सगळ्यांचे लाडके "क्‍लासमेट्‌स'

प्रत्येक कॉलेजमध्ये एक अशी बॅच असते जिच्यासारखं आधीही कुणी नसतं आणि नंतरही कुणी येत नाही. असाच एक "क्‍लासमेट्‌स‘चा ग्रुप तुम्हाला कॉलेजच्या दिवसांत रमवू पाहतोय... प्रत्येक कॉलेजच्या कट्ट्यावर हमखास कानावर पडणारी, भिंतींवर दिसणारी वाक्‍यं पुन्हा एकदा ऐकू येताहेत. "माशाला पोहायला...,‘ "चड्डीत राहायचं....,‘ "व्हॅनिला आइस्क्रीम‘पासून "टॉन्सिल्सच्या ऑपरेशन‘पर्यंत तरुणाईला आकर्षित करणारे "क्‍लासमेट्‌स‘मधील डायलॉग चित्रपट प्रदर्शनाआधीच हिट झालेत. 

"म्हाळसा एंटरटेन्मेंट‘ निर्मित "क्‍लासमेट्‌स‘चा स्टायलिश लुक, कलरफुल प्रोमोज, तगडे कॅरॅक्‍टर्स, अपील करणारा एडिटिंग पॅटर्न आणि सतत कानात रुंजी घालणारं म्युझिक अशा दर्जेदार प्रेझेंटेशनमुळे येत्या शुक्रवारी (ता. 16) प्रदर्शित होणाऱ्या आदित्य सरपोतदार दिग्दर्शित "क्‍लासमेट्‌स‘ची चित्रपटसृष्टीसोबतच प्रेक्षकांमध्येही जोरदार चर्चा रंगलीय. 

"व्हिडिओ पॅलेस‘चे नानूभाई जयसिंघानी "एस. के. प्रॉडक्‍शन्स फिल्म‘चे कोमल व संदीप केवलानी प्रस्तुत "क्‍लासमेट्‌स‘मध्ये दिसणारे अस्सल मराठी वातावरण, त्यातली आपलेसे वाटणारे कलाकार, त्यांच्यातले प्रेम, संघर्ष, विचारसरणी, महत्त्वाकांक्षा आणि त्यातून घडणारे घटनाक्रम या सगळ्यामुळे चित्रपटाची उत्सुकता शिगेला पोचली आहे. अंकुश चौधरी, सचित पाटील, सई ताम्हणकर, सोनाली कुलकर्णी, सुशांत शेलार, सिद्धार्थ चांदेकर, सुयश टिळक, पल्लवी पाटील, संजय मोने, किशोरी शहाणे आणि रमेश देव ही "क्‍लासमेट्‌स‘ची तगडी स्टारकास्ट या सिनेमानिमित्त पहिल्यांदाच एकत्र आलीय. कॉलेजमधील जिवलग मित्रांची... सत्या, अनिरुद्ध, अप्पू, आदिती, रोहित, प्रताप, अमित, हीना या साऱ्यांच्या अनोख्या मैत्रीची कथा "क्‍लासमेट्‌स‘मधून प्रेक्षकांना पाहता येईल. 

चित्रपटाच्या संगीतासाठी अविनाश-विश्‍वजित, अमितराज, पंकज पडघन व ट्रॉय-अरिफ या संगीतकारांनी खूप मेहनत घेतली असून, प्रत्येक गीत आजच्या पिढीला आकर्षित करेल याकडे त्यांनी विशेष भर दिला आहे. चित्रपटातील गीते गुरू ठाकूर, मंदार चोळकर, क्षितिज पटवर्धन, विश्‍वजित जोशी या गीतकारांनी तितक्‍याच तरलतेने लिहिली आहेत. तरुणांना भावणारी चित्रपटाची पटकथा क्षितिज पटवर्धन, समीर विध्वंस यांनी लिहिली असून, तरुणाईला तोंडपाठ झालेले कडक संवाद क्षितिज पटवर्धन यांचे आहेत. के. के. मनोज यांनी चित्रपटाचे प्रसन्न आणि कलरफूल छायांकन केले आहे, तर कॉलेजच्या विश्वात रमवणारे कला दिग्दर्शन मनोहर जाधव याचे आहे. "क्‍लासमेट्‌स‘मधील प्रत्येक कलाकाराच्या व्यक्तिरेखेला साजेशी वेशभूषा मनाली जगताप यांनी डिझाइन केली आहे. चित्रपटाचे उत्कंठावर्धक संकलन इम्रान-फैझल यांनी केलंय. मनोहर वर्मा या साहस दिग्दर्शकांच्या मार्गदर्शनाखाली यातील साहस दृश्‍ये चित्रित झाली आहेत.