विवेकवादाचे बळी

३० ऑगस्ट २०१५ रोजी सकाळी कर्नाटकातील धारवाड येथील प्रसिद्ध विचारवंत तथा हंपी विद्यापीठाचे माजी कुलगुरु साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त एम. एम. कलबुर्गी यांची त्यांच्या राहत्या घरी गोळ्या घालून हत्या झाली आणि पुन्हा एकदा देशामध्ये कायद्याचे राज्य आहे का? हा प्रश्न देशातील सुजान नागरिकाला पडल्याशिवाय राहत नाही.
भारतीय राज्य घटनेने देशातील सर्व लोकांना आपले मत मांडण्याचा मुलभूत अधिकार दिलेले असतांनाही त्यावरच आज अशा तर्‍हेने घाला घातला जात आहे. मुळात प्रत्येक व्यक्ती हा स्वतंत्र आहे आणि त्याच्या सद्सदविवेकबुद्धीला पटेल असे विचार मांडणे हा त्याचा घटनादत्त अधिकार आहे. असे असतांना देखील ज्या व्यवस्थेने नागरिकांना हे अधिकार दिलेले आहेत तेच अधिकार काही तथाकथीत मंडळीकडून हिंसेच्या मार्गाने संपवण्याचे जे काम आज देशातील काही स्वतःला प्रतिगामी म्हणवणारी मंडळी करीत आहेत.
जगात ज्या ज्या देशामध्ये लोकशाही आहे त्या सर्वच देशामध्ये भारत हा एक वेगळा देश आहे. ज्या ठिकाणी अनेक भाषा, धर्म, पंथ यात विविधता असतानाही हा देश आजपर्यंत अखंड राहिलेला आहे. याचे योगदान घटनाकृत्याला द्यावे लागेल.
एखाद्या विचाराला विरोध करुन म्हणून तो विचार हिंसेच्या मार्गाने संपवणे हे एका लोकशाही म्हणवून घेणार्‍या राष्ट्राला कदापी शोभनीय नाही. ज्या पद्धतीने पुण्यात डॉ. नरेंद्र दाभोलकरांची हत्या झाली अगदी त्याचप्रमाणे कोल्हापूरात कॉ. गोविंद पानसरे यांची झालेली हत्या आणि कर्नाटकात कलबुर्गी सरांची झालेली हत्या यामध्ये एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते. यातील समान धागा म्हणजे हे तिघेही प्रतिथयश विचारवंत होते, विवेकवादाचे पुरस्कर्ते होते, अंधश्रद्धेला नाकारणारे होते आणि हे सर्व समाजातील एका मोठ्या गटाला कदापी सहन होणारे नव्हते, कारण त्यामुळे त्यांच्या विचारांवर गदा येणारी होती. त्याच बरोबर त्यांचे समाजात असलेले गोरखधंदे बंद होणार होते. याचाच परिपाक म्हणून या तथाकथित गटांनी या विचारवंतांची केलेली हत्या होय. समाजातील अजुनही एक गट धर्माच्या नावावर सबंध देशावर राज्य करण्याचे धोरण आखीत आहे. त्यातील महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे आम्ही एका अमुक गटाचे, धर्माचे म्हणून देशप्रेमी तर इतर सर्व धर्माचे म्हणजे देशद्रोही ही जी विचारसरणी २०१४ च्या झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणूकांमधून मोदी लाटेच्या नावाखाली देशभर फोफावत आहे.
याला वेळीच समाजाने पर्यायाने राजकीय व्यवस्थेने दुर्लक्ष न करता वेळीच अटकाव केला नाही तर ज्याप्रमाणे आज देशाला दहशतवाद, नक्षलवाद, सीमावाद, माओवाद यासारख्या कारवायांचा सामना करताना जी किंमत मोजावी लागत आहे. ही उद्या धर्माच्या नावावर होणार्‍या हिंसेलाही रोकताना चुकवावी लागेल.

