अस्वस्थ करतोय हा उजेड

कोल्हापूर आणि सांगली या जिल्ह्यांची जिथं गळाभेट होते, तिथं आहे एक धरण... चांदोली त्याचं नाव. निसर्गसंपन्नतेच्या वेगवेगळ्या रंगांनी नटलेलं....पण प्रत्येक धरणाच्या बुडाशी-तळाशी जसा एक काळा रंग असतो, तसा काळा रंग याही धरणाच्या तळाशी आहे. धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाच्या हेळसांडीचा! हे धरण होऊन आता तीसहून अधिक वर्षांचा काळ लोटला... या काळात धरणातून बरंच पाणी वाहून गेलं... पण धरणग्रस्तांच्या समस्या आजही जवळपास तेव्हा जशा होत्या तशाच आहेत... या धरणानं इतर गावा-शहरांना वीज दिली...पण त्याच्यामुळं बेघर-बेगाव झालेल्यांच्या जगण्यातला अंधार काही त्यानं अजून दूर केलेला नाही...!

एकोणीस जानेवारीच्या सायंकाळी चांदोली धरणाच्या बांधावरून फिरत होतो. शेकडो एकरांत पसरलेल्या निळ्याशार पाण्याचा एक समुद्रच झाला होता. मावळतीची लालबुंद किरणं पाण्यावर नाचत होती. किरणांच्या नाचण्यामुळं पाणी चकाकत होतं. धरणाच्या तिन्ही बाजूंना जणू काही हिरवीगार वस्त्रं परिधान करून तपश्‍चर्येला बसल्यासारखे तीन डोंगर दिसत होते. धरणाचं पाणी डोंगराच्या पायाला, तळव्याला स्पर्श करून मागं यायचं, पुन्हा पुढं जायचं... तपश्‍चर्या करताना डोंगराला काय सापडलं असंल, याची जणू विचारपूस ते करत असावं, असं एक काव्यात्म भावविश्व मनात तयार होत होतं. भिंतीच्या एका कठड्यावर कावळ्यांची एक भली मोठी रांग तयार झाली होती. दिवसभर थकलेले कावळे धरणातलं स्वच्छ, सुंदर पाणी चोचीत घेऊन आपापल्या घरट्यात परतणार होते... अन्य पक्ष्यांचे थवेच्या थवे धरणावरून उडत जाताना दिसले. धरणाचं पाणी इतकं स्वच्छ, इतकं गोड आहे, की कोणत्याही बाटलीबंद पाण्याच्या थोबाडीत सहजपणे ते मारेल... ‘जे बंद असतं तेच स्वच्छ आणि शुद्ध असत नाही, तर जे खुलं आणि मोकळं असतं तेच शुद्ध असतं,’ असा एक संदेश देईल... चांदोली धरण तसं कधीच आटत नाही... आम्ही धरणावर होतो तेव्हाही ३४.४०३ टीएमसी पाणी घेऊन ते आपली समृद्धी दाखवत होतं... खूप मोहक आणि सुंदर दिसत होतं धरण... डोळे भरून ते घेतच राहावं असा मोह होत होता... धरणाच्या पल्याड हजारो एकरांत अभयारण्यानं हात-पाय पसरले होते. बिबट्या, गवे आदी अनेक प्राणी आजही या अभयारण्यात मस्तपैकी जगतात... कोल्हापूर आणि सांगली या जिल्ह्यांची जिथं गळाभेट होते, तिथलं हे अभयारण्य आणि धरण... पहाटे उठून अभयारण्यात फेरफटका मारावा, असं वाटत होतं पण पशुगणना सुरू असल्यानं अभयारण्याचे दरवाजे बंद होते... धरणाच्या काठावर उभं राहिल्याचा आणखी एक फायदा होत होता आणि तो म्हणजे आपण स्वतःही निसर्ग होतोय... कुठंतरी झाडात, त्याच्या हिरव्यागार पानात, धरणाच्या अंगावर शांत आणि सैलपणे खेळणाऱ्या लाटांत, मस्तपैकी विहार करणाऱ्या पक्ष्यांत आपलं रूपांतर होतंय असं वाटत होतं...
धरणावर राहिल्यानं नेमकं काय घडतंय, सांगता येत नव्हतं... पण काहीतरी व्यक्त करावं म्हणून माझ्याबरोबर असणाऱ्या कवी वसंत पाटलाला म्हणालो ः ‘‘वसंत, किती सुंदर दृश्‍य तयार झालंय, नाही?’’

