बाबला टॉप करून महागुणसच्या दिशेनं निघालो. समोरच
लष्कराचा कॅम्प आणि लंगर होतं. सपाटीसुद्धा होती. घोडेवाल्याला सांगितलं,
आता मी चालत येतो अन्...
आयुष्यात अनेकदा कठीण प्रसंग
येतात. त्यांना आपण आपापल्या शक्तीनुसार सामोरे जातो. अशा वेळी परिचित अथवा
अपरिचित व्यक्तींची मदत होत असते. असा एखादा कठीण प्रसंग आला आणि त्या
वेळी अपरिचित व्यक्तींची झालेली मदत यामुळे आपल्याला त्या अपरिचित
व्यक्तींमध्ये परमेश्वर भेटल्याची भावना होते. असाच कठीण प्रसंग माझ्यावर
अमरनाथ यात्रेमध्ये आला. त्या वेळी सोबतच्या मित्रांनी आणि त्या मार्गावरील
जवानांनी व डॉक्टरांनी केलेल्या मदतीमुळे मला त्यांच्या रूपात परमेश्वरच
भेटला असं वाटतं. अर्थात अमरनाथ यात्रा पूर्ण न करताच आम्हा सर्वांना परत
यावं लागलं, तरी त्याची खंत वाटत नाही.
मी व माझे तीन मित्र- गिरीश
गोखले, शरद वझे आणि मिलिंद ग्रामोपाध्ये असे चौघे जण ऑगस्टमध्ये श्रीनगर
मार्गे पहलगामला मुक्कामास पोचलो. दुसऱ्या दिवशी चंदनवाडीतून सुरक्षा
तपासणी झाल्यानंतर आमची तीन दिवसांची अमरनाथ यात्रा सुरू झाली. तिथं काही
घोडेवाले आम्हाला घोडा करा म्हणून मागे लागले. आम्ही त्यांना टाळण्याचा
प्रयत्
न
करीत होतो. त्या वेळी एक घोडेवाला म्हणाला, ""अगर आप मेरा घोडा नहीं लोगे
तो आपकी यात्रा पुरी नहीं होगी.‘‘ यावर मी त्याला उत्तर दिलं, की ""अगर
यात्रा पुरी नहीं होती है तो मै आधे रास्तेसे वापस आ जाऊंगा.‘‘ त्या वेळी
काहीच कल्पना नव्हती, की खरोखरच मला दुसऱ्या दिवशी परत फिरावं लागणार आहे.
पहिल्या
दिवसाचा शेषनागपर्यंतचा टप्पा रोमहर्षक आहे. वाटेत पीसू टॉपला छोटीशी
विश्रांती आणि तेथील लंगरमध्ये नाश्ता केल्यानंतर आम्ही झोझीबालमार्गे
सायंकाळी शेषनागला मुक्कामास पोचलो. चंदनवाडी ते शेषनाग हा पहिला टप्पा
वाटेतील उंच डोंगर आणि खोल दऱ्या यामुळे रोमहर्षक आहे. रात्री मिलिंदनं आपण
दुसऱ्या दिवशी घोड्यावरून पंचतरिणीस जाण्याचं सुचवलं. त्याला मी ताबडतोब
होकार दिला. गिरीश व शरद यांनी, आम्ही चालत येऊ. गरज पडल्यास घोडा करू, असं
सांगितलं.
दुसऱ्या दिवशी पहाटे नित्यकर्मे आटोपल्यावर लंगरमध्ये
चहा-नाश्ता करून आम्ही पंचतारिणीच्या दिशेनं निघालो. मी व मिलिंद
घोड्यावर, तर गिरीश व शरद चालत येत होते. त्या दिवशी पहिला टप्पा बाबल टॉप
आणि दुसरा टप्पा महागुणस टॉप इथं होता. आम्ही महागुणस येथे गिरीश व शरद
यांची वाट पाहण्याचं ठरलं होतं. बाबल टॉपचा पहिला टप्पा पार केल्यानंतर
महागुणसच्या दिशेने निघालो. समोरच लष्कराचा कॅम्प व लंगर दिसू लागले. रस्ता
सपाट असल्यानं मी घोडेवाल्यास सांगितलं, की खाली उतरून चालत येतो.
साधारणतः 100 मीटर चालल्यानंतर काही समजायच्या आत मी तोंडावर पडलो. कपाळावर
मोठी खोक पडली. चेहरा रक्तबंबाळ झाला, कोपरांवर आणि गुडघ्यावर खरचटलं.
