चार दिवस पुस्तकाचे

buk 
अरुण जाखडे

घुमान येथे होत असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनावर मराठी प्रकाशकांनी बहिष्कार टाकला आहे. या पार्श्वभूमीवर गोरेगाव येथे 'चार दिवस पुस्तकाचे' हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. मराठी प्रकाशक परिषद आणि प्रबोधन, गोरेगाव (प) यांच्या एकत्र प्रयत्नांतून तो साकारणार आहे.

वाङ्मयीन चैतन्य निर्माण व्हावे आणि ग्रंथसंस्कृतीला बळ मिळावे, यासाठी मराठी प्रकाशक परिषद आणि प्रबोधन, गोरेगाव (प) यांच्या एकत्र प्रयत्नांतून 'चार दिवस पुस्तकांचे' हा कार्यक्रम येत्या ५ ते ८ फेब्रुवारी २०१५ या कालावधीत आयो‌जित करण्यात आला आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन घुमान येथे होईल, अशी घोषणा झाल्यापासून महाराष्ट्रातील प्रकाशक अस्वस्थ होते. ह्या मानसिकतेतून त्यांना बाहेर काढणे आवश्यक आहे. ह्या पार्श्वभूमीवर 'चार दिवस पुस्तकांचे' असा उपक्रम महाराष्ट्रातील अनेक शहरांत करावा असे ठरले. उद्योगमंत्री सुभाष देसाई ह्यांच्या प्रेरणेतून कार्यरत असलेल्या गोरेगावच्या प्रबोधन संस्थेने आम्हाला अतिशय सकारात्मक प्रतिसाद दिला. प्रबोधनचे कार्यकर्ते सुनील वेलणकर, शशांक कामत ह्यांनी ह्यासाठी मन:पूर्वक परिश्रम घेतले. अल्पकाळात ठरवलेल्या या उपक्रमात ३५पेक्षा अधिक प्रकाशकांचे ६० स्टॉल्स असतील. प्रा. द. मा. मिरासदार यांच्या हस्ते गुरुवार, ५ फेब्रुवारी रोजी सकाळी ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन होईल. या निमित्ताने प्रा. द. मा. मिरासदार यांचे कथाकथन ऐकण्याची संधी मुंबईकरांना त्याच दिवशी संध्याकाळी मिळेल.

६ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी आजच्या पिढीचे लोकप्रिय संगीतकार, गायक, वादक शंकर महादेवन यांची मुलाखत, तर ७ व ८ फेब्रुवारी या दोन दिवसांत मुलांसाठी विज्ञान खेळांची कार्यशाळा, तर पालकांसाठी 'मुलांना समजून घेताना' असा कार्यक्रम आहे. 'आजच्या कार्पोरेट विश्वातील संधी व आव्हाने' या कार्यक्रमाद्वारे तरुणांना मार्गदर्शन केले जाईल. त्यांच्या शंकांचे निरसन केले जाईल. यासाठी व्यवस्थापन क्षेत्रातील मकरंद रेगे, योगेश जोशी हे उपस्थित राहतील. एकूणच बालवाचक, तरुण पिढी ह्यांचा सहभाग ग्रंथप्रदर्शनात राहावा हा यामागचा हेतू. मुलांमध्ये विज्ञान व साहित्य यांची आवड निर्माण व्हावी यासाठी काही कार्यक्रम आयोजित केले आहेत.

मराठी वाचनसंस्कृती कमी होत चालली असताना, मराठी भाषा व पुस्तके याविषयी काही करणे गरजेचे आहे. मराठीतील मुद्रित प्रकाशने म्हणजे पुस्तके, नियतकालिके, वृत्तपत्रे यांना मोठ्या स्पर्धेला सामोरे जावे लागणार आहे. तंत्रज्ञानाच्या अतिरेकी वेगात 'साहित्य' ही गोष्ट दुर्लक्षित राहणे योग्य नाही. समाजाच्या संस्कृतीचे ते भूषण आहे. आणि म्हणूनच 'प्रबोधन' ह्या संस्थेने मराठी प्रकाशकांसाठी मदतीचा हात अतिशय सन्मानपूर्वक पुढे केला. यात उपकाराची भावना नाही, तर आपण सगळे मिळून मराठीसाठी काही करूया, ही प्रामाणिक भावना आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी एक लाख सह्यांचे उद्दिष्ट ह्या कार्यक्रमात ठेवले आहे.

मुंबईकर व इतर भागांतील मराठी वाचकांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे. पुस्तकांप्रमाणेच स्ट्रॉबेरी महोत्सवाचेही आयोजन केले आहे.

अशी ग्रंथप्रदर्शने होतात तेव्हा मला प्रश्न पडतो की, ग्रंथप्रदर्शन म्हणजे तरी नेमके काय? स्टॉल्स? पुस्तकविक्री? व्यवसाय? छे, मला यातले काही महत्त्वाचे वाटत नाही. आपण ग्रंथप्रदर्शनात दीर्घकाळ रेंगाळत राहतो, पुस्तकांचा विचार करतो, काय असायला हवे अथवा नसावे, याबद्दल चर्चा करतो, अनेक पुस्तकप्रेमी भेटतात. साहित्य व्यवहारातील इतर सर्व घटक एरव्ही एकमेकांना भेटत असतात, पण वाचकांची भेट होणे, त्यांना एकत्रित पाहणे ही वेगळी अनुभूती असते. अशा वाचकांमुळेच ग्रंथसंस्कृती उन्नयीत होते. हा 'वाचकमहोत्सव'च असतो. अशा प्रदर्शनात नवे लेखक, संपादक, विक्रेते भेटतात. ग्रंथप्रदर्शनातून पुढील काळासाठी मोठी पेरणी होत असते. हे ग्रंथप्रदर्शन म्हणजे घुमानच्या साहित्य संमेलनाला पर्याय वा समांतर कृती नाही तर 'चार दिवस पुस्तकांचे' या प्रारंभापासून 'तीनशे पासष्ट दिवस पुस्तकांचे' या प्रवासाचा प्रारंभ आहे.

0 comments:

Post a Comment