बघताक्षणीच पाहणारा हरखून जाईल, असं हे चांदोलीचं मनोरम धरण. तिन्ही बाजूंच्या डोंगरांनी त्याला अधिकच देखणं केलंय... मात्र, त्याच्यामुळं विस्थापित झालेल्यांचं रोजचं जगणंही असंच सुंदर झालं, तरच या धरणाचा देखणेपणा अधिक उठून दिसेल!

वसंतनं उजव्या बाजूला लांबवर नजर टाकली. इतकी लांब की ती डोंगरापर्यंत पोचली. तो म्हणाला ः ‘‘तो मांडी घालून बसलेला डोंगर आहे ना तिथं आमचं गाव होतं...आमच्या मालकीचे दीड-दोनशे एकरांत पसरलेले डोंगर होते. खूप झाडं होती आमच्या मालकीची... खूप सुंदर गाव होतं आमचं...आता दिसणार नाही ते. कारण ते धरणाखाली गेलंय... ते तिकडं कोपऱ्यातलं पाणी दिसतंय ना ते आमच्या गावावरच तरंगतंय, असं समजा ना...!’’
आता मात्र वसंतशी काय बोलावं समजंना... तरीही म्हणालो ः ‘‘धरणाखाली बुडालेली, अभयारण्यामुळं उठवली गेलेली गावं कुठं गेली?’’
तो म्हणाला ः ‘‘कुठं जाणार? प्रत्येक गाव तुटलं... त्याचा तुकडा तुकडा झाला आणि सांगली-कोल्हापूर जिल्ह्यांत सुमारे ५० ठिकाणी तो विखुरला... गावं तुटली... गावातली कुटुंबं तुटली, जनावरं गेली, कोंबड्या गेल्या... शेती गेली.’’

आता मात्र वसंतला काही विचारायचं धाडस नव्हतं राहिलं. त्याच्या प्रत्येक शब्दातून वेदनेनं भरलेली एक कथाच बाहेर पडत होती आणि ती ऐकण्याचं बळ माझ्यात उरलेलं नव्हतं... शेवटी मनुष्य हा दुर्बल प्राणी असतो, अशा शब्दात मीच माझी समजूत काढली आणि परतीच्या प्रवासात वीजनिर्मिती केंद्र पाहिलं. धरणाच्या पाण्यातून वीज तयार होते. कोयनेच्या विजेत ती मिसळते. महाराष्ट्रातल्या घराघरांत जाते. अगदी तुमच्या आणि माझ्या घरा-दारात ती खेळते. छोटंसं बटण दाबलं की आपल्याभोवती उजेडच उजेड तयार होतो.

धरणाच्या काठावर एक माणूस धरणात गळ टाकून वर, खूप वर कठड्यावर मासे धरत होता. गळाला शिळी चपाती त्यानं खोचली होती... मासा सापडला नव्हता... या धरणात मासे कमी आणि मगरीच जास्त आहेत... महाराष्ट्रात इतरत्र सापडणाऱ्या मगरी याच धरणात आणून सोडल्या जातात...
धरणावरच्या रेस्ट हाउसवर पोचेपर्यंत काहीच बोलत नव्हतो. फक्त वसंतचं ऐकत होतो... त्याचं बोलणं कधी कविता व्हायचं... कधी सुविचार व्हायचं, कधी चळवळ-आंदोलनातल्या घोषणा व्हायचं... कधी व्यवस्थेचा चेहरा ओरबाडून काढायचं, तर कधी आणखी काय व्हायचं...

