खाद्यसंस्कृतीची इ-परंपरा

samosa



एक काळ असा होता की एखादी रेसिपी शिकायची म्हटलं की घरातल्या किंवा शेजारपाजारच्या सुगरणींना मस्का मारावा लागायचा. त्यानंतर खाद्यपदार्थांची रेसिपी असणाऱ्या विविध पुस्तकांनी महिलांना आधार दिला. आज मात्र चलती आहे ती फूड ब्लॉग्जची. कोणालाही मस्का न मारता किंवा पुस्तकासाठी पैसे खर्च न करता एका क्लिकवर उपलब्ध होणारे हे फूड ब्लॉग्ज घराघरातील महिलांना उपयुक्त ठरत आहेत.

कोणत्याही प्रकारची माह‌तिी हवी असेल तर इंटरनेटचा आधार घेण्याशिवाय पर्याय नसल्याचे आज चित्र आहे. हेच लक्षात घेऊन विविध खाद्यपदार्थांच्या रेसिपीजही इंटरनेटवर उपलब्ध झाल्या आहेत. पण या रेसिपीजमध्ये अधिक पसंतीला उतरत आहेत ते आपल्या स्वयंपाकाच्या अनुभवातून रेसिपी शिकविण्याच्या उद्देशाने तयार केलेले ब्लॉग्ज. देशी तसेच परदेशी पदार्थ बनविण्याची माहिती देणारे हे ब्लॉग्ज आज नवशिक्या तसेच पदार्थ बनविण्याची आवड असणाऱ्यांसाठी उपयुक्त ठरत आहेत.

केवळ रेसिपीच नव्हे तर कोणत्या खाद्यपदार्थाचा गुणधर्म काय इथपासून ते कोणता मसाला कशाप्रकारची चव तुम्हाला देऊ शकतो इथपर्यंतची इत्यंभूत माहिती या ब्लॉग्जवर तुम्हाला मिळू शकते. इंटरनेटवर पदार्थाच्या नावानुसार किंवा प्रकारानुसार हे ब्लॉग्ज तुम्हाला मिळू शकतात. तसेच या रेसिपीबद्दल किंवा पदार्थाबद्दल काही शंका असल्यास ती विचारण्यासाठी इमेल अॅड्रेसही या ब्लॉगवर मिळू शकतो. कोणताही खर्च न करता घरबसल्या उपलब्ध होणारे हे ब्लॉग्ज चहापासून डेजर्टपर्यंतच्या पदार्थांना स्थान देणारे आहेत. त्यामुळे सध्या खाद्यसंस्कृतीची इ-परंपरा या ब्लॉग्जच्या माध्यमातून जपली जात आहे.

गारेssssगार!

juice
सुपर्णा शुक्ल, कॉलेज क्लब रिपोर्टर

रविवारच्या महिला दिनानिमित्त स्वतःला द्या एक मस्त ट्रीट.. उन्हाच्या झळा पुन्हा जाणवू लागल्या आहेत. त्यामुळे मैत्रिणींनो एक झक्कास ज्यूसपार्टी होऊन जाऊ द्या !

सध्या हेल्दी आणि डाएट फूडचा जमाना आहे. त्यामुळे कमी तेलकट, फायबर युक्त पदार्थांच्या सेवनाकडे लोकांचा कल दिसून येतोय. त्यातही आहार आणि आरोग्याविषयी जागरूक असणाऱ्या मंडळींमध्ये वेगवेगळ्या भाज्या आणि फळांच्या ज्युसेसची जबरदस्त क्रेझ दिसून येतेय. आजकाल तर चक्क मोठमोठ्या समारंभातून जंक फूडऐवजी ज्यूस काउंटरवर लोकांची जास्त गर्दी असते.

ज्यूस अर्थात फळांचा रस हे नक्कीच एक उत्तम डाएट आहे. कामाच्या धावपळीत बसून नाश्ता करायला वेळ मिळत नाही, अशावेळी एनर्जीसाठी वर्कआउटनंतर एक ग्लासभर ज्यूस नक्कीच फायदेशीर आहे. या ज्यूसमुळे पचन सुधारतं, तजेलदार कांती मिळते. त्यामुळेच सध्याच्या पार्टी लव्हर्सचं लेटेस्ट आकर्षण आहे, 'ज्यूस बार'. तुमचीही पार्टी हटके बनवायची असेल तर ज्युसेससाठी गाजर, सफरचंद, संत्री यासारख्या वेगवेगळ्या भाज्या किंवा फळे तयार ठेवा. नेहमीच्या जंकफूड किंवा फास्टफूड्पेक्षा वेगवेगळ्या फळांचं किंवा भाज्यांचं मिश्रण करून हेल्दी ज्युसेस बनवा. या ज्यूसना 'पॉवर पंच', 'पेप इट अप', 'गारेगार रसदार' अशी भन्नाट नावं देऊन तुम्ही आपल्या पाहुण्यांना चकित करू शकता. हा आगळा मेन्यू हेल्दीही असेल आणि चवदारही. मिक्सर किंवा ब्लेंडरमधून ज्यूस बनवताना त्यातील उपयुक्त पोषक द्रव्यांचा नाश होतो. त्यामुळे 'कोल्ड प्रेस' टेक्निकने केवळ फळाचा गर कुस्करून निघालेला रस नक्कीच अधिक पोषक असतो.

ज्युसला आणखी एक पर्याय म्हणून तुम्ही तुमच्या जेवणात 'सूप्स'चा समावेशष करू शकता. कधीतरी जड खाण्याऐवजी भाज्यांचं सूप घेतलंत तर पुरेशा जीवनसत्त्वांबरोबरच पोषक अशी खनिजं आणि मूलद्रव्यंही मिळू शकतील. ज्यूसमुळे अतिरिक्त साखर आणि ग्लुटेन यांसारख्या विषारी द्रव्यांची पातळी नियंत्रित केली जाते. आणि शरीर शुद्ध होण्यास मदत होते.

असा सेट करा तुमचा ज्यूस बार:

तुम्हाला गरज आहे फक्त एका टेबलाची, ज्युसिंग मशीनची आणि कापलेल्या भाज्या व फळांची. तुमच्या आवडत्या संत्री, मोसंबी, सफरचंद, यांसारख्या फळांबरोबरच रासबेरी, ब्लुबेरी, पिअर, अशा वेगळ्या फळांचाही समावेश करू शकता. चवीला मध, ब्राउन शुगर, आणि पुदिन्याची पानंही फळांच्या रसात वापरू शकता. जोडीला हेल्दी कुकीजसुद्धा ठेऊ शकता.

फळांच्या रसाचे फायदे

१. व्हिटामिन 'सी'चा स्त्रोत: विषारी किरणांच्या हानिकारक प्रभावापासून शरीराचे रक्षण करण्यासाठी संत्र्याच्या रसातून मिळणारं व्हिटामिन सी लाभदायक ठरतं.

२. प्रतिकारकशक्ती वर्धक: अननसाच्या रसातील ब्रोमेलीन नावच्या विकरामुळे सर्दी-खोकला कमी होण्यास मदत होते.

३. जलवर्धक: शरीरातील पाण्याचं प्रमाण संतुलित राखण्याच्या दृष्टीने यंदाच्या उन्हाळ्यात ज्युसेसला पर्याय नाही.

४. पचनशक्ती वर्धक: बीटामधील फायबरमुळे चयापचय क्रिया सुधारण्यास मदत होते.

५. यकृतासाठी फायदेशीर: सफरचंदातील अल्कधर्मी गुण यकृत स्वच्छ करून मजबूत बनवण्यात उपयोगी ठरतात.

घाबरायचं नाही, थांबायचं नाही!

debate
स्त्री प्रत्येक क्षेत्रात पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करतेय. पण दुसरीकडे ‌स्त्रियांवरील अत्याचारांच्या घटना चिंता वाढवतायत. गेल्या काही दिवसांत मुंबई-ठाण्यात रिक्षाचालकांकडून झालेल्या गुन्ह्यांनी हेच दाखवून दिलं. उद्याच्या महिला दिनानिमित्त, स्त्रियांच्या विविध प्रश्नांबाबत 'मुंबई टाइम्स'ने रुईया कॉलेजमध्ये खास डिबेटचं आयोजन केलं होतं. 'आम्ही डरपोक नाही, आम्ही जागरुक आहोत. असल्या घटनांनी घाबरुन जाऊन आम्ही थांबणार नाही', असा विश्वास यामध्ये सहभागी झालेल्या मुलींनी व्यक्त केला.

स्त्री घराच्या चौकटीतून बाहेर पडलीय, तिचं स्वातंत्र्य ती जपतेय. पण आजच्या जगात वावरत असताना तिच्या समोरील समस्याही वाढल्या आहेत. अर्थात, समस्या कितीही असल्या तरी आजची स्त्री डरपोक नाही. वाटेवरती कितीही काचा असल्या तरी आयुष्यात काही करून दाखवण्याची जिद्द त्यांना त्यांच्या ध्येयापर्यंत घेऊन जाईल, असा विश्वास 'मुंटा'च्या डिबेटमध्ये व्यक्त झाला.

यामध्ये कॉलेजच्या प्रोफेसर्स आणि काही विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या. तुमच्या नजरेतली भारतीय स्त्री कशी आहे? यावर बोलताना क्रांती कानेटकर म्हणाली, की 'भारतात पूर्वी महिलांवर अनेक निर्बंध लादले जायचे आणि स्त्रिया ते निमूटपणे सहन करायच्या. सध्याची भारतीय स्त्री मात्र बदलली आहे. ती बदल स्वीकारणारी आहे. पुरुषप्रधान समाजामध्येही ती आपलं स्थान बनवू पाहते.'

सुरक्षितता...मोठी समस्या

'स्त्री ही पूर्वीही असुरक्षित होती. घरातच तिच्यावर अनेक अत्याचार होत होते. आता फक्त याबाबत जागरुकता निर्माण झाली आहे. यात मीडियाचा मोठा वाटा आहे', असं मत माधवी शिखरेने मांडलं. घराबाहेर पडल्यापासून ते घरी परत येईपर्यंत मुलींच्या आणि तिच्या पालकांच्या मनाला घोर असतो. परंतु ग्रामीण भागात स्त्रिया घरीही तितक्याच असुरक्षित असतात. आपल्या सुरक्षेसाठी आपण काय करू शकतो? यावर बोलताना चारुश्री वझेने सांगितलं, की 'सुरक्षेच्या बाबतीत महिलांनी जागरूक राहायला हवंच. पण डरपोक बिलकूल होता कामा नये.' रुचिता पाड्याळ म्हणाली, की 'स्वत:च्या सुरक्षेची जबाबदारी स्वतः घ्यायला हवी. त्यासाठी दुसऱ्यांवर अवलंबून राहता कामा नये. आजची तरुणी यासाठी सक्षम आहे. मुलीने स्वतःच्या फायटिंग स्पिरीटवर विश्वास ठेवायला हवा. त्यासाठी कराटेसारख्या स्वसंरक्षणाच्या माध्यमाचं प्रशिक्षण घ्यायला हवं. कारण अत्याचार करणाऱ्याइतकाच त्याविरोधात आवाज न उठविणाराही गुन्हेगार असतो.

शिक्षणाची भूमिका महत्त्वाची

महिला दिन एक दिवस साजरा करण्यापेक्षा स्त्री-पुरुष समानतेचं मूल्य कायमस्वरूपी मनात रुजवायला हवं. शिक्षण यात नक्कीच महत्वाची भूमिका निभावू शकतं. समाजाची मानसिकता बदलणं गरजेचं आहे. अनेक पुरुषही ‌स्त्रियांच्या हक्कांसाठी लढा देताना आज आपण बघतो. हे कौतुकास्पद आहे.

-शाल्मली रेडकर, प्रोफेसर, रुईया कॉलेज

विशेष वागणूक नको

जागतिकीकरणामुळे आजच्या स्त्रीमध्ये बदल झाले आहेत. समाजाची चौकट मोडण्यापेक्षा ती विस्तारून स्वतःचं स्थान निर्माण करण्यावर तिचा भर आहे. समाजाची मानसिकता मात्र अजूनही तीच आहे. आम्हाला पुरुषवर्गापेक्षा वरचढ व्हायचं नाही आणि आम्हाला विशेष वागणूक नकोय. तर आम्हांला समाजात समानता हवी आहे. माणूस म्हणून जगण्याचा अधिकार हवाय असं आजच्या स्त्रीचं म्हणणं आहे.

- आश्लेषा रांगणेकर, प्रोफेसर, रुईया कॉलेज

नवं घर दाखवताना

new-home
मुंबई टाइम्स टीम

नवं घर घेतल्याचा आनंद तेव्हाच द्विगुणीत होतो, जेव्हा या घराचं कौतुक मित्र-मैत्रिणी, जवळचे नातेवाईक करतात. आजकाल वास्तूशांत झाल्यानंतर हाउसवॉर्मिंगची वेगळी छोटी पार्टी ठेवून सर्वांना बोलावण्याचा ट्रेंड आहे. अशावेळी घर सजवताना काय कराल याच्या टिप्स.

स्वच्छता, टापटिप या गोष्टी तर तुम्ही करालच; पण सगळं नीटनेटकं ठेवण्याच्या नादात घर फर्निचरच्या दुकानासारखं वाटणार नाही याची काळजी घ्या.

सगळे येणार त्यादिवशी घरात फुलांची हलकी सजावट करता येईल. बेडरूमच्या कॉर्नर टेबलवर, हॉलमध्ये खिडकीजवळ किंवा डायनिंग टेबलवर एखाद्या काचेच्या बाउलमध्ये सुवासिक फुलं ठेवल्यास त्याचा मंद सुगंध संपूर्ण घरात दरवळत राहिल.

जेवणा-खाण्याची व्यवस्था मांडताना विशेष काळजी घ्या. जेवण, पाणी सांडल्यानं फर्निचर, महागड्या बेडशीट, लँपशेड अशा गोष्टी खराब होणार नाहीत याची काळजी घेऊनच व्यवस्था करा.

सर्वांना दिवसाच्या कोणत्या वेळी बोलावणार याचा विचार करून सजावट करा. संध्याकाळची वेळ असेल, तर तुम्ही नव्यानं केलेली प्रकाशयोजना पुरेशी ठरेल. सकाळी बोलावणार असाल, तर फुलांची सजावट योग्य ठरेल.

सजावट करताना तुमचं महागडं फर्निचर झाकोळलं जाणार नाही याची खात्री करा.

वारशाचा नायनाट

pic
`आपण इतिहासातून हेच शिकतो की, इतिहासातून आपल्याला काहीच शिकता येत नाही', असे जॉर्ज बर्नाड शॉ म्हणाले होते. इसवीसनापूर्वी १३व्या शतकात उभ्या राहिलेल्या टायग्रस नदीच्या काठावरील निमरूद या नगरीचा विध्वंस खरेतर इसवीसनापूर्वी ६१२मध्येच झाला होता. मात्र, आता त्याच्या उरलेल्या अनमोल अवशेषांचा विध्वंस इस्लामी स्टेटचे बिनडोक सैनिक करीत आहेत. यामागे नक्की कारण कोणते याबाबत अभ्यासकांमध्ये विविध मतप्रवाह आहेत. इस्लामची मूर्तिभंजनावर श्रद्धा आहे, असे काहींचे म्हणणे असले तरी मूर्तिपूजक संस्कृती व इस्लामी संस्कृती शतकानुशतके एकत्र नांदल्याचे अनेक दाखले आहेत. सौदी अरेबियाच्या राजघराण्याला अभिप्रेत असलेल्या वहाबी इस्लामचा अविकसित इस्लामी राष्ट्रांवरचा वाढता पगडा हेच प्रमुख कारण यामागे आहे, असे दिसते. अठराव्या शतकातील मुहंमद-इब्न-अब्दल-वहाब या इस्लामच्या अभ्यासकाने शुद्ध इस्लामच्या नावाखाली विविध संस्कृतींना सामावून घेणाऱ्या इस्लामी परंपरांना छेद देणारे विचार मांडले. वहाब हा सौद घरण्याचा अधिकृत धर्मगुरू होता. त्याच्या विचारांवर हे घराणे वाटचाल करत असून ब्रिटिशांनी त्यांच्या फायद्याकरिता अरबस्तानाची वाटणी करताना सौद घराण्याच्या ताब्यात जो प्रदेश दिला त्याला आज जग सौदी अरेबिया म्हणून ओळखते. जगभरातील सर्वाधिक व उत्तम कच्च्या तेलाचे साठे इथे आहेत. तेलातून येणाऱ्या प्रचंड पैशाचा वापर हा देश जगभर वहाबी विचार प्रसारात करतो. अल् कायदा, असो वा इस्लामिक स्टेट.. त्यांच्याशी या देशातील राज्यकर्त्यांचा थेट संबंध जोडून दाखवता येत नसला तरी जगात शुद्ध इस्लामच्या फेरस्थापनेसाठी होणाऱ्या चळवळींमागे सौदी रियाल उभा असतो. शुद्ध इस्लाममध्ये पैगंबरांच्या आधी व नंतरच्या सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय, आर्थिक जडणघडणीला स्थान नाही. या कारणास्तव या देशाने महंमद पैगंबरांच्या काळातील ऐतिहासिक वास्तूही नष्ट केल्या होत्या. त्याच विचारधारेवर आधारित कट्टर चळवळींची वाटचाल सुरू आहे. त्यामुळे कधी बमियाँच्या बुद्धमूर्तींवर तोफा व बंदुकीच्या गोळ्यांचा भडीमार करणे तर कधी बायबलमध्ये उल्लेखलेल्या निमरूद नगरीतील अवेशष नष्ट करण्याचे काम तालिबान किंवा इस्लामिक स्टेटचे सैनिक करत असतात. आता प्रश्न आहे तो इराकसह जगभरातील भावी पिढीला सर्वार्थाने ज्ञानी तसेच सुसंस्कृत बनविण्यासाठी हा ऐतिहासिक ठेवा जतन कसा करायचा याचा. जगभरातील सर्वच राष्ट्रांनी याचा गांभीर्याने विचार करण्याची वेळ आता आली आहे.

विज्ञान दिन उत्सवप्रियतेकडे?

asci
प्रातिनिधिक फोटो
>> मयुरेश प्रभुणे

ज्या सर्वसामान्यांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी विज्ञान दिनाचा खटाटोप केला जातो, त्यांच्यासाठीच हा दिवस सोयीचा नसल्याचे गेली अनेक वर्षे विविध स्तरांतून मांडण्यात येत आहे. अधिकाधिक नागरिकांपर्यंत विज्ञान पोचवायचे असल्यास एखाद्या 'निमित्ता'पेक्षा सर्वांची सोय पाहणे अधिक गरजेचे आहे. मात्र, दुर्दैवाने वैज्ञानिक समूहाकडून या तारखेचे निमित्त पुढे केले जाते, जे एक प्रकारे अवैज्ञानिकच म्हणायला हवे.

