पुण्यात गाडी चालवायची त्यात
टू-व्हीलर म्हणजे भले-भले गळपटतात. अनेकांची धांदल उडते, पुण्यात राहूनही
मी थोडा घाबरतोच इथे गाडी चालवायला. (तुम्ही म्हणाल हे भित्रंय सालं, पण मी
घाबरतो हे सांगताना मला लाज वाटत नाही.) गाडी चालवायच्या वयातच आम्हाला
हातात गाडी मिळाली; पण तेव्हा मी मुंबईत होतो. अर्थात, तिथेही गाडी चालवली
नाही असं नाही, पण मुंबापुरीत कधी जगण्या-मरण्याच्या परिसीमा गाठतील, अशी
ड्रायव्हिंग होत नाही. एक्स्प्रेस वेवर धडकी भरत असली तरी आत्तापर्यंत
माझ्याबाबतीतलं सगळं व्यवस्थितच आहे.
गेल्या मार्चमध्ये पुण्यात
आल्यानंतर खऱ्या अर्थाने टू-व्हीलर चालवायला सभ्य भाषेत रेमटवायला चालू
केली; पण वेगाची नशा डोक्यात नसल्यामुळे आणि खिशाला भोक असल्यामुळे मी
गाडीची "इकॉनॉमी‘ कधी सोडत नाही. परवा गाडी 40 वरून 60 वर नेली नाही म्हणून
एका मित्राशी वाजलंय. काय कराव या पुणेकरांना? पण पुण्यातल्याच काही
लोकांनी वाहतुकीचे नियम अंगात भिनवले, सिग्नलला थांबणं म्हणजे जणू आपण
गुन्हा केल्यासारखं असलं तरी अनेक पुणेकर स्वत:ला गुन्हेगार समजून का
होईना, पण सिग्नलला थांबतात. (मी ही त्यातलाच एक) अर्थात, काउंटडाऊनमधील
5,4,3,2,1 या वेळेत कुणाच्याच गाड्या झेब्रा क्रॉसिंगच्या पल्याड नसल्या
तरी आम्ही सिग्नल पाळलेला असतो.
मी सिग्नल पाळण्याच कारण, पुण्यात
आल्यानंतर सिग्नल तोडताना माझ्या पाठीवर बसलेले गुद्दे आणि "तुला कळतं नाही
का‘, एवढ्याच शब्दांवर थांबलेल्या शिव्या. मित्रांबरोबर असतो तर "तुला
कळतं नाही का?‘च्या पुढे कित्येक शिव्या खाव्या लागल्या असत्या हे माझं
मलाच माहितीय; पण हल्ली पुण्यात सिग्नल पाळणंही कठीण होत चाललंय. अगदी नाव
घेऊन सांगायची ठिकाणं म्हणली तर अनेक आहेत सीएमईचा सिग्नल, संचेतीचा चौक
यांसारखी ठिकाण किंवा पुण्यातल्या कुठल्याही चौकातला सिग्नल पाळण्यासाठी
नाही, तर शोसाठी लावलेत असा अनेकांचा समज आहे. सिग्नलला बसवाले, मोठे
ट्रकवाले, सुशिक्षित म्हणवणारे कारवाले यांच्यासारख्यांनीच जर सिग्नल
पाळायचं ठरवलं तर मागच्यांना सिग्नल पाळावा लागतोच; पण इथे नेमकं उलटं
चित्र आहे. बसवालाच सिग्नल तोडून निघतो आणि मग त्यापाठोपाठ सगळे जण
वेड्यासारखे हळूहळू निघू लागतात. बरं या वेळी आपण गाडी साईडला घेऊन थांबाव
तरी मागून हॉर्न वाजवत लोक आपली इज्जत काढतात. त्यांच्या हॉर्नचा अर्थ
असतो, "** एक शिवी हासडून** सगळे जातायतं, तुला काय धाड भरलीय. काय
महात्मा, लोकमान्य वगैरेंच भूत आलंय की काय तुझ्या अंगात.‘ त्यांना काय
सांगायचं हेच कळत नाही.
आज अप्पा बळवंत चौकात मी सिग्नलला
थांबलेलो, पाठीमागे आई बसलेली. सिग्नल सुटायला अवघी 20 सेकंद बाकी होती,
आपल्यासाठी म्हणाल तर 15चं. कारण, वर नमूद केल्याप्रमाणे 5,4,3,2,1 हे
काउंटडाऊन इथे पाळताच येत नाही, आणि ग्रीन झालेला सिग्नल तर निम्मा चौक
ओलांडल्यानंतरच पाहायचा असतो नाही का? असो, त्या एवढ्या कमी कालावधीत एका
पीएमटी बसवाल्याने इतकी घासून गाडी काढली, की मी आणि आई गाडीखालीच यायचे
बाकी होतो. आई गाडीवर असूनही त्याला शिव्यांची लाखोली वाहायला चालू केली,
तर बसमधल्यांच्या नजरा मलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभ्या करतील अशा बदलू
लागलेल्या. त्याला चेस करून "मामा-बिमा‘ असं गोड बोलत बाबा नीट चालव सांगाय
लागलो तर त्याने माझ्याकडे न बघताच "चल चल, पुढे जा..‘ असा हाताने इशारा
केला. मग त्याची "आयझेड‘ काढून मी रस्ता धरला. असं शिव्या देणं चुकीचं आहे,
हे कळतंय मला; पण त्या **ला तरी एवढी का घाई असावी?
आणखी एक
पुणेरी वैशिष्ट्य म्हणजे ऍम्ब्युलन्सला वाट न देणं. सायरन वाजला की गाड्या
हे लोकं फर्स्ट गीअरमध्येच गाड्या चालवतात. अरे तो ऍम्ब्युलन्सवाला काय उडत
जाणारयं का ? या सगळ्यातून एकच गोष्ट समोर येते, ती म्हणजे मेंढर चरायला
सोडतात ना, तसं आपल्यालाही कोणीतरी सोडलंय असं समजून लोकांबरोबर सगळे नियम
धाब्यावर बसवून "वायझेड‘सारखं गाडी चालवायची. पण हे योग्य आहे का अयोग्य?
याचा विचार करणार कोण?
का मला जगायचंय म्हणून मी सिग्नल तोडू?
तुम्हाला सापडलं तर उत्तर द्याल प्लीज...!!!
तुम्हाला सापडलं तर उत्तर द्याल प्लीज...!!!