विकासासाठी चांदोली धरण झालं... विकासाला कुणीच विरोध करता कामा नये... पण विकास होताना चांदोली धरणाभोवतालची तीन हजार कुटुंबं भकास झाली. त्यांचे तुकडे झाले. अजूनही ७५ टक्के लोकांचं परिपूर्ण पुनर्वसन झालेलं नाही. तिसरी पिढी आता जगतेय. पुनर्वसनाची वाट बघत दोन पिढ्या काळाआड गेल्या... धरणग्रस्तांची पिढी डॉ. भारत पाटणकरांच्या नेतृत्वाखाली वर्षानुवर्षं लढतेय... ३० वर्षांपूर्वी पहिलं गाव बुडालं... या पहिल्या गावाचंही पुनर्वसन नीट नाही... शेतीवर जगणारी ही कुटुंबं आहेत... १९७६ मध्ये धरण उभारण्यास सुरवात झाली आणि ८६ मध्ये ते पूर्ण झालं. सांगली-कोल्हापूर जिल्ह्यांतल्या ८६ हजार हेक्‍टर शेतीला त्याचा लाभ झालाय आणि १६ मेगावॉट वीज तयार होऊन महाराष्ट्रभर ती खेळते... दोन्ही जिल्ह्यांच्या विकासाला चांदोली धरणानं मोठा हातभार लावला असला, तरी बेघर, बेगाव आणि भकास झालेल्या तीन हजार कुटुंबांचं काय...? पिकाऊ जमिनी न मिळालेल्यांची संख्या ७५ टक्‍क्‍यांच्या आसपास आहे. जिथं जमिनी मिळाल्या, तिथं पाणी मिळत नाही. काही ठिकाणी वीज मिळत नाही. पुनर्वसित गावात अनेक ठिकाणी सोई-सुविधांचा दुष्काळ आहे. धरणाखाली सर्वस्व गमावलेल्यांना आर्थिक, सामाजिक प्रतिष्ठाही राहिलेली नाही. एक सर्वहारा समाज जन्माला आलाय आणि विकासक्षेत्राच्या कडेकडेला तो भकास आयुष्य जगतो आहे. त्याच्यापर्यंत ना उजेड जातो ना पाणी... त्याच्याशी बेटीव्यवहार करायलाही विकास पावलेला समाज सहजासहजी तयार होत नाही. याच्या पोरांना नोकऱ्याही अद्याप मिळत नाहीत. धरणग्रस्तांसाठी कायदे करण्यात, सुंदर कायदे करण्यात महाराष्ट्र आघाडीवर आहे. अर्थात हे कायदे सहजासहजी झालेले नाहीत. चळवळीच्या रेट्यानं ते झाले. ‘कायदे करणारं पुरोगामी राज्य,’ म्हणून महाराष्ट्राचा लौकिक देशभर झाला; पण कायद्याची अंमलबजावणी मात्र कासवाच्या गतीनं सुरू आहे. अंमलबजावणीबाबत महाराष्ट्र कुख्यात आहे... आंदोलनाशिवाय अंमलबजावणीला गतीच मिळत नाही... पण किती वर्षं करायची आंदोलनं आणि किती पिढ्यांनी करायची आंदोलनं हा प्रश्‍न उरतोच. २५-२७ वर्षांपूर्वी क्रांतिवीर नागनाथ नायकवाडी यांनी भारत पाटणकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांना कोयना धरणग्रस्तांची पाहणी करण्यास सांगितलं होतं. या सर्वांच्या बरोबर जाण्याची संधी मलाही मिळाली होती. त्या वेळी धरणग्रस्तांची जी दैना बघितली होती, त्यातली बहुतांश अजूनही कायम आहे. धरणग्रस्तांची पाहणी केल्यानंतर ‘सकाळ’मध्ये लेखमाला लिहिली होती... ती आज जशीच्या तशी पुन्हा वापरली, तर बहुतांश ती वास्तववादी ठरणार आहे. दरम्यानच्या काळात महाराष्ट्राची विकासात घोडदौड होत राहिली. कारण, धरणामुळं पाणी आणि वीज यांचं टॉनिक विकासाला लाभलं होतं. महाराष्ट्राचा विकास आनंददायीच आहे; पण बुडालेल्या गावांचं आणि तिथल्या माणसांचा विकास कधी, या विकासात त्यांना स्पेस कधी, या प्रश्‍नाचं उत्तर ‘महाराष्ट्र माझा’ आणि ‘कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा’ असं सांगणारे, विचारणारे कुणीच देत नाहीत... धरणग्रस्तांचं म्हणणं अगदी सोपं आणि साधं आहे आणि ते म्हणजे आमच्या त्यागातून धरण उभं राहिलंय,
आमच्या त्यागातून वीज सळसळतेय... आम्हालाही चांगलं जगण्याची संधी द्या. आम्हालाही मुख्य प्रवाहात घ्या... ज्यांच्या हाताच्या दोन्ही मुठी विकासानं भरल्या, तेही विकासातला धरणग्रस्तांचा वाटा द्यायला तयार नाहीत आणि माय-बाप सरकार तर इतकं असंवेदनशील, इतकं निगरगट्ट बनलंय की कायद्याची किमान तातडीनं अंमलबजावणी करावी, असं त्याला वाटत नाही...धरणग्रस्तांना अजूनही आपल्या बुडालेल्या गावांची, वैभवाची याद येत राहते... जशी धरणाच्या काठावर राहिलेल्या वसंतला आली... त्यानं ‘कविता ः धरणाआधी आणि नंतरच्या’ या काव्यसंग्रहात व्यक्त केलेल्या चार ओळी मला अस्वस्थ करू लागल्या ः
तुकोबाची गाथा तरंगावी
तशाच चिरंतन
धरणात बुडालेल्या गावाच्या
या काही आठवणी...
वसंतचा एकूण काव्यसंग्रहच अस्वस्थ करतोय...त्याच्या कवितांची अवस्थाही धरणग्रस्तांप्रमाणेच झालीय... धरणग्रस्तांची व्यथा मांडण्यासाठी पदरमोड करून काढलेल्या वसंतच्या (फोन ः ९८८१३९६३८४) काव्यसंग्रहाची धरणाबाहेर चर्चाही होत नाही. धरणग्रस्तांच्या कविता काळीज चिरत जातात; पण ज्यांना काळीजच वापरायचं नाही किंवा लॉकरमध्ये ते ठेवून जगायचंय, त्यांचं काय?

