मागणी कमी; सोने उतरले


आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील उतरते भाव व देशांतर्गत कमी मागणी यामुळे सोन्याची किंमत कमी झाली असून, १० ग्रँममागे १०० रुपयांनी उतरत सोने २८,३०० रु.च्या पातळीवर उतरल्याचे राष्ट्रीय बाजारपेठेत दिसले. चांदीची किंमतही किलोमागे ६३५ रु.नी कमी झाली असून, ३९,४०० रु. किलो असा चांदीचा दर राहिला आहे.
अमेरिकेच्या फेडरल बँके ची बैठक, तसेच युरोपियन अर्थमंत्र्यांची ग्रीकला युरोझोनमध्ये ठेवण्यासाठी दिलेली मान्यता यामुळे मौल्यवान धातूंच्या मूल्यावर दबाव आला असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
सिंगापूरमधील सोन्याच्या किमतीत ०.७ टक्के घट झाली असून, दर औंशामागे १,२७२.४४ डॉलर असा भाव राहिला. १९ जानेवारीनंतरची ही सोन्याची सर्वात कमी किंमत असून, चांदी ०.४ टक्क्याने घसरली आहे. चांदीचा दर औंशामागे १७.८५ डॉलर राहिला.
राजधानी नवी दिल्लीत ९९.९ टक्के शुद्ध सोन्याचा दर २८,३०० रु. ला १० ग्रँम असा राहिला, तर स्टँडर्ड सोने २८,१०० रु.ला १० ग्रॅम या दराने विकले गेले. आठ ग्रॅमच्या सोन्याच्या नाण्याची किंमत कायम राहिली असून, २४,००० रु.ला ८ ग्रॅम सोने अशी आहे.
चांदीची किंमत किलोमागे ६३५ रु.नी कोसळली असून दर ३९,४०० रु. किलो झाला, तर चांदीच्या नाण्यांची किंमत १ हजार रु.नी कोसळली असून, १०० नाण्यासाठी खरेदी ६४ हजार रुपये व विक्री ६५ हजार रुपये असा दर आहे.