एका
जवानानं मला पडताना पाहिलं आणि तो ओरडला, ""यात्री गिर गया!‘‘ तो आणि
त्याच्यापाठोपाठ पाच-सहा जवान स्ट्रेचर घेऊनच माझ्याजवळ आले. त्यांनी मला
तात्काळ स्ट्रेचरवरून मेडिकल कॅम्पमध्ये नेलं. तेथील डॉक्टरांनी जखमेवर
मलमपट्टी केली. सलाइन व इतर औषधे दिली आणि सांगितलं, की जखम मोठी असल्यानं
टाके घालावे लागतील. सीटी स्कॅन करावं लागेल. पण हे सर्व श्रीनगर इथं होईल.
मला शंका आली, की तेथून श्रीनगरला जायचं कसं? डॉक्टरांनी शंका दूर केली व
सांगितलं, की तुला तेथून स्ट्रेचरवरून पंचतरिणीस घेऊन जाऊ. तेथून
हेलिकॉप्टरनं बालताल आणि तेथून ऍम्ब्युलन्सनं श्रीनगरला नेण्यात येईल.
संबंधित डॉक्टरांनी वाटेतील मेडिकल कॅम्पवर आणि श्रीनगरच्या सरकार
हॉस्पिटलला (एसकेआयएमएस) माझ्याबद्दल सर्व माहिती कळविली.
त्यानंतर
जवानांनी मला स्ट्रेचरवरून पळतच पंचतरिणीस नेण्यास सुरवात केली. मागून
मिलिंद चालत येत होता. त्यानं गिरीश व शरदला घटनेची माहिती कळविली. (ते
चालत असल्यामुळे आमच्यामागं जवळपास दोन तास होते.) तेसुद्धा ताबडतोब
आमच्याबरोबर श्रीनगरला निघाले. परंतु मिलिंदनं त्याची आवश्यकता नसल्याचं
सांगितलं. पंचतरिणीच्या वाटेवर माझी दोनदा तपासणी झाली. एका तपासणीनंतर
माझा ताबा "एनडीआरएफ‘च्या जवानांनी घेतला. दोन्ही डॉक्टरांनी मी व्यवस्थित
असल्याचं सांगितलं. बालताल इथं माझी पुन्हा तपासणी झाली. मला तेथून
श्रीनगरला ऍम्ब्युलन्सनं न्यायचं ठरवलं. ऍम्ब्युलन्समध्ये माझ्याबरोबर एक
डॉक्टर आणि अटेंडंट होता. ते सारखी माझ्या तब्येतीची चौकशी करीत होते.
साधारणतः
तीन तासांच्या प्रवासानंतर आम्ही "एसकेआयएमएस‘मध्ये पोचलो. तिथं अमरनाथ
यात्रेकरूंसाठी वेगळी टीम कार्यरत आहे, हे पाहून मी व मिलिंद थक्क झालो.
तिथं आपल्या येथील हॉस्पिटलप्रमाणे मामा किंवा मावशी नसल्यानं मिलिंदनंच
स्ट्रेचर आणला व मला डॉक्टरांकडे घेऊन गेला. पुन्हा तपासणीनंतर
डॉक्टरांनी मला डोक्याचा एक्स-रे व सोनोग्राफी करावी लागेल, असं
सांगितलं. अधिक वेळ न घालवता या सर्व तपासण्याअंती रिपोर्ट नॉर्मल असल्याचं
सांगितलं आणि टाके घालण्यास सुरवात केली. जखम स्वच्छ केल्यावर भूल न देता
सात-आठ टाके घातले. त्यानंतर माझा डोक्याचा सीटी स्कॅनपण केला. तोही
रिपोर्ट नॉर्मल असल्याचं सांगितलं. तद्पश्चात मला डिस्चार्ज मिळाला.
अतिशय
महत्त्वाचं, मी पडल्यापासून ते डिस्चार्ज मिळेपर्यंत मला कुठलाही खर्च
करावा लागला नाही. एक्स-रे, सीटी स्कॅन, ऍम्ब्युलन्स, मलमपट्टी वगैरे सर्व
खर्च सरकारने (केंद्र व जम्मू-काश्मीर सरकारने) यात्री म्हणून केला.
डिस्चार्ज दिल्यानंतर मी पत्नीला फोन करून घटनेची माहिती दिली, तोपर्यंत
तीन मित्रांनी दुसऱ्या दिवशी सर्वांनी पुण्याला परत जायचा निर्णय घेतला
होता. तात्पर्य- अमरनाथ यात्रेच्या खडतर मार्गावर काही आणीबाणीची परिस्थिती
आल्यास लष्कराचे आणि "एनडीआरएफ‘चे जवान मदत करतात. मला अमरनाथचं प्रत्यक्ष
दर्शन घेता आलं नाही, याबद्दल खेद वाटत नाही. कारण वरील सर्व लोकांनी मला
जी तत्पर मदत केली ते सर्व माझ्यासाठी देवासमानच आहेत. कोण म्हणतो
परमेश्वर भेटत नाही? मला ज्या सर्वांनी मदत केली, त्यांच्या रूपानं मला
प्रत्यक्ष परमेश्वरच भेटला.