"आरके‘
गेल्या काही महिन्यांपासून आजारी होते. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात
उपचारही सुरू होते. तज्ज्ञांची "टीम‘ त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून होती;
पण उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाचे वृत्त
समजताच रुग्णालयात चाहत्यांची गर्दी झाली. सिंबायोसिस संस्थेच्या आवारातील
"कॉमन मॅन‘च्या पुतळ्याजवळ मंगळवारी सकाळी त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी
ठेवण्यात आले. या वेळी राजकीय, सामाजिक, कला, शिक्षण क्षेत्रातील
व्यक्तींनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर वैकुंठ स्मशानभूमीत
त्यांना साश्रू नयनांनी दुपारी एकच्या सुमारास अखेरचा निरोप देण्यात आला.
त्यांच्या मागे पत्नी कमला, मुलगा श्रीनिवास, स्नुषा उषा लक्ष्मण असा
परिवार आहे.
रासीपुरम
कृष्णस्वामी लक्ष्मण असे "आरके‘ यांचे पूर्ण नाव. त्यांचा जन्म 23
ऑक्टोबर 1924 रोजी म्हैसूर येथे झाला. वडील म्हैसूर येथील शाळेत
मुख्याध्यापक होते. वडिलांच्या शाळेसाठी अनेक नियतकालिके त्यांच्या घरी येत
असत. "हार्पर्स‘, "पंच‘, "ऑन पेपर‘, "ऍटलांटिक‘, "अमेरिकन मर्क्युरी‘, "द
मेरी मॅगझीन‘ अशी अनेक मासिके त्यांना पाहायला-वाचायला मिळाली. तशी चित्रे
आपणही काढून पाहावी, असे त्यांना वाटू लागल्याने ते चित्रांकडे वळले.
सर्वसामान्यांच्या वेदना, त्यांची भावना "आरके‘ अचूकपणे टिपत. या
निरीक्षणातूनच पुढे त्यांनी चितारलेला "कॉमन मॅन‘ प्रचंड गाजला. चौकड्याचा
कोट, पांढरे धोतर असा साधाच त्याचा पोशाख. पण घटनांचे अचूक टिपण या चित्रात
असतं. त्यामुळे त्यांची व्यंग्यचित्रे सहजच लक्षात राहत असत. आसपासच्या
घटना मिस्कीलपणे दाखवीत असल्याने त्यांची चित्रे खास ठरली. त्यांनी आजवर
असंख्य व्यंग्यचित्रे रेखाटली; पण कधीही या माध्यमातून कोणास दुखावले नाही
किंवा कोणाच्या व्यंगावर चित्रे काढली नाहीत. त्यांच्या व्यंग्यचित्रांत
प्रांजळपणाचेही दर्शन घडायचे. त्यांचा हा "कॉमन मॅन‘ गेल्या साठ वर्षांतील
देशातील राजकीय-सामाजिक-सांस्कृतिक घडामोडींचा-उलथापालथीचा साक्षीदार ठरला.
व्यंगचित्रकलेच्या इतिहासाचे पान त्यांचे नाव घेतल्याशिवाय उलटता येणार
नाही.
मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस, केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर, सांस्कृतिक
कार्यमंत्री विनोद तावडे, शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे, मनसेचे
अध्यक्ष राज ठाकरे, पालकमंत्री गिरीश बापट, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज
चव्हाण, महापौर दत्तात्रेय धनकवडे, जिल्हाधिकारी सौरभ राव, खासदार वंदना
चव्हाण, नीलम गोऱ्हे, वात्रटिकाकार रामदास फुटाणे, व्यंग्यचित्रकार मंगेश
तेंडुलकर, चित्रकार रवी परांजपे, "सिंबायोसिस‘चे अध्यक्ष डॉ. शां. ब.
मुजुमदार, प्रधान संचालिका विद्या येरवडेकर, "एमआयटी‘चे डॉ. विश्वनाथ
कराड, पत्रकार दिलीप पाडगावकर, उल्हास पवार, "सरस्वती लायब्ररी‘चे कैलास
भिंगारे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी त्यांना या वेळी
श्रद्धांजली अर्पण केली.
लक्ष्मण यांचे स्मारक उभारण्याचा प्रस्ताव
आर.
के. लक्ष्मण यांची स्मृती जपण्यासाठी शहरात त्यांचे स्मारक उभारण्याचा
प्रस्ताव महापालिकेतील सभागृह नेते सुभाष जगताप यांनी मंगळवारी सादर केला.
