लोकसभेच्या अध्यक्ष
सुमित्रा महाजन यांनी सभागृहाचे कामकाज तहकूब केल्यानंतर तरुण महिला
खासदारांनी सभागृहातच जे 'फोटोसेशन' केले, ते सर्वथा औचित्यभंग करणारे
होते. संसदेच्या अर्थसंकल्पी अधिवेशनाचा सोमवार हा पहिलाच दिवस. त्यामुळे,
राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर लोकसभेचे औपचारिक कामकाज अर्ध्या तासात
संपले. त्यानंतर, सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या ज्या नऊ महिला
खासदारांना ही फोटोसेशनची स्फूर्ती झाली, त्यांच्यात रक्षा खडसे आणि प्रीतम
मुंडे या महाराष्ट्रातून निवडून गेलेल्या दोन खासदारही होत्या. या तसेच
इतर महिला खासदारही प्रथमच या लोकसभेत निवडून गेल्या असल्याने त्यांच्या
मनात संसदतेल्या प्रत्येक गोष्टीची नवलाई आणि नव्हाळी असणे, स्वाभाविक आहे.
आपण देशातल्या सर्वोच्च सभागृहाच्या सदस्य आहोत, याचा त्यांना अभिमानही
वाटणे साहजिक आहे. मात्र, या सभागृहाचा त्यांनी स्टुडिओ बनविणे व
दिल्लीतल्या उदित राज या भाजप खासदारांना तात्पुरता फोटोग्राफरचा रोल देणे,
हे अनुचित घडले. संसदेचे कामकाज पाहण्यासाठी नागरिक एक तासाचा पास काढून
गॅलरीत जातात, तेव्हा त्यांना असंख्य सूचना दिल्या जातात. खाली कामकाज चालू
असताना एखाद्याने अगदी बसल्याबसल्या मांडी बदलली तरी सुरक्षारक्षक हलकेच
जवळ येऊन दटावू शकतो. संसदेचे गांभीर्य, पावित्र्य व महत्त्व अबाधित
राहण्यासाठी हे आवश्यकही आहे. मग हाच नियम खासदारांना का नाही, असा प्रश्न
मतदारांना पडू शकतो. सभागृहात दहा मिनिटे हे मोबाईल फोटोसेशन चालू होते,
तेव्हा ते सुरक्षा अधिकाऱ्यांच्या निश्चित लक्षात आले असणार. मग त्यांनी
नम्रपणे या खासदारांना हा औचित्यभंग लक्षात का आणून दिला नाही? सभागृहाचे
चित्रण किंवा तेथे फोटोग्राफी करण्याबाबत अत्यंत कडक नियम आहेत.
अध्यक्षांची पूर्वानुमती घेतल्याशिवाय एकही कॅमेरा अगदी रिकाम्यादेखील
सभागृहात प्रवेश करू शकत नाही. या खासदारांना या प्रथा आणि परंपरा कदाचित
माहीत नसतील. पण त्या असे काहीतरी करीत आहेत, हे लक्षात येताच सत्ताधारी
पक्षाचे प्रतोद किंवा इतर ज्येष्ठ नेत्यांनी त्यांना आवरायला हवे होते. तसे
झालेले दिसत नाही. तंत्रज्ञानाच्या घोडदौडीने हातातल्या मोबाईलमध्ये
कॅमेरा आला हे खरे, पण तो कुठे वापरायचा आणि कुठे नाही, याचा विवेक
सर्वांनीच बाळगायला हवा. अध्यक्ष सुमित्रा महाजन यांना आता नव्यानेच एक
वर्तनावली जारी करावी लागणार, हे मात्र निश्चित.
0 comments:
Post a Comment