दोन दशकांपूर्वी सुरू करण्यात आलेल्या राष्ट्रीय विज्ञान दिनाला आता राष्ट्रीय सणाचे स्वरूप आले आहे. सुरुवातीच्या काळात मोजक्या मोठ्या शहरांपर्यंत मर्यादित असणारा हा सोहळा आता खेडोपाडीही पोचला आहे. एकीकडे गणेशोत्सवातील पौराणिक देखावे पाहायला होणारी गर्दी आणि दुसरीकडे विज्ञान दिनाच्या दिवशी विज्ञान प्रदर्शने पाहण्यासाठी लागणाऱ्या रांगा, सर्वसाधारणपणे विरोधाभासी वाटणारे हे चित्र बदलत्या भारतासाठी मात्र आश्वासक आहे.

भारतात विज्ञान आहे; मात्र भारतीय समाजात नाही, हे वास्तव लक्षात घेऊन विज्ञानाला सर्वसामान्यांपर्यंत पोचवण्यासाठी राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जावा, अशी मागणी १९८६ मध्ये 'नॅशनल कौन्सिल फॉर सायन्स अँड टेक्नॉलॉजी कम्युनिकेशन'मार्फत (एनसीएसटीसी) केंद्र सरकारला करण्यात आली. विज्ञान दिन कोणता ठेवावा यासाठी निवडण्यात आलेल्या समितीने २८ फेब्रुवारी हा दिवस त्यासाठी निश्चित केला. या दिवशी सर सर सी. व्ही. रामन यांनी त्यांचा 'रामन इफेक्ट' हा प्रसिद्ध शोध जाहीर केला होता, ज्याला १९३० चे नोबेल पारितोषिक मिळाले. सरकारची या दिवसाला मान्यता मिळाल्यावर १९८७ पासून दर वर्षी २८ फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून देशभरात साजरा केला जातो. विज्ञानाचे दैनंदिन जीवनातील महत्त्व नागरिकांना पटवून द्यावे, लोककल्याणासाठी करण्यात येणारे वैज्ञानिक संशोधन सर्वसामान्यांसमोर मांडावे, विज्ञानाच्या प्रगतीसाठी आवश्यक विविध विषयांची आणि तंत्रांची चर्चा व्हावी, वैज्ञानिक दृष्टिकोन असणाऱ्या नागरिकांना संधी उपलब्ध करून द्यावी आणि विज्ञान-तंत्रज्ञानाचा सर्वसामान्यांमध्ये प्रसार करावा, त्यांना विज्ञानाकडे आकर्षित करण्यासाठी प्रोत्साहित करावे, ही विज्ञान दिन साजरा करण्यामागील मुख्य उद्दिष्टे असल्याचे केंद्र सरकारने

म्हटले आहे. राष्ट्रीय विज्ञान दिनाला दोन दशके पूर्ण होत असताना, ही उद्दिष्टे खरच साध्य होत आहेत की नाही याचाही वैज्ञानिक दृष्टिकोनातूनच आढावा घेणे आवश्यक आहे. एरवी प्रयोगशाळांच्या अन् संशोधन संस्थांच्या बंदिस्त, उंच भिंतींआड नेमकी कसले संशोधन चालते, याविषयी सर्वसामान्यांना मोठे कुतूहल असते. विज्ञान दिनाच्या निमित्ताने हे कुतूहल शमवण्याची संधी विद्यार्थी आणि नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. देशभरातील बहुतेक संशोधन संस्था या दिवशी सर्वांसाठी खुल्या ठेवल्या जातात आणि विद्यार्थी, तसेच नागरिक प्रत्यक्ष प्रयोगशाळांना भेट देऊन संबंधित संस्थांमध्ये काय संशोधन सुरू आहे, याची माहिती घेतात. तेथील शास्त्रज्ञांशी थेट संवाद साधता आल्याचा निराळाच आनंद विद्यार्थ्यांना असतो. काही संस्थांमध्ये या दिवशी विज्ञान प्रदर्शने, शास्त्रज्ञांच्या व्याख्यानांचेही आयोजन केले जाते. या उपक्रमांनाही सर्व वयोगटातील विज्ञानप्रेमींची मोठी गर्दी असते. थोडक्यात, अबालवृद्धांमध्ये विज्ञानाविषयी मोठे आकर्षण असून, संशोधन संस्थांनी पुढाकार घेतल्यास त्यांच्या उपक्रमांना मोठा प्रतिसाद मिळतो, हे विज्ञान दिनाच्या निमित्ताने समोर आले आहे. एकीकडे विज्ञान दिनाला लोकांचा मोठा प्रतिसाद मिळत असताना, दुसरीकडे मात्र, या दिवशी आयोजित होणाऱ्या उपक्रमांच्या अनेक मर्यादाही समोर येत आहेत. मान्यवर शास्त्रज्ञ, राज्य आणि केंद्र सरकार; तसेच सर्व संशोधन संस्थांनी खुल्या मनाने आणि व्यावहारिक दृष्टीतून या मर्यादांची नोंद घेणे आवश्यक आहे.

विज्ञान दिनाच्या मर्यादा

१. एका दिवसाचा सोहळा

भारतीय लोक उत्सवप्रिय असतात, याचा प्रत्यय विज्ञान दिनाच्या निमित्तानेही येतो. वर्षभरातील फक्त एक दिवस लोकांमध्ये विज्ञान जागृतीसाठी दिला म्हणजे आपले कर्तव्य पार पाडले, असा काहीसा शास्त्रज्ञ आणि संशोधन संस्थांचा पवित्रा असतो. काही मोजक्या संस्था सोडल्या, तर बहुतेक संशोधन संस्थांमध्ये अद्यापही स्वतंत्र विज्ञानप्रसार विभाग नाही, हे दुर्दैवाने वास्तव आहे. त्यामुळे अशा संस्थांसाठी विज्ञानप्रसार म्हणजे विज्ञान दिन असे समीकरण बनून गेले आहे.

२. अव्यावहारिक तारीख

ज्या सर्वसामान्यांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी विज्ञान दिनाचा खटाटोप केला जातो, त्यांच्यासाठीच हा दिवस सोयीचा नसल्याचे गेली अनेक वर्षे विविध स्तरांतून मांडण्यात येत आहे. दहावी- बारावीच्या परीक्षांचा काळ असल्यामुळे शिक्षकांना आपल्या विद्यार्थ्यांना घेऊन विज्ञान दिनाच्या उपक्रमांना उपस्थित राहता येत नाही. तसेच उन्हाचा दाहही वाढू लागल्यामुळे लहानग्यांना मोठा त्रास सहन करावा लागतो. हाच दिवस केंद्रीय अर्थसंकल्पाचाही असल्यामुळे माध्यमे, तसेच प्रशासन या उपक्रमांमध्ये सक्रियपणे सहभागी होऊ शकत नाही. अधिकाधिक नागरिकांपर्यंत विज्ञान पोचवायचे असल्यास एखाद्या 'निमित्ता'पेक्षा सर्वांची सोय पाहणे अधिक गरजेचे आहे. मात्र, दुर्दैवाने वैज्ञानिक समूहाकडून या तारखेचे निमित्त पुढे केले जाते, जे एक प्रकारे अवैज्ञानिकच म्हणायला हवे.

३. विज्ञानप्रसारासाठी काय करता येईल?

> समाजात विज्ञानप्रसाराची आत्यंतिक गरज लक्षात घेता संबंधित उपक्रम विज्ञान दिनापुरते मर्यादित नसावेत.

> सर्वसामान्यांना समजेल अशा भाषेत वैज्ञानिक माहितीची मांडणी केली जावी. विशेषतः मराठी आणि हिंदीतूनही वैज्ञानिक माहिती दिली जावी.

> उपक्रमांमधील तोचतोपणा टाळून अधिक आकर्षक आणि नावीन्यपूर्ण उपक्रम राबवले जावेत. सोशल मीडियाचाही आधार घ्यावा.

> संशोधन संस्थांनी वर्षातून एक विज्ञान दिन राबविण्यापेक्षा महिन्यातून एक असा विज्ञान दिन राबवला, तर अधिकाधिक विद्यार्थी आणि नागरिकांपर्यंत विज्ञान पोचू शकेल आणि विज्ञान दिनाची उद्दिष्टे खऱ्या अर्थाने पूर्ण होऊ शकतील.

> प्रत्येक संशोधन संस्थेत स्वतंत्र विज्ञानप्रसार विभाग असावा. ज्याच्या माध्यमातून आपल्या विषयाचे ज्ञान सातत्याने सर्वसामान्यांपर्यंत पोचवता येईल.

४. विविधता, नावीन्याचा अभाव

विज्ञान दिनाच्या कार्यक्रमांमध्येही गेल्या काही वर्षांत तोचतोपणा आल्याचे दिसून येत आहे. काही संस्थांमध्ये तर गेली दहा-पंधरा वर्षे एकाच प्रकारचे प्रदर्शन आणि व्याख्याने आयोजित केली जातात. इंटरनेट, टीव्ही, मोबाइलसारख्या माध्यमांद्वारे आज अमर्याद वैज्ञानिक माहितीची दालने खुली असताना अजूनही पारंपरिक पद्धतीने राबवल्या जाणाऱ्या उपक्रमांमध्ये मोठे बदल करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी स्वतंत्र वेळ काढून शास्त्रज्ञांनी उपक्रमांची आखणी करणे आवश्यक आहे. शास्त्रज्ञ आणि संशोधन संस्थांनी आपल्या दृष्टिकोनात बदल करणे आवश्यक असल्याचे अनेक तज्ज्ञांचे आणि डॉ. कलामांसारख्या वरिष्ठ शास्त्रज्ञांचे मत आहे. आपले संशोधन ज्या सर्वसामान्यांच्या करातून मिळणाऱ्या पैशांवर चालते, त्यांना या संशोधनाची माहिती, त्यांना समजेल अशा भाषेत देणे आपले कर्तव्य आहे, हे शास्त्रज्ञांनी समजून घेणे आवश्यक आहे. आपल्या संशोधनाची योग्य ती माहिती सर्वसामान्यांपर्यंत योग्य प्रकारे न पोचल्यास, त्याच नागरिकांकडून अनेक प्रकल्पांना विरोध होतो याची उदाहरणे जगात आणि भारतातही पाहायला मिळतात. त्यामुळे विज्ञान संशोधनात समाज हाही एक महत्त्वाचा घटक असल्याचे मान्य करून त्याला यात प्रत्यक्ष सहभागी करून घेणे आवश्यक आहे.

स्त्रियांचे आरोग्य

pic

डॉ. शालीन दुबे, लेप्रोस्कोपिक सर्जन

पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या भारतातील महिला आपल्या आरोग्याकडे मात्र हवे तेवढे लक्ष देत नाहीत. शहरातील सुमारे ३० टक्के महिलांना स्तनांच्या कॅन्सरचा धोका असल्याचे वैद्यकीय सर्वेक्षणातून समोर आले आहे. स्त्रियांना गर्भाशयाचा कॅन्सर होण्याचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. स्त्रियांमध्ये संधिवात, डायबेटिस, उच्च रक्तदाबाच्या तक्रारीही वाढत आहेत.

भारतात स्त्रियांचे आरोग्य म्हणजे केवळ गरोदरपण व बाळंतपण एवढ्यापुरतेच मर्यादित असल्यामुळे शहर व ग्रामीण भागांतील असंख्य महिला कॅन्सरला बळी पडत आहेत. स्तनाचा कॅन्सर झालेल्या दहापैकी पाच महिलांचा मृत्यू होतो, एका वैद्यकी पाहणीत आढळळे आहे. याचा अर्थ, भारतात स्तनाच्या कॅन्सरविषयी जनजागृतीचे प्रमाण खुपच कमी आहे. स्त्रियांचे मानसिक आरोग्य, जननसंस्थेचे आजार, स्तन व गर्भाशयाचा कॅन्सर आणि रजोनिवृत्तीच्या वेळी होणारा त्रास आदींबाबत जरी सरकारने महिलांच्या आरोग्यविषयक उपक्रम राबविल्यास अनेक महिलांचे जीव वाचवू शकतात. भारतातील महिलांना स्तनाचा कॅन्सर होण्याचा कायमस्वरूपी धोका १२ टक्के असतो. स्तनाच्या कॅन्सरचे निदान लवकर झाल्यास पेशंट पूर्णपणे बरे होऊ शकतात. त्यासाठी शालेय जीवनापासूनच मुलां-मुलींमध्ये याविषयी योग्य वैद्यकीय माहिती पुरवली गेली पाहिजे.

आपल्याकडे अनेक स्त्रियांना चाळीशीच्या आतच अत्यंत त्रासदायक सांधेदुखीचा त्रास चालू होतो. स्त्री आरोग्य म्हणजे बाळंतपण एवढ्यावरच मर्यादित न रहाता स्त्रियांच्या आरोग्याचा सर्वांगीण विचार करणे गरजेचे आहे. अॅनिमिया (रक्तक्षय), गर्भारपणातील आजार, गर्भाशयाचा कॅन्सर आणि डायबेटिसविषयी भारतातील प्रत्येक महिलेला योग्य माहिती पुरवली पाहिजे. भारतामध्ये कॅन्सरग्रस्त महिलांमध्ये मृत्यूचे प्रमाणही खूप आहे. स्त्रियांनी निकोप शरीर व निकोप मन याचा आग्रह धरलाच पाहिजे. हा प्रश्न भावनिक पातळीवर न पाहता स्त्री आरोग्याशी संबंधित हवा. सामाजिक परिप्रेक्ष्यातून या प्रश्नांकडे डॉक्टर, सामाजिक कार्यकर्ते, स्त्रिया व त्यांचे कुटुंबीय पाहतील, तर स्त्रियांचे आरोग्य अबाधित राहील. आरोग्यपूर्ण जीवन जगणे हा तिचा हक्क आहे. पुढील भागांत स्त्रियांच्या आरोग्यसमस्यांविषयी जाणून घेऊ.

हवेतले निरर्थक वार

pic
'इंडियाज डॉटर' या दिल्लीतील 'निर्भया' अत्याचार व खून प्रकरणातील आरोपी तसेच वकिलांच्या मुलाखतींचा समावेश असणाऱ्या डॉक्युमेंटरीवर केंद्र सरकारने घातलेली बंदी म्हणजे 'वाहत्या वाऱ्यावर धरण बांधून आम्ही तो कोंडून घालू' असा अहंकार बाळगण्यासारखे आहे. अशी बंदी म्हणजे तंत्रयुगाची ताकद, वेग आणि पसारा यांचे आकलन नसल्याची तर कबुली आहेच, पण स्वतःचे हसे करून घेणे आहे. याक्षणी ही डॉक्युमेंटरी जगाच्या कानाकोपऱ्यात सर्वत्र पोहोचली आहे. भारतातही ती ज्यांना इच्छा आहे, त्यांना थोडासा प्रयत्न केला तर सहज पाहता येते आहे. अशावेळी, केंद्रीय गृहखात्याने बंदी घालून नेमके काय साधले, याचा विचार करण्याची आवश्यकता आहे. चारच वर्षांपूर्वी ब्रिटनमधील 'चॅनेल फोर' या वाहिनीने श्रीलंकेतील गृहयुद्ध संपताना जे भयानक अत्याचार झाले आणि मानवी हक्कांची धूळधाण करण्यात आली, याचे चित्रण करणारी डॉक्युमेंटरी तयार केली होती. ती साऱ्या जगाने पाहिली. मात्र, हा आमच्या राष्ट्रावरचा हल्ला आहे, अशी टोकाची भूमिका तेव्हाच्या श्रीलंका सरकारने घेतली. देशात त्यावर बंदी घातली. अर्थात, 'श्रीलंकाज किलिंग फील्डस' ही डॉक्युमेंटरी पाहून जगाला जे समजायचे ते समजले. तामिळी जनतेची निर्घृण कत्तलही लपून राहिली नाही. तसेच, केंद्र सरकारने बंदी घातली असली तरी ज्या गुन्हेगाराला फाशीची शिक्षा ठोठविण्यात आली आहे, तो महिलांबाबत कसा विचार करतो, त्याच्या मनात आपल्या हातून घडलेल्या गुन्ह्यांविषयी कोणती भावना आहे, याचे स्पष्ट दर्शन 'इंडियाज डॉटर' पाहूनही साऱ्या जगाला झाले. या वृत्तपटाकडे एक संकट म्हणून पाहण्यापेक्षा एक आरसा किंवा एक इशारा म्हणून सर्वांनीच पाहिले असते, तर या निरर्थक 'बंदी'ने होणारे हसे टळले असते.

या गुन्ह्यातील मुलीची ओळख या वृत्तपटात जाहीर झाली आहे. ती आजवर कटाक्षाने गुप्त ठेवण्यात आली होती. त्याचप्रमाणे, ही डॉक्युमेंटरी बनविणाऱ्या महिलांनी मुकेशसिंग या गुन्हेगाराची अनेक भेटींमध्ये १६ तास चाललेली मुलाखत या दोघींनी घेतली होती. ही मुलाखत घेण्यासाठी सरकारी खात्यांनी दिलेली परवानगी, ही डॉक्युमेंटरी तयार झाल्यानंतर ती तपासण्याची न घेतलेली तसदी आणि वृत्तपट निर्मात्यांवर न घातलेली कोणतीही बंधने अशी सारी पार्श्वभूमी असताना आता सरकारने खडबडून जागे होण्याला काहीच अर्थ नाही. या डॉक्युमेंटरीच्या निर्मात्या लेस्ली उडविन यांनी 'हा वृत्तपट बनविण्याचा आपला हेतू केवळ या गुन्हेगारांची मानसिकता सर्वांसमोर यावी आणि या मुलीच्या पालकांना काय वाटते, तेही सर्वांना समजावे, असा होता,' असे म्हटले आहे. त्यांचे हे म्हणणे रास्त मानायला हवे. याचे कारण, 'निर्भया'च्या वडिलांनी एका मुलाखतीत 'ही डॉक्युमेंटरी म्हणजे भारतीय समाजासमोर धरलेला आरसा आहे,' अशी प्रतिक्रिया दिली आहे. दुसरीकडे, काही उपटसुंभांनी ही डॉक्युमेंटरी म्हणजे भारताच्या विरोधातला 'धार्मिक कट' असल्याचा आरोप केला आहे. आपल्या समाजाचे नासके अंग कुणी पाहू नये किंवा बाहेरच्यांनी ते आम्हाला दाखवू नये, हा हट्ट योग्य नाही. आजच्या तंत्रप्रधान जगात तर असा आग्रह किती वेडगळपणाचा ठरतो, हे गेल्या काही दिवसांत दिसून आले. तंत्रयुगाचा हा झपाटा 'चायना वॉल'लाही जुमानत नाही. तो केंद्र सरकारला कसा आटोपणार? त्यामुळे, हे आम्ही कुणाला पाहू देणार नाही, असे म्हणण्यापेक्षा त्यात जे दाखविले आहे, ते बदलण्यासाठी काय काय करता येईल, या विचाराने अंतर्मुख होणे, अधिक महत्त्वाचे आहे. अर्थातच, हा मार्ग दूरचा आणि खडतर आहे.