धरण आणि भोवतालचं सारं जंगल अंधार पांघरून घेऊ लागलं, तेव्हा रेस्ट हाउसवर मी पोचलो. संगाप्पा नावाच्या शिपायानं खोली उघडली... वीज सुरू करण्यासाठी बटणावर हात ठेवला खरा; पण बोट जड झाल्यासारखं वाटू लागलं. तसंच बोट दाबलं आणि खोली लख्ख उजेडानं भरून गेली... पण हा उजेड मला तरी अस्वस्थ करायला लागला... तो सहजासहजी आला असता, तर खूप बरं झालं असतं... अनेक वाड्या-वस्त्या आणि गावं धरणाखाली गेल्यानंतर तो तयार झालाय... ज्यांच्या त्यागातून जन्माला आला उजेड, त्यांच्या वाट्याला मात्र अंधार का आला आणि त्यांच्या ओंजळीत कधी जाणार उजेड, हा प्रश्‍न नाशिकला आल्यानंतरही मला सतावू लागला... विजेच्या बटणावर बोट ठेवलं की माझी अस्वस्थता अजूनही वाढतेय... बटणावर बोट ठेवण्याचं धाडस मी गमावून बसलो की काय, असं वाटायला लागतंय... केमिकल लोच्या झालाय माझा...! उगीचच धरणावर गेलो... उगीचच तो वसंत भेटला, असंही वाटतंय... भारत पाटणकरांची माझी ओळखच व्हायला नको होती, असंही वाटतंय... पण काय करणार, घडलं ते खरंच आहे... उजेडाला आपल्याच सात-बारावर नोंदवणाऱ्यांनी थोडा जरी या हरलेल्या जगाचा विचार केला तरी त्यांच्याही आयुष्यात एखादा कण उजेड जाऊ शकतो... धरणग्रस्तांना एका सुंदर जगण्याची व्यवस्था व्हावी म्हणून शासन अजून तरी जागं होणार की नाही आणि उजेडाचे मालकही त्यासाठी दबाव आणणार की नाही हाच प्रश्‍न आहे... वसंतच्या कवितेचं तेच म्हणणं आहे आणि धरणाच्या काठी मौनात जाऊन तपश्‍चर्या करणाऱ्या डोंगरांचंही तेच म्हणणं आहे...