लक्ष्मण यांना श्रद्धांजली अर्पण करताना सभागृहात त्यांच्या स्मारकाचा
प्रस्ताव मांडला. तत्पूर्वी महापौर दत्तात्रेय धनकवडे, कॉंग्रेसचे गटनेते
अरविंद शिंदे, मनसेचे गटनेते बाबू वागस्कर, भाजपचे गटनेते गणेश बिडकर,
शिवसेनेचे गटनेते अशोक हरणावळ, रिपब्लिकन पक्षाचे गटनेते डॉ. सिद्धार्थ
धेंडे तसेच विशाल तांबे, चंचला कोद्रे, माधुरी सहस्त्रबुद्धे, पुष्पा
कनोजिया आदींनी लक्ष्मण यांना श्रद्धांजली अर्पण केली.
आर. के. पुणेकर झाले! - डॉ. शां. ब. मुजुमदार
आर.
के. यांना पुणे फार आवडायचे. पुण्यात ते रमले होते. मुंबईच्या धकाधकीपासून
दूर असलेले पुणे त्यांना आवडले होते. पुण्याची हवा त्यांना आवडायची. काही
वर्षांपासून ते पुणेकरच झाले होते.
त्यांचा
आणि माझा 30 वर्षांचा स्नेह होता. अमेरिकेने 1985 मध्ये युवक वर्ष साजरे
केले. त्यानिमित्ताने सिम्बायोसिसने आयोजित केलेल्या कार्यक्रमास ते प्रमुख
पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यानंतर ते अधूनमधून मुंबईहून पुण्याला येत
आणि त्यामुळे त्यांचा पुण्याशी स्नेह जुळला. त्यांनी त्यापूर्वीच औंधला
छोटेसे घर घेतले होते आणि ते भाडेतत्त्वावर दिले होते. त्यांना व त्यांच्या
पत्नी कमला यांना मुंबई सोडायची होती. त्यांनी मुंबईतील आपला फ्लॅट मुलगा
श्रीनिवासला दिला आणि ते पुण्याला आले. घराच्या जागी अपार्टमेंट बांधून
त्यातील फ्लॅटमध्ये ते राहू लागले. त्यांच्याकडे मी अनेकदा जात असे आणि
गप्पा मारत असे. ""मी 50 वर्षे रोज व्यंग्यचित्र काढतो आहे,‘‘ असे त्यांनी
सांगितले. त्यावर मी त्यांना, ""तुमच्या मानसपुत्राचे, कॉमन मॅनचे पुतळ्यात
रूपांतर का नाही करीत,‘‘ असे विचारले. त्यांनी ""कोण करणार,‘‘ असा प्रश्न
विचारला. त्यावर मी म्हटले, ""सिम्बायोसिस करेल.‘‘ त्यानुसार शिल्पकार डी.
एस. खटावकर यांना विचारले. त्यांनी त्यांचे चिरंजीव विवेक यांना सांगितले
आणि त्याने पुतळ्याचे काम केले. पुतळ्याखालचा चौथरा संगमरवरी करू या, असे
चर्चेत ठरले; पण त्याच रात्री त्यांनी मला फोन केला आणि "कॉमन मॅन दगडावर
करू या,‘ असे सांगितले.
एकदा
गप्पांमध्ये त्यांनी मला, ""तुमचा देवावर विश्वास आहे का,‘‘ असे विचारले.
मी उत्तर दिल्यावर त्यांनी दुसरा प्रश्न विचारला, पण देवाचा तुमच्यावर
विश्वास आहे का. त्या प्रश्नाने मला अंतर्मुख केले. ते म्हणाले, ""तुमचे
चारित्र्य चांगले असेल, विचार चांगले असतील तर देवाचा तुमच्यावर विश्वास
बसेल.‘‘
त्यांना
2003 मध्ये अर्धांगवायूचा झटका आला, त्यानंतर त्यांचा आवाज गेला.
त्यांच्या पत्नी कमला या नसत्या तर ते इतके दिवस जगूच शकले नसते. त्यांची
आठवण आम्हाला सतत राहील.
व्यंग्यचित्रांच्या प्रशिक्षण वर्गाची इच्छा
सिम्बायोसिसमध्ये
तुम्ही व्यंग्यचित्रांचा वर्ग का काढत नाही, असे त्यांनी मला एकदा विचारले
आणि शिकविण्याची तयारीही दाखवली. व्यंग्यचित्रे काढण्याची कला जन्मजात
असते की शिकवता येते, या प्रश्नावर त्यांनी ती शिकवता येते, असे उत्तर
दिले होते. त्यांची व्यंग्यचित्रे शिकविण्याची इच्छा मात्र तशीच राहून
गेली.
अखेरचा क्षणही "कॉमन मॅन‘सोबतच
आर.
