एन.सी.एल. कॉलनीत सर्वांत जास्त
मौजेचा सण रंगपंचमी-धुळवड असे. सर्व वयोगटांतील मंडळी त्यात उत्साहानं
सामील व्हायची. महिलाही आघाडीवर असायच्या.
माझं बालपण
राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा वसाहतीत (एनसीएल कॉलनी, डॉ. होमी भाभा रोड,
पाषाण) गेलं. या कॉलनीमध्ये प्रयोगशाळेतील संशोधक आणि इतर कर्मचारी राहत
असत. पंजाबी, केरळी, तामीळ, कन्नड, बंगाली अशा सर्व भाषांचे परिवार आणि
सर्व धर्मांचे लोक गुण्यागोविंदानं एकत्र राहत. सर्व जण सर्व सण
मिळून-मिसळून साजरे करीत. त्यामुळे पायसम, शिरकुर्मा, पोंगलची लज्जत,
श्रीखंड-पुरी आणि पुरणपोळीची चव मनसोक्त अनुभवायला मिळत असे. 1976 पासून
पुढील 15 वर्षे कॉलनीतील सणांचा आनंद-उल्हास मनात घर करून आहे.
आम्ही
तिथं एका इमारतीत तिसऱ्या मजल्यावर राहत होतो. तिथं सर्वाधिक महाराष्ट्रीय
कुटुंब होती. मराठी सणांची ऐट काही औरच होती. इमारतीसमोर मोठं पटांगण,
त्यात मुलांसाठी झोपाळे, घसरगुंड्यांची सोय होती. शाळा सुटल्यावर आणि
सुटीच्या दिवशी आम्ही मुलं-मुली एकत्र जमून पळापळी, शिवणापाणी, लगोरी,
झोपाळे खेळत असू. या पटांगणाचा मनसोक्त आनंद घेतला. दिवाळीत फटाके उडवणे,
होळी, रंगपंचमीची धामधूम याच पटांगणावर केली.
धुळवड-रंगपंचमी
या दिवशी इथं सारे जण जमत. रंगपंचमी ही कुठल्या एका भाषेची नसे किंवा
धर्माची नसे. लहान मुलं-मुली रंग, फुगे, पिचकाऱ्या घेऊन या उत्सवात सामील
होत. काकांनी भरलेल्या पिंपामधील रंगीत पाणी पिचकाऱ्यांत, फुग्यांत भरलं
जाई. एकमेकांना रंग फासून भिजवण्यात जो आनंद मिळत असे, तो अवर्णनीय होता.
पिंपातील रंग संपला, की पाइपनं पाणी खेळण्याचा मनमुराद आनंद आम्ही मुलं घेत
असू.
गार पाण्यानं भिजून थंडी वाजू लागे. अंगावर काटा येई. दात
वाजायला लागत. मग वेल्हेकाकू खोटं-खोटं रागावत. सर्वांना गरम चहा देत.
त्यांच्या प्रेमाची आणि गरम चहाची ऊब एकाच वेळी पोटात जाई. मग आमची घरी
जाण्याची लगबग सुरू होई. त्या दिवशी पाणी थोडा वेळ जास्त सोडण्यात येई.
अंगावरचा रंग घासून-घासून काढला जाई. अर्थात, रंग त्या दिवशी जातच नसे.
त्यानंतर आम्ही मुलं मोठ्यांची रंगपंचमी पाहण्यात दंग होत असू.
मी पाच
वर्षांची असतानाची गोष्ट. रंगपंचमी/धुळवडीचा दिवस असेल. बाबांची मित्रमंडळी
घरी आली. ते माझ्या बाबांना बाहेर घेऊन गेले. पाच वाजता दार वाजलं. आई
म्हणाली, ""दार उघड!‘‘ मी दार उघडलं. पाहते तर काय, बाबांच्या चेहरेपट्टीचा
आणि आवाजात साम्य असलेला माणूस दारात उभा होता. त्याच्या रंगरूपाकडं आणि
काळ्या-निळ्या चित्रविचित्र रंगांनी बरबटलेल्या कपड्यांकडं बघून मला फार
भीती वाटली. मग बाबा म्हणाले, ""अगं, मी तुझा बाबा आहे. मला घरात तर येऊ
दे!‘‘ मी त्यांचा आवाज ओळखला. मग माझी झालेली घबराट कुठच्या कुठे पळून
गेली. अशी या रंगाची मजा पुढच्या सणापर्यंत पुरत असे.
कॉलनीतले
मोठे पुरुष एकमेकांना बाहेर बोलावून घेत. त्याला सर्व जण पकडून रंगांनी
माखून टाकत. कोणाच्या घरी गेलं, तेथील गृहिणी त्यांचं स्वागत करून गोड
पक्वान्न-चहा देऊन निरोप देई. मग ही टोळी पटांगणावर गप्पा मारून घरी परतत.
ही निळ्या रंगाची कातडी साफ करायला दोन दिवस तरी लागत. कॉलनीतल्या आठवणी
आजही मनाला ताजेतवानं करतात. तेथील प्रेमळ माणसांचा सहवास आजही हवाहवासा
वाटतो.
0 comments:
Post a Comment