताचा हट्ट धरला. माझ्या आईनं शेजारी-पाजारी जाऊन
तांदूळ मागितले; पण कोणाकडंही मिळाले नाहीत. माझी समजूत काढण्याचा प्रयत्न
घरातील सर्व जण करीत होते. मी हट्ट धरून धायमोकलून रडत होतो. तितक्यात
वडील आले. त्यांनीही मला समजाविण्याचा प्रयत्न केला; पण उपयोग नव्हता.
शेवटी त्यांनी माझ्या कानशीलात खूप जोरात मारले. तेव्हापासून माझा उजवा कान
काही अंशी बधिर झाला, तो तब्बल आत्तापर्यंत. मी दोन वर्षांपूर्वी औषधोपचार
करून कान पूर्ववत केला.
या
भाताची आठवण मी कर्जतला कार्यक्रमात सांगितली. कृषी परिषदेचा उपाध्यक्ष या
नात्यानं २०११मध्ये मला डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या
अंतर्गत कर्जत येथील भात संशोधन केंद्राला भेट देण्याचा योग आला. राज्यातील
चारही कृषी विद्यापीठातील भात संशोधकांची दरवर्षी कर्जतला संशोधन परिषद
होत असते. या परिषदेचं उद्घाटन माझ्या हस्ते झाले. भाताची आवड मला किती
आहे आणि लहानपणापासून मी कसा भाताच्या प्रेमात आहे, याची आठवण सांगताना
अनुभव कथन केला. तेव्हा सर्व संशोधक चाटच पडले. मी म्हणालो, ‘‘म्हणूनच मला
भात संशोधन परिषदेच्या उद्घाटनाचा मान मिळाला, हे मी माझेय भाग्य समजतो.
आता खूप उत्पादन घ्या खेड्यापाड्यात, दुर्गम वस्तीवर आणि आदिवासी पाड्यातील
लहान मुलांना दररोज भात खायला मिळू देत, म्हणजे माझ्यासारखा गंभीर प्रसंग
कोणावरही येणार नाही.’’ माझे औचित्यपूर्वक भाषण ऐकून सर्वांनी टाळ्या
वाजवल्या.