मोठ्या भावाने कष्टाने उभे केलेले वैभव आयते घशात घालायला न मिळाल्याने मत्सराने पेटुन उठलेल्या धाकट्या बहीण भावाने आपल्या सख्ख्या नात्याचाही मुलाहिजा न ठेवता, लहानपणापासुन आपल्यावर जिवापाड प्रेम करणाऱ्या मोठ्या भावाचाच काटा काढायचे ठरवले आणि यासाठी त्यांनी मदत घेतली अमानवीय शक्तीची. आपल्या मनसुब्यात ते यशस्वी होतात का? की मोठा भाऊच त्यांना पुरून उरतो याची रंजक कहाणी म्हणजेच वारसाहक्क.
श्री राजाराम कांबळे आणि सौ सरोजिनी कांबळे या दाम्पत्याला तीन मुले झाली. मोठा समीर, दुसरी सरला आणि सर्वात धाकटा सोहन. श्री कांबळे हे भुमापन विभागात अधिकारी होते, आणि त्यांच्या पत्नी सौ सरोजिनी या शाळेत हेडमास्तर होत्या. कामानिमित्त कांबळे साहेबांना सतत फिरतीवर राहावे लागायचे. त्यांच्या गैरहजेरीत सरोजिनी बाईच सगळे काही बघायच्या. राजाराम हे साक्षात जमदग्नीचा अवतार होते, ते कधी आणि कोणत्या गोष्टीवर भडकतील याचा काही भरवसा नसायचा. त्यांच्या या स्वभावाला घरातील सर्वच लोक टरकुन होते. नातेवाईकांच्यातही त्यांचा तसाच दरारा होता. वरकरणी जरी राजाराम स्वभावाने तापट असले तरी मनाने मात्र ते खुप प्रेमळ होते. फक्त राग आला की मग त्यांचा स्वतःवर संय्यम राहत नसे. घरी असले की ते सर्वांची आस्थेने विचारपुस करत असत. कोणाला काय हवे, काय नको याची जातीने काळजी घेत असत. कठोर असले तरी खुप प्रेमळ आणि हौशी होते. त्यामुळे त्यांच्या स्वभावातील या दोषाकडे सर्वजण जाणीवपुर्वक दुर्लक्ष करत असत.
सरोजिनी बाईंनी आपल्या तिन्ही मुलांवर चांगले संस्कार केले होते. मोठा मुलगा समीर हा मितभाषी पण आपल्या भावंडांवर खुप प्रेम करणारा, त्यांना सांभाळुन घेणारा होता. त्यामुळे जरी सरोजिनी बाईंचे यजमान कमी वेळ घरी असले तरी समीरमुळे त्या आपल्या इतर दोन मुलाच्या बाबतीत निर्धास्त असायच्या. समीर खरच एक आदर्श मुलगा आणि प्रेमळ भाऊ होता. आपल्या वडीलांच्या अनुपस्थितीत तो आपल्या आईची आणि भावंडांची खुप चांगली काळजी घ्यायचा. त्यांना काय हवे नको याकडे लक्ष द्यायचा. आपल्या वाट्याचा खाऊ देखील तो भावंडाना द्यायचा. प्रसंगी स्वतः मार खायचा आणि वडीलांच्या रागापासुन त्यांना वाचवायचा. सोहन आणि सरलाचा स्वभाव मात्र समीरच्या अगदी उलट होता. आपल्या स्वार्थी, भांडकुदळ, सुडबुद्धी ठेवणाऱ्या आणि कृतघ्न स्वभावामुळे दोघेही इतरांमध्ये अप्रिय होते. त्यांचे आपापसातही पटायचे नाही. सतत भांडणे व्हायची. सरोजिनी बाईंना आपल्या मुलांचे स्वभाव ठाऊक होते पण अजुन लहान आहेत, मोठे झाले की येईल समज असा विचार करून त्या त्यांच्या खोड्यांकडे दुर्लक्ष करायच्या. पण जसजसे ते मोठे होत गेले तसतसे तिघांचेही स्वभाव पक्के होत गेले.
समीर आपल्या भावंडाना अभ्यासात मदत करायचा, पण मुळातच मंद असलेल्या सोहनची शिक्षणातील प्रगती यथातथाच होती. अभ्यासापेक्षा त्याचे सर्व लक्ष किचनकडेच असायचे. तो जणु काही दुसरा बकासुरच होता. बोबडा असल्यामुळे वर्गात सर्व मुलेच नाही तर शिक्षकही त्याची चेष्टा करायचे, खिल्ली उडवायचे. सततच्या चिडवण्यामुळे सोहन इतरांना टाळत असे. त्यांच्या मनात इतरांबद्दल चीड आणि द्वेष वाढत चालला होता. तो सतत तणावात असे त्यातुनच त्याला अती खाण्याची सवय लागली. खाल्ल्यावर त्याला शांतता लाभायची. त्यांच्या मनावरचा ताण कमी व्हायचा. परिणामी तो जास्तीत जास्त वेळ खाण्यातच घालवू लागला. वाढत्या वयामुळे आपल्या मुलाची भुक पण वाढत असेल असा विचार करून सरोजिनी बाई त्याला इतर दोघांपेक्षा जास्त खायला देत असत. सोहनचा आहार वाढवायला नकळत त्यांची आंधळी ममता देखील हातभार लावत होती. समीरच्या प्रयत्नांमुळे सोहन काठावर का होईना पण दहावी पास झाला आणि त्याने शिक्षणाला रामराम ठोकला तो कायमचा. सरला कॉलेजला गेली पण मुळात चंचल असल्यामुळे तिचेही लक्ष अभ्यासात कमी आणि नटणे, मुरडणे, फॅशन व मुलांमध्ये जास्त होते. फार काही मार्क्स मिळायचे नाहीत पण नापास होत नव्हती एवढेच. समीरही काही स्कॉलर नव्हता पण नेहेमी ६० टक्क्यांच्या आसपास असायचा. आपल्या मुलांची शिक्षणातील अधोगती, हेडमास्तर असलेल्या सरोजिनी बाईंसाठी नेहेमीच लाजीरवाणी गोष्ट ठरायची.
