हुंड्याच्या विरोधात कितीही मोठ्या प्रमाणावर जनजागृती होत असली, तरी त्याचा प्रभाव अद्याप कायम असल्याचे राज्यातील काही सामाजिक संस्थांनी केलेल्या पाहणीतून पुढे आले आहे. मुंबई, कल्याण, औरंगाबाद, अहमदनगर, अकोला, बुलडाणा येथे याबाबत पाहणी करण्यात आली असून, आजचे तरुण-तरुणी लिंगभावाकडे कसे पाहतात, हुंड्यावर त्यांचे मत काय आहे, याची उत्तरे यातून शोधण्यात आली. त्यासाठी १८ ते २१ वयोगटातील पाचशेहून अधिक तरुणांशी संवाद साधला गेला. पाहणीसाठी निवडण्यात आलेल्यांच्या संख्येवरून राज्यभराचा निष्कर्ष काढणे संख्याशास्त्रीयदृष्ट्या अयोग्य असले, तरी तो चूक आहे, असे म्हणण्यासारखी सामाजिक स्थिती नाही.
पाहणी केलेल्यांपैकी ७० टक्के तरुणांनी हुंड्याची प्रथा योग्य असल्याचे म्हटले आहे. हुंडा दिल्याशिवाय मुलीला चांगले स्थळ मिळत नाही, लग्नानंतर मुलगी सुखी राहण्यासाठी हुंडा देणे भाग पडते, असे मत अनेकांनी व्यक्त केले. मुलाकडच्यांनी स्वतःहून हुंडा नाकारल्यास मुलामध्ये काहीतरी खोट असल्याची चर्चा होत असल्याकडेही काहींनी लक्ष वेधले. केवळ अठरा टक्के तरुणांनी हुंड्याच्या प्रथेला विरोध दर्शविला असून, हुंडाविरोधी कायद्यांचा काटेकोर अंमल होत नसल्याचे म्हटले आहे. या प्रातिनिधिक पाहणीतील ही निरीक्षणे समाजातील पुरुषप्रधान वास्तव अधोरेखित करतात. हुंड्याची प्रथा कायम राहण्याबरोबरच ती रक्कम पाच-सहा आकड्यांपर्यंत वाढत चालली आहे. उच्च शिक्षणाचा खर्च आणि हुंड्याची रक्कम समप्रमाणात वाढत असल्याकडे पुण्यातील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी मध्यंतरी लक्ष वेधले होते.
आज मुलीही उच्च आणि व्यावसायिक शिक्षण घेत असल्या; त्याचबरोबर त्या करिअर करीत असल्या, तरी त्यामुळे हुंड्याचे प्रमाण कमी झालेले नाही. मोठाल्या लॉनवर खर्चिक लग्न करून खरी-खोटी प्रतिमा आणि प्रतिष्ठा निर्माण करण्याचे आकर्षण मध्यमवर्गीय आणि नवमध्यमवर्गीयांना वाटू लागले आहे. आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेला वर्गही उच्चभ्रूंचे अनुकरण करीत असल्याने हुंड्याची पद्धत कायम राहिली आहे. हुंड्याच्या प्रथेला असे अनेक कंगोरे असले, तरी मुख्य कारण पुरुषप्रधान मानसिकतेत दडले आहे. शेकडो वर्षांची ही मानसिकता सहज मोडणे शक्य नसले, तरी स्त्री-पुरुष समानतेबाबत व्यापक जनजागृती करणे, मुलींमधील शिक्षणाचे प्रमाण वाढविणे, त्यांना आर्थिकदृष्ट्या सबळ करणे, निर्णयक्षम करणे आदी उपाय करावेच लागतील. शिवाय कायद्याची कठोर अंमलबजावणी करावी लागेल. तरच हुंड्याच्या कुप्रथेला थोडेतरी तडे जाऊ शकतील.
0 comments:
Post a Comment