क्षितिजापर्यंत अथांग निळाई

क्षितिजापर्यंत अथांग निळाई

                                 - विजय देसाई 
मार्च महिना. होळीचे दिवस, उन्हाचा तडाखा वाढलेला. वैताग आला होता, पण डावीकडनं गावाचं रूपडं न्याहाळतच निवतीचा किल्ला चढायला सुरवात केली. माथ्यावर पोचलो अन्‌ जे दिसलं ते आवर्णनीय...

किल्ले निवतीला जाण्यासाठी सकाळी सावंतवाडीहून निघालो. कुडाळला पोचलो. पण सकाळची आठ-वीसची गाडी थोडक्‍यात चुकली. पुढच्या गाडीची चौकशी केली, ती साडेदहा वाजता होती. थोडा वेळ घालवून साडेदहाच्या गाडीत बसलो. पाऊण-एक तासात निवतीला पोचलो. गावाच्या अलीकडे वळणे घेत गाडी उतरताना समुद्रात घुसलेला सोनेरी खडक, त्याला गोल्डन रॉक म्हणतात, प्रत्यक्षात तो लालसर रंगाचा आहे. शाळेजवळून ते दृश्‍य फारच सुंदर दिसतं. निळ्याशार समुद्रात लाल रंगाचा घुसेला खडक. खडकाच्या पायथ्याशी विसावलेल्या डौलदार नौका, अलीकडे चवऱ्या ढाळणारे शालीन हिरवे माड आणि थोड्याशा उंचीवर असलेलं अतिशय निरागस सौंदऱ्याने नटलेलं किल्ले निवती गाव.

गाडी गावतल्या मोकळ्या जागेत थांबली. बाजूला थांब्याची छोटीशी शेड. सोनेरी खडक जवळून पाहण्याची इच्छा होती, फोटोही काढायचे होते. गाडी थोडा वेळ थांबणार होती, म्हणून कंडक्‍टरला विचारलं, जरा हिंडून येतो तोपर्यंत थांबणार का? तर त्यांनी सांगितले, की तसं सांगता येणार नाही. गाडी भरली तर निघणार. म्हटलं ठीक आहे. गावातून किनाऱ्याकडे गेलो. गोल्डन रॉक जवळून पाहिले. पण ते लांबूनच छान दिसत होते. परत आलो तर गाडी निघून गेलेली. पुढच्या गाडीची गावकऱ्यांकडे चौकशी केली, तर गाडीच नाही, असं कळलं. एकदम संध्याकाळी मुक्कामाचीच गाडी येणार असं त्यांनी सांगितलं. म्हटलं आली काही पंचाईत. गावात त्या वेळी हॉटेलही नव्हतं. गावातल्या सदाशिव सावंतांकडे गेलो, पूर्वीची ओळख नसतानाही घरातल्या गृहिणीनं भरपूर आटवलं आणि फजावची भाजी करून वाढली. पैसे द्यायला गेलो तर नको म्हणाली. गप्पा मारताना कुडाळला कसं जायचं हे विचारलं. कोणी गाडी घेऊन इकडे आलं तर सोय होईल, असं सांगितलं. नाही तर दुसरा मार्ग म्हणजे किल्ला चढून वर जायचं. किल्यावरून पलीकडे खाली उतरायचं आणि किनाऱ्यावरून वाळू तुडवत भागवे गावाला जायचं आणि तिथून दुपारची अडीचची गाडी पकडायची. मार्च महिना, होळीचे दिवस. काही इलाज नव्हता, परतणं आवश्‍यक होतं. उन्हाला चांदणं समजून किल्ला चढायला सुरवात केली. किल्ला फार उंच नाही, पण उन्हानं वैताग आला होता. डावीकडं गावाचं रुपडं न्याहाळत किल्ला चढून गेलो. माथ्यावर गेल्यावर समोर जे दिसलं ते केवळ अवर्णनीय होतं. किल्ल्याचा परिसर गावासारखाच छोटा. पलीकडे पाण्यातून डोकी वर काढलेले लाल-काळे खडक, पायथ्याला लगटून भोगव्याकडे गेलेला मऊसूत सोनेरी वाळूचा किनारा. टेकडी उतारावर गच्च भरलेले हिरवे माड आणि क्षितिजापर्यंत पसरलेला अथांग निळाशार समुद्र. वरती आकाशाच्या निळाईवर छोट्या पांढऱ्या करड्या रंगाचे ढगांचे पुंजके. उंचीवरून हे दृश्‍य लाजवाब दिसत होतं. क्षणार्धात सर्व थकवा, त्या निळाईत वितळून गेला. संपूर्ण किल्ल्यावर माझ्याशिवाय कोणीही नव्हतं. त्या एकांतात सर्व निसर्गरंग कॅमेऱ्यात घेऊन सावकाशपणे किल्ला उतरून मुलायम वाळूतून भोगव्याकडे निघालो. खाडीपलीकडे देवबागचा सुंदर परिसर. अडीचची गाडी पकडून यथावकाश सावंतवाडीला पोचलो. तेव्हा आभाळ थोडं भरून आलं होतं...