समीर कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला असताना, त्याला बँकेत क्लार्कची नोकरी लागली. सकाळचे कॉलेज असल्यामुळे शेवटच्या तासाला न बसण्याची परवानगी घेऊन समीर बँकेत काम करू लागला. त्यावेळी कांबळे कुटुंब चाळीतील दहा बाय दहाच्या दोन रूम असलेल्या घरामध्ये राहत होते. आत एक मोरी आणि कॉमन शौचालय, एवढेच काय ते घर, पण त्यातही ते आनंदी होते. बँक बंद झाल्यावर समीर RD कलेक्शनसाठी बाजारपेठेतील व्यापाऱ्यांकडे जात असे. रोजच्या कमाईतुन काही रक्कम ते बाजुला टाकत असत. त्यांना बँकेत जायला वेळ नसल्यामुळे, समीर बँकेतर्फे ते पैसे गोळा करून त्यांना रिसीट देत असे आणि दुसऱ्या दिवशी ती रक्कम ज्याच्या त्याच्या खात्यामध्ये टाकत असे. त्या बदल्यात बँक त्याला कमिशन देत असे. तेवढीच समीरची वरकमाई होत असे. आपले स्वतःचे घर बांधण्याचे स्वप्न समीरने उराशी बाळगले होते. त्याच्या आईवडीलांनी आत्तापर्यंतचे सर्व आयुष्य भाड्याच्या खोलीत काढले होते त्यामुळे त्यांचे उर्वरित आयुष्य तरी आपल्या हक्काच्या घरात जावे अशी त्याची प्रामाणिक इच्छा होती आणि त्यासाठीच तो दिवसरात्र एक करत होता.
बघता बघता समीर पंचवीस वर्षांचा झाला. त्याचे मन आपल्या आईच्या जवळच्या मैत्रिणीच्या मुलीवर, राधिकावर जडले होते. तिलाही तो पसंत होता. अडचण तशी काहीच नव्हती पण कांबळे साहेबांच्या हुंड्याच्या अपेक्षा मात्र अवाजवी होत्या त्यामुळे अडचण येत होती. शेवटी होय नाही करत एकदाचे लग्न पार पडले. राजाराम कांबळेंना चार बहीणी आणि दोन भाऊ होते सोबत मोठा गोतावळाही होता. सर्वांचे मानपान करता करता वधु पक्षाच्या तोंडाला फेस आला होता. पण आपली मुलगी सुखात राहील या अपेक्षेने त्यांनी यथाशक्ती लग्न लावुन दिले. लग्नाच्या पहिल्या रात्रीच समीरच्या एका आत्येने राधिकाकडुन तिच्या पाया पडायचे गडबडीत राहुन गेल्याने रागाच्या भरात तिच्या मुस्काटात ठेऊन दिली. रडत रडत राधिका तिच्या पाया पडायला वाकली तेव्हा झाले ते पुरेसे नव्हते म्हणुन की काय दुसऱ्या आत्येने वरून पाठीत एक गुद्दा हाणला तो वेगळाच. वर आईबापाने हेच संस्कार केले का म्हणुन त्यांचाही उद्धार केला. बिचारी राधिका त्या प्रकाराने हादरून गेली. सोहन आणि सरला मात्र आपल्या आत्येने वहीनीचे केलेले स्वागत पाहुन निर्लज्जासारखे हसत होते. समीर या सर्वापासुन अनभिद्न्य होता कारण की तो चाळीसमोर घातलेल्या मांडवात पुरुष मंडळीत बसला होता. झालेल्या प्रकाराबद्दल राधिकाने समीरला काहीही न सांगण्याचे ठरवले व अपमान निमुटपणे गिळुन अश्रु पुसले.
दुसऱ्या दिवशी पुजा झाल्यावर समीर आणि राधिका मधुचंद्रासाठी उटीला रवाना झाले, आणि घरात जमलेल्या बायकांमध्ये मानपानावरून चर्चेला उधाण आले. "असली कसली सुन बघीतलीस गं सरू? फक्त पाचच तोळे सोने दिले? चांगले पन्नास तोळे तरी वाजवुन घ्यायचे होतेस. समीरला मोटारसायकल पण नाही दिली त्यांनी. आपल्या समीरमध्ये असे काय कमी आहे गं म्हणुन एवढी गरिबाघरची मुलगी केलीस देव जाणे! मेलीवर संस्कारच केलेले दिसत नाहीत घरच्यांनी." वगैरे म्हणत जमलेल्या बायकांनी राधिकाच्या माहेरच्यांच्या नावाने शिमगा सुरू केला. जेमतेम एकोणीस वर्षाच्या त्या बिचाऱ्या निष्पाप आणि सरळ स्वभावाच्या मुलीचे संस्कार वगैरे काढुन त्या बायका मोकळ्या झाल्या. बाईच बाईची शत्रु असते म्हणतात तेच खरे. नातेवाईकांची मुक्ताफळे ऐकुन सरोजिनी बाईंना आपण राधिकाला सुन करून घेऊन मोठी चुक केली असे वाटू लागले. नकळत त्यांच्या मनात राधिकाबद्दल अढी निर्माण झाली. "सुनेला डोक्यावर जास्त चढवु नकोस, नाहीतर तुझ्या डोक्यावर मिऱ्या वाटेल ती! तिला सुरुवातीपासुनच अंगठ्याखाली नीट दाबुन ठेव!" वगैरे मोलाच्या सुचना सरोजिनी बाईंना देऊन त्यांच्या नणंदा दुसऱ्या दिवशी आपापल्या सासरी निघुन गेल्या. चार पाच दिवसातच समीर आणि राधिका मधुचंद्राचे धुंद क्षण आपल्या मनात साठवुन घरी परतले.