के. लक्ष्मण यांचे पार्थिव "सिंबायोसिस‘मधील "कॉमन मॅन‘ पुतळ्याजवळ ठेवले
जावे, अशी कमला लक्ष्मण यांची इच्छा होती. त्यानुसार पार्थिव तेथे ठेवण्यात
आले. कायम "कॉमन मॅन‘ चितारणारे "आरके‘ अखेरच्या क्षणीही "कॉमन मॅन‘सोबत
पाहायला मिळाले. फुलांनी सजविलेल्या मंचावर त्यांचे पार्थिव ठेवण्यात आले
होते. वेगवेगळ्या क्षेत्रांतील नामवंतच नव्हे, तर ज्यांचा आवाज त्यांनी
आपल्या चित्रातून व्यक्त केला, असे सामान्य वाचकही या वेळी उपस्थित होते.
यातील अनेकांच्या भावनाही दाटून आल्या होत्या. मुकीम तांबोळी यांनी
चितारलेला "रडणारा कॉमन मॅन‘ आणि चारुहास पंडित यांच्या कुंचल्यातून
साकारलेला "रडणारा चिंटू‘ लक्ष वेधत होता. अशा वातावरणातच पोलिसांनी "आरके‘
यांना मानवंदना दिली. त्यानंतर त्यांचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत आणले.
अविस्मरणीय आठवण
व्यंग्यचित्र
कलेतील ते दोन दोस्त... दोघांचेही वय वाढलेले... प्रकृती खालावलेली... असे
असतानाही अनेक दिवसांनी जुना दोस्त पुण्यात भेटीसाठी आला. तोही तितक्यात
ताकदीचा व्यंग्यचित्रकार. त्याचा आपुलकीचा स्पर्श अन् मायेचे दोन शब्द
ऐकल्यानंतर "आरके‘ भावुक झाले होते. ते दोस्त म्हणजे शिवसेनाप्रमुख
बाळासाहेब ठाकरे. चार वर्षांपूर्वीचीच ही घटना. या वेळी बाळासाहेब म्हणाले
होते, ""मला पाहिल्यावर तो रडायलाच लागला. आता तो बोलू शकत नाही.
त्याच्याशी मीच सगळं बोलत होतो. मी सर्वांना सांगतो, आमच्या दोघांचा हात
असा आहे की, या हातांनी काढलेल्या व्यंग्यचित्रांमुळे राजकारण्यांना कापरं
भरायचे; पण आज आमचेच हात थरथरत आहेत.‘‘ ही आठवण "आरकें‘साठीही अविस्मरणीय,
अशीच होती.
डॉ. कलाम यांच्या आठवणीतील चित्र
"अन्कॉमन
मॅन‘ आणि "मिसाईल मॅन‘ यांची भेटही अशीच गाजली. साहित्यवेध आणि सरस्वती
लायब्ररीच्या दोन वर्षांपूर्वी झालेल्या या कार्यक्रमात माजी राष्ट्रपती
डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या हस्ते "आरके‘ यांना भारतभूषण
पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या वेळी डॉ. कलाम यांनी दोन आठवणी
सांगितल्या. अग्नी प्रेक्षपणाच्या कामात व्यग्र असतानाचे माझे व्यंग्यचित्र
"आरके‘ यांनी रेखाटले आहे. माझ्या केसांतून ते जात आहे, असे त्यांनी त्यात
दाखवले होते, तर दुसरे चित्र मी राष्ट्रपती भवन सोडल्यानंतर काढलेले आहे.
माझ्या दोन्ही हातांत दोन बॅग आहेत. एकावर जनतेचे प्रेम आणि दुसऱ्यावर
नीतिमूल्यांची ठेव, असे त्यांनी लिहिले होते. हे डॉ. कलाम यांनी या वेळी
आवर्जून सांगितले.
पुतळ्यामागची कथा
"सिंबायोसिस‘च्या
आवारात दिसणाऱ्या "कॉमन मॅन‘च्या पुतळ्याची कथा डॉ. शां. ब. मुजुमदार आणि
मूर्तिकार विवेक खटावकर यांनी उलगडली. मुजुमदार म्हणाले, ""आरके‘
यांच्यासोबत 2000च्या सुमारास झालेल्या एका भेटीत "कॉमन मॅन‘चा पुतळा
करायचा, असे ठरले. त्यानुसार आम्ही खटावकर यांची भेट घेतली आणि पुढील काही
महिन्यांत तो तयारही झाला.‘‘ खटावकर म्हणाले, ""हा पुतळा ब्रॉन्झचा आहे. तो
तयार करण्याआधी त्याचे लहान आकारातील नमुने मी "आरके‘ यांना दाखवले.
त्यांना ते आवडले; पण "कॉमन मॅन‘चा बूट कसा असावा, कोट कसा हवा, केस कसे
हवे... हे हळूहळू ते सांगू लागले. त्यामुळे मला माझ्या चुका कळल्या. नाराज न
करता त्यांनी मला प्रेरणा दिली. त्यानुसार मी पुन्हा पुतळा बनविला. त्या
वेळी "आरके‘ यांना आपल्या चेहऱ्यावरील आनंद लपविता आला नाही.‘‘