नखरेल ‘अप्सरा’ ते गूढ नंदिनी!

नखरेल ‘अप्सरा’ ते गूढ नंदिनी!(सोनाली कुलकर्णी)
                                                      -  सोनाली कुलकर्णी
‘नटरंग’, ‘अजिंठा’, ‘क्‍लासमेट्‌स’ आणि ‘मितवा’ या चारही चित्रपटांतल्या माझ्या भूमिका खंबीर मुलीच्याच आहेत. या चारही चित्रपटांनी मला कलाकार म्हणून समृद्ध केलं आहे. करिअरच्या प्रत्येक टप्प्यावर या भूमिका मला मिळाल्या आणि मला त्यांनी मनसोक्त आनंद दिला... परंतु, मला अजूनही खूप मोठी झेप घ्यायची आहे...

प्रत्येक भूमिकेतून काहीतरी नवीन शिकायला मिळतं आणि प्रत्येक भूमिका नवं काही तरी देऊन जाते. आतापर्यंत मी ‘बकुळा नामदेव घोटाळे’, ‘नटरंग’, ‘अजिंठा’, ‘क्‍लासमेट्‌स’ आणि आता ‘मितवा’ अशा काही चित्रपटांमध्ये काम केलं आहे. या चित्रपटांतली माझी प्रत्येक भूमिका आणि तिच्यासाठीचा माझा लूक वेगळाच आहे. या प्रत्येक चित्रपटागणिक मी काहीतरी नवीन शिकले आहे. ‘नटरंग’, ‘अजिंठा’, ‘क्‍लासमेट्‌स’ आणि आता येणारा ‘मितवा’ या चित्रपटामध्ये मी साकारलेल्या भूमिका माझ्या आवडीच्या आहेत. ‘नटरंग’ या चित्रपटात मी ‘नयना कोल्हापूरकरीण’ ही भूमिका साकारली. ‘बकुळा नामदेव घोटाळे’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मला मिळाला. एका वाहिनीच्या पुरस्कार सोहळ्यातही मला गौरवण्यात आलं.

1) सोनाली कुलकर्णी -अंजिठा चित्रपटातली ‘पारो’ 2) ‘मितवा’मधली ‘नंदिनी’

हा पुरस्कार घेण्यासाठी मी स्टेजवर गेले, त्या वेळी मला ‘नटरंग’चे दिग्दर्शक रवी जाधव यांनी पाहिलं. त्यानंतर त्यांनी मला फोन केला आणि ‘नटरंग’ चित्रपटातली भूमिका मला देऊ केली. मुळात ‘नटरंग’मधली भूमिका ही एका नृत्यांगनेची होती. मला नृत्य येत नव्हतं. मला नृत्य अतिशय आवडतं असलं, तरी मला ते येत नव्हतं. मग काय... त्या भूमिकेसाठी मला प्रचंड मेहनत घ्यावी लागणार होती. त्यादृष्टीनं मी तयारी सुरू केली. या चित्रपटाच्या गाण्यांच्या रेकॉर्डिंगच्या वेळी हजर राहिले. बेला शेंडे गाणं कसं गात आहे... आपल्याला परफॉर्म कसा काय करायचा आहे... वगैरे वगैरे गोष्टी जाणून घेतल्या. या भूमिकेसाठी बरीच तयारी केली. थोडे वजन वाढवलं. कारण ती भूमिकेची गरज होती. त्यानंतर ‘नटरंग’ने काय कमाल केली हे सर्वांना ठाऊक आहे. ‘नटरंग’नं मराठी चित्रपटसृष्टीला बरेच काही दिलं. एक अभिनेत्री म्हणून मला या चित्रपटानंच ‘स्टारडम’ मिळवून दिलं. या चित्रपटातली ही भूमिका साकारण्यासाठी अन्य मंडळींबरोबरच मला साहित्यिक आनंद यादव यांचं मोठे सहकार्य लाभले. हा चित्रपट त्यांच्या साहित्यकृतीवर आधारित आहे. यादव यांनीदेखील मला लहानसहान गोष्टी सांगितल्या आणि विशेष म्हणजे जेव्हा त्यांनी हा चित्रपट पाहिला तेव्हा त्यांना भावना अनावर झाल्या. त्यांनी अनेक वर्षं पाहिलेलं स्वप्न पूर्ण झालं होतं.
या भूमिकेमुळे मलादेखील बरेच काही मिळालं. ‘अप्सरा’ अशी माझी ओळख या भूमिकेनंच मला दिली.