घरी सुन आल्यावर कांबळे साहेबांनी राजीनामा दिला आणि घरीच राहु लागले. लवकरच राधिकाच्या सासुरवासाला सुरवात झाली. समीर सकाळी लवकर घर सोडत असे. तो गेल्यावर सरोजिनी बाई आपल्या यजमानांचे कान भरण्याचे काम मोठ्या इमानेइतबारे करत असत. आधीच तापट डोके असलेले राधिकाचे सासरे मग तिला घालुन पाडून तोंडाला येईल ते बोलत असत. ती बिचारी निमुटपणे सगळे ऐकुन घेत असे, कधीच त्यांना उलट उत्तर देत नसे. सोहन आणि सरला मात्र त्या प्रसंगांचा मनमुराद आनंद लुटत असत. राधिकाला कधीच पोटभर जेवायला मिळत नसे. ती जेवायला बसली की तिचे सासरे तिच्या पुढ्यात बसत. आमच्या घरात कोणीच जास्त जेवत नाही असे सुचक टोमणे मरत असत, त्यामुळे तिची भुकच मरत असे. पण सोहनसाठी मात्र तिला पहाटे चार वाजता उठुन डबा बनवावा लागत असे. त्याच्या बकासुरी खाण्यामुळे त्याला चार थरांचे मोठे डबे भरून ती देत असे. त्या व्यतिरिक्त कंपनीच्या कँटीन मध्ये सवलतीच्या दरात मिळणारे वडे, भजी, पोहे, उपीट तसेच चिकन, मटण आणि माश्याची थाळी वगैरे तो चापायचा ते वेगळेच. बिचारी राधिका आली आणि कामवालीला कायमची सुट्टी मिळाली हे सांगायला नकोच. लग्न करून रांधा, वाढा आणि उष्टी काढा एवढेच तिच्या नशिबी आले होते. सगळे आवरून झोपायला तिला बारा वाजत, समीर तोपर्यंत तिची वाट पाहुन झोपुन गेलेला असे. परत सकाळी तिला चार वाजता उठावे लागायचे. माहेरी चांगली तब्येत असलेली राधिका अपुऱ्या अन्नामुळे आणि झोपेमुळे सासरी मात्र बहरण्याऐवजी सुकत चालली होती.
समीरने ओळखीच्या जोरावर सोहनला एका फाईल्स बनवणाऱ्या कंपनीत शिकाऊ कामगार म्हणुन चिकटवले होते. बोबड्या सोहनला इथेही कामगारांच्या आणि वरिष्ठांच्या त्रासाला सामोरे जावे लागले. सोबतचे कामगार सतत त्याची मस्करी करायचे. एकदा तर दोघा तिघांनी मिळुन जबरदस्तीने त्याची पॅन्ट काढुन घेतली आणि ती मिळवण्यासाठी त्यांच्या मागे तो धावत असताना वरिष्ठांनी त्याला पहिले आणि तडकाफडकी कामावरून काढुन टाकले. समीरने आपली ओळख वापरून आणि त्यांच्या हातापाया पडून सोहनची नोकरी वाचवली होती. पण त्या बदल्यात त्याचे उपकार मानायचे दूरच राहिले उलट सोहन त्यालाच पाण्यात पाहायचा. सोहनच्या उदरातील अग्निहोत्र अहर्निश पेटलेले असल्यामुळे घरातील अन्न कमी पडायचे की काय म्हणुन कंपनीतुन नाश्त्याची आणि जेवणाची जास्तीची कुपन्स घ्यायचा. मित्रांना फुकटात खाऊ घालणे, बक्षीस लागेल या अपेक्षेने लॉटरीची बेसुमार तिकिटे खरेदी करणे, आगाऊ पगार उचलणे या सगळ्या उद्योगांमुळे सोहनच्या हातात पडणारा पगार कायम तुटपुंजा असायचा. सोहनला मिळणारा पगार चांगला असुनही त्याला त्याच्या चुकीच्या सवयींमुळे नेहेमी समीरकडे हात पसरावे लागायचे, आणि समीर त्याला वेळोवेळी पैसे द्यायचाही. घरात आपल्या कमाईचा हिस्सा देणे किंवा घराची जवाबदारी आपल्या खांद्यावर घेणे तर दूरच राहिले उलट घरातुनच वरखर्चाला तो पैसे घेत असे. हलक्या कानाच्या सोहनला आपले परके काही कळत नव्हते. समीर त्याला खुप समजवायचा पण इतरांचे ऐकुन तो समीरचाच द्वेष करायचा. समीरबद्दल सतत कागाळ्या करून आपल्या वडीलांचे त्यांच्याबद्दलचे मत कलुषित करायची एकही संधी तो सोडत नसे, आणि त्याला साथ द्यायला सरला तत्पर असायचीच.
