एका बाजूस खोल पाताळगंगा आणि दुसऱ्या बाजूला खडा
डोंगर यामुळं कसरत करत जावं लागतं. किलोमीटरभर गेल्यानंतर श्री
अक्कमहादेवीची दगडी शिळेवर कोरलेली अप्रतिम मूर्ती आहे.
अमावस्येच्या
अगोदरची रात्र म्हणजे चांदण्याचा अभाव आणि भयाण जंगलात श्वापदांच्या,
नागसर्पांच्या सान्निध्यात अंधेरी गुहेत रात्र काढली. निर्मनुष्य जंगलातून
झाडाझुडपांच्या व दगडधोंड्यातून उंच वारुळांना वळसे मारत, मार्ग काढत
सुमारे 14 किलोमीटर चालून "श्री स्वामी समर्थ‘ तपोभूमीला माथा टेकला.
कर्दळीवन
हे आंध्र प्रदेशातील कर्नुळ जिल्ह्यात नंदीकोटकूर तालुक्यात नलुमलाई
पर्वतात आहे. श्रीशैल्यम इथं मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेऊन "रोप
वे‘नं पाताळगंगाकाठी आलो. पाताळगंगेतील 25 किलोमीटरचा प्रवास बोटीनं करून
आम्ही अक्कमहादेवी मंदिराच्या लोखंडी कठड्यापाशी पोचलो. बोटीतून कठड्यावर व
कठड्यावरून पर्वताच्या पायवाटेला लागणं अवघडच! पण एकमेकांच्या आधारानं
उतरलो. पायवाटेनं मंदिराकडं जावं लागतं. एका बाजूला खोल पाताळगंगा, दुसऱ्या
बाजूला खडा डोंगर मग कसरत करत जावं लागतं. मित्रवर्य पानसे इथंच घसरले, पण
सावरले. सुमारे किलोमीटरभर चालल्यावर मंदिर लागतं. मंदिर कसलं ते पर्वताला
नैसर्गिक विवर पडून तयार झालेलं तपस्थान!
शिवगिरीच्या
जंगलात उंच उंच झाडे होती, पण पक्षी दिसले नाहीत. दुपारची वेळ होती. एकही
प्राणी दिसत नव्हता. दगडधोंड्यातून, खाचखळग्यांतून मार्ग काढायचा होता.
मधूनमधून वेगवेगळ्या प्रकारचे साप दिसत होते. आम्ही काठी टेकत खडे डोंगर
चढलो. मनात भीतीची पाल चुकचुकत होती, पण स्वामी सामर्थ्याच्या तपोभूमीला
माथा टेकविण्याची अनावर ओढ होती.
व्यंकटेश किनारा ते
अक्कमहादेवीची गुहा हा पायी प्रवास सुमारे नऊ किलोमीटरचा असावा.
दगडधोंड्याचे खडे चढण कसरत करत चढावं लागतं. खरी दमछाक वा परीक्षा याच
टप्प्यात होते. रात्रीचा मुक्काम मोठ्या गुहेत करावा लागतो. पाचशे माणसं
झोपतील अशी मोठी गुहा आहे. रात्री आत बाहेर अंधार असतो. मेणबत्त्या व
बॅटरीच्या उजेडात रात्र घालवावी लागते. स्वामी समर्थांचं प्रगटस्थान या
गुहेपासून पाच किलोमीटरवर आहे. हा मार्ग तुलनेनं सपाटीचा आहे. मात्र, अतिशय
घनदाट आहे. दुतर्फा उंच उंच वारूळं आहेत. पायवाटेवरील वृक्ष वेली बाजूला
सारत पुढं जावं लागतं. पायवाट नागमोडी आणि खाचखळग्यांची आहे. अखेरीस स्वामी
समर्थांच्या पादुकांवर माथा टेकतात व कृतार्थतेचा निःश्वास टाकतात. इथं
झाडाखाली पत्र्याची लहानशी शेड आहे. त्यात स्वामी समर्थांच्या पादुका आहेत.
जवळच पाण्याचा धबधबा आहे. भाविक स्नान करून पूजा-अर्चा, पारायणं करतात.
कर्दळीवन हे तपश्चर्येचे पवित्र ठिकाण आहे. ते कैलासाचं प्रतिबिंब मानतात.
या परिसरात अक्कमहादेवी, आदि शंकराचार्य,
शरणबसवेश्वर, श्रीपाद श्रीवल्लभ, वासुदेवानंद सरस्वती (टेंबे स्वामी)
लोकनाथतीर्थ गुळवणी महाराज अशा योग्यांनी तपानुष्ठानं केली अशी श्रद्धा
आहे. नृसिंह सरस्वती कर्दळीच्या पानावर गंगा पार करून आले, म्हणून याला
"कर्दळीवन‘ म्हणतात.
0 comments:
Post a Comment