त्यानंतर आलेला माझा चित्रपट म्हणजे ‘अजिंठा’. या चित्रपटात मी पारो नावाच्या आदिवासी मुलीची व्यक्तिरेखा साकारली. मुळात ही व्यक्तिरेखा रुपेरी पडद्यावर कशी उभी करायची, हे मला माहीत नव्हतं. मग, कविवर्य ना. धों, महानोर यांच्या काव्यसंग्रहात उल्लेख असलेल्या व्यक्तिरेखेप्रमाणेच पारो उभी करायची असं ठरवलं. कारण तिचा लूक, तिची संस्कृती आणि तिचं राहणीमान अगदीच वेगळं होतं. हा सगळा लूक नीता लुल्ला यांनी डिझाईन केला. पारोच्या मेकअपसाठी मला दोन दोन तास लागायचे आणि तो मेकअप दिवसभर तसाच ठेवायला लागायचा. तब्बल ४५ दिवस मला हे करावं लागलं; परंतु या भूमिकेचं मला खूपच कौतुक आहे. एक उत्कृष्ट भूमिका साकारायला मिळाल्याचं समाधान आहे. रॉबर्ट आणि पारोची ही प्रेमकथा. रॉबर्टची ती प्रेरणा असते, समाजाच्या विरोधात जाऊन ती खंबीरपणे त्याच्या पाठीशी उभी राहते. ही भूमिका मला साकारायला मिळाली, हे माझं भाग्यच; कारण ही भूमिका स्मिता पाटील साकारणार होत्या. त्यांचं ते स्वप्न होतं. डॉ. जब्बार पटेल याच कथेवर चित्रपट काढणार होते. एक स्वप्नवत्‌ भूमिका जगण्याचा आनंद मला या चित्रपटानं दिला. ‘अजिंठा’ हा चित्रपट आणि त्यातली पारोची भूमिका माझ्या करिअरला कलाटणी देणारी ठरली. या चित्रपटामुळंच मला हिंदी चित्रपटसृष्टीची दारं उघडी झाली. मात्र, एक अभिनेत्री म्हणून मला खंबीरपणे उभं राहण्याची संधी मिळाली ती नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘क्‍लासमेट्‌स’ या चित्रपटामुळंच. या चित्रपटातली अदिती निंबाळकर ही सध्याच्या काळातली मुलगी आहे. एका राजकारणी कुटुंबातली ही मुलगी असली तरी स्वतःच्या करिअरसंदर्भात तिच्या कल्पना अगदी सुस्पष्ट आहेत. करिअर आणि प्रेम याबाबतीत तिचे काही विचार असतात. ही भूमिकादेखील  माझ्यासाठी कठीण होती; परंतु मी अशी काही ती भूमिका साकारली, की अनेकांनी माझे कौतुक केले. ‘रमा-माधव’, ‘झपाटलेला-२’ असे काही चित्रपट मध्यंतरी केले असले, तरी ‘क्‍लासमेट्‌स’मधल्या भूमिकेनं मला आत्मविश्‍वास दिला. ‘नटरंग’ आणि ‘अजिंठा’ या दोन्ही ‘पीरिअड फिल्म’नी मला नावलौकिक दिला; परंतु ‘क्‍लासमेट्‌स’मधल्या भूमिकेनं अभिनेत्री म्हणून उभं राहण्याची संधी दिली. या तिन्ही भूमिकांपेक्षा ‘मितवा’मधली भूमिका निराळी आहे आणि ती साकारतानाही तेवढीच मजा आलेली आहे. ‘मितवा’मध्ये नंदिनी प्रभू नावाची भूमिका मी साकारत आहे. ही नंदिनी माझ्या मूळ स्वभावाच्या अगदी विरुद्ध आहे. तिचं कोणतंही स्वप्न नाही... तिचं कोणतेही ध्येय नाही... ती फक्त जगत असते... ती दिसायला सुंदर आहे. तिच्या डोळ्यांत रहस्य आहे. तिचे डोळे आणि ओठ काहीतरी अव्यक्त असं बोलत असतात. त्याच वेळी शिवम सारंग तिच्या आयुष्यात येतो आणि तिचं सगळं जगच बदलतं... या भूमिकेविषयी मला जेव्हा विचारण्यात आलं, आणि भूमिकेविषयी माहिती देण्यात आली, तेव्हा मला काय बोलावं तेच सुचेना. माझ्या निःशब्दतेच माझा होकार होता, हे दिग्दर्शिका स्वप्ना वाघमारे- जोशी यांनी जाणलं. मी आतापर्यंत केलेल्या भूमिकांमध्ये नंदिनी वेगळी आहे. या भूमिकेचं वैशिष्ट्य म्हणजे, ध्यानधारणेतून व्यक्तित्व कसं शोधायचं हे या चित्रपटातून मला शिकायला मिळालं. एखाद्या भूमिकेचा प्रवास ध्यानधारणेतून शोधण्याचं तंत्र मला या चित्रपटामुळंच उमगले. या चित्रपटात एक प्रसंग आहे आणि त्या प्रसंगाच्या वेळी मला अक्षरशः रडू अनावर झालं. कारण, तशाच प्रकारची घटना माझ्या एका मैत्रिणीसंदर्भात घडलेली आहे. एकूणच सांगायचं तर, ‘नटरंग’, ‘अजिंठा’, ‘क्‍लासमेट्‌स’ आणि ‘मितवा’ या चारही चित्रपटांतल्या माझ्या भूमिका खंबीर मुलीच्याच आहेत. या चारही चित्रपटांनी मला कलाकार म्हणून समृद्ध केलं आहे. करिअरच्या प्रत्येक टप्प्यावर या भूमिका मला मिळाल्या आणि मला त्यांनी मनसोक्त आनंद दिला... परंतु, मला अजूनही खूप मोठी झेप घ्यायची आहे...