प्रत्येक नवविवाहीतेप्रमाणेच राधीकालाही आपल्या नवऱ्यासोबत फिरायला जावे, त्याच्या सोबत जास्तीत जास्त वेळ घालवावा, सिनेमे पाहावे असे वाटायचे. ते दोघे बाहेर जायचेही पण दरवेळी एकतर सरला किंवा सोहन सोबत असायचेच. त्यांना एकांत मिळणार नाही याची सरोजिनी बाई पुरेपूर काळजी घ्यायच्या. सिनेमाला गेले तरी त्या दोघांमध्ये सरला किंवा सोहन बसायचे. राधिकाची खुप चिडचिड व्हायची. तिने वेळो वेळी समीरला सांगायचा प्रयत्नही केला पण तो तिला सांगायचा की ऑफिस मध्ये कटकटी काय कमी असतात जे तू पण कटकट करत बसतेस? ह्या असल्या गोष्टी सांगायच्या असतील तर माझ्या सोबत येऊच नकोस. समीर सोबत समुद्रावर फिरायला गेल्यावर मिळणारे ते क्षणच राधिकाच्या आयुष्यातले सुखाचे क्षण असायचे त्यामुळे तिनेही त्याला काही सांगायचे नाही असे ठरवले. त्याला तिचे हाल दिसत नव्हते असे नाही पण आपल्या वडीलांच्यापुढे बोलायची त्याची छाती व्हायची नाही. समीर बँकेत गेला की सगळी कामे आवरल्यावर कधी कधी राधिका आपल्या त्याच गावात असलेल्या माहेरी जायची. समीरशी बोलता न आल्यामुळे आपल्या मनातील सगळी घुसमट ती आपल्या आईकडे व्यक्त करायची. सुरवातीला सगळ्यांनाच थोडेफार सोसावे लागतेच, नंतर हळुहळु सगळे ठीक होईल असे सांगुन त्याही तिला धीर द्यायच्या. सासरी पोटभर जेवायला मिळताना मारामार मग डोहाळे कोण पुरवणार? म्हणुन राधिकाला डोहाळे लागल्यावर तिची आई तिला जे काही खायची इच्छा होईल ते सगळे पदार्थ बनवुन तिची वाट पाहायची.
एके दिवशी संध्याकाळी समीरने राधिकाला तिच्या आईकडून पिकअप केले आणि समुद्रावर फिरायला गेला. गप्पांमध्ये वेळ कसा गेला ते दोघांनाही कळलेच नाही. घरी यायला उशीर झाल्याच्या निमित्ताने समीरचे वडील इतके चिडले होते की घरात पाहुणे असल्याचेही त्यांना भान राहीले नाही व ते घरातील नारळ सोलायची कोयती घेऊन समीरच्या अंगावर धाऊन गेले. ऐनवेळी पोटुशी असलेली राधिका आडवी आली म्हणुन ते थांबले, नाहीतर रागाच्या भरात त्यांच्या हातुन मोठा अनर्थ घडला असता. या प्रसंगाचा समीरच्या मनावर एवढा मोठा आघात झाला की तो राधिका सोबत तडकाफडकी घर सोडून निघुन जायला निघाला. पण राधिकाने त्याला अडवले व थोडे दूर घेऊन गेली. तिने त्याला समजावले की, "आजवर तुम्ही घरासाठी आणि सर्वांसाठी इतके कष्ट उपसले आहेत, त्रास सहन केलाय वेळ प्रसंगी कमीपणा घेऊन अपमानही सहन केलाय. ते सगळे क्षणात मातीमोल होऊन जाईल. आत्ता जर का आपण घर सोडुन बाहेर पडलो तर सगळे आपल्यालाच दोष देतील. बायको आली आणि समीर बदलला म्हणतील. तेव्हा राग सोडा आणि घरी चला." राधिकाने समीरची समजुत काढुन घरी आणले. पुढे राधिकाचे दिवस भरल्यावर तिने एका सुधरूड मुलाला जन्म दिला, आणि घरातील वातावरण हळूहळू पालटू लागले. सगळ्यांनाच पहिला मुलगा झाला म्हणुन खुप आनंद झाला.
यथावकाश सरलाचेही लग्न झाले आणि ती परगावी सासरी गेली. सरोजिनी बाईंना राधिकाच्या विरोधात उसकवणारी आणि पाठिंबा देणारी मुख्य व्यक्ती गेल्यामुळे त्यांचेही आपल्या यजमानांचे कान भरणे कमी झाले. सासु सासऱ्यांना आपल्या सुनेतील गुण दिसु लागल्यामुळे तेही तिचे कौतुक करू लागले. पण कांबळे कुटुंबाचा हा आनंद फार काळ टिकला नाही. एके दिवशी दुपारी जेवत असतानाच समीरच्या वडीलांना हृदयविकाराचा तिव्र झटका आला आणि ते कोसळले. समीर त्यावेळी बँकेत होता तर सरोजिनी बाई शाळेमध्ये आणि सोहन कंपनीत गेला होता. घरात फक्त राधिका आणि तिचे तान्हे बाळ होते. समीरच्या ज्या मित्रांना त्याच्या वडीलांनी भिकार्डे म्हणुन भरल्या ताटावरून हाकलून दिले होते तेच मित्र अशा प्रसंगी मैत्रीला जागुन वेळेला धाऊन आले. समीरच्या वडीलांना हॉस्पिटलमध्ये भरती करण्यापासुन ते पाळ्या लावुन त्यांना हॉस्पिटलमध्ये सोबत करण्यापर्यंत सर्व काही त्यांनी केले. त्यांना हवे नको ते सर्व काही बघितले. सर्वानी पैसे जमा करून हॉस्पिटलचा खर्च देखील परस्पर भागवला. समीर घेणार नाही एवढी त्यांनी समीरच्या वडीलांची काळजी घेतली.