डॉ. डी. जे. पाटील

nond
नुकतीच व्हाऊट हाऊसने डॉ. डी. जे. पाटील यांची नियुक्ती चीफ डेटा सायंटिस्ट म्हणून केली. व्हाइट हाऊसचे ते पहिलेच डेटा सायंटिस्ट. जगात डेटा सायंटिस्ट या कामाचा आरंभच पाटील यांनी केला. त्यामुळे अमेरिकेच्या प्रशासनात अनेक भारतीय व्यक्ती असल्या तरी पाटील यांची नियुक्ती विशेष. डी. जे. म्हणजे धनुर्जय सुहास पाटील. वडील सुहास यांनी आयआयटी खरगपूरमधून इंजिनीअरिंग केल्यावर मास्टर्स व पीएच.डीसाठी मॅसेच्युसेट इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजीची निवड केली. अमेरिकेत स्थायिक होऊन त्यांनी एका प्रख्यात संस्थेची स्थापना केली. डी. जे. यांचे शालेय व कॉलेजचे शिक्षण अमेरिकेत झाले. गणितात अधिक रस असल्याने त्यांनी कॅलिफोर्निया विद्यापीठात गणितात बॅचलर्स डिग्री केली. पुढे मेरीलँड विद्यापीठातून उपयोजित गणितात पीएच. डी. केली. सध्या ७ पेटंट त्यांच्या नावावर आहेत. ते मेरीलँड विद्यापीठातच प्राध्यापक होते. नंतर अमेरिकेच्या संरक्षण विभागात काम करताना सोशल मीडियातून येऊ शकणाऱ्या धोक्यांचा इशारा देण्याचे काम त्यांच्याकडे होते. याशिवाय, भारतीय उपखंड धोरणाचे ते सल्लागार होते. पुढे ई-बे व समूहातील इतर कंपन्यांसाठी नवे तंत्रज्ञान निर्माण करण्याची जबाबदारी त्यांच्याकडे आली. २००८ ते १० दरम्यान झेटावायर या कंपनीत ते सल्लागार होते. गुगलने वॉलेट सुविधा पुरविण्यासाठी पुढे ही कंपनी विकत घेतली. यादरम्यान लिंक्डइन सोबत डेटा सायंटिस्ट म्हणून त्यांनी काम सुरू केले. त्याकाळी पाटील लिंक्डइनमध्ये तर जेफ हॅमरबॅचर फेसबुकमध्ये होते. या दोघांसाठीच या जागा कंपन्यांनी तयार केल्या. लिंक्डइनच्या सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या सुविधा उदा. तुम्ही ओळखत असलेल्या व्यक्ती, तुमच्या प्रोफाइल पाहिलेल्या व्यक्ती, तुम्ही कदाचित इच्छुक असाल अशा नोकऱ्या... वगैरे सुरू करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. व्हाइट हाऊसमध्ये येण्यापूर्वी ते रिलेटेलक्यू या सॉफ्टवेअर व ग्रे लॉक पार्टनर्स या तरुणांना भांडवल देणाऱ्या कंपनीत होते. हार्वर्ड बिझनेस रिव्ह्यूच्या ऑक्टोबर २०१२च्या अंकात 'डेटा सायंटिस्ट हे २१ व्या शतकातील सर्वाधिक आकर्षक काम असल्याचे' त्यांनी लिहिले होते. फोर्ब्स, फॉर्च्युन, सीएनएन, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम अशा नामवंत संस्थांनी त्यांचा गौरव केला आहे. व्हाइट हाऊसचे चीफ डेटा सायंटिस्ट व उपमुख्य तंत्रज्ञान अधिकारी म्हणून थेट ओबामांनी त्यांना नेमले. त्यांचा या पदनामांचे CDSaDCTODT हे लघुरूप सध्या चर्चेत आहे. व्हाइट हाऊसमध्ये ते विविध प्रकारच्या डेटाचा उपयोग समाजाच्या भल्यासाठी कसा करता येईल यावर ते लक्ष केंद्रित करतील. तसेच, विविध पेशंटच्या माहितीच्या आधारे त्यांना उपयुक्त व फायदेशीर तंत्रज्ञान कसे देता येईल, या ओबामा सरकारच्या प्रीसिजन मेडिसिन प्रकल्पात ते लक्ष घालणार आहेत.

मनास माझ्या कुंपण पडणे...

अनुभवांचे गणित मांडताना बेरीज करायची की वजावाकी, गुणाकार करायचा की भागाकार हा ज्याचा त्याचा व्यक्तिगत प्रश्न. पण ही व्यक्ती जर लेखक किंवा कवी असेल तर हा व्यक्तिगत प्रश्न न सोडवताच बेफिकीरीने पान उलटून पुढे जाणे अंमळ कठीणच. कारण येथे मागणी बेरजेची आणि गुणाकाराची. अत्यावश्यक तेथे वजाबाकी व भागाकार हवा, हे मान्य. पण मुळात हाताला वळण हवे ते अधिकाचेच चिन्ह गिरवण्याचे.

..............

निमित्त... ग्रेगरी डेव्हिड रॉबर्ट्सच्या 'शांताराम' या कादंबरीचा मराठी अनुवाद प्रसिद्ध होणे.

लेखक किंवा कवी जे काही लिहितो तो पक्का माल धरला तर त्याच्याकडील कच्चा माल कुठला? प्रज्ञा, शब्दप्रतिभा, शब्दसंग्रह, ते जुळवण्याची हातोटी, प्रकटीकरणाचे सार्मथ्य हे तर आलेच; पण त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचे म्हणजे अनुभवांचे संचित. अनुभव ग्रहण करण्याचे बळ. अनुभवांना धीटपणे, थेटपणे सामोरे जाण्याची ताकद. अनुभव ही 'येण्या'ची गोष्ट आहेच, पण त्याहीपेक्षा ती गोष्ट आहे 'जाणवण्या'ची. त्यासाठी शरीराची पंचेदिये जागी असावी लागतात, जागी ठेवावी लागतात. मन, संवेदना जित्याजागत्या आणि खुल्याही ठेवाव्या लागतात.

ही अवस्था कुठली?

थोडा संदर्भ आणि शब्दपालट मंजूर केला तर, 'मनास माझ्या कुंपण पडणे अगदी न मला साहे' अशी ही स्थिती. या लेखास निमित्तमात्र असलेल्या 'शांताराम'ची अवस्था ही अशी असावी.

शांतारामसारखी प्रज्ञा आपल्याकडे नाही का? त्याच्यासारखी शब्दप्रतिभा आपल्याकडे नाही का? शब्द जुळवण्याची हातोटी आपल्याकडे नाही का? प्रकटीकरणाचे सार्मथ्य आपल्याकडील लेखक-कवीमध्ये नाही का?

तर या प्रश्नांची उत्तरे 'आहे' असे मिळणे त्यातील अनेकांबाबत शक्य आहे.

प्रश्न उरतो तो अनुभव ग्रहण करण्याच्या ताकदीचा.

आता अनुभव अनेकदा परिस्थितीजन्य असतात हे खरे. या परिस्थितीत बरेच काही येते. आथिर्क, सामाजिक, राजकीय, भौगोलिक, शैक्षणिक, मानसिक, नैतिक, शारीरिक, समूहमानस... अशा असंख्य गोष्टींची गोळाबेरीज म्हणजे परिस्थिती. म्हणजे अनुभवांचे गणित या गोळाबेरजेवर ठरणार, हे नक्की. अनुभवांचे हे गणित मांडताना बेरीज करायची की वजावाकी, गुणाकार करायचा की भागाकार हा ज्याचा त्याचा व्यक्तिगत प्रश्न. पण ही व्यक्ती जर लेखक किंवा कवी असेल, तर हा व्यक्तिगत प्रश्न न सोडवताच बेफिकिरीने पान उलटून पुढे जाणे अंमळ कठीणच. कारण येथे मागणी बेरजेची आणि गुणाकाराची. अत्यावश्यक तेथे वजाबाकी व भागाकार हवा, हे मान्य. पण मुळात हाताला वळण हवे ते अधिकाचेच चिन्ह गिरवण्याचे.

ते वळण शांतारामच्या हाताला दिसते. येथील मंडळींच्या हाताला ते आहे काय?

या प्रश्नाचे उत्तर 'हो' असे फारच थोड्या मंडळींबाबत शक्य.

शांताराम आणि येथील मंडळी यांच्यात ही तुलना होत आहे काय? शक्य आहे. आता हे खरे की, शांतारामचे अनुभवविश्व येथील मंडळींपेक्षा कितीतरी वेगळे. त्याची मनोभूमी येथील मंडळींच्या मनोभूमीपेक्षा निश्चितच निराळी. आयुष्याकडे बघण्याचा त्याचा दृष्टिकोन येथील मंडळींपेक्षा भिन्न. त्याची आयुष्यशैली येथील लोकांपेक्षा अलग. या सगळ्यामुळे तो जे काही लिहिणार ते येथील मंडळींपेक्षा वेगळेच असणार. पण हे तर असणारच. किंबहुना असेच असायला हवे. सगळ्यांचेच शब्द एकसाच्यातील कसे चालतील?

मूळ मुद्दा आहे तो स्वत:च्या मनास कुंपण घालण्याचा. कुंपण घालून आतल्या घरात बसून राहणे सोपे आणि सुरक्षेचे. त्याने हातचे आहे ते राखले जाईल कदाचित. अनेक कुंपणवाल्यांनी एकत्र येऊन बेतलेल्या गणिताचे उत्तर पुरस्कारांच्या वा कुठल्यातरी गौरवांच्या स्वरूपात मिळत राहीलही कदाचित. मानाचे दशांश चिन्हही मिरवायला मिळेल कदाचित. पण हाती राखलेल्यात काही भर टाकायची असेल तर कुंपण घालून चालणार कसे? असलेले कुंपण तोडून भिरकावून द्यायला हवे.

आता कुंपण भिरकावयाचे म्हणजे लगेच कृतक-कलंदरासारखे वागायचे असे नाही. त्यातून खरे, अस्सल काही हाती लागणे कठीणच. शिवाय ती फार मोठी आत्मवंचनाही. त्यामुळे त्याच्या वाटेस न गेलेलेच उत्तम. बेभानाचेही भान राखत, भोवतीच्या समष्टीचा सहवेदनेने अदमास घेत, संवेदनशीलतेला धार लावून जगणे म्हणजे कुंपण तोडणे. आणि असे जगल्यास ती लिपी शब्दांत उमटणारच. कारण शब्दांतून उमटणारी लिपी कुठल्या परग्रहावरच्या अनुभवांची नसते, ती इथल्या, या जमिनीतल्या अनुभवांची असते.

जमीन समोर अमोज पसरली आहे. सरळवाकड्या, सुखदु:खाच्या, नीतीअनीतीच्या, वास्तवआभासाच्या, निराशाचैतन्याच्या असंख्य अनुभवांची बिजे त्यात रुजलेली आहेत. कुंपण तुटू दे... ती हिरवी सरसरून वर येणारच.

राजीव काळे

मराठी साहित्याचं लोणचं

राजीव काळे

यापुढे आपल्या शहरात कुठेही नवी बिझनेस गाळेवाली बिल्डिंग उभारली तर त्यातल्या एका गाळ्यात फक्त मराठी साहित्याचं लोणचंच विकायला ठेवायचं, असा नियम करणार आहे सरकार. आता विचार करा, आपल्या शहरात केवढ्या बिल्डिंगा उभ्या राहतायत. किमान अडीच ते तीन हजार. तशा प्रत्येक बिल्डिंगमध्ये एक एक गाळा मराठी साहित्याच्या लोणच्यासाठी ठेवणार म्हणजे लोणच्याचा केवढा प्रसार होणार...

..................

नमस्कार नमस्कार नमस्कार...

आजच्या आमच्या किचन कॅबिनेट कार्यक्रमात आपणा सर्व रसिकांचे खूप खूप स्वागत. आता तुम्ही म्हणाल की कार्यक्रम मराठी आणि त्याचं नाव हे असं इंग्रजी कशाला? तर हल्ली स्वयंपाकघर म्हटलं की थोड्याच लोकांना कळतं. किचन म्हटलं की सगळ्यांनाच कळतं. आणि मुळात स्वयंपाकघर म्हणजे कसं ओल्ड फॅशन्ड वाटतं, कुठल्यातरी जुन्यापुराण्या वाड्यातल्या काळोख्या खोलीसारखं. मसाले आणि फोडणीचा वास गच्च भरून राहिल्यासारखा वाटतो. जुनी पितळ्याची भांडी डोळ्यांसमोर येतात. किचन म्हणजे कसं एकदम खूप उजेड वगैरे. आणि स्टीलच्या चकाचक भांड्यांनी उजेड वाढणार. आणि शिवाय एक्झॉस्ट फॅन असल्याने वास भरून उरणार नाही. तर असो. किचनचं कौतुक पुरे झालं. आता मुख्य विषयाकडे वळू. आजच्या आपल्या रेसिपीकडे. आणि हो नेहमीसारखे तुम्ही फोनही करू शकता आम्हाला कार्यक्रमादरम्यान काही शंका असल्यास.

तर आजची आपली खास रेसिपी आहे मराठी साहित्याचं लोणचं. आता आम्ही आणि तुम्ही सारेच ते नेहमी घालत असतो. प्रत्येकाची त्याची कृती

निरनिराळी असते. त्याच्या साहित्यातील समान धागा म्हणजे साहित्य. हा काय शब्दच्छल? तर तो शब्दच्छल नाही, हे आधी जाणून घ्या. साहित्याचं लोणचं घालायचं तर मुख्य साहित्य साहित्यच असणार ना?

आता तुम्ही म्हणाल की, मराठी साहित्याचं लोणचं हा पदार्थ किचन कॅबिनेटमध्ये आत्ता घेण्याचं कारण काय? तर या पदार्थाची खासियत अशी की तो कधीही घालता येतो आणि त्यासाठी कुठलंही कारण पुरतं. त्यासाठीचं ताजं कारण तुम्हाला ठाऊक असेलच. काय? माहिती नाही म्हणता? ऐका तर मग.

मराठी साहित्याच्या लोणच्यासाठी आपल्या मायबाप सरकारने रिझवेर्शन ठेवण्याचं मान्य केलं आहे नुकतंच. रिझवेर्शन म्हणजे काय? तर यापुढे आपल्या शहरात कुठेही नवी बिझनेस गाळेवाली बिल्डिंग उभारली तर त्यातल्या एका गाळ्यात फक्त मराठी साहित्याचं लोणचंच विकायला ठेवायचं, असा नियम करणार आहे सरकार. आता विचार करा, आपल्या शहरात केवढ्या बिल्डिंगा उभ्या राहतायत. किमान अडीच ते तीन हजार. तशा प्रत्येक बिल्डिंगमध्ये एक एक गाळा मराठी साहित्याच्या लोणच्यासाठी ठेवणार म्हणजे लोणच्याचा केवढा प्रसार होणार. केवढी दुकानं लोणच्याची. लोणचं मिळत नाही... लोणचं मिळत नाही, अशी आजवरची लोकांची तक्रार असायची, ती दूर होणार. घराघरांत हे लोणचं पोहोचणार. लोणची तयार करणाऱ्यांचं कल्याण होणार. तर अशी ही विलक्षण योजना कमालीची दूरदृष्टी असलेल्या, बुद्धिमान, विचारवंत, लोणचंप्रेमी सरकारनं जाहीर केली आहे. त्यानिमित्तानं आजचा हा रेसिपीचा प्रपंच.

तर, या रेसिपीचं साहित्य आणि कृती आहे... अरे, लगेच पहिला फोन आला. हां, हां विचारा. हं. हं. हो गाळा रिझर्व ठेवणार आहेत. म्हणजे आरक्षित. आता ते कसंय, की तो कुठल्या मजल्यावर ठेवायचा, ओपनिगंला ठेवायचा की नाही, किती स्क्वेअर फुटांचा ठेवायचा ते अद्याप ठरलेलं नाही. पण हे प्रश्न फिजूल आहेत, असं नाही वाटत तुम्हाला? लोणच्याला गाळा मिळणं महत्त्वाचं.

तर, रेसिपीचं साहित्य आहे... अरे, दुसरा फोन आला. हं. बोला. तुमच्या घरातील टीव्हीचा आवाज कृपया कमी करा. हं. हं. नाही नाही. ते गाळे कुणाला आणि कसे द्यायचे ते ठरलेलं नाही अजून. काय म्हणता? गाळेवाटपात भ्रष्टाचार? हॅलो. हॅलो. संपर्क तुटला वाटतं.

तर रेसिपीचं साहित्य आहे... अरे पुन्हा फोन. अच्छा. हं. कळला तुमचा प्रश्न. आता इतके गाळे निघाल्यानंतर साहित्याचं लोणचं खपणार कसं? या तुमच्या प्रश्नाला उत्तर तुम्हीच द्यायचं आहे. म्हणजे तुम्हीच ते खरेदी करायचं आहे. सामाजिक आणि सांस्कृतिक कर्तव्यच आहे ते तुमचं. ते पार पाडण तुमच्याच हाती आहे.

