घ्या यू टर्न

सकाळचा चहा, नाश्‍ता बागेतील सहकाऱ्यांबरोबर घशाखाली उतरवताना घरातल्यांना दुषणं देण्याचा एककलमी कार्यक्रम सुरू असतो. घरी गेल्यावर मात्र "मुँह में राम‘ असं असतं.

सकाळच्या त्या कडक थंडीत, पण कोवळ्या उन्हात वामनराव फुल स्वेटर, मफलर, कानटोपी अशा वेशात बागेत जॉगिंग ट्रॅकवर संथ पावलांनी फिरत होते. भोवतालच्या बाकांवर साधारण त्यांच्याच वयाचे स्त्री-पुरुष सकाळच्या उन्हाची ऊब घेत होते. बहुतेकांची स्थिती सारखीच होती. संसारातली त्यांची "उबेची कवचकुंडले‘ नियतीने काढून नेली होती. लग्न झालेल्या मुली संसारात गुंतलेल्या, त्यामुळे आईवडिलांकडे लक्ष देण्यास सवड नाही. जावयाच्या मर्जीवर अवलंबून, तर काहींच्या बाबतीत नोकरीच्या निमित्ताने मुलं परगावी किंवा परदेशी. "प्रपंच माझा वेगळा‘ असं म्हणत पत्नीसमवेत दूर गेलेली. हे कालचक्र आहे आजच्या जीवनपद्धतीचं. घड्याळाच्या काट्यांबरोबर धावणाऱ्या लोकांचं.

तरुण वयात विवाह बंधन पत्करून लोक गृहस्थाश्रमात "एक दुजे के लिये‘ म्हणत प्रवेश करतात. त्या वेळी "हम दो‘ म्हणणारे नंतर "हमारे दो‘ (काही "हमारा एक‘) म्हणतात. प्रापंचिक जबाबदारीचा प्रारंभ होतो. पत्करलेली मुलांची जबाबदारी पंचवीस-तीस वर्षे सांभाळावी लागते. माता-पित्यांचे ते कर्तव्यच असते. मुलांची शिक्षणं, नोकऱ्या, जागेची शोधाशोध आणि ती सुखाने नांदावीत यासाठी सुयोग्य जोडीदाराचा शोध अशी टप्प्याटप्प्याने पत्करावी लागणारी ती चौफेर जबाबदारी असते. पार पडेपर्यंत आई-वडिलांचा संसाररूपी रथ निवृत्तीमार्गाकडे वळलेला असतो. जीवनाच्या शेवटच्या टप्प्यातल्या समस्या खुणावत असतात. मुलांकडे म्हातारपणाची काठी या दृष्टीने वृद्ध माता-पिता पाहतात. काही मुलं (जावई-सुना) भक्कम पाठिंबा मनात कृतज्ञ राहून देतात. वृद्ध आई-वडिलांची पुरेपूर काळजी घेतात. वृद्धाश्रमात न पाठविता पुरेपूर आर्थिक व मानसिक पाठिंबा देतात. आपल्या आईवडिलांच्या कष्टाचं, त्यागाचं, त्यांच्या निःस्वार्थी वृत्तीचं मूल्यमापन मुलांनीसुद्धा केलेलं असतं. अशा मुलांची संख्या आता समाजात कमी कमी होत आहे. काळाचा महिमा बदलत्या अभिरुची याचाच तो परिणाम.

आजकाल पुष्कळशा आई-वडिलांना कटू-गोड आठवणींची शिदोरी उराशी बाळगून अखेरचे दिवस "याचसाठी केला अट्टाहास‘ असं म्हणत कंठावे लागतात. पण समवयीन वृद्ध व्यक्तींशी "अनुभव शेअर‘ करताना त्यांचीही गाडी घसरते. आपली सून, मुलगा, पदरी पडलेला जावई यांच्या वास्तव अडचणी विचारात न घेताच, त्यांचे अवमूल्यन करण्याची चुकही काही वृद्ध जोडपी करतात. सकाळचा चहा-नाश्‍ता बागेतील सहकाऱ्याबरोबर घशाखाली उतरवत असताना सून मुलगा, मुलगी जावई यांना नावे ठेवण्याचा "एककलमी कार्यक्रम‘ विरंगुळा म्हणून चालू असतो. मात्र, घरी गेल्यावर पुन्हा "मुँह में राम‘ या धोरणाचा अवलंब ते करतात. मनात जाणीव असते शेवट मुलांच्या, नातेवाइकांच्या पायाशीच आहे. "विसरतील खास मला‘ अशी भीती मनात असते. कोणाचीही गरज, मुले-मुली, नातेवाईक, शेजारी-पाजारी कधीही पडू शकते. शेवटचा दिस गोड व्हावा, यासाठी संसारात यू टर्न आवश्‍यक असतो.

वृद्धापकाळी मनात विचारांचा गोंधळ चालू असतो. त्यामुळं सतत जागरूक असावं लागतं. समवयीन वृद्धात काही "कळलावे नारदही‘ असतात, ते किंवा त्या वृद्ध स्त्रिया जनसंपर्काचे काम मोफत करत असतात. तुमचा मुलगा, सून, जावई भेटण्याचाच अवकाश की "तुला म्हणून सांगते हो‘ असे म्हणत मन मोकळं करण्याचं पुण्य, कर्तव्य निष्ठेने काही आजी पार पाडत असतात. खरं तर त्यांच्या तारुण्यात आधीच्या पिढीला आपण कसं वागवलं, याचा विसरच त्यांना पडलेला असतो. पण हे चक्र पिढ्यान्‌ पिढ्या चालूच राहते, यालासुद्धा संसारातला "यू टर्न‘ म्हणता येईल. सासू पुन्हा पुन्हा आपल्या सुनेच्या, जावयाच्या घरी जात असते. सूनही मनातून सासू-सासऱ्यांना म्हणत असते, तुमचाच शेवट (वेड्यांनो) आहे माझ्या पायाशी. पण हे वास्तव बाहेरच्या जगात वावरताना सारेच ज्येष्ठ विसरलेले असतात. प्रत्येकाच्या आयुष्यात यू टर्न असतोच, पण तो वेळेत लक्षात यावा लागतो. वामनराव फारसे कुणाशी बोलत नाहीत. जेव्हा बोलतात, तेव्हा आजच्या पिढीबद्दल मनातला असंतोष कधीच व्यक्त करत नाहीत. कदाचित "मौनं सर्वार्थ साधनम्‌‘ या संसार तत्त्वाचा स्वीकार त्यांनी केला असावा.

पुनश्‍च हरिओम असं म्हणत आपल्यापैकी प्रत्येक जण घरात, कार्यालयात, नातेवाईक, समाजातील शेजारी-पाजारी यांच्याशी प्रसंगी बिघडलेले, ताणलेले संबंध सुधारण्याचा प्रयत्न करतो. सकारात्मक विचारसरणीच त्यातून सूचित होते. हासुद्धा यू टर्न मारण्याचा प्रयत्न समजावा लागेल. मात्र यू टर्न मारताना वाहनचालकाला जशी दक्षता घ्यावी लागते, तशीच दक्षता संसारातसुद्धा घ्यावी लागते. नातेसंबंध सुधारताना "यू टर्न‘ची इच्छा उलटसुलट अशी दोन्ही बाजूंनी असावी. एकमार्गी वाहतूक प्रसंगी आजारावर तात्पुरता उपाय ठरणंच जास्त शक्‍य असते. आजार तसाच राहतो, तात्पुरती मलमपट्टी कधीही गळून पडणं शक्‍य असतं.