वयं मोठं? सपशेल खोटं!
- उज्ज्वला बर्वे"आता माझं वय झालं‘, असं वाक्य कुणाच्या तोंडून ऐकलं, की मला नेहमीच प्रश्न पडतो, की विशिष्ट वयातच विशिष्ट गोष्टी केल्या पाहिजेत, असे काही नियम आहेत का?
हा आणि असे प्रश्न पडण्याचं कारण माझे वडील. लहानपणापासून त्यांना बघत आलेय; पण विशिष्ट वय आणि वर्तन यांची सांगितली जाणारी समीकरणं त्यांच्याबाबतीत मला कधीच आढळली नाहीत. नेमका हाच विचार करीत असताना झर्रकन वडिलांच्या साऱ्या आयुष्यक्रमाचा एक धावता चित्रपटच डोळ्यांसमोर उभा राहिला.
वय वर्ष 81 : दोन- अडीच वर्षांच्या पणतीला "झुकू झुकू अगीनगाडी‘ गाणं म्हणताना ऐकल्यावर त्यांना वाटलं, अरे, ही गाणं म्हणतीये; पण हिनं आगगाडी कधी पाहिलीच नाहीये. उठले आणि पणतीला घेऊन स्टेशनवर गेले, आगगाडी दाखवायला. (अर्थातच बसनं. त्यांना रिक्षा दिसतच नसे.)
नातींशी संवाद : (नातींनी नव्या पद्धतीचे कपडे घातलेले असतात. कधी लांडे, कधी चित्रविचित्र) हे जे तू घातलं आहेस अंगात, त्याला काय म्हणतात? (मग सगळं ऐकून घेत) असं होय, अच्छा. नवीन प्रकार आहे वाटतं? वेगळा आहे; पण मला आवडला.
वय वर्षे 79 : सुरवातीच्या काळात नोकरी केली तेव्हा पगार कमी, जबाबदाऱ्या खूप. नोकरीनंतर पेन्शन नाही, तरीही अतिशय योग्य नियोजन करून जमवलेली पै पै प्रवासाची हौस पूर्ण करण्यासाठी. बरचसं फिरणं झालं; पण अमेरिका पाहायची राहिली होती. ती पाहण्याची शक्यता निर्माण झाली तेव्हा वय झालेलं. मित्रमंडळी, नातेवाईक बरोबर येण्याची शक्यता नव्हती (आणि चक्क अमेरिकेत एकही नातेवाईक नव्हता). मग प्रवास कंपनीबरोबर, एकट्यानंच जायचं ठरवलं. एकदा व्हिसा नाकारला गेला. चिकाटीनं पुन्हा अर्ज केला आणि शेवटी जाऊनच आले.
साधारण त्याच सुमाराला एका शाळेत कथाकथन करायला गेले होते. माईक बंद पडला. दोनेकशे मुलांना व्यवस्थित ऐकायला जाईल, अशा खड्या आवाजात तासभर उभं राहून गोष्ट सांगितली. मध्ये पाणीदेखील पिणं नाही की थांबणं नाही.
वय वर्ष 78 ः नातीला कामासाठी जुन्या बाजारात जावं लागणार होतं. पहिल्यांदाच जायचं होतं. तिला म्हणाले, "मी येतो दाखवायला‘. टांग टाकून तिच्या मागे स्कूटरवर बसले आणि गेले भरदुपारी बारा वाजता.
त्याच वर्षी सासवडपासून पंढरपूरपर्यंत वारीमध्ये चालत गेले. खूप छान वारी पूर्ण केली. मनात श्रद्धा कमी आणि उत्सुकता जास्त. तरीही.
वय वर्ष 75 : संगणक वापरायला शिकले. मराठी टाइप करायला लागले आणि चक्क स्वतःची पुस्तकं स्वतःच टाइप केली.
वय वर्ष 70 ते 75 : पत्नीला पूर्ण अंधत्व आलं. घरात दोघंच. सगळा स्वयंपाक शिकले, अगदी गोडधोडसुद्धा. कधीही त्यांच्या घरी गेलं, की काहीतरी ताजा पदार्थ मिळणारच.
वय वर्ष 60 ते 70 : कथाकथनाच्या आवडीच्या कामासाठी राज्यभर अखंड भ्रमंती; मिळेल त्या वाहनानं, मिळेल तिथं राहून, मिळेल ते खाऊन.
वय वर्ष 58 : नोकरी संपता संपता पहिल्यांदाच चारचाकीची सोय मिळाली, ड्रायव्हर मिळाला; पण हौस भारी. स्वतः गाडी चालवायला शिकले. हायवेवरदेखील पाच- सहा तास गाडी चालवू लागले.
एकाच सुमाराला निवृत्त होणारी दोन माणसं माझ्या पाहण्यात आली. एक म्हणत होते, "निवृत्त होतोय, आता काही स्कूटर लागणार नाही, विकून टाकतो.‘ हे म्हणत होते, "निवृत्त होतोय. आता खूप हिंडायला मिळेल. नवी चांगली स्कूटर घेतो.‘
बाबांना शंभर वर्षं जगायचं होतं; पण शेवटपर्यंत हिंडतंफिरतंही राहायचं होतं. कारण, अजून पीएच.डी. करायची होती. चीन, जपानला जायचं होतं. शंभर वर्षं तर काही ते जगले नाहीत; पण शेवटपर्यंत मस्त जगले आणि एका पहाटे झोपेत गेले.
मन, शरीर, विचार, जगण्याची उर्मी कायम ताजी ठेवणाऱ्या या माणसाच्या सहवासानं तर विलक्षण ऊर्जा मिळायचीच; पण ते गेल्यानंतर त्यांच्या आठवणीतून ती अजूनही मिळत राहिली आहे, हे किती छान, असं सतत वाटत राहतं. कारण, मी त्यांची मुलगी असले तरी ते सगळं आपोआप माझ्यात कसं येईल? त्यांचं किंवा त्यांच्या आठवणींचं बोट धरूनच ते जमेल, नाही का? वय मनात असतं हे कधीही तोंडानं बोलून न दाखवणारे; पण आपल्या वागण्यातून सिद्ध करणारे माझे वडील म्हणजे द्वारकानाथ लेले.