तर, साहित्य आहे... अरे पुन्हा फोन. मराठीत विचारा. मराठी नाही तुम्ही? बरं हिंदीत विचारा. गुजराती? बरं गुजरातीत विचारा. पण उत्तर मराठीतच मिळेल तुम्हाला. हं. विचारा. हो हो. नाही नाही. अच्छा. लोणच्यासोबत पापड, खाकरा, ढोकळा, समोसा, शेव, गाठी विकता येतील का? वा. फार छान प्रश्न आहे. तर मराठी साहित्याच्या लोणच्याचा खप किती आहे, हे पहिल्या तीन महिन्यांत बघितलं जाईल. त्यासाठी खास सर्वपक्षीय समिती स्थापन केली जाणार आहे. खप समाधानकारक असेल तर त्याचा अर्थ लोकांना असं काहीतरी हवं आहे, असा काढला जाईल. असं काहीतरी म्हणजे पापड, ढोकळा, शेव वगैरे. त्यामुळे त्याच्या विक्रीची परवानगी मिळेल. आणि खप समाधानकारक नसेल तर लोणच्याचा सोबतीला काहीतरी गाळ्यात ठेवायलाच लागेल. हे काहीतरी म्हणजे पापड, ढोकळा, शेव वगैरे.त्याशिवाय गाळेवाल्याचं घर कसं चालणार? त्यामुळे त्यांच्या विक्रीस परवानगी दिली जाईल. मला वाटतं तुमच्या मनाचं समाधान झालं असेल.

तर, रेसिपीचं साहित्य आहे... अरे अरे अरे. कार्यक्रमाची वेळच संपली वाटतं. सिग्नल दाखवतायत. यावेळी आपला कार्यक्रम अर्धवटच राहिला. साहित्य आणि कृती सांगताच आली नाही. हरकत नाही. उद्या याच वेळी, याच चॅनेलवर पुन्हा भेटू. किचन कॅबिनेटच्या पुढच्या भागात. तोपर्यंत सगळ्यांना नमस्कार. जय महाराष्ट्र...

मुहूर्त वारीचा

अक्षरसाक्ष

म्हणजे ही जबाबदारी दुहेरी झाली. लिहिण्याची आणि ते जपण्याची. या जबाबदारीची आजची स्थिती काय आहे?संतसाहित्य राहू द्यात जरा बाजूला. आजच्या काळाला प्रतिसाद देणारी, आजच्या काळाचा शब्द होणारी किती मंडळी आहेत सभोवती? खऱ्याखुऱ्या कळवळ्याचे, काळाचे भान राखून लोकांमध्ये जाणारे कितीजण आहेत आपल्या मराठीच्या छोट्याशा परिघात? आणि असलीच अशी दुमिर्ळ मंडळी तर त्यांना प्रतिसाद देण्यात, त्यांचा मानमरातब राखण्यात पुरे पडतोय का आपण लोक?

......

दिवस वारीचे आहेत. पालख्यांचे आहेत. अभंगाचे आहेत. ओव्यांचे आहेत. ज्ञानेश्वरांपासून तुकारामांपर्यंत... नामदेवांपासून चोखोबांपर्यंत... मुक्ताबाईंपासून कान्होपात्रांपर्यंत... अशा कितीतरी मंडळींचे आहेत. ही सारी संतमंडळी. सारे उत्तम साहित्यिक. त्यांच्या शब्दसृष्टीच्या, भावसृष्टीच्या केंदस्थानी बहुतांशवेळा सावळे विठ्ठलतत्व भले असेल, त्यांचा आत्मधर्म हा नि:शंकपणे सृजनतेचा. अभंग, ओव्या हे त्या सृजनत्वाच्या फांदीवर झुलणारे नितांतसुंदर फूल. या फुलाच्या पाकळ्या झुबकेदार लयीच्या. या लयींतील एक लय आत्मनिष्ठेची आणि तिच्या सोबतीची दुसरी लय समष्टीशीही निष्ठा सांगणारी. या समष्टीत काय काय आले? तर भोवतालचे सारेच. भोवतीचा निसर्ग, माणसे, त्यांची सुखदु:खे. त्यांची आयुष्ये. त्यांच्या आशानिराशा. त्यांचे पुण्य, त्यांचे प्रमाद. थोडक्यात म्हणजे एकाच वेळी विविध सारण्यांतून चालत असलेली त्यांची जीवनरहाटी. हीच जीवनरहाटी संतमंडळींच्या शब्दांमध्ये अनेकवार उतरलेली. ही उतरण कधी केवळ आरशाप्रमाणे बिंबाचे प्रतिबिंब दाखवणारी, तर कधी मूळ बिंबावर टिप्पणी करणारी. भरभक्कम अर्थाच्या पायावरची ही टिप्पणी इतकी चपखल, की शतके लोटली तरी तिची समयोचितता कायम उरलेली.

रुणुझुणु रुणुझुणु रे भ्रमरा... सांडी तू अवगुणू रे भ्रमरा...

तुका म्हणे ऐशा नरा, मोजुनी माराव्या पैजारा...

तुटे वाद, संवाद तो हितकारी...

ही अगदी वानगीदाखलची उदाहरणे. अशी उदाहरणे संतसाहित्यात कैक सापडतील. सोयीसाठी त्यांना वचने म्हणू यात. कित्येक शतकांचे उंबरे ओलांडूनही ही वचने त्यानंतरच्या माणसांच्या बोलण्यालिहिण्यात कायम चालत राहिली. मुख्य म्हणजे आधुनिक अर्थाने समाज साक्षर नसताना, मुदितपरंपरा रुजली नसताना बहुतांश प्रमाणात मौखिक परंपरेतूनच साहित्याचे चलन एका पिढीकडून पुढच्या पिढीकडे चालू राहिले, ही मोठ्या उल्लेखाची बाब. त्यामागचे कारण काय? त्यावर, आहेच मुळी संतसाहित्य मोठ्या ताकदीचे, असे साधेसोपे उत्तर देऊन नाही भागायचे. तर, त्या ताकदीमागचे कारण अजमावून बघायला हवे.

ही ताकद कशात? तर, अगदी पहिलेछूट डोळ्यापुढे येणारे कारण म्हणजे संतांचा शब्द हा त्या काळाचा आवाज होता. काळ म्हणजे काय? व्यक्ती आणि भोवताल. कधी थेट, कधी रूपकांच्या बुंथीआडून, कधी कूटरचनांच्या माध्यमातून ही मंडळी स्वत:च्या आणि इतरांच्याही आतल्या आवाजाला प्रकट आवाज देत होती. कधी लोकांवर मायेचे, करुणेचे पांघरूण घालत होती, कधी त्यांना दटावत होती, कधी स्वत:वर चरपडत होती, कधी लोकांना दूषणे देत होती, कधी सगुण-निर्गुणाला आर्ततेने हाक देत होती, कधी सावळे तत्व हाती गवसल्याच्या आनंदात बेभान होत होती, कधी गुह्य असे काही उघड करीत होती, माणसाच्या मनातील सत् आणि असत् यांच्यातील झगडा समजून व समजावून देत होती, वास्तवाचे भान देत होती. हा असा आपल्या काळाचा आवाज ऐकणे कुणाला नाही भावणार? टाळ-मृदंग-झांजांचा भान हरपून लावणारा तालाचा पडदा जरा दूर सारून निखळ शब्दांकडे पाहिले की त्यातील ताकद अधिक जोखता येते, त्यातून काळाचा आवाज अधिक चांगल्या रीतीने ऐकता येतो.

या साहित्यातील थेट हृदयाला भिडणारी भाषा, हे या वचनांच्या अमरत्वाचे आणखी एक कारण नमूद करता येईल. या अशा भाषेचा उद्भव होणार कधी? मुळात लिहिणाऱ्याच्या हृदयात खराखुरा कळवळा असेल तर. हा कळवळा कशाहीविषयीचा. स्वत:विषयीचा, दुसऱ्याविषयीचा, आनंदाविषयीचा, दु:खाविषयीचा. अशा कळवळ्यातून निर्माण झालेल्या शब्दांचे नाते भोवतीच्या माणसांशी जोडले गेले नाही तरच नवल. आणि ही नातेसांधणी केवळ आपल्या गुहेत, आश्रमात राहून शब्द प्रसवण्यापुरती नव्हती, आत्म्याचे तत्वज्ञान सांगणारे हे लोक काळाचे भान राखून प्रत्यक्ष देहाने समाजात मिसळत होते, हे लक्षात ठेवण्याजोगे.

आणि वचनांच्या अमरत्वाचे एक न विसरता येणारे कारण म्हणजे सर्वसामान्य लोकांनी या संतांच्या अभंगांना, ओव्यांना, विविध रचनांना दिलेला प्रतिसाद. एका रीतीने बघितले तर साहित्यिक आणि त्यांचे चाहते यांच्यातील अद्वैताचे हे एक अद्भुत उदाहरण आहे. त्यामुळे, संतसाहित्य टिकून राहण्याचे श्रेय जसे संतमंडळींच्या ताकदीला, तसेच त्या ताकदीचा योग्य तो मानमरातब राखणाऱ्या लोकांनाही.

म्हणजे ही जबाबदारी दुहेरी झाली. लिहिण्याची आणि ते जपण्याची. ती दोन्ही बाजूंनी यथास्थित पार पाडायला हवी.

या जबाबदारीची आजची स्थिती काय आहे? संत साहित्य राहू द्यात जरा बाजूला. आजच्या काळाला प्रतिसाद देणारी, आजच्या काळाचा शब्द होणारी किती मंडळी आहेत सभोवती? शब्दांतून लोकांशी नाते सांधणारे किती लोक आहेत भोवताली. खऱ्याखुऱ्या कळवळ्याचे, काळाचे भान राखून लोकांमध्ये जाणारे कितीजण आहेत आपल्या मराठीच्या छोट्याशा परिघात? टिकून राहतील का त्यांचे शब्द शतकांचे जाऊ देत, दशकांचे तरी उंबरे ओलांडून? आणि असलीच अशी दुमिर्ळ मंडळी तर त्यांना प्रतिसाद देण्यात, त्यांचा मानमरातब राखण्यात पुरे पडतोय का आपण लोक? कुठल्याही माध्यमाने घेऊन जाणार आहोत का आपण त्यांचे साहित्य पुढे पुढे?

या प्रश्नांची उत्तरे द्यायला हवीत दोन्ही बाजूंनी. तीही खरीखुरी. संतांच्या साहित्याला साक्षी ठेवून आणि त्यांच्याच शब्दांत सांगायचे तर सत्य असत्यासी मन ग्वाही करून. आणि त्यासाठी वारीखेरीज अन्य चांगला मुहूर्त कुठला सापडणार?

राजीव काळे

अन, वस्त्र, निवारा आणि पुस्तक

राजीव काळे

फोटोतील मुलगी, तिचा देश, तिचा धर्म, तिच्या भोवतीचा दृश्य परिसर, पडझडीचे स्वरूप, काळ या सगळ्यावरचे अनावश्यक संदर्भबंध दूर सारूया आणि विचार करूया फक्त पुस्तकाचा, ते मिळवण्यासाठी आणि ते वाचण्यासाठी जीव पाखडण्याचा. हे जीव पाखडणे कुठल्या प्रकारचे? कुठल्या प्रतीचे? तर जणू पुस्तकाविना आपण जगूच शकणार नाही, अशा असोशीचे. म्हणजे पुस्तक, वाचन ही जीवनावश्यक बाबच झाली.

............

हा फोटो कुठला? अफगाणिस्तानमधला, किंवा इराकमधला. आणि आपल्या मनातील दृश्य भौगोलिक व सांस्कृतिक संदर्भांत थोडे बदल केले तर हा फोटो आपला शेजारी पाकिस्तान किंवा अगदी आपल्या भारतातलाही.

हा फोटो कधीचा?

दिसत आणि भासत आत्ताचाच असला तरी फोटो काढण्याची कला माणसाला अवगत होण्याच्या कितीतरी आधीपासून ते आजपासून कितीतरी वषेर् पुढचा ठरू शकेल, असा कधीचाही.हा फोटो कसला?

बेलगाम, बेफाम आणि पिसाट शक्तींनी घडवून आणलेल्या उद्ध्वस्तीकरणाचा. पडझडीचा.

या उद्ध्वस्त पडझडीच्या पार्श्वभूमीवर एक मुलगी उभी. तिच्या हातात पुस्तक.

हे पुस्तक कसले? कुराण.

उन्मत्त दांडग्यांनी केलेल्या पडझडीत घरातील उरलेले काहीतरी शोधताना हे कुराण या मुलीला सहज सापडले असावे किंवा मग खास कुराणासाठीच तिने शोध घेतला असावा. आपल्या मनातील शक्यता आजमावण्याचा परीघ रुंद करूया आणि मानूया की तिने कुराण शोधण्यासाठीच जीव पाखडला असावा. कुराणाभोवतीचे धामिर्क, आध्यात्मिक, सांस्कृतिक आणि कुठले कुठले संदर्भ या मुलीसाठी कदाचित साऱ्या पडझडीत मोठे आधार ठरत असतील. कुराणाचा आधार का वाटतो, याचे सुस्पष्ट आणि तर्कसंगत विश्लेषण कदाचित तिला नाही करता यायचे. पण साऱ्या समीक्षकी विश्लेषणांच्या पलीकडे तिला काय वाटते ते अधिक महत्त्वाचे. एक दाट शक्यता अशीही की या मुलीची कदाचित अक्षरांशी ओळखही नसावी. पण केवळ कुराणाचे अस्तित्व, त्या पवित्र ग्रंथाचा स्पर्शही तिच्यासाठी फार फार मोलाचा असावा.

फोटोतील मुलगी, तिचा देश, तिचा धर्म, तिच्या भोवतीचा दृश्य परिसर, पडझडीचे स्वरूप, काळ या सगळ्यावरचे अनावश्यक संदर्भबंध दूर सारूया आणि विचार करूया फक्त पुस्तकाचा, ते मिळवण्यासाठी आणि ते वाचण्यासाठी जीव पाखडण्याचा. हे जीव पाखडणे कुठल्या प्रकारचे? कुठल्या प्रतीचे? तर जणू पुस्तकाविना आपण जगूच शकणार नाही, अशा असोशीचे. म्हणजे पुस्तक, वाचन ही जीवनावश्यक बाबच झाली. अन्न, वस्त्र, निवारा या तिगडीला जोड वाचनाची.

पण, रोजचे नुस्ते जगणेही कमालीचे क्लिष्ट होत असताना आणि त्याची गणिते दिवसागणिक अधिकाधिक अवघड होत चालली असताना त्यात कसले हे वाचनबिचन? डोक्याला ताप सांगितलाय कुणी? आणि वाचून वाचून वाचायचे काय, तर कथा, कविता, कादंबऱ्या, वैचारिक लेखन किंवा मग 'आयुष्यात यशस्वी कसे व्हावे', 'मन ताणरहित कसे करावे?' अशा ठपीची पुस्तके. त्यातून हाती काय लागणार? उगाच महागड्या पुस्तकांवर खर्च करायचा. त्यापेक्षा अन्न, वस्त्र, निवारा एवढ्यापुरत्याच आपल्या जीवनावश्यक गरजा सीमित ठेवू या. त्यांचा दर्जा वाढवण्यासाठी, त्यांच्या झगमगाटासाठी हवे तर पैसे खर्च करू या. वेळ खर्च करू या. पण हे वाचनबिचन नका सांगू आम्हाला. केवळ कागदी फडफड ती.

मग त्या फोटोतल्या मुलीने एवढ्या पडझडीत पुस्तक शोधले, त्याचे काय? तिच्या लेखी पुस्तक म्हणजे केवळ कागदी फडफड नाही. तिच्या लेखी पुस्तक म्हणजे आधार. हा आधार जगण्याचे बळ देणारा. भोवतालाचे भान देणारा. त्यातील सुखदु:खांचे प्रवाह दर्शवणारा. अवघडातून मार्ग दाखवणारा. कदाचित पडझड करणाऱ्यांशी लढण्याची ताकद देणाराही. प्रेरणा निरनिराळ्या असू शकतील, मुख्य मुद्दा वाचन हाच. अगदी अन्न, वस्त्र, निवाऱ्याच्या जोडीने.

ही जोड तुम्ही-आम्ही दिली आहे? देत आहोत? देणार आहोत?

आपल्या भोवताली दृश्य आणि अदृश्य स्वरूपाची बेहिशेबी पडझड सुरू आहे. सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, मूल्यात्मक अशा असंख्य आघाड्यांवर. अशा परिस्थितीत पुस्तक-वाचन ही आपली जीवनावश्यक बाब ठरू शकत नाही काय? पुस्तकांच्या वाटेलाही न जाता अन्य मार्गांनी भोवतालचे उत्तम भान येत असेल, वैचारिक पातळी उंचावत असेल, विचारांचा परीघ रुंदावत असेल, तर गोष्ट वेगळी. तेथे तक्रारीला जागा नाही. उलट कौतुकच. पण असे भान नसल्यास ते येण्यासाठी पुस्तकाचे पान उलगडायला हवेच. आवश्यक ते वाचायला हवेच. त्याखेरीज अन्य मार्ग नाही. आणि जिवंतपणे जगायचे असल्यास असे भान राखण्यावाचूनही पर्याय नाही. अन्न, वस्त्र, निवाऱ्यावाचून माणसाला पर्याय नसतो तसेच हे. फोटोतल्या त्या मुलीने हा पर्याय स्वीकारला असावा. आम्ही-तुम्ही स्वीकारला आहे? असल्यास उत्तम. नसल्यास स्वीकारायला हवा. जिवंतपणे जगण्यासाठी एवढे तरी करायला हवेच.

शस्त्रवाले आणि त्रिवर्ण

राजीव काळे

शस्त्रवाल्यांचा सांस्कृतिक दबदबा लक्षात घेता ते सांगतील ती पूर्वदिशा, असा समज होण्याचा आणि काळ्या दगडावर त्यांचीच रेघ उमटण्याचा धोका खूप. या मंडळींकडून दान घेणा-याबाबत तर हा धोका अधिकच. आणि हे दान देणारे आणि दान घेणारे या वर्तुळाबाहेरील अक्षरवाचकांचे काय? की त्यांना या सगळ्या व्यवहारात गावकुसाबाहेर ठेवायचे? ही तर चातुर्वर्णासारखी त्रिवणीर् व्यवस्था झाली. चातुर्वर्ण व्यवस्थेने आपल्या समाजाचे काय झाले, ते सर्वज्ञात आहे. त्रिवर्ण व्यवस्थेने साहित्याचे काही वेगळे होईल, अशी आशा बाळगण्यास जागा नाही.

..................

... तर ही व्यवस्था मस्तच. म्हणजे समोर येईल त्या कवितेचे, कथेचे, कादंबरीचे, किंवा मग समजा कुणी केलाच प्रयत्न या रूढ साहित्यप्रकारांपेक्षा निराळ्या अशा फॉर्ममधील साहित्य घडवण्याचा, तर त्याचे विच्छेदन करायचे ते आपल्याला भावलेल्या शस्त्रांनी, उपकरणांनी. आता या भावण्याच्या पायात एक मोठा दगड सोयीचा. सोय अनेक पातळ्यांवरची. वैयक्तिक, सामाजिक, साहित्यिक, व्यावहारिक वगैरे. त्यातून साध्य करायच्या गोष्टी अनेक. आणि त्यातील अनेक साहित्यबाह्य. त्याविषयी येथे न बोलणेच श्रेयस्कर. मग बोलायचे कशावर? तर, या विच्छेदनर्कत्यांच्या हाती असलेल्या शस्त्रांवर... उपकरणांवर.

ही शस्त्रे विविध प्रकारची आणि धारदार. आणि प्रत्येक शस्त्रावर वेगवेगळी लेबले डकवलेली. रूपवाद, मार्क्सवाद, देशीवाद, वच्छंदतावाद, कलावाद, वास्तववाद, आदिबंधवाद, व्यक्तिवाद, समाजवाद... लेबलांना तोटा नाही. ती लेबले ज्यावर डकवायची त्या शस्त्रांना तोटा नाही. ती शस्त्रे ज्या हातात असणार त्यांना तोटा नाही. हे हात ज्या मेंदूच्या आज्ञेनुसार चालणार त्या मेंदूंना तोटा नाही. हे सारे मेंदू कमालीचे तल्लख आणि चाणाक्ष. त्यांचे भरणपोषण जाड्याजाड्या पुस्तकांवर, ग्रंथांवर झालेले. त्या ग्रंथांतील सारा रस त्यांच्या मेंदूंत सुरक्षित. आणि महत्त्वाचे म्हणजे हे सारे मेंदू भावी पिढ्यांच्या साहित्यिक, सांस्कृतिक कल्याणाच्या कामी लागलेले. काम कसले ते, दानच की हो. आणि दान म्हणजे तर महापवित्र. आपली संस्कृतीच सांगते तसे. संस्कृती सांगते म्हणजे खरेच असणार ते. तर ही सारी मंडळी ज्ञानशूर आणि दानशूर. आता त्या पवित्र दानासाठी त्यांना महिन्याच्या महिन्याला भरभक्कम बिदागी मिळते ती सोडा. पण तरीही ती दानशूरच.

या दानशूर मंडळींवर नियतीने सोपवलेली जबाबदारी मोठी आणि ऐतिहासिकही. समोर आलेल्या अक्षरकृतीचे विच्छेदन करणे. आणि त्यातील शब्द न् शब्द वेगळा करणे. त्या शब्दांच्या मुळाशी कुठला रस वाहतो आहे, याचा तपास करणे. कालगतीच्या पटलावर त्यांची ऐतिहासिकता मोजणे. हा सव्यापसव्य करण्यात प्रत्येक मेंदू आपापली वाट शोधणार. आता अशा प्रकारे स्वतंत्ररीत्या वाट शोधण्यात चूक काय? तर काहीच नाही. मेंदू असलेल्या प्रत्येकाने अवश्य करावी, अशीच ही गोष्ट. प्रश्न एकच. मेंदू चालवताना डोळे टक्क उघडे ठेवायचे की हाती असलेली शस्त्रेच चालवण्याचा अट्टहास धरायचा, त्यांच्या पलीकडे काही पहायचेच नाही का, हा. एका मर्यादेपर्यंत ती तशीही चालवण्यात हरकत नाही. पण त्याच्या पुढचा मुद्दा म्हणजे केवळ आपल्या हाती असलेली शस्त्रेच खरी... इतरांच्या हाती असलेली शस्त्रे म्हणजे हंबग, असला विचार शस्त्रवाल्यांनी मांडावा का, असा. त्यावर कहर म्हणजे आपल्या हाती जी शस्त्रे आहेत त्यांवर डकवलेली लेबलेच डकवता येईल, अशीच अक्षरकृती त्याच्या निर्मात्यांनी निर्माण करावी, असा उघड वा छुपा हट्ट धरणे. हा तर अक्षरपातळीवरचा दहशतवादच की.

आता, हाती कुठली शस्त्रे हाती घ्यायची, केवळ त्यांचाच हट्ट धरायचा का हा ज्याच्या त्याचा वैयक्तिक प्रश्न असला आणि त्यात प्रत्येकाच्या बुद्धीच्या, दृष्टीच्या आवाक्याचा संबंध असला तरी त्यातून होणारे नुकसान कोण भरून काढणार? कारण शस्त्रवाल्यांचा सांस्कृतिक दबदबा, त्यांची पत हे लक्षात घेता ते सांगतील ती पूर्वदिशा असा समज होण्याचा आणि काळ्या दगडावर त्यांचीच रेघ उमटण्याचा धोका खूप. विशेषत: या मंडळींकडून दान घेणाऱ्यांबाबत तर हा धोका अधिकच. आणि अपवाद वगळता ही रेघ खरोखरच मोठी होण्याच्या योग्यतेची असेलच, याची हमी देण्यासारखीही परिस्थिती नाही. दान घेणारी मंडळी आदल्यांकडून हाती आलेले तेच दान नंतर पुढल्यांच्या हाती देणार. ही साखळी अशीच सुरू राहणार. त्यात वैचारिक खुलेपणा बुडणार आणि आपापल्या मार्गांवरील वाटचाल, त्यांचेच उदात्तीकरण आणि इतर वाटांच्या नावाने बोटे मोडणे जारी राहणार. शिवाय हे दान देणारे आणि दान घेणारे या वर्तुळाबाहेरील अक्षरवाचकांचे काय? की त्यांना या सगळ्या व्यवहारात जमेसच धरायचे नाही? त्यांना गावकुसाबाहेरच ठेवायचे? ही तर चातुर्वर्णासारखी त्रिवणीर् व्यवस्था झाली. त्यातून शस्त्रवाल्यांची पोटे भरत असतील, त्यांच्या हाती मानसन्मान पडत असतील, पण त्यातून इतरांचे खऱ्या अर्थाने कल्याण होणे कठीणच.

चातुर्वर्ण व्यवस्थेने आपल्या समाजाचे काय झाले, ते सर्वज्ञात आहे. या त्रिवर्ण व्यवस्थेने साहित्याचे काही वेगळे होईल, अशी आशा बाळगण्यास जागा नाही.

रुतलेल्या पावलांना सदिच्छा!

राजीव काळे

इथे मुद्दा जुन्यांना सरसकट मोडीत काढण्याचाही नाही. त्यांनी त्यांच्या काळी, त्यांच्या काळाशी सांधा जोडून जे लिहिले ते त्या काळात उत्कृष्ट असेलही. शिवाय त्यातले काही लिखाण आजच्याही काळाशी सांधा जोडत असेल तर ते टिकून राहणारच. पण असे सांधे जोडणारे साहित्य नसेल तर ते मागे सोडणेच श्रेयस्कर. केवळ विभूतिपूजा करण्यात आणि जुन्याचे उमाळे काढण्यात काही हशील नाही. आजच्या पिढीला 'आज'चा साहित्यिक वाचायला मिळायलाच हवा...

.............

एक पिढी म्हणजे किती वषेर्? याचा हिशेब मांडायचा तर त्याचा संदर्भ कुठला हे आधी लक्षात घेणे गरजेचे. त्यानुसार काळाचा हिशेब मांडता येणे शक्य. साहित्य व्यवहारात तर त्याबाबत काळाचे ठोकताळे मांडता येणे कठीणच. म्हणजे अमुक एक वर्षांमागे जन्मलेला किंवा दिवंगत झालेला लेखक वा कवी त्या पिढीचा असू शकतो. किंवा त्या पिढीचा न झाला तर पुढल्या पिढीचा असू शकतो. आणि त्याच्या बरोबर उलटही. म्हणजे आपल्या अवतीभवती 'आज' वावरणारा आणि लिहिणारा लेखक वा कवी 'काल'चा असू शकतो. आणि कालच्याच गोष्टी तो पुन्हापुन्हा सांगत असतो. याची उदाहरणे आपल्या मराठीत कैक. ती कालही होती आणि आजही आहेत.

साहित्यिक शिळ्या वा ताज्या वा उद्याच्या पिढीतला असू शकतो. या पिढ्यांच्या परिमाणांबाहेरचाही असू शकतो. तर मग या पिढ्यांना समांतर, खरे तर त्या पिढीशी जोडलेली अशी वाचकांची पिढी असते का? ढोबळमानाने अशी पिढी दिसतेच. ही रचनाही तशीच. म्हणजे त्यांतील कुणी आदल्यांशी जोडले गेलेले, कुणी आजच्यांशी, कुणी पुढल्यांशी.

या सगळ्या रचनेत लहान मुलांचं स्थान कुठे? तर ते स्थान स्वयंसिद्ध असणे खूपच कठीण. घरातील लोक जे वाचणार, शाळांच्या वाचनालयांत जी पुस्तक असणार त्यावरच त्यांचे स्थान ठरणार. त्यात केवळ फॅशन म्हणून नव्हे, तर खरोखरच्या आस्थेने पुस्तक घरी बाळगणारी मंडळी कमीच. आणि शाळांमध्ये मुलांना कुठली पुस्तकं वाचायला मिळणार?

श्यामची आई, स्वामी, मृत्युंजय, व्यक्ती आणि वल्ली, बटाट्याची चाळ, राजा शिवछत्रपती, माझी जन्मठेप, एक होता कार्व्हर...

ही यादी मनची नाही. 'जिज्ञासा ट्रस्ट' आणि 'मराठी अभ्यास केंद' यांनी ठाण्यात काही महिन्यांपूवीर् लेखन शिबिर आयोजित केले होते. त्यात सहभागी झाले होते इयत्ता सातवी ते नववीतील विद्याथीर्. तुम्हाला आवडलेली पुस्तकं कुठली? या प्रश्नाला या विद्यार्थ्यांनी दिलेली उत्तरे म्हणजे ही पुस्तकांच्या नावांची यादी. आणि त्यांच्या आवडत्या लेखक वा कवींच्या यादीत स्थान पु. ल. देशपांडे, कुसुमाग्रज, गोविंद विनायक म्हणजेच विंदा करंदीकर आदींना.

आणि आता आणखी एक यादी बघू. सुमारे १२ ते १५ वर्षांमागे जे विद्याथीर्दशेत होते, त्यांच्याकडूनही अशा प्रकारची यादी मागवण्यात आली. त्या यादीत स्थान राजा शिवछत्रपती, माणदेशी माणसं, गोट्या आदी पुस्तकांना. त्या पिढीचे आवडते लेखक पु. ल., भा. रा. भागवत, व्यंकटेश माडगूळकर.

थोडा विचार करू या की, साहित्यिकांच्या या यादीतील मंडळींची पिढी कुठली आणि आजच्या, किंबहुना 'आज'चा होण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या वाचकाची पिढी कुठली? केवळ काळाचा मापदंड लावला तर या बहुतांश साहित्यिकांची पिढी मागची. आणि कालनिरपेक्षतेचा मापदंड हाती धरला तर त्यातील काहींची पिढी कालची आणि काहींची आजची. त्यातील काहींचे काही लिखाण आज शिळे वाटणारे तर काही आजही ताजे वाटणारे.

या सगळ्यात एक शंका येते ती अशी की, आपण आजच्या मुलांना आजच्या पिढीच्या वर्गात बसवत आहोत की नाही? इथे प्रश्न मराठी वा इंग्रजी माध्यमाचा नाही. इंग्रजी माध्यमातील मुलगा जर 'बटाट्याची चाळ' वाचू शकतो तर त्याला 'आज'चेही एखादे पुस्तक वाचता येईलच की. ते पुस्तक आपण त्याच्या हाती देतो की नाही, हा प्रश्न आहे. इथे मुद्दा जुन्यांना सरसकट मोडीत काढण्याचाही नाही. त्यांनी त्यांच्या काळी, त्यांच्या काळाशी सांधा जोडून जे लिहिले ते त्या काळात उत्कृष्ट असेलही. त्याबाबत संशयाला जागाच नाही. शिवाय त्यातले काही लिखाण आजच्याही काळाशी सांधा जोडत असेल तर ते टिकून राहणारच. पण असे सांधे जोडणारे साहित्य नसेल तर ते मागे सोडणेच श्रेयस्कर. केवळ विभूतिपूजा करण्यात आणि जुन्याचे उमाळे काढण्यात काही हशील नाही. विभूतिपूजेत मेंदू गहाण ठेवला जातो आणि जुन्याचे उमाळे काढून केवळ मन कातरहळवे होते. मेंदू गहाण ठेवून मन कातरहळवे करण्याने काय साध्य होणार?

गोष्ट साधीसोपी आहे. आजच्या वाचकाला 'आज'चा साहित्यिकही वाचायला मिळायला हवा. आणि येथे 'आज'चा वाचक म्हणजे शाळेतील मुले अभिप्रेत आहेत. आता, या छोट्यांच्या हाती एकदम श्याम मनोहरांचे किंवा अरुण कोलटकरांचे (हे दोघेही तसे 'काल'चे असूनही 'आज'चेच!) पुस्तक सोपवा, असे सांगण्याचा हेतू नाही. पण त्या दिशेने प्रवास तरी करता येईल ना! आणि ती जबाबदारी निविर्वाद मोठ्यांचीच. अर्थात, प्रवास करण्यासाठी पावले उचलावी लागतात. रुतलेली पावले पुढे जाऊ शकत नाहीत.

पावले रुतलेली असतील तर ती निघोत आणि प्रवासाला लागोत, हीच सदिच्छा...

नवा ध्वज फडकू द्या..!

- राजीव काळे

एका आवर्तनात अडकलेल्या मराठी साहित्य संमेलनास अधिकाधिक व्यापक स्वरूप प्राप्त होण्याच्या मार्गावरील हे छोटेसे पाऊल ठरू शकते, असा आशावाद बाळगण्यास तरी हरकत नाही. हा आशावाद खरा ठरवायचा असेल तर यापुढील संमेलनांतही अशा प्रकारची पावले टाकायला हवीत.
....................

आणखी बरोबर दोन आठवड्यांनी ठाण्यातील ८४व्या 'अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलना'साठीची आयोजकांची लगबग कमालीची वाढलेली असेल. मंडप उभारणीपासून ते जेवणा-खाण्याच्या व्यवस्थेपर्यंत... सगळ्याच गोष्टींच्या तयारीवर अखेरचा हात फिरवला जात असेल. त्यावेळी आयोजकांच्या मनात उत्साह असेल तशीच थोडी धाकधूकही. धाकधूक कसली? 'एवढा घाट घातलाय आपण, तर संमेलन नीट पार पडेल ना', याची.

... आणि आणखी बरोबर तीन आठवड्यांनी संमेलनाचा मंडप उतरेल. आयोजक शिणवटा दूर करीत असतील. संमेलनास प्रत्यक्ष उपस्थिती लावणारे, त्याच्या बातम्या वृत्तपत्रांत आस्थेने वाचणारे, टीव्हीवर पाहणारे त्यावेळी काय करत असतील? मनावर चढलेला संमेलनाचा रंग थोडा बाळगत, थोडा पुसत आपापल्या कामाला लागले असतील. हा बाळगायचा आणि पुसायचा रंग कसा असेल? हवाहवासा की नकोनकोसा? पुढच्या दोन आठवड्यांत आणि नंतर प्रत्यक्ष संमेलनात नेमके काय घडते, यावर हा रंग विसंबून असेल.

आता साहित्य संमेलनाच्या आधीच्या दिवसांत आणि प्रत्यक्ष साहित्य संमेलनात काय घडायला हवे, या प्रश्नाचे उत्तर उघडच आहे. संमेलन मराठी साहित्याचे असल्याने मराठी भाषा व साहित्याविषयीची साधकबाधक चर्चा. अशी चर्चा यावेळी होईल? संमेलनांच्या गतानुभवांचा वेताळ मानगुटीवर इतका घट्ट बसलेला आहे, की या प्रश्नाचे उत्तर 'हो' असे देण्यास जीभ रेटली तर नवलच. आणि गतानुभव कशाला? या ठाणे संमेलनाच्याही काही घटना आणि अनुभव तसे आहेतच की. आयोजकांमधील कुरबुरी, आरोप-प्रत्यारोप, उद्घाटकाचा वाद, खर्चाच्या रकमेवरील आक्षेप या तर ठळकपणे समोर आलेल्या गोष्टी. अद्याप समोर न आलेल्या किंवा न आणलेल्या आणखी बऱ्याच गोष्टी आहेतच. पण या नकोशा रंगांआडून एक हवासा लोभस रंग डोकावतो आहे. त्याची दखल घ्यायलाच हवी.

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ आणि स्थानिक यजमान संस्था यांच्या एकत्रित प्रयत्नांतून वर्षानुवषेर् अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलने पार पडत आहेत. अध्यक्षीय निवडणुकीच्या संकुचित रीतीवर होणारी टीका बाजूला ठेवली तरी या संमेलनांनी 'अखिल भारतीय' असे बिरूद लावण्याचे धारिष्ट्य का करावे, हा अनेकदा, किंबहुना नेहमीच पडणारा प्रश्न. ठराविक प्रदेशापुरती, ठराविक घटकांपुरती, ठराविक मंडळींपुरती, ठराविक कार्यक्रमांपुरती संमेलनांची चाकोरी ठरलेली. त्या चाकोरीतून चालताना हमखास गदीर्ची खात्री मिळत असेलही संबंधितांना; पण मराठीचे, मराठी साहित्याचे काही भले होईल, त्याच्या गुणात्मक आणि भौमितिक विकासास चालना मिळेलच, याची खात्री बाळगणे कठीण.

ठाण्यातील चित्र थोडे वेगळे दिसते आहे.

संमेलनाची रूढ चाकोरी पार तोडूनमोडून थेट क्रांतीबिंती झालेली नाही ठाण्यात. पण संमेलनाच्या निमित्ताने ठाणे जिल्ह्यात विविध ठिकाणी आयोजित करण्यात आलेले साहित्य कार्यक्रम व त्यांना मिळालेला प्रतिसाद आवर्जून लक्षात घ्यावा, असा आहे. सातपाटीत झालेले कोळीबांधव संमेलन तसेच जव्हारचे आदिवासी संमेलन हे दोन्ही कार्यक्रम खास ध्यानात घ्यावेत असेच. मुंबई-पुण्यातील मराठीजन बोलतात किंवा लिहितात किंवा छापतात ती मराठी भाषा आहेच, पण केवळ तीच मराठी भाषा नाही. तसल्या गैरसमजात कुणी राहू नये. या भाषेच्या वर्तुळाबाहेरही अतिशय समृद्ध वारसा असलेली आपल्याच मराठीची विविधरंगी रूपे आहेत. स्थानिक मातीचा रंग आणि गंध त्यांना आहे. ही रूपे उपेक्षित ठेवून कसे चालणार? तसे केल्याने त्यांचे काय नुकसान होईल, यापेक्षा मराठीचे काय नुकसान होईल, याचा विचार महत्त्वाचा. ठाण्यातील संमेलनाच्या निमित्ताने तो झाला असावा, असे दिसते. त्याखेरीज महानुभाव साहित्य संमेलन, महिला साहित्य संमेलन, शालेय विद्याथीर् संमेलन, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे संमेलन असे कार्यक्रम येत्या काही दिवसांत होतील. एका आवर्तनात अडकलेल्या मराठी साहित्य संमेलनास अधिकाधिक व्यापक स्वरूप देण्याच्या मार्गावरील हे छोटेसे पाऊल ठरू शकते. अर्थात, हा आशावाद खरा ठरवायचा असेल तर यापुढील संमेलनांतही अशा प्रकारची पावले टाकायला हवीत.

आता यातही एक भीती आहेच. म्हणजे मुख्य साहित्य संमेलनाआधी घेतले एखादे आदिवासी संमेलन, घेतले एखादे महिला संमेलन की मग या घटकांना मुख्य संमेलनाच्या व्यासपीठावर स्थान द्यायलाच नको... तिथे आपली आणि आपल्या पिट्ट्यांचीच घोडी नाचवायची, असला बेरकी हिशेब तसलीच बेरकी मंडळी करू शकतात. आणि भोळसट, भाबडी मंडळी त्यास भुलू शकतात. तसे होता कामा नये. या घटकांना मुख्य संमेलनाच्या व्यासपीठावरही स्थान मिळालेच पाहिजे. आणि तेही त्यांच्यावरील उपकार म्हणून नव्हे, तर तो त्यांचा हक्क आहे, म्हणून.

ठाणे संमेलनाच्या उद्घाटकपदाची खुचीर् रिकामी आहे. त्यामुळे महामंडळाचा ध्वज फडकावून संमेलनाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. त्या ध्वजाच्या सोबतीला काही नवे-वेगळे (भले त्याचा आवाका कमी असेल) आकाशात फडकू पहात आहे. त्याचे स्वागत करायला हवे!

खुर्ची आणि लेखणी

- राजीव काळे

सत्तेच्या उठवळ बाजारात, खुर्ची टिकवण्याच्या किंवा मिळवण्याच्या धावपळीत आपल्याकडील राजकारण्यांमधील संवेदनशीलता पार गोठून गेली आहे का? नवा काही विचार करण्याची, तो लोकांसमोर मांडण्याची उमीर्च त्यांच्यात नाही का? कविता वगैरे जाऊ देत, जे भोवताली दिसतं आहे, ज्या भोवतालात आपण जगत आहोत आणि आपली जनता जगत आहे, त्यावर गद्यातून व्यक्त होण्याची, आपले अनुभव लोकांपर्यंत पोहोचवण्याची, त्यांच्याशी संवाद साधण्याची इच्छाच त्यांना नाही का?
.....................

बातमी पुस्तकांच्या खपाची. ती तशी आपल्या कुणासाठीच नवी नाही.

अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा भारतदौरा आटपून पुढच्या मुक्कामी निघून गेले. त्यांनी भारतात पाऊल टाकण्याआधीपासूनच त्यांच्या पुस्तकांचा खप एकदम वाढला होता. मग ते 'ड्रीम्स फ्रॉम माय फादर' असो, 'ऑडेसिटी ऑफ होप' असो वा इतर कुठलं.

प्रसंगपरत्वे विशिष्ट व्यक्तीने लिहिलेल्या, विशिष्ट व्यक्तीवरील वा विशिष्ट विषयाशी संबंधित पुस्तकांना मागणी वाढते, हा आपला नेहमीचा अनुभव. मग एखाद्या लेखक वा कवीला मिळालेला एखादा प्रतिष्ठित पुरस्कार असो, एखाद्या ताज्या विषयावरचं लिखाण असो, एखादा वाद असो, अशी पुस्तकं वाचण्यास लोक उत्सुक असतात, असं अनेकदा दिसतं.

इथला विषय आहे ओबामांचा. ओबामा जर युगांडाचे किंवा कंबोडियाचे अध्यक्ष असते तर त्यांनी काय लिहिलं आहे, किंवा त्यांच्यावर कुणी काय लिहिलंय याकडे लोकांनी किती लक्ष दिलं असतं? कल्पना नाही. प्रतिकूलतेशी झुंजत यश मिळवणाऱ्याबाबत जनमानसात एक आदिम कुतूहल असतं. त्यामुळे कदाचित ते कुठल्याही देशाचे असते तरी लोकांनी त्यांची वा त्यांच्यावरची पुस्तकं वाचलीही असती. हा झाला कल्पनाविलास. या कल्पनाविलासाचा परिघ थोडा वाढवू या. ओबामा समजा आपल्या देशाचे राष्ट्रपती वा पंतप्रधान असते तर त्यांच्या पुस्तकांना अशी मागणी आली असती?

इथे एक शंका येते ती अशी की, ओबामा भारताचे पंतप्रधान वा राष्ट्रपती असते तर त्यांनी मुळात पुस्तकं लिहिली असती का अशी. आणि अशी पुस्तकं समजा लिहिली असती तरी लोकांनी ती वाचली असती का, ही पहिल्या शंकेला जोडशंका.

आणि समजा ओबामा महाराष्ट्रातील पुढारी असते तर? हा तर कल्पनाविलासाचा वेडा विस्तार झाला. पण या वेड्या विस्ताराच्या अनुषंगाने विचारलेल्या प्रश्नाचं सहज येणारं उत्तर - तर मग ओबामांनी पुस्तकं लिहिलीच नसती!

या उत्तरामागील तर्कट भूतकाळाशी नव्हे, तर वर्तमानकाळाशी सांधा साधणारं.

भूतकाळात डोकावलं आणि स्वातंत्र्यानंतरचा काळ लक्षात घेतला तर अशी लिहिती राजकारणी मंडळी अनेक दिसतात. पार अगदी जवाहरलाल नेहरू, यशवंतराव चव्हाण, श्रीपाद अमृत डांगे, एसेम जोशी यांच्यापासून ते अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, जसवंतसिंह यांच्यापर्यंतचे दाखले त्यासाठी देता येतील. (वाजपेयी, अडवाणी, जसवंत यांची कारकीर्द हा 'भूतकाळा'त जमा झालेला ऐवज आहे, अशी मांडणी, कित्येकांना नाही आवडली तरी सरळ सरळ समोर दिसतेच आहे!) या व त्यांच्यासारख्या इतर काही राजकारणी मंडळींनी आपापल्या प्रवृत्ती व प्रकृतीनुसार लिखाण केलं. त्यास कधी लालित्याचा स्पर्श होता, कधी इतिहासाचा अर्थ नव्याने लावण्याचा प्रयत्न होता, कधी वर्तमानावर केलेलं अभ्यासपूर्ण भाष्य होतं, कधी भविष्याचा वेध घेणारी नजर त्यात दिसून आली. त्यातील काही अभ्यासू मंडळींनी वेगवेगळ्या विषयांवर सैद्धांतिक स्वरूपाचं लेखनही केलं.

पण हे झालं भूतकाळाचं. वर्तमानकाळात त्या दृष्टीनं पहायला गेलं तर फारसं काही नजरेला पडत नाही. आपल्या महाराष्ट्रात तर नाहीच नाही. राजकारण्यांवरची पुस्तकं बाजारात नसतात असं नाही; पण त्यांचं स्वरूप मुख्यत्वे भाटगिरीचं. अमका अमका माणूस कसा मोठा झाला... त्याचं कर्तृत्व कसं आभाळाएवढं आहे... तो महाराष्ट्राचं कसं आशास्थान आहे... तो देशाचं कसं आशास्थान आहे (अद्याप कुणी एखाद्याला विश्वाचं आशास्थान म्हटलेलं नाही, हे नशीब!) असल्याच मजकुराची भरताड त्यात दिसते. पुढाऱ्यांनाही ते कदाचित आवडत असावं. मग लिहिणाऱ्याची काहीतरी सोय लावली जाते. छद्मी हास्य ही असल्या भाटगिरीच्या लिखाणावरची सामान्य वाचकाची पहिलीठोक प्रतिक्रिया असणं हे ओघानं आलंच.

प्रश्न असा पडतो की आजच्या आपल्या पुढाऱ्यांना लेखणी हातात घ्यावीशी वाटतच नाही का? लिहून लिहून काय लिहिणार, असा प्रश्न त्यांना सतावतो आहे का? सत्तेच्या उठवळ बाजारात, खुचीर् टिकवण्याच्या किंवा मिळवण्याच्या धावपळीत त्यांच्यातील संवेदनशीलता पार गोठून गेली आहे का? नवा काही विचार करण्याची, तो लोकांसमोर मांडण्याची उमीर्च त्यांच्यात नाही का? कविता वगैरे जाऊ देत; जे भोवताली दिसतं आहे, ज्या भोवतालात आपण जगत आहोत आणि आपली जनता जगत आहे, त्यावर गद्यातून व्यक्त होण्याची, आपले अनुभव लोकांपर्यंत पोहोचवण्याची, त्यांच्याशी संवाद साधण्याची इच्छाच त्यांना नाही का? की, लिखाण हे आपलं क्षेत्रच नाही, अशी खूणगाठ त्यांनी मनाशी बांधली आहे? की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या मनावरचे मुलामे खरवडून काढून आत डोकावण्याची त्यांच्यात ताकदच उरलेली नाही?

कारणं काहीही असोत; ही मंडळी लेखणी उचलताना फारशी दिसत नाहीत, हे खरं. लोकाभिमुख असणं ही राजकारण्यांसाठीची एक आवश्यक अट असायला हवी. या लोकाभिमुखतेकडे घेऊन जाणारा एक मार्ग लेखनाचाही आहे, हे या मंडळींना माहिती नसेल, असं शक्यच नाही. तेवढी हुशार ती नक्कीच आहेत.

ही हुशारी दिसू दे, एवढीच अपेक्षा.

आंधळ्यांच्या झुंडी

राजीव काळे

कॉलेज अभ्यासक्रमात लावण्यात येणा-या कादंबरीत हे घटक चालू शकतात, असं अभिव्यक्तीवाल्यांचं म्हणणं असेल, तर त्यांनी तसं स्पष्ट सांगावं. कादंबरीवरील प्रत्येक आक्षेपाचं मुद्देसूद उत्तर द्यावं. त्यासाठी केवळ आविष्कारस्वातंत्र्याची ढाल पुढे करून कसं चालेल? तसं असेल तर मग हीदेखील एक आंधळी झुंडशाहीच झाली. आविष्कारस्वातंत्र्य म्हणजे आविष्कारस्वातंत्र्य, त्यापुढे कुणी बोलता कामा नये, असा दुटप्पी व्यवहार कसा चालेल?

..................

कवितेत अर्थांतरन्यास जेव्हा प्रभूच्या दयेतूनही कोसळे,

या संहितेला नवे शील द्याया पुन्हा धाड तू वाळवीची कुळे...

गेल्या आठवड्यात कवी ग्रेस यांनी नागपुरातील एका कार्यक्रमात ही स्वत:ची कविता ऐकवीत उपस्थितांना सवाल केला की, 'माझ्या कवितेला दुबोर्ध म्हणणारे म्हणोत; पण त्याबद्दल स्पष्टीकरण आणि पुरावे द्यायला मी काय गुन्हेगार आहे?'

' मराठी लोकांचा अंमल सुरू झाला की काय होतं ते बघ. मग तर आपल्याकडे खरोखर गांडूराजच येईल', दिनशॉजी म्हणाला. 'शिवाजी पार्कवर सभा घ्यायच्या, घोषणा द्यायच्या, धमक्या द्यायच्या आणि रस्त्यांची नावं बदलायची, एवढंच त्यांना येतं'. तो अचानक उद्वीगन् झाला. मनातून तो अत्यंत व्यथीत झाला होता. 'कशासाठी नावं बदलायची? साला भेंचोद! हुतात्मा चौक!' तो उद्गारला. 'फ्लोरा फाउंटन काय वाईट होतं?'

हा छोटासा उतारा आहे रोहिंग्टन मिस्त्री यांच्या 'सच ए लाँग जनीर्' या कादंबरीतला. ठराविक उताराच या लेखात दिलाय, असा आक्षेप घेतला जाऊ शकतो. पण तसा आक्षेप अंगावर घ्यायचा नसेल, तर अख्खं पुस्तकच छापायला लागेल. आणि महत्त्वाचं म्हणजे असा आक्षेप हे 'सदर उतारा पुस्तकात आहे', हे सत्य नाकारू शकत नाहीच की.

' मी माझ्या कवितेबद्दल स्पष्टीकरण देणार नाही', असं ग्रेस यांनी सांगून टाकलं. आपल्या पुस्तकाबद्दल मिस्त्री असं काही बोलल्याचं ऐकिवात तरी नाही. ग्रेस यांची कविता दुबोर्ध असल्यानं अभ्यासक्रमातून काढून टाका, गेलाबाजार जाळून तरी टाका, असं कुणी आजवर म्हटलेलं नाही. मिस्त्रींबाबत मात्र तसं झालं. म्हणजे अद्याप तरी त्यांचं पुस्तक जाळलेलं नाही. पण मुंबई विद्यापीठाच्या टीवायबीएच्या अभ्यासक्रमातून ते काढून टाकण्यात आलं.

असं एक मानूया की, ग्रेस यांचं एखादं पुस्तक अभ्यासक्रमाला आहे आणि खूपच दुबोर्ध वाटल्यानं ते अभ्यासक्रमातून काढून टाकण्यासाठी कुणीतरी आंदोलन केलं. (दुबोर्धतेच्या मुद्यावर आंदोलन वगैरे करण्याची आपली संस्कृती नाही आणि तसं करण्याची सांस्कृतिक पातळी गाठल्याची काही उदाहरणंही दिसत नाहीत, ते सोडा.) आणि विद्यापीठानं तडकाफडकी ते बादही करून टाकलं. असं झाल्यास काय होईल? ग्रेसप्रेमी म्हणा, वाचक म्हणा, लेखक म्हणा, समीक्षक म्हणा, प्रकाशक म्हणा... कुणीतरी ग्रेसच्या बाजूनं आवाज उठवतील. (अशी आशा बाळगू या.) ग्रेस यांच्या कवितेतील सौंदर्यस्थळं उलगडून दाखवतील. त्यातील दुबोर्धता सुबोध कशी होऊ शकते, याचं विवेचन करतील. किंवा अन्य काहीतरी. एकुणात काय, तर ग्रेसचं पुस्तक अभ्यासक्रमातून वगळण्याचा निर्णय चुकीचा कसा, हे पटवून देण्याचा प्रयत्न करतील.

आता जरा मिस्त्रींकडे वळू या. 'मिस्त्री यांच्या 'सच ए लाँग जनीर्'मध्ये मराठी माणसांबद्दल अनुदार उद्गार आहेत, भाषा अत्यंत गलिच्छ आणि हीन पातळीची आहे' वगैरे आक्षेप घेण्यात आले. त्यानंतर हे पुस्तक तडकाफडकी अभ्यासक्रमातून वगळण्यात आलं आणि वादाचा मोठा धुरळा उडाला. याचं एक कारण अगदीच स्पष्ट होतं. ज्यांच्या मागणीमुळे हा निर्णय घेण्यात आला, ती शिवसेना (पुढे कुणालाही केलेलं असो.) आणि अभिव्यक्तीस्वातंत्र्य यांच्यात काय नातं आहे, हे सर्वश्रुतच आहे. शिवाय, शिवसेनेच्या 'युवराजां'साठी या प्रकरणाचा उपयोग लाँचिंग पॅड म्हणून करण्यात येत असल्याचा आक्षेप होताच. त्यात तथ्यही होतं. मग सुरू झाला अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा, लेखनस्वातंत्र्याचा जयघोष. पुस्तकाला विरोध करणाऱ्यांपैकी कितीजणांनी हे पुस्तक खरोखरच वाचलं आहे, या प्रश्नाचं हत्यार उपसलं गेलं. कारण आंधळ्या झुंडशाहीच्या राजकारणातील बहुतांश मंडळी असलं वाचन बिचन करण्याच्या भानगडीत फारशी पडत नाहीत, हे सदर हत्यार उपसणाऱ्यांना आणि खरं तर सगळ्यांनाच चांगलं ठाऊक. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर झुंडीतील कुणाहीसाठी फारसं सोयीचं नव्हतंच. आता असल्या प्रश्नांचं उत्तर देण्याची पत्रासही ते बाळगत नाहीत, हा मुद्दा निराळा. पण प्रश्नर्कत्यांना तेवढंच नैतिक आणि आत्मिक समाधान स्वत:च्या विजयाचं.

आता या विजयाचं सेलिब्रेशन करायचं तर करू देत त्यांना, पण याच निमित्तानं एक दुसरा सवाल उभा राहिला आहे तो अभिव्यक्तीस्वातंत्र्यासाठी उभं राहणाऱ्यांच्या जागरुकतेचा. लेखक व त्याचं लेखन हे स्वयंभू आणि सार्वभौम असतं हे अगदी मान्य. आणि त्याबाबत लढाई झाल्यास स्वातंत्र्याच्या बाजूनं उभं राहण्यातही काही गैर नाही. मुद्दा येतो तो आपण स्वातंत्र्यासाठी का उभे आहोत, याचं स्पष्टीकरण करण्याचा. आणि हे स्पष्टीकरण केवळ तात्त्विक अर्थाचं, तात्त्विक पातळीवरील नव्हे. लेखनस्वातंत्र्याचा सबगोलंकार जयघोष येथे अपेक्षित नाही. इथे अपेक्षित आहे तो तपशील. 'सच ए लाँग जनीर्'च्या निमित्तानं झालेल्या वादात लेखनस्वातंत्र्याच्या बाजूनं उभं राहिलेल्या मंडळींकडून असा तपशील आलेला बघण्यात नाही. या कादंबरीवर जे आक्षेप घेण्यात आले, ते खोडून काढण्यासाठी या मंडळींनी काही ठोस तपशिलातील उत्तरं दिली आहेत का? थेट उदाहरणंच पाहू. मराठी माणूस ही एक 'कम्युनिटी' असं गणित मांडून त्यावर शेरेबाजी आहे, एका पात्राच्या तोंडी मुंबईतील डबेवाल्यांविषयी 'वगीर्य' उद्गार आहेत, एक पुरुषपात्र 'पलंगतोड' पान खाऊन जे काही करतो, त्याचं वर्णन या कादंबरीत आहे. कॉलेज अभ्यासक्रमात लावण्यात येणाऱ्या कादंबरीत हे घटक चालू शकतात, असं अभिव्यक्तीवाल्यांचं म्हणणं असेल, तर त्यांनी ते नीट मांडावं. कादंबरीवरील आक्षेपांचं मुद्देसूद उत्तर द्यावं. (ते देता आलं नाही, तर 'यांनी तरी पुस्तक कुठे वाचलं आहे?', अशा प्रश्नाचं हत्यार पहिल्या झुंडीतल्या लोकांनी उगारलं तर?) ही आपली जबाबदारी आहे, असं या मंडळींना वाटत नाही का? त्यासाठी केवळ आविष्कारस्वातंत्र्याची ढाल पुढे करून कसं चालेल? तसं असेल तर मग हीदेखील एक आंधळी झुंडशाहीच झाली. आविष्कारस्वातंत्र्य म्हणजे आविष्कारस्वातंत्र्य, त्यापुढे कुणी बोलता कामा नये, असा दुटप्पी व्यवहार कसा चालेल? एक शक्यता अशी की, तसा व्यवहार न केल्यास आपल्यावर 'पहिल्या झुंडीतला' असा शिक्का बसेल आणि आपण प्रतिगामी ठरू, ही मनातील भीती. ही भीती बाळगण्यामागील कारण तात्त्विक नव्हे, तर बहुतांशी व्यावहारिक. त्यामागे कुठले कुठले हिशेब मांडलेले. म्हणजे संपलंच सगळं.

या असल्या आंधळ्या झुंडींच्या झोंबीतून काय साध्य करणार आहोत आपण? पहिली झुंड इतका सारासार विचार करणार नाही, अशी दुसऱ्या झुंडीची धारणा असेल, तर मग त्यांनी तरी तो नीट करावा. आणि डोळे उघडून करावा. ही ग्रेसची खूप आतली दुबोर्ध कविता नाही. हे अटळ, क्लिष्ट तरीही सुबोध वास्तव आहे. समजण्यासारखं. पान उलटून ते बाजूला करता येणार नाही.

सद्यकालावर क्ष-किरण

book2
अभिजीत रणदिवे

'कथा हा गौण साहित्यप्रकार आहे' असा विचार मराठीला नवीन नाही. सकस आणि प्रयोगशील कथा सातत्यानं लिहिणं हा अशा आक्षेपांवरचा बिनतोड उपाय आहे, पण मराठी कथाकारांना तो जमतोच असं नाही. सतीश तांब्यांना मात्र ते जमताना दिसतं. त्यांचा 'मॉलमध्ये मंगोल' हा कथासंग्रहही ह्याला अपवाद नाही. 'मॉलमध्ये मंगोल' किंवा 'बेडरूम तिथे पिकासो' अशा शीर्षकांतून कथेविषयीचं कुतूहल चाळवतं. ह्या संग्रहातल्या अनेक कथा स्त्री-पुरुष संबंधांवर भाष्य करतात. १९९०नंतरचं बदललेलं समाजवास्तवही कथांत गुंफलेलं दिसतं. मराठीतल्या परंपरेनुसार थेट तात्पर्य सांगणं किंवा संदेश देणं त्यात बहुश: टाळलेलं आहे. कथेच्या अखेरीला क्वचित तात्पर्य म्हणून जे काही येतं, त्यामुळे वाचक चक्रावण्याचीही चांगलीच शक्यता आहे. म्हणजे एकीकडे त्या कथा धक्कातंत्राची रुळलेली वाट धरतात, आणि तरीही त्यातल्या धक्क्याचं स्वरूप अनपेक्षित असल्यामुळे समकालीन मराठी कथाविश्वात त्या प्रयोगशील ठरतात. मराठी वाचकांना अपेक्षित सौष्ठव, दमदार व्यक्तिरेखा किंवा काळजाचा ठाव घेणारे प्रसंग वगैरे गुणवैशिष्ट्यं ह्या कथांमध्ये नाहीत; पण ह्या अपेक्षा बाजूला ठेवल्या, तर नैतिक-अनैतिक काय, ह्याबद्दलची ढोबळ शेरेबाजी टाळून सध्याच्या परिस्थितीकडे पाहण्याचा एक गमतीशीर आणि खेळकर दृष्टिकोन त्यात दिसतो.

उदाहरणार्थ, 'तळघरातला बुरखेधारी'मधला बुरखेधारी म्हणजे निवेदकाला पडणारे स्त्री-पुरुष संबंधविषयक प्रश्न आहेत. नवराबायकोच्या दांभिकपणामुळेच बरीचशी लग्नं टिकतात असं निवेदक मानतो. एकमेकांशी असा दांभिकपणा न करण्याच्या अटीवर ज्यांचं लग्न उभं असतं, अशा एका दुर्मीळ जोडप्याच्या घटस्फोटाची बातमी कथेच्या सुरुवातीलाच कळते. त्यामुळे निवेदकाच्या मनात हा बुरखेधारी शंकांचं काहूर माजवू लागतो. अशा मांडणीत लेखकाचा खेळकरपणा दिसतोच; शिवाय त्यामुळे कथा सुरुवातीपासूनच वाचकाच्या मनाची पकडही घेते. अखेर, एखाद्या डिटेक्टिव्हकथेप्रमाणे रहस्याचा उलगडा होतो, तेव्हा कथा सुफळ संपूर्ण झाल्याचं समाधान मिळण्याऐवजी उलट आणखी प्रश्नच उपस्थित होतात.

लेखकाच्याच शब्दांत - 'ढोबळ गोष्टींवर मनाची ऊर्जा न घालवता बारकाव्यांवर खल करायची' वृत्ती अनेक कथांत दिसते. त्यामुळे 'अंघोळ झटपट आटपायची की आरामात', ह्या प्रश्नावर सुरू होणाऱ्या कथेत पुढे निपुत्रिक जोडपं येतं; त्यांची मूल दत्तक घेण्याविषयी धाकधूक येते; अशी वळणं घेत 'निखळ आनंद मिळण्यासाठी कसं जगायला हवं?' अशा प्रश्नापर्यंत कथा पोहोचते. कथांमधली पात्रं अनेकदा 'स्वत:वर पाळत ठेवणारी' असतात. त्यातून व.पु.काळे छापाचं जीवनविषयक सुभाषितवजा तत्त्वज्ञानही कथेत कधी डोकावतं, किंवा चर्चानाट्यांप्रमाणे कधी पात्रं एकमेकांशी निव्वळ चर्चा करत राहतात. मात्र, वर सांगितल्याप्रमाणे कथेतल्या अनपेक्षित आणि गमतीदार वळणांमुळे ते कंटाळवाणं होण्याचा धोका बऱ्याचदा टळतो.

मॉलमध्ये कारणाशिवाय वस्तू किंवा माणसं न्याहाळत भटकणारे आणि जमलं तर एखाद्या मुलीवर लाइन मारणारे, अनोळखी माणसांशी हिंदीत बोलायला सुरुवात करणारे, पण मग मराठीत बोलायला लागल्यावर वाक्यात इंग्रजी शब्द भुरभुरणारे, वगैरे मराठी माणसाचे अनेक ओळखीचे नमुने तांब्यांच्या कथांमध्ये भेटतात. त्यातून कथेला समकालीन संदर्भ मिळतात आणि लेखकाचा माणसांकडे पाहण्याचा खट्याळ तिरकसपणाही दिसतो. नीट पाहिलं तर मात्र ह्या माणसांमागचं वैविध्य लक्षात येऊ लागतं. तसंच, 'मानगुटीवर बसलेल्या ग्लोबलायझेशनच्या वेताळाला' लेखकानं पुस्तक का अर्पण केलं असावं ह्याचाही अंदाज येतो. 'मॉलमध्ये मंगोल'मधल्या सडाफटिंग निवेदकाला संसारात पडलेल्या माणसांविषयी कुतूहल असतं. ही माणसं इतक्या निरुपयोगी वस्तू का गोळा करत असावीत, असा प्रश्न त्याला पडलेला असतो. ते समजून घेण्यासाठी माणसांचे खरेदीव्यवहार एकगठ्ठा न्याहाळायला तो मॉलमध्ये फेऱ्या मारत असतो. खरेदीआधी वस्तू एकाग्रतेनं पाहणारी आपली मैत्रीण त्याला ओशट, रोगट आणि ओंगळ वाटते. तिच्याबद्दलचं त्याला वाटणारं आकर्षण ओसरू लागतं. ह्याउलट, त्याच्या वागण्यातल्या वेगळेपणाला उत्स्फूर्त दाद देणारी आणि त्याच्याशी असलेले मतभेद खुल्या दिलानं मान्य करणारी त्याची मैत्रीण किरकोळ कारणावरून त्याच्यावर चिडते. ह्या बारकाव्यांतून लेखक आजच्या समाजाच्या भावनिक गोंधळाविषयीही आगळंवेगळं काही म्हणू पाहतो.

सद्यकालीन परिस्थितीविषयी भाष्य करताकरताच तांबे काही साहित्यिक प्रयोगही करतात. 'वास्तववादातून मराठी साहित्य बाहेर यायला हवं' असं म्हणणारा 'जेंडरनगरमधील प्रेम की सुगंध'मधला निवेदक पुढे जी गोष्ट सांगतो, ती एक फॅन्टसी आहे हे सुरुवातीपासूनच उघड आहे. माणसाची 'आयडेंटिटी' म्हणजे नक्की काय आणि जागतिकीकरणानंतरच्या समाजात ती आपल्याला हवी तशी घडवण्याचा किंवा वाकवण्याचा हक्क व्यक्तीला कितपत असतो अशा प्रकारच्या, म्हणजेच 'पोस्टमॉडर्न' प्रश्नांभोवती ती रचलेली आहे. निवेदक सांगतो आहे ती गोष्ट खरी नाहीच आहे, हे वाचकाला स्पष्ट सांगणारी शैलीदेखील पोस्टमॉडर्न आहे.

वेगळा विचार करणारे पुरुष आणि स्वतंत्र विचारांच्या अपारंपरिक स्त्रिया तांब्यांच्या लिखाणात अनेकदा असतात. हा कथासंग्रहही त्याला अपवाद नाही. 'पुरावाच काय आहे अमेरिकेला...'मधल्या 'जे जे चमकतं ते अमेरिकन' मानणाऱ्या आणि अमेरिकेवर राग धरणाऱ्या जयंतरावांचा प्रतिवाद करणारी त्यांची मुलगी आपल्या वडिलांच्या आंधळ्या अमेरिकाविरोधाला जुमानत नसते. 'बेडरूम तिथे पिकासो'मधली मिनी अवखळ तारुण्यात ज्या पुरुषाच्या प्रेमात पडते ते पाहता तो वरकरणी एखाद्या 'एक्झॉटिक' गोष्टीचा पोरकट हव्यास वाटू शकतो; पण तांबे पुढे कथेला जे वळण देतात ते खास त्यांच्या शैलीतलं आहे आणि त्यामुळे त्या स्त्रीलासुद्धा वेगळी मिती लाभते. 'मुटकुळा' कथेतली आई लहान गावातल्या कर्मठ वातावरणातली आहे. तरीही, तिची वेगळी विचारपद्धती कथेतल्या रहस्यभेदाच्या मुळाशी आहे. एकाच घटनेकडे पाहण्याची स्त्रीची आणि पुरुषाची नजर ह्यांतला फरक त्यात दिसतो. काहीशी प्रचारकी स्त्रीवादी भूमिका घेऊन बेतलेल्या रूढ पांढरपेशा व्यक्तिरेखांपेक्षा अशा व्यक्तिरेखा नव्वदोत्तरी स्त्रीशी अधिक जवळच्या भासतात. तांब्यांच्या कथांतले पुरुष निवेदक अनेकदा न-नैतिक बघ्याच्या भूमिकेत असतात, पण 'मॉलमध्ये मंगोल'सारख्या कथेत कधी हा बुरखा फाटतानाही दिसतो.

ह्या साऱ्याच्या 'गच्चागोळा'तून एकसंध नसलेली, वास्तववादीही नसणारी पण सद्यकालीन वास्तवाचा आरसा घेऊन एक प्रतिसृष्टी उभी राहते. कथेचं रंजनमूल्य सांभाळत आताच्या समाजाबद्दल भाष्य करण्याची कसरत तांब्यांना साध्य झाली आहे. विलास सारंगांची चमत्कृतीपूर्ण फॅन्टसी किंवा श्याम मनोहरांचा उपरोध अशा घटकांनी १९७०-८०च्या दशकापासून मराठी कथांना वेगळा बाज दिला होता. तांब्यांच्या कथा त्या परंपरेहून वेगळ्या आहेत आणि तरीही त्यांतले काही घटक इथे थोडे सहजसोपे होऊन येतात. सामान्य मराठी वाचक सारंग-मनोहरांच्या कथेला बिचकून त्यापासून थोडा दूरच राहिला, पण कदाचित तांब्यांच्या कथा त्याला अधिक जवळच्या वाटतील.

........

मॉलमध्ये मंगोल

लेखक : सतीश तांबे

प्रकाशक : अक्षर प्रकाशन, मुंबई

पृष्ठसंख्या : २०८

किंमत : २२५ रु.

६४ घरांतला माणूस

chess
जुन्या काळातील निष्णात बुद्धिबळपटू रामचंद्र उर्फ आप्पा सप्रे म्हणजे त्या पटावरील ६४ घरांत रमलेला माणूस. त्यांची आज, ४ मार्च रोजी १००वी जयंती आहे. त्यांच्याशी जिव्हाळ्याचे ऋणानुबंध जुळलेल्या सुलोचना गावंडे यांनी जागविलेल्या या आठवणी...

आमच्या सहावीच्या वर्गात नवीन आलेली मुलगी बु‌द्धिबळ उत्तम खेळते असं मला कळलं. तिने शाळेकडून स्पर्धेत भाग घ्यावा, म्हणून मी माधववाडीच्या चौथ्या मजल्यावर पोचले. तिला ओढून आणायला मी गेले खरी, पण मीच काही ऋणानुबंधाने त्या घराकडे अशी ओढली गेले की पुढची सात-आठ वर्षे पुन्हा पुन्हा तिथे जात राहिले. त्या चाळीच्या दोन खोल्यात मला भेटले अंजूचे आई-वडील. सावळ्या, ठेंगण्या-ठुसक्या, ठसक्यात बोलणाऱ्या, प्रेमळ, सुग्रण आई आणि गोरेपान, उंच, नाकेले रामचंद्र उर्फ आप्पा सप्रे. त्यांच्या दिसण्याचं वैशिष्ट्य म्हणजे डोक्यावरचं दाट पांढऱ्या केसांचं छप्पर आणि नाकावरच्या चष्म्यावरून बघणारे, थोडे स्वतःतच हरवलेले डोळे. आप्पा तेव्हा साधारण पन्नाशीचे होते आणि काहीतरी नोकरी करत होते. घरात असताना बहुतेक वेळ ते बुद्धिबळात मग्न असायचे. साधारण एक-दीड वर्षांनी मी अशीच त्यांच्या घरी असताना आप्पा कामावरून लवकर परत आले आणि म्हणाले, ‌'आता मी नोकरीवर जाणार नाही. बरं झालं, आत्ता मला पूर्ण वेळ बुद्धिबळाला देता येईल'. मी तेव्हा शाळकरी मुलगी होते. आजूबाजूच्या मध्यमवर्गीय मराठी घरातून सर्व वडील नियमितपणे नोकरीला जाताना बघत होते. त्यामुळे सुरुवातीला मला आप्पांच्या बुद्धिबळाच्या नादाची गंमत वाटली. पण नंतर कळलं की आप्पा हे प्रख्यात बुद्धिबळपटू आहेत आणि भारतातल्या सर्वात पहिल्या स्पर्धेत ते राष्ट्रविजेते होते. घरातली आप्पांची ठरलेली जागा म्हणजे पुढच्या खोलीतलं टेबल - त्यावर एक छोटा दिवा, बाबा आदमच्या काळातला टाइपरायटर आणि तळहातावर मावेल असा छोटा चुंबकीय (magnetic) बुद्धिबळाचा सेट. आजूबाजूला किती गोंधळ असला तरी आप्पा एकाग्र चित्ताने तिथे काम करत बसलेले असायचे. मग कधीतरी त्याच तंद्रीत उठून फेऱ्या मारायचे. एकदा असेच चक्क जिन्याकडे जायला लागले तशी मी मागे धावले - आप्पा फक्त लेंगाच घातलाय तुम्ही. तसे लहान मुलासारखे निर्व्याज हसले - असं झालं होय! आणि मग त्या लेंग्यावर ठगळ पँट चढवून पुन्हा बाहेर गेले.

आप्पा सायन्सचे पदवीधर होते आणि घरातल्या लहान-सहान गोष्टी दुरुस्त करायला त्यांना फार मजा यायची. पुष्कळदा हे प्रयोग त्यांच्या चष्म्याच्या मोडलेल्या काडीवरच व्हायचे. बुद्धिबळाच्या पटावर अटीतटीने लढणारे आप्पा वैयक्तिक आयुष्यात फार शांत आणि समजूतदार होते. मी त्यांना चिडताना किंवा रागावताना क्वचितच पाहिलं. एकदा मी कोचावर ‌अभ्यास करत होते आणि आप्पा त्यांच्या टेबलावर लेख लिहीत होते. अचानक शेजारची मुलगी पाठच्या नळावर पाणी भरून घराच्या मागच्या दाराने आत शिरली आणि पुढच्या दाराने तिच्या खोलीकडे जाऊ लागली. तिच्या पायातल्या पैंजणांचा छमछमाट आणि बादली ‌हिंदकळून पडणारे पाणी यामुळे आम्ही दोघे चमकलो आणि चक्रावून बघत राहिलो. मी रागावून काही बोलायला उठणार तर आप्पांनी मला थांबवलं - म्हणाले - जाऊ दे, कठीण असतं पाणी भरणं - आणि आपली दोन मिनिटं करमणूक झाली ना!

आम्ही सायन्सचा अभ्यास करत असलो की आप्पा अधूनमधून भाग घ्यायचे. एकदा खूप उन्हाळा असताना त्यांनी विचारलं की पंख्याचा वेग कमी-जास्त कसा करतात? मी म्हटलं, resistance बदलून होईल ना? त्यावर आप्पांनी म्हटलेलं 'शाबास' आज इतकी वर्षं मी मनात जपून ठेवलंय्.

आप्पांना थंडी फार वाजायची. डिसेंबर-जानेवारीत कित्येकदा गच्चीत उन्हात बसलेले सापडायचे. आजारालाही आप्पा घाबरायचे, पण सुदैवाने फारसे आजारी व्हायचे नाहीत. एकदा मात्र मी तिथे असताना त्यांच्या छातीत खूप दुखू लागलं. मग मी अॅम्बुलन्स बोलावून एकटीच त्यांना के.ई.एम्.ला घेऊन गेले. त्यांच्या तोंडचं पाणी पळालं होतं पण त्या परिस्थितीतही आपला बु‌द्धिबळाचा सेट बरोबर ‌घ्यायला विसरले नाहीत.

आप्पा बुद्धिनिष्ठ आणि पुरोगामी विचारांचे होते. एकदा मी जातीयवादावरून काही पोपटपंची केली तेव्हा त्यांनीच मला महत्त्वाचा धडा दिला की, फक्त आपल्यातले बोलले म्हणून खरं मानू नकोस, खात्री करून घ्यायला शिक. आप्पांना मी कधी पूजा-अर्चा किंवा देव-देवळं करताना पाहिलं नाही. घरातलं वातावरणही मोकळं आणि लोकशाहीचं होतं. मी त्या घरात वधू-वर परीक्षा, लग्नाची बैठक इथपासून ते डोहाळे जेवण, बारसे अशा अनेक प्रसंगांना हजर होते. तेव्हाही कधी मी आप्पांनी स्वतःची मतं मुलांवर किंवा इतरांवर लादताना पाहिली नाहीत.

आप्पा सप्रे यांच्यातलं असामान्यत्व समजण्यासाठी बुद्धिबळाशी असलेलं त्यांचं नातं समजून घ्यायला पाहिजे. बुद्धिबळाने त्यांचं आयुष्य सर्वथा व्यापून टाकले होतं, आणि तो हा खेळ केवळ खेळले नाहीत, तर त्याच्यासाठीच जगले असं म्हटलं तर ती अतिशयोक्ती होऊ नये. आप्पांचे बुद्धिबळाचे ज्ञान आणि अनुभव यामु‍ळे कितीतरी अतिरथी, महारथी त्या पुढच्या खोलीत येताना मी पाहिलेत. आप्पा त्यांच्यात रमायचे पण त्यांना खरा आनंद मिळायचा नवीन खेळाडूंना शिकवताना. सतत कितीतरी लहान-मोठी माणसं यायची - पुढची खोली अगदी भरून जायची - आणि त्यांना नव्या खेळी, नवे डावपेच शिकवताना आप्पा काळवेळ विसरून जायचे. जणू काही पुराणातील कोणी ऋषी काळनदी पार करून थेट माधववाडीत पोचला आणि तिथे त्याने आपले गुरूकुल सुरू केले.

आप्पांनी शिकवलेले कित्येक विद्यार्थी पुढे स्वतः उत्तम बुद्धिबळपटू झाले. अनेकांना नावलौकिक व सन्मान मिळाले आणि व्यावहारिकरीत्या ते यशस्वी झाले. आप्पांना त्यांचं कौतुक वाटायचं पण चुकूनही त्यांच्या मनात इतरांबद्दल हेवा, मत्सर आला नाही की स्वतःबद्दल खंत वाटली नाही. आपली कर्तव्ये निभावून जेमतेम राहता येईल एवढीच सांपत्तिक पुंजी आप्पांकडे होती; पण ते इतके निरिच्छ, अलिप्त आणि आत्मसंतुष्ट होते की त्यांना कधी कुठलीच उणीव जाणवली नाही. बुद्धिबळाचा सखोल अभ्यास करून ते ज्ञान इतरांना शिकवणे आणि या खेळाला भारतात मान्यता व लोकप्रियता मिळण्यासाठी झटणे हेच त्यांचे ध्येय होते, किंबहुना तो त्यांचा धर्म होता. म्हणूनच आपल्या कार्याबद्दल प्रसिद्धी किंवा पुरस्कार मिळावा असा विचारही कधी त्यांच्या मनाला शिवला नाही. मी आप्पांना खूप वर्षांनी भेटले सन १९९७ मध्ये. आ‍वर्जून नवऱ्याला व मुलीला घेऊन गेले होते. आप्पा आता भांडुपला राहत होते. जागा बदलली पण आप्पा मात्र तसेच होते. हातात बुद्धिबळाचा सेट आणि चेहऱ्यावर प्रसन्न निरागस हास्य. काडी आणि धागा वापरून सांधलेला चष्मा मला अगदी अभिमानाने दाखवला. त्या तपस्व्याशी झालेली ती माझी शेवटची भेट. आज ४ मार्चला आप्पांची शंभरावी जयंती आहे. मी कधी बुद्धिबळ खेळले नाही पण आज या लेखाच्या रूपाने मी माझं प्यादं पुढे सरकवलं आहे. आप्पा - पुढची खेळी तुमची. आशीर्वाद द्या की तुमच्या मूल्यांचा आम्हाला कधी न विसर पडो.

- सुलोचना गावंडे,

कॅन्सर रिसर्चर, न्यू जर्सी- अमेरिका

प्रतिजैविकांचा वापर जरा जपून

medicine
प्रतिजैविकांच्या अतिवापरामुळे आरोग्यावर धोकादायक परिणाम होऊ शकतो, हे आपण पाहिले. या प्रतिजैविकांच्या अतिवापरामुळे शरीरातील अपायकारक जैविके मरतातच, परंतु चांगले जिवाणूही मारले जातात. या चांगल्या जिवाणूंची शरीर निरोगी ठेवण्यासाठी आवश्यकता असते...

नवीन संशोधनामध्ये असे दिसून आले आहे की, ए म्युसिनिसीला नावाचे बॅक्टेरियाही प्रतिजैविकांच्या अतिसेवनाने मारले जातात. आतड्यातील चांगल्या जिवाणूंचे तीन ते पाच टक्के प्रमाण हे ए म्युसिनिसीला या जिवाणूंचे असते. संशोधनात असे आढळले की, ज्या उंदरांमध्ये टाइप २ प्रकारचा डायबेटिस किंवा लठ्ठपणा आहे, त्यांच्यात या बॅक्टेरियांच्या प्रमाणाची मात्रा कमी झाल्याचे निदर्शनास आले. तसेच, ज्या उंदरांना चरबीयुक्त आहार देण्यात आला त्यांच्यात या बॅक्टेरियाचे प्रमाण अधिक दिसले. दुसरीकडे ज्या उंदरांना योग्य आहार देण्यात आला, त्यांच्यात या बॅक्टेरियाचे प्रमाण वाढले. या संशोधनाच्या आधारे संशोधकांनी या बॅक्टेरियाचे औषध तयार करून उंदराना दिले तेव्हा ते बरे झाले. हाच पॅटर्न माणसांना लागू होतो.

न्यूयॉर्कमधील कॉर्नेल युन्हिव्हसिटीच्या डॉ. जॉन मार्च आणि त्यांच्या सहायकांनी असेच संशोधन मानवी हॉर्मोन्सवर केले. त्यांनी लॅक्टो बॅसिलस गसेरी या बॅक्टेरियात मानवी (GLP One) हार्मोन टाकला व हे द्रव्य ज्यांना देण्यात आले त्यांच्या स्वादुपिंडातील कोषिका ज्या इन्सुलिन बनविण्यात असमर्थ होत्या त्या या द्रव्यामुळे इन्सुलिन बनवू लागल्या व रक्तातील शर्करेची मात्रा घटली व चांगला परिणाम झाला. हे द्रव्य जेव्हा डायबेटिस नसणाऱ्यांना दिले, तेव्हा त्यांना कोणताही त्रास झाला नाही. रक्तातील साखरेची पातळीही कमी झाली नाही. या संशोधनात दिसले की, असे प्रतिजैविक जर बाजारात आले तर ते डायबेटिसच्या पेशंटांमध्ये साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवतील व लठ्ठ व्यक्तींनाही डायबेटिसचा त्रास होणार नाही.

पुढील दोन वर्षांत असे प्रतिजैविक हे बाजारात उपलब्ध होण्याची शक्यता आहे व त्यामुळे डायबेटिसच्या पेशंटांना आधार मिळू शकेल.

लहान मुलांमध्ये होणाऱ्या टाइप-१ मधुमेहात काही विशिष्ट जिवाणूंची भूमिका असते. या पेशंटांना जन्मभर रोज इन्शुलिनची मात्रा घेणे बंधनकारक असते. असे न केल्यास हे डायबेटिस मूल दगावण्याची शक्यता असते. या संशोधनामुळे अशा पेशंटांना दिलासा मिळणार असून डायबेटिस, स्थूलता, उच्चरक्तदाब आणि इतर व्याधिग्रस्त पेशंटांना आशेचा किरण दिसेल.

देशाच्या आत्म्यावर उगारलेले शस्त्र

all
>> मिलिंद मुरुगकर

डॉ. दाभोलकरांना किंवा कॉ. गोविंद पानसरेंना हिंदूविरोधी का ठरवण्यात येते? याचे कारण म्हणजे हे दोघेही सर्वच धर्मातील अतिरेकी विचारांच्या विरोधी होते. असे खरे सेक्युलर हे सर्वच धर्मांध लोकांचे शत्रू असतात. मग त्यांना बदनाम करण्यासाठी स्युडो सेक्युलर, हिंदूविरोधी अशी विशेषणे लावण्यात येतात.

कॉम्रेड गोविंद पानसरे सेक्युलर होते, की स्युडो सेक्युलर? हा प्रश्न महत्वाचा आहे. कारण जे जे लोक हिंदुत्ववादी विचारसरणीला विरोध करतात त्या सर्वांना स्युडो सेक्युलर म्हणून हिणवण्यात येते. कॉम्रेड पानसरे हे हिंदुत्ववादी विचाराच्या कट्टर विरोधी होते, कारण ते सर्वच धर्मवादी राजकारणाच्या विरुध्द होते. स्युडो सेक्युलॅरिझम हा शब्द भारतीय राजकारणात पहिल्यांदा लालकृष्ण अडवाणींनी प्रभावीपणे रुजवला. लोकांना तो भावला, याचे कारण त्याला मुस्लिम मतांसाठी तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी केलेली घटनादुरुस्तीची पार्श्वभूमी होती. काँग्रेस स्युडो सेक्युलर आहे हे ठसवण्यासाठी हे उदाहरण परिणामकारक हत्यार होते, आणि राजीव गांधींची ही कृती खरेच हा खरेच स्युडोसेक्युलॅरिझमचाच अविष्कार होता. या इतिहासाच्या जरा तपशिलात जाऊया. १९८० साली मध्य प्रदेशातील गरीब घटस्फोटीत शहबानोने आपल्या नवऱ्याने पोटगी देणे बंद केल्यावर कोर्टात त्याच्याविरुद्ध अर्ज केला. कोर्टाने शहबानोच्या बाजूने निर्णय दिला. शहाबानोने दुसरे लग्न न केल्याने आणि तिला कोणताच आर्थिक सहारा नसल्याने तिच्या आधीच्या नवऱ्याने, महम्मद खानने तिला दरमहा पोटगी दिलीच पाहिजे असा तो निर्णय होता. इस्लामी कायद्याचा आधार घेत महम्मद खानने या निकालाविरुद्ध सुप्रीम कोर्टात अपील केले. १९८५ साली सुप्रीम कोर्टाने हे अपील फेटाळून लावले. व्यक्तीचा धर्म तिच्या हक्काच्या आणि कर्तव्याच्या आड येऊ शकत नाही हे सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामागील गाभ्याचे सूत्र होते. म्हणजेच सुप्रीम कोर्टाने सेक्युलॅरिझमचा पुरस्कार केला होता. धर्म आणि व्यक्तिस्वातंत्र्य यामध्ये व्यक्तिस्वातंत्र्याच्या मूल्याला उचलून धरले होते.

मुस्लिम धर्मगुरूंनी हा मुस्लिम धर्मात झालेला हस्तक्षेप आहे असे म्हणत राजीव गांधींवर दबाव वाढवायला सुरुवात केली आणि राजीव गांधींनी मुस्लिम मते आपल्या विरोधी जाऊ नयेत म्हणून आपल्याकडे असलेल्या बहुमताच्या आधारे घटनादुरुस्ती करून सुप्रीम कोर्टाचा निर्णय रद्दबातल ठरवला. राजीव गांधींचा हा निर्णय अतिशय आक्षेपार्ह होता, कारण त्यामुळे मुस्लिम महिलांवर प्रचंड अन्याय झाला. त्यांची 'व्यक्ती' म्हणून असलेली ओळख पुसली जाउन केवळ 'मुस्लिम स्त्री' याच ओळखीची दखल घेण्यात आली. सेक्युलॅरिझम हा अतिशय मोलाचा अशासाठी, की त्यामुळे व्यक्तिस्वातंत्र्याचे मूल्य अबाधित रहाते. या स्वातंत्र्याच्या आड धर्म, जात या गोष्टी येऊ शकत नाहीत. म्हणूनच आपल्या घटनेत सेक्युलॅरिझम हे गाभ्याचे मूल्य आहे.

राजीव गांधींच्या या निर्णयाला देशभरातील सर्व पुरोगामी संघटनांनी विरोध केला. मुस्लिम सत्यशोधक मंडळासारख्या पुरोगामी मुस्लिम संघटनांनीही विरोध केला. इथे हे लक्षात घेऊया, की या सर्व लोकांना स्युडो सेक्युलर म्हणून हिणवण्यात येते, कारण ते हिंदुत्ववादाचेही विरोधक आहेत. हा दुटप्पीपणा, हे धूर्त राजकारण, आपण लक्षात घेतले पाहिजे. आरिफ महम्मद खान यांनी राजीव गांधींच्या मंत्रिमंडळातून याच प्रश्नावर राजीनामा दिला. राजीव गांधींच्या या निर्णयाला सीपीआय आणि सीपीआय(एम) या दोन्ही पक्षांनी कडाडून विरोध केला. या त्यांच्या निर्णयामुळे आपले मुस्लिम मतदार आपल्यापासून दूर जातील याची पर्वा न बाळगता या पक्षांनी हा विरोध केला. त्यांनी मोठी किंमत देऊन सेक्युलॅरिझमवरील आपली निष्ठा सिद्ध केली, तरीदेखील दोन्ही पक्षांची संभावना 'स्युडो सेक्युलर' या शब्दाने करण्यात आली. कॉ. गोविंद पानसरे हे देखील याच कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते. त्यांनाही स्युडो सेक्युलर, मुसलमानांचा अनुनय करणारे, हिंदूविरोधी म्हटले गेले. डॉ. नरेंद्र दाभोलकरांनाही अशाच टीकेचे आयुष्यभर धनी व्हावे लागले. डॉ. दाभोलकर हे मुस्लिम धर्मात परिवर्तनाचे काम करणारे विचारवंत हमीद दलवाई यांचे चाहते होते. हमीद दलवाईंना आयुष्यभर मुस्लिम धर्मगुरूंशी संघर्ष करावा लागला. त्यांच्यावर प्राणघातक हल्ले झाले. अश्या क्रांतिकारी मुस्लिम धर्मसुधारकाचे नाव नरेंद्र दाभोलकरांनी आपल्या मुलाला दिले, यातून त्यांची सेक्युलॅरिझमवरील निष्ठाच दिसते, त्यांचा मुस्लिम धर्मांधतेला असलेला कट्टर विरोधच दिसतो. ज्या ज्या लोकांनी मुस्लिम आणि इतर धर्मातील अतिरेकी विचारांना विरोध केला, त्या त्या लोकांना स्युडो सेक्युलर ठरवण्यात आले. डॉ. दाभोलकरांना किंवा कॉ. गोविंद पानसरेंना हिंदूविरोधी का ठरवण्यात येते? याचे एकमेव कारण म्हणजे हे दोघेही सर्वच धर्मातील अतिरेकी विचारांच्या विरोधी होते. ते हिंदू धर्मातील अतिरेकी विचारांच्याही विरोधी होते. ते खरे सेक्युलर होते. असे खरे सेक्युलर हे सर्वच धर्मांध लोकांचे शत्रू असतात. मग त्यांना बदनाम करण्यासाठी स्युडो सेक्युलर, हिंदूविरोधी अशी विशेषणे लावण्यात येतात. स्युडो सेक्युलॅरिझमचा आरोप करण्याचा नैतिक अधिकार खरे तर केवळ खऱ्या सेक्युलर लोकांनाच असू शकतो. पण आपल्याकडे कम्युनल लोक असा आरोप करतात. कारण त्यांना सेक्युलॅरिझमचा पराभव करायचा असतो. आपल्या देशात सेक्युलॅरिझमचा पराभव करण्यासाठी कम्युनल लोक स्युडो सेक्युलॅरिझमच्या हत्याराचा यशस्वी वापर करतात. आपल्या देशाचे दुर्दैव असे, की हे धूर्त राजकारण कमालीचे यशस्वी होत आलेय.

अशा लोकांची दुसरी एक रणनीती असते, ती म्हणजे हिंदूंमध्ये सदैव अन्यायग्रस्ततेची भावना जागी ठेवणे. बहुसंख्य असूनही तुमच्यावर अन्याय होतो आहे असे सदोदित सांगत रहाणे. (हीच रणनीती मुस्लिम धर्मातील अतिरेकी वापरतात). आपल्या धर्मावर प्रचंड अन्याय होतो आहे या दुष्प्रचाराला काही तरुण बळी पडतात. नथुराम गोडसेचे शस्त्र कोणाही ब्रिटिश अधिकाऱ्यावर कधीच नाही उगारले गेले. ते उगारले गेले सर्व धर्मातील अतिरेकी विचाराविरुद्ध संघर्ष करणाऱ्या निशःस्त्र म्हाताऱ्या माणसाविरुद्ध. 'स्युडो सेक्युलॅरिझम'चे हे शस्त्र वापरणारे लोक आपण स्वतः राष्ट्रवादी असल्याचा दावा करतात, पण राष्ट्रवादाचा हा दावा फसवा असतो. या लोकांचे हे शस्त्र आपल्या देशाच्या आत्म्यावरच उगारलेले असते.

(लेखक सामाजिक प्रश्नांचे अभ्यासक आहेत)