समीरचे वडील हॉस्पिटल मधुन जेव्हा घरी आले तेव्हा ते पुर्वीचे राजाराम कांबळे राहिले नव्हते. ते पुर्णपणे बदलुन गेले होते. त्यांना आपल्या चुकांची जाणीव झाली. आपल्या मोठ्या मुलाचा आणि सुनेचा त्यांना एवढा अभिमान वाटला की त्यांनी सर्वांसमक्ष त्यांची माफी मागितली. समीर आणि राधिकाच्या कष्टाचे खऱ्या अर्थाने चीज झाले. आत्ता सर्व उलट झाले होते. समीरचे वडील राधिकाचे कौतुक करू लागले होते, तिची सर्वतोपरी काळजी घेऊ लागले होते. सरोजिनी बाईंची मात्र ते काहीही शिल्लक ठेवत नसत. त्यांनीच त्यांच्या मनात राधिकाबद्दल विष जे कालवले होते. पण राधिकाने मोठ्या मनाने आपल्या सासु सासऱ्यांना माफ केले. सासऱ्यांचेही मन वळवले. राधिकाच्या आईने दिलेला सल्ला योग्य ठरला होता एवढे दिवस बाळगलेला संयम आज कामी आला होता. आपल्या चांगल्या वागणुकीने राधिकाने घरात आणि सर्वांच्या मनात आपले स्थान मिळवले होते. पण तिचे घरातील वाढणारे महत्व सरला आणि सोहनच्या मनातील द्वेषाला खतपाणीच घालत होते. सरला आपल्या सासरी खुश नव्हती. ती आपल्या नवऱ्याची तुलना आपल्या भावाच्या कर्तृत्वाशी करायची त्यामुळे मुळचाच प्रवृत्तीने वाईट असलेला विजय नकळत आपल्या मोठ्या मेव्हण्याचा द्वेष करू लागला होता. सरला, सोहन आणि विजयच्या मनात खदखदणाऱ्या द्वेषाबद्दल काहीच कल्पना नसलेले कांबळे कुटुंब आपल्या घरात एका नवीन व्यक्तीचा समावेश करण्यासाठी विवाह संस्थांचे आणि नातेवाईकांचे उंबरठे झिजवु लागले होते.
जवळच्याच गावातील, जातीतीलच पण एका गरीब घरातील सीमाशी सोहनचे लग्न ठरले. सोहनचे शिक्षण, व्यक्तिमत्व आणि कर्तृत्व पाहाता त्याला फार सुंदर, सुशिक्षित आणि नोकरी करणारी श्रीमंत घरातील मुलगी मिळणे जरा कठीणच होते. घरची गरिबी, त्यात पदरात तीन बहिणी असलेल्या सुदेशने राजाराम कांबळेंचे घराणे व घरातील माणसांचे राधिकाशी असलेले वागणे पाहुन आपल्या बहिणीचे लग्न बोबड्या सोहनशी लावून दिले. हुंड्यासाठी अट नसणे हे एक मोठे कारण या लग्नामागे होते. सीमा आठवीपर्यंतच शिकलेली होती पण कामाला वाघ होती. तब्येतीने मजबुत आणि घरकामात तर एकदम तरबेज होती. स्वभावाने सीमा एकदम रोखठोक होती, राधिका सारखी शांत, नम्र आणि मृदुभाषी तर बिलकुल नव्हती. दोन देऊन दोन घेऊन राहणाऱ्यांपैकी ती होती. विरुद्ध स्वभाव असुनही सुदैवाने तिचे राधिकाशी खुप चांगले पटले. आपल्या सासु सासऱ्यांच्या स्वभाव तिने चांगलाच ओळखला होता. ती त्यांची हुकुमत बिलकुल चालु देत नव्हती. सासरे तिला जे काही वाईट बोलायचे त्याला ती बिनधास्त उलटी उत्तरे द्यायची. राधिका तिला समजवायची की मोठ्या माणसांना अशी दुरुत्तरे करू नये. पण ती तिलाच सांगायची की तुम्ही खुप साध्या आहात म्हणुन हे लोक तुमचा खुप गैरफायदा घेतात. यांच्याशी असेच वागले पाहिजे नाहीतर हे आपल्याला आपल्या घरच्यांसकट विकुन खातील. तुम्ही नका काळजी करू, मी आलेय ना आत्ता, यांना बरोबर सरळ करते की नाही ते बघा! राधिका सीमाला आपल्या धाकट्या बहिणीप्रमाणे वागवायची, सीमा देखील तिच्यावर खुप माया करायची. तिची काळजी घ्यायची. दोघी जावा एकमेकींशी खुप प्रेमाने राहायच्या.
प्रमोशन मिळाल्याने समीर आता कॅशियर झाला होता. आपल्या आई वडीलांसाठी घर बांधायची उर्मी त्याला स्वस्थ बसु देत नव्हती. जागा घेण्यासाठी त्याने वडीलांकडे पैशाच्या मदतीची मागणी केली पण त्यांनी ती पार धुडकावून लावली व एक फुटकी कवडी पण मिळणार नाही, वर तुझे तु काय ते बघ असेही सांगितले. पहिल्या प्रयत्नालाच वडीलांनी अनपेक्षितरित्या सुरुंग लावल्यामुळे समीर कमालीचा हताश झाला. तेव्हा राधिकाच्या केवळ एका शब्दावर तिचा मामा त्याच्या मदतीसाठी धाऊन आला. एक रुपयाही व्याज न घेता त्याने त्याला पाच लाख रुपयांची मदत केली. स्वतःचे वडील पाच पैशाची मदत करत नाहीत आणि कोण कुठला परका माणुस मदतीचा हात पुढे करतो याचे समीरला खुप नवल वाटले. बँकेतुन कमी व्याज दरावर त्याने घर बांधण्यासाठी कर्ज घेतले. नव्या जोमाने तो कामाला लागला. थोडी स्वस्तात मिळाल्यामुळे वस्ती पासुन पाच किलोमीटर दूर एका माळावरील जागा त्याने घेतली. बाजुला केवळ दोनच घरे होती बाकी पुर्ण उजाड माळ होता. अधुन मधुन समीरच्या वडीलांचा मुळचा स्वभाव उफाळुन येत असे मग ते त्याला सतत टोचुन बोलत असत, "कुठे मसणात जागा घेतलीन आहे! काय भुतासारखे राहायचे काय तिथे?" वगैरे. त्यांच्या तोंडाचा पट्टा सुरूच असायचा पण समीर त्याकडे दुर्लक्ष करत असे.
बँक सुटल्यावर RD कलेक्शन आटपुन घर बांधण्याकडे लक्ष द्यायला समीरला वेळ कमी पडू लागला. कॉन्ट्रॅक्टरच्या भरवशावर सगळे सोपवून निर्धास्त राहणे समीरला चुकीचे वाटू लागले तेव्हा दुसऱ्यांदा पोटुशी असलेली त्याची अर्धांगी त्याच्या मदतीला आली. RD कलेक्शनची जवाबदारी तिने स्वतःवर घेतली त्यामुळे समीरला बँक सुरू व्हायच्या आधी आणि सुटल्यावर उशिरापर्यंत बांधकामाकडे लक्ष देत येऊ लागले. सुरवातीला समीरच्या सततच्या सुचनांमुळे त्रस्त झालेल्या काँट्रॅक्टर आणि गवंड्यानी समीरला चांगलाच चुना लावायचे ठरवले होते पण जसजसे दिवस जाऊ लागले तसतसे समीरचा चांगुलपणा, परोपकारी वृत्ती, त्यांच्या बरोबरीने काम करणे, मालक असल्याचा कसलाच माज नसणे या गोष्टींमुळे त्यांचे त्यांच्याबद्दलचे मत बदलले. आणि त्यांनी त्याला सर्वतोपरी सहकार्य करण्याचे ठरवले. समीरच्या मोकळ्या स्वभावामुळे कॉन्ट्रॅक्टर आणि गवंडी आता त्याच्याशी एकदम मोकळेपणाने बोलत असत. त्याच्या सुचनांवर आपले मत देत असत. काही चुकत असल्यास त्याला योग्य तो सल्ला देत असत. रविवारी राधिका समीरसाठी जेवण घेऊन जात असे तेव्हा ते सर्व एकत्र जेवण करत असत. बरे वाईट अनुभव गाठीला बांधत घर बांधणीचे काम समीर नेटाने पुर्णत्वाकडे नेत होता.
बांधकामावर पाणी मारण्यास वेगळे पैसे द्यावे लागु नयेत म्हणुन समीरने सोहनला विनंती केली की तु फक्त बांधकामावर पाणी मार. पण समीरच्या वडीलांनी सोहनला जाण्यास विरोध केला. समीरने त्या घरासाठी स्वतःचे रक्त आटवले होते. आपला आवडता रेबॅनचा गॉगल ४००० रुपयात विकला होता. टेम्पोचे भाडे वाचावे म्हणुन लोखंडी शिगा स्कुटरच्या स्टेपनीला अडकवुन भर दुपारी रस्त्यावरून ओढत नेल्या होत्या. खर्च भागवताना तो बिचारा पार मेटाकुटीला आला होता. उगीच नाही म्हणत, "घर पाहावे बांधून आणि लग्न पाहावे करून तेव्हा कळते!" ज्या आई-वडिलांसाठी तो घर बांधत होता त्यांची मदत तर सोडा पण विरोधच जास्त होत होता. मग कोणासाठी म्हणुन घर बांधायचे? एका क्षण तर असा आला की तो इतका संतापला की घर पेटवून द्यायला निघाला. तेव्हा त्या गवंड्यानीच त्याला धीर दिला. "तुम्ही फक्त मालाचे पैसे द्या, आमचे पैसे नंतर जमेल तेव्हा द्या पण आपण घर बांधायचेच". घरचे तर दूरच राहीले पण बाहेरचेच त्यांच्या जास्त उपयोगी पडत होते. शेवटी प्रयत्नांची शर्थ करत वयाच्या अवघ्या २८ व्या वर्षी त्याने घर बांधुन पुर्ण केले आणि सर्व कांबळे कुटुंब नवीन घरात राहायला गेले.
नवीन घरात समीरच्या दुसऱ्या मुलग्याचा जन्म झाला. सर्वांना आनंद झाला पण सरोजिनी बाईंना यावेळी मुलीची इच्छा होती म्हणुन त्या थोड्या नाराज झाल्या होत्या. समीरच्या वडीलांना तोंडाचा कॅन्सर होता. त्यांचे तंबाखु खाणे त्यांच्या जिवावर उठले होते. सहा महिन्यातच राहत्या घरी त्यांची प्राणज्योत मालवली. काही महिन्यांकरीता का होईना पण समीरची आपल्या वडीलांनी स्वतःच्या हक्काच्या घरात राहावे ही इच्छा पुर्ण झाली. समीरचे वडील गेल्यावर समीरच्या आईचे मानसिक संतुलन जरा ढासळले, त्यांचा शरीर धर्मांवरचाही कंट्रोल गेला. लघवीला किंवा संडासला झालेले त्यांना कळेनासे झाले. त्यामुळे सीमा आणि सासुची भांडणे खुप वाढु लागली होती. सीमा सासुकडे ढुंकुनही बघायची नाही त्यामुळे आपल्या मोठ्या व लहानग्या धाकट्या मुलाला सांभाळुन राधिकाला त्यांचे सर्व काही बघावे लागायचे. भरीत भर म्हणुन सीमा आणि सोहनने वेगळे राहण्याचे ठरवले. सीमा गर्भार असुनही दोघे वेगळे झाले आणि भाड्याच्या खोलीत राहु लागले. सोनोग्राफीत मुलाच्या मेंदुची वाढ नीट झालेली नाही हे लक्षात आले. जन्माला येणारे बाळ मतिमंद होईल असे डॉक्टरांनी सांगीतल्यावर राधिकानेही सीमाला बाळ पडायचा सल्ला दिला. पण सोहनने ऐकले नाही आणि हट्टाने त्याने मुलाला जन्माला घालण्यास सीमाला भाग पाडले. शेवटी व्हायचे तेच झाले. समीप मतिमंद जन्माला आला. सुदैवाने त्याला कोणतेही शारीरिक व्यंग नव्हते पण त्याची बौद्धिक वाढ खुपच मंद होती.
दोन वर्षांनी समीरला प्रमोशन मिळाले आणि त्याची बाहेरगावी बदली झाली त्यामुळे तो आई, पत्नी आणि दोन्ही मुलांना घेऊन परगावी गेला. पण जाताना त्याने आपल्या भावाला भाड्याच्या खोलीत राहण्यापेक्षा आपल्या घरात राहण्यास सांगीतले. जेणेकरून त्याला दर ११ महिन्यांनी नवीन घरासाठी भटकावे लागणार नाही आणि आपल्या घराची काळजीही घेतली जाईल. पण समीरला कुठे माहीत होते की ज्या भावाचा तो एवढा विचार करत आहे त्या बोबड्या भावाच्या मनात काही भलतेच शिजत आहे. समीर परगावी जाऊन जेमतेम सहाच महिने झाले असतील. सरला, तिचा नवरा आणि सोहनने समीरच्याच घरात एक बैठक घेतली. घर जरी समीरच्या नावावर होते तरी वडीलांच्या दबावामुळे घराची जागा समीरने स्वतःच्या पैशातुन विकत घेतली असुनही त्याला ती आपल्या आईच्या नावावर ठेवावी लागली होती. याचाच गैरफायदा तिघांनी घ्यायचा ठरवले. समीरने २६ गुंठ्याचा प्लॉट विकत घेतला होता आणि त्यात २ गुंठ्यात घर आणि ३ गुंठ्यात आंबा, नारळ, चिकु, लिंबु, सीताफळ, रातांबे, पेरू अशी फळझाडे लावली होती. म्हणजे घर आणि झाडे सोडली तर २१ गुंठे जागा मोकळी होती. जागा आईच्या नावावर असल्यामुळे वारसाहक्क दाखवून त्या २१ गुंठ्यांचे तीन हिस्से करून त्यातील १४ गुंठे लाटावे असा विचार विजयने सरला आणि सोहनच्या डोक्यात सोडला होता. समीर याला सहजा सहजी तयार होणार नाही हे ते जाणुन होते. पण एकदा का सरोजिनी बाईंनी सही दिली की मग समीर काहीही करू शकणार नव्हता. त्यामुळे सरला आणि सोहनने सरोजिनी बाईंना आपापल्या घरी काही काळासाठी नेऊन त्यांना आपलेसे करून घ्यायचे आणि गोड बोलुन जागेचे तीन हिस्से करायला लावुन आपापला हिस्सा विकुन चांगले पैसे मिळवायचे असा प्लॅन ठरला.
त्यांचा हा प्लॅन सीमाच्या कानावर पडला आणि ती कमालीची अस्वस्थ झाली. गरीब असली तरी ती मानी होती. आपल्याच माणसांना फसवुन तिला स्वतःसाठी काहीच नको होते. तिने सोहनच्या नकळत राधिकाच्या कानावर सर्व काही घालायचे मनाशी ठरवले. पण तिच्या दुर्दैवाने तिला चोरून ऐकताना विजयने पाहिले होते. त्याने सरला आणि सोहनला बोलत बोलत बाहेर नेले, आणि ही गोष्ट दोघांच्या कानावर घातली. आपल्या प्लॅनवर पाणी फिरणार हे लक्षात येताच सीमाला आपल्या मार्गातुन बाजुला करण्याचा कट विजयने बोलुन दाखवला. आधी सरला आणि सोहनने त्याला विरोध दर्शविला पण पैसा आल्यावर सीमापेक्षा श्रीमंत आणि सुंदर मुलीशी लग्न करता येईल हे विजयने पटवुन देताच सोहन तयार झाला. सरलालाही हा विचार पटला. दोघांच्या मनातील पैशाची हाव त्यांच्या सद्सद्विवेकबुद्धीला वरचढ ठरली आणि त्यामुळे ते दोघेही त्या कुकर्माला तयार झाले. आता सीमाला मार्गातुन बाजुला करायचे म्हणजे तिला ठार मारणे आले आणि पोलिसांकडुन पकडले जाण्याची भीती पण होती. सीमाला दम्याचा त्रास होता. तिला मृत्यु जर गुदमरल्यामुळे झाला तर दम्याच्या अटॅकमुळे ती मेली असे आपसुकच सिद्ध होईल आणि आपल्यावर कोणाला संशयही येणार नाही, असे विजयने सांगताच दोघांनाही ते पटले. तसेही सीमाला सरोजिनी बाई आवडत नव्हत्या त्यामुळे ती त्यांच्याशी गोड वागायची अपेक्षा करणेच चुकीचे होते, सीमा मेल्यावर समीपची काळजी घेण्यासाठी कोणीतरी हवे हे कारण पुढे करून सरोजिनी बाईंना समीरपासुन दूर करणे शक्य होणार होते. रात्री सीमा गाढ झोपेत असताना आपले काम बिनबोभाट करायचे ठरवुन त्यांची मिटिंग संपली.
जेवताना कोणीच कोणाशी बोलत नव्हते. सीमाने बनवलेले माशाचे कालवण मस्तपैकी हादडून तिघेही निर्लज्जासारखे झोपायच्या तयारीला लागले. इकडे सीमा राधिकाला कसे कळवायचे हा विचार करत होती तर तिकडे ते तिघे सीमाला कसे मारायचे त्या प्लॅनची मनात उजळणी करत होते. बिचाऱ्या सीमाला आपण ज्यांच्यासाठी एवढे चांगले जेवण बनवले तेच आपला घात करणार आहेत याची पुसटशी कल्पनाही नव्हती. आपला नवरा असे काही करेल हा विचारही तिच्या मनाला शिवला नव्हता. ती बिचारी आपल्या दीर आणि जावेच्या काळजीने बेचैन झाली होती. एकवेळ सरला आणि विजयचे वागणे आपण समजु शकतो कारण की ते परके होते, पण सोहन तर सीमाचा नवरा होता; साता जन्माचा सोबती. तोच तिच्या जिवावर उठला तर इतरांचे ते काय? आपल्या मतिमंद मुलाचे त्याच्या आईविना काय होईल? दुसरे लग्न केल्यावर येणारी नवी नवरी त्याला आईचे प्रेम देईल का? किंवा तो तिला आई मानु शकेल का? याचा साधा विचारही सोहनच्या मनाला शिवला नाही. आयत्या पिठावर रेघोट्या मारायच्या नादात ते तिघेही अमानुष बनले होते. डोळ्यासमोर दिसणाऱ्या पैशाच्या ढिगाखाली त्यांची सारासार विचारशक्ती दबली गेली होती. मानव हत्येसारखे महान पातक करायला त्यांचे मन धजावले होते. सोहन आणि सरला मनाने जरी वाईट असले तरी कोणाचा जीव घेतील इतके निर्दय नक्कीच नव्हते पण विजयने त्यांचा डोळ्यावर पैशाचा चष्माच असा काही बसवला होता की त्यांच्यातील माणुसकीने त्यांची साथ कधी सोडली ते त्यांचे त्यांनाच कळले नाही.
रात्री साधारण दोन वाजता सीमाला खोकल्याची प्रचंड उबळ आली. घुसमटल्यामुळे तिला श्वासही घेता येईना. मंद दिव्याच्या प्रकाशात तिला संपुर्ण खोली धुराने भरल्याचे दिसले. तिने समीप आणि सोहनच्या दिशेने पाहिले तर ते त्यांच्या जागेवर नव्हते. तिच्या बेडच्या बाजुला डास पळवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या अनेक कॉइल्स लावलेल्या तिला दिसल्या. त्यांच्याच धुराने खोली भरली होती. सीमाला श्वास घ्यायला खुप अडचण होत होती, ती श्वास घेण्यासाठी तडफडू लागली. तिने तिच्या दम्याचा स्प्रेसाठी हात पुढे केला पण तोही प्लॅनप्रमाणे रिकामा होता. बेडवरुन उठुन ती कशीबशी दरवाजाकडे गेली तर दरवाजा बाहेरून बंद असल्याचे तिच्या लक्षात आले. तिने दरवाजा ठोठावला पण काहीच प्रतिसाद मिळाला नाही. दरवाज्याखालची फटही चादर लावुन बुजवली होती. सीमाच्या सगळा प्रकार लक्षात आला. जन्माच्या जोडीदाराने पैशाच्या लोभापायी आपल्या जिवाचा सौदा केला याचे तिला खुप दुःख झाले. आपण आता काही वाचत नाही हे लक्षात यायला तिला वेळ लागला नाही. त्याही परिस्थितीत आपल्या जावेला आपण सावध करू शकलो नाही याचे शल्य तिला टोचत होते. ती जिवाच्या आकांताने दार ठोठावू लागली पण दरवाजा उघडला नाही. शेवटी दरवाज्यावर आदळणाऱ्या तिच्या हातांचा आवाज क्षीण होऊन बंद झाल्यानंतर काही वेळाने दरवाजा उघडला. सीमा खिडकीखाली जमिनीवर निचेष्ट पडली होती, तिने खिडकी उघडण्याचा निष्फळ प्रयत्न केला होता पण तिला दम्याचा तीव्र अटॅक आला होता. ते पाहुन त्या नराधमांच्या चेहऱ्यावर क्रुर हास्य पसरले.
सर्व प्रथम विजयने ट्युब सुरू केली आणि खिडक्या उघडल्या जेणेकरून सगळा धुर बाहेर जावा. नंतर त्याने सोहनच्या मदतीने सीमाचे निपचित पडलेले शरीर उचलुन बेडवर ठेवले. एकच कॉईल जळती ठेऊन सरलाने बाकीच्या कॉइल्स उचलल्या आणि त्यांची पडलेली राखही साफ केली. सोहनने दरवाज्याखालची चादर उचलली. नंतर विजयने खिडक्या पुन्हा लावून घेतल्या. बाहेर हॉलमध्ये झोपलेल्या समीपच्या हे ध्यानीही नव्हते की त्या बिचाऱ्याच्या आई सोबत आत काय घडत होते. पुरावे नष्ट केल्यावर सर्व काही ठीक असल्याची खात्रीकरून ते बाहेर पडणार इतक्यात विजयला सीमाच्या पापण्या हलल्याचे दिसले. विजेच्या चपळाईने त्याने तिथलीच एक उशी घेतली आणि सीमाच्या तोंडावर दाबुन धरली. ते पाहताच सोहनने तिचे हात, तर सरलाने पाय धरून ठेवले. अर्धमेली झालेल्या दुर्दैवी सीमाने काही सेकंद शेवटची असहाय तडफड केली आणि मग ती कायमची शांत झाली. सीमाचे निर्जीव शरीर बेडवर पडले होते. तिचे विस्फारलेले डोळे एकटक सोहनकडे पाहात होते. सोहनला ती मृत पण दाहक नजर सहन होईना. त्याने हळुच तिच्या डोळ्यांवरून हात फिरवला तशा सीमाच्या पापण्या मिटल्या. यावेळी मात्र ती मेल्याची पक्की खात्री करून मगच ते तिघे बेडरूमच्या बाहेर गेले. पैशाच्या लालसेने एका निष्पाप जिवाचा बळी घेतला होता.
0 comments:
Post a Comment