म्हणून हा प्रश्न कोण्या एका चळवळीचा, गटाचा, पक्षाचा, धर्माचा नसून एका लोकशाही देशाचा प्रश्न आहे. आजपर्यंत आपल्या देशाचा इतिहास पाहिल्यास त्यातून आपल्याला हे स्पष्टपणे दिसते की, आमच्यावर कोणतेही आक्रमण चालणार नाही. धर्मात केलेली ढवळाढवळ खपवून घेतली गेली नाही. मग ते मुस्लीम आक्रमण असो की वैदीक आक्रमण हेच अधोरेखीत होते.
या तीनही विचारवंताचे काम हे धर्मातील अनिष्ठ चालीरिती अंधश्रद्धा यातून धर्माची मुक्तता करुन एक विवेकवादी समाजाची निर्मिती करणे हा एक समान कार्यक्रम या विचारवंताच्या विचारधारेत दिसतो. म्हणून दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी यांची हत्या हा समाजाला लागलेला एक कलंक असून ही केलेली एक विचाराची हत्या आहे.
फुले, शाहू, आंबेडकर, आगरकर, रानडे, गोखले, टिळक यांच्यापासून सुरु झालेली महाराष्ट्रातील समाजसुधारणेची चळवळ ही वादविवादाकडून-सुसंवादाकडे गेलेली दिसते. परंतु मनुवादीची विचारसरणीची पिल्लावळ ही वादविवादाची चळवळ जाणीवपूर्वकरित्या विसंवादाकडे नेत आहे.
म्हणून २१व्या शतकाकडे वाटचाल करीत असताना दाभोलकरांची सुरु केलेली विवेकवादी चळवळ कलबुर्गी पर्यंत येवून थांबते आणि इथल्या राज्यकर्त्यांना विचारते आहे की, देशात अजुन किती दाभोलकर होणार.
दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी यांच्या हत्येचा उलगडा न होणे हे एक गुपीतच आहे. जे गुपीत सुसंस्कृत नागरिक समजून घेवू शकतो. यांची ज्या प्रकारे हत्या झाली. त्यामध्ये एक समान धागा दिसतो तो म्हणजे मारेकरी हे मोटारसायकलवरुन आले होते आणि पाठीमागून गोळ्या घालून क्षणात पसार झाले. पण शीना बोरा हत्याकांडासारख्या गुन्ह्यामध्ये ज्यापद्धतीने तपासाची चक्रे फिरली आणि प्रसारमाध्यमांच्या झगमगटीमध्ये ज्या पद्धतीने पोलीस अधिकारी तपासाची माहिती देत होते. दिवसेंदिवस नवनवीन माहिती उलगडत होती. परंतु या उलट परिस्थिती या तीनही घटनांमध्ये आपल्याला दिसते. याचे कारण तपासासाठी देशातील यंत्रणेला सक्षमपणे काम करु दिले जात नाही आणि राजकीय हस्तक्षेपाशिवाय तपास यंत्रणाने काम केल्यास मला वाटत नाही की, मारेकरी सापडणार नाहीत आणि यातील तिसरा महत्वाचा दुवा म्हणजे तपास यंत्रणा ह्या वेगवेगळ्या पद्धतीने तपास करीत आहेत. त्यांच्यामध्ये कुठलाही समन्वय नाही आणि झालेली घटना ही एकाच अनुषंगाने घडली असतानाही तपास यंत्रणा जाणीवपूर्वक दूर्लक्ष करीत असल्याचे दिसते. म्हणून मुळ मुद्दाच हा आहे की, ही एक पद्धतशीरपणे शांत डोक्याने केलेली विचारांची हत्या आहे. ज्या विचारप्रणालीने हे सर्व घडवले आहे. त्या विचारसरणीचा अभ्यास केल्यास त्यातून एकच जाणवते ते म्हणजे आम्हाला जे विचार मान्य नाही ते विचार आम्ही हत्येने नष्ट करु असा मारेकर्‍यांचा उद्देश दिसतो.
म्हणून कोणताही विचार हा ती व्यक्ती मृत झाली म्हणून मरत नाही, कोणताही विचार हा हिंसेने नष्ट करता येत नाही. हेच पुन्हा एकदा ज्या उम्मेदीने मुक्ता आणि हमीद हे दाभोलकर डॉक्टरांच्या हत्येनंतरही काम करीत आहेत त्यावरुन याची प्रचिती येते.
म्हणून सरकार नावाचे जे घट्ट त्वचेचे भूत संवेदना शून्य होऊन राज्यकारभार करीत आहेत त्यांनी आपल्या संवेदना जागृत ठेऊन कोणत्याही धर्माच्या, जातीच्या, पंथाच्या राजकीय दबावाला न डगमगता निःपक्षपद्धतीने तपास करुन मारेकर्‍यांना शोधून पुन्हा एकदा समाजमन कसं समृद्ध आणि सौहार्दपूर्ण होईल याची काळजी घ्यावी.

0 comments:

Post a Comment