रशियाचे पाताळयंत्री अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यावर सातत्याने टीकेची
धार धरणारे विरोधी नेते बोरिस नेमत्सोव यांची मागून गोळ्या घालून हत्या
व्हावी, याचा अर्थ रशियन नागरिकांना नेमका कळला आहे. तसे नसते तर 'रशिया
पुतिनमुक्त करा' अशा घोषणा देत हजारो निदर्शक रस्त्यावर उतरले नसते. पुतिन
यांच्या राजवटीने पेरलेल्या भयाच्या काळोखाला न जुमानता देशभर निदर्शने होत
आहेत. बोरिस हे एकेकाळी उपपंतप्रधान होते. पुतिन यांच्या राजवