स्वातंत्र्यानंतर देशाच्या राजकारणात मध्यवर्ती राहिलेल्या काँग्रेस
पक्षाने पक्षांतर्गत उद्रेकाच्या अनेक यादवी पचवल्या आहेत. पंडित जवाहरलाल
नेहरू यांच्या काळातील कामराज योजना असो की, इंदिरा गांधी यांच्या
कालावधीतील ओल्ड गार्ड विरुद्ध यंग टर्क असो. पक्षांतर्गत उद्रेकातून
दरवेळी काँग्रेसची पडझड झाली तरी नेहरू-गांधी परिवाराच्या मागे उभ्या
राहिलेल्या काँग्रेसला त्यातून कायम बळ मिळत आले आहे. हे सगळे सांगण्याचे
कारण म्हणजे काँग्रेस पक्ष पुन्हा एकदा पक्षांतर्गत यादवीच्या उंबरठ्यावर
उभा आहे, असे दिसते. पक्षातील ज्येष्ठ नेते विरुद्ध राहुल गांधी आणि
त्यांची टीम असा संघर्ष सुप्त स्वरूपात गेले कित्येक दिवस सुरू असून तो आता
अगदी टोकाला पोहोचलेला दिसतो. राहुल गांधी यांनी ऐन अर्थसंकल्पी
अधिवेशनाच्या तोंडावरच सद्य राजकीय परिस्थितीचे चिंतन करण्यासाठी घेतलेल्या
सुटीमागील खरे कारण हेच आहे, असे गांधीपरिवाराच्या जवळच्या नेत्यांचेही
म्हणणे आहे. राहुल गांधी यांची पक्षाच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्यानंतरच्या
काळात यश कशाला म्हणतात हे जणू काँग्रेस पक्ष विसरल्यातच जमा झाला आहे.
त्यामुळे, या अपयशाचे खापर अध्यक्षपदाकडे वाटचाल करणाऱ्या राहुल यांच्यावर
फुटणे स्वाभाविकच होते. राहुल आणि त्यांच्या टीमचे मात्र याबाबत वेगळे मत
आहे. राहुलना काँग्रेस पक्षात अनेक बदल करावयाचे आहेत. पक्षातील जुन्या
नेत्यांना ते मान्य नसल्याने ते यात अडथळे आणतात. त्यामुळे, राहुल यांना
मनाप्रमाणे व्यूहरचना आखता येत नाही आणि पराभव झाल्यावर मात्र त्याचे
संपूर्ण खापर त्यांच्या माथी फोडले जाते, असे राहुल यांना वाटते. यात राहुल
यांचा सर्वाधिक रोष हा पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार
अहमद पटेल तसेच जनार्दन द्विवेदी यांच्यावर असल्याची उघड चर्चा काँग्रेस
पक्षात सुरू आहे. सोनिया गांधी यांच्या संयमी स्वभावामुळे तसेच त्यांची
एकंदरीत खालावलेली प्रकृती लक्षात घेता त्यांना फार त्रास होऊ नये म्हणून
या जुन्या लोकांशी टोकाची लढाई लढताही येत नाही आणि त्यांना पक्षातील
महत्त्वाच्या पदांवरून दूरही करता येत नाही, अशा कचाट्यात राहुल गांधी
सापडल्यामुळेच त्यांनी या लढाईला वेगळ्या पद्धतीने टोकापर्यंत नेले आहे.
१९६९ साली इंदिरा गांधी यांनादेखील बँक राष्ट्रीयीकरण असो अथवा
संस्थानिकांचे तनखे रद्द करण्याचा निर्णय असो पक्षातील तेव्हाचे जुने नेते
मोरारजीभाई देसाई, संजीव रेड्डी, निजलिंगप्पा, स. का. पाटील आदींनी तीव्र
विरोध केला होताच. मात्र, जनतेची नाडी अचूक ओळखणाऱ्या इंदिरा गांधी यांनी
या सर्व जुन्या नेत्यांना एकटे पाडले आणि पक्षावर भक्कम पकड बसवली. मात्र,
इंदिरा गांधी आणि राहुल गांधी यांच्यात खूप फरक आहे. जनता पार्टीने पराभव
केल्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण करण्यासाठी इंदिराजी
स्वतः रस्त्यावर उतरल्या होत्या. बिहारमधील बेलची येथे दंगा झाला. वाहन
मिळाले नाही तेव्हा इंदिरा गांधी हत्तीवरून त्या गावात पोहोचल्या होत्या.
आणीबाणीमुळे नाराज झालेले भारतीय जनमानस क्षमाशील आहे, यावर विश्वास
असलेल्या इंदिरा गांधींनी लोकसंपर्क सोडला नाही. राहुल गांधी यांच्या
आजवरच्या वाटचालीत आपल्या आजीतील एकही गुण अजूनतरी दिसलेला नाही. राजकारण
वर्षाचे ३६५ दिवस व दिवसाचे २४ तास करावे लागते. त्यात पक्षांतर्गत वा
पक्षाबाहेरील आव्हानांमुळे उद्विग्न होऊन सुटीवर जाणे, हा काही उपाय नसतो.
राहुल गांधी यांची पक्षाला नवा चेहरा देण्याची लढाई योग्य असली तरी त्यांनी
निवडलेले हत्यार चुकीचे आहे. त्याने त्यांची प्रतिमा अधिकच मलीन होण्याचा
धोकाच अधिक संभवतो.
0 comments:
Post a Comment