आजी रोज सकाळी 11 वाजता बाळगोपाळांना वरणभात
खायला घालायच्या. त्यांचं मुलांकडं नीट लक्ष असायचं. कोणतं मूल जेवत नाही,
भाजी खात नाही, याचा रिपोर्ट संध्याकाळी आईकडं जायचा.
आजीचं पाळणाघर
मागच्याच
आठवड्यात, मैत्रिणीबरोबर तिच्या नातवाला "डे केअर‘मधून आणायला गेले होते.
ते चकाचक डे केअर सेंटर, ती भारी भारी खेळणी, सायकली वगैरे पाहून माझं मन
पंचवीस वर्षे मागं गेलं. माझा भाचा दीड वर्षाचा होता. बहीण पूर्णवेळ
कॉलेजमध्ये नोकरी करायची. तिचे पती होते मर्चंट नेव्हीत! अमेयला ठेवायचं
कुठं? त्या वेळी हल्लीसारखी झकपक "डे केअर्स‘ नव्हती. कोणीतरी पुढच्या
गल्लीतल्या कर्वे आजींचं नाव सुचवलं. बहीण त्यां
ना भेटायला गेली. कर्वे आजींचा खूप मोठा बंगला होता. पुढील जागेत लॉन्ड्री, गिरणी अशी दुकानं होती.
आजी
आणि त्यांची सून केवळ हौस म्हणून पाळणाघर चालवीत होत्या. त्यांना आर्थिक
गरज तर मुळीच नव्हती. अमेयला सांभाळायचं त्यांनी कबूल केलं. प्रथम तो खूप
रडायचा, मग हळूहळू चांगलाच रुळला. त्याची इतर मुलांशी दोस्ती झाली. कर्वे
आजींच्या सोनी मांजरीशी खेळ, कुठं पपी कुत्र्याशी दंगा करत अमेय मजेत राहू
लागला. मग अमेयला झाला भाऊ आदित्य! तो तर कर्वे आजींकडे सहा महिन्यांचा
असल्यापासूनच जायला लागला. दोन्ही मुलगे खूप खूश असत तिथं. ते मुळी घरगुती
पाळणाघरच होतं. कर्वे आजी, रोज 11 वाजता सगळ्या बाळगोपाळांना वरणभात
भरवायच्या, त्याचं मुलांकडं नीट लक्ष असायचं. कोणतं मूल नीट जेवत नाही,
भाजी खात नाही, याचा रिपोर्ट संध्याकाळी त्याच्या आईकडं जायचा.
आदित्य
जास्त दंगेखोर होता, त्याची लॉन्ड्रीवाल्या काकांशी दोस्ती होती. शिवाय,
उसाचं गुऱ्हाळ सुरू झालं की सर्व मुलं तिथं हक्कानं रस प्यायला जात. त्या
काकांनी रसाचे पैसे कधीच मागितले नाहीत. दर श्रावणात कर्वे आजी, सगळ्या
मुलांना औक्षण करायच्या. या मुलांपैकीच कोणाची तरी आई, शुक्रवारची सवाष्ण
म्हणून जेवायला बोलवायच्या. एखादे दिवशी बहीण, मुलांना लवकर आणायला गेली,
तर मुलं म्हणत,‘ कशाला गं लवकर आलीस आई? घरी जा. गौरवशी अजून खेळायचं आहे
की आम्हाला!‘‘
अमेय, आदित्यच्या मुंजी झाल्या. कर्वे आजी, आजोबा,
कर्वे मावशी, सगळ्यांना आमंत्रणं होती, कर्वे आजींनी मुलांना झकास केळवण
केलं. माझ्या बहिणीनं, आजींना आणि मावशींना एकदम भारी साड्या घेतल्या. आता
मुलं मोठी झाली तरी पाळणाघरात जातच होती. शाळेची रिक्षा तेथूनच मुलांना नेई
आणि तिथंच शाळा सुटल्यावर आणून पोचवी. मुले मोठी झाली, कॉलेजात जायला
लागली, कर्वे आजीसुद्धा हळूहळू थकल्या. त्यांनी पाळणाघर बंद केलं. अमेय,
आदित्य मात्र कर्वे आजींना विसरले नाहीत. आठ-दहा दिवसांनी त्याच्या घरी
गेल्याशिवाय त्यांना चैन पडायचं नाही.
दोन्हीही मुलगे मर्चंट
नेव्हीत नोकरीसाठी गेले. परदेशातून परत येताना, आठवणीनं कर्वे आजी,
आजोबांना छान उपयोगी वस्तू, चॉकलेट्स न विसरता आणतात. आजींना सगळ्या
मुलांचं खूप कौतुक आहे. पाळणाघरातील सगळी मुलं आता मोठे मोठे रुबाबदार तरुण
झाले आहेत आणि छोट्या मुली, सुंदर सुंदर तरुणी. पाळणाघरातील गायत्रीनं
प्रेमविवाह ठरवला तर आपल्या आई-वडिलांना सांगायच्या आधी ती आजींकडं आली.
आपल्या होणाऱ्या नवऱ्याला घेऊन! अशी ही नाती, रक्ताच्या नात्यापेक्षाही
किती घट्ट रुजली आहेत.
परवा आदित्यचं लग्न झालं. कर्वे आजोबा तर
देवाघरी गेले; पण आजी खूप थकल्या आहेत. आदित्य मृण्मयीला घेऊन आजींच्या घरी
गेला. सगळा बंगला हिंडून बघितला. तिला सगळ्या आपल्या बालपणीच्या आठवणी
सांगितल्या. आजींना दोघांनी खाली वाकून नमस्कार केला. थरथरत्या हातांनी
आजींनी मनापासून आशीर्वाद दिला. दोघांना घट्ट जवळ घेतलं.
...आता सांगा,
कर्वे आजीच्या प्रेमळ पाळणाघराची सर आजच्या आधुनिक व्यावसायिकरीत्या
चालविल्या जाणाऱ्या डे केअर सेंटरला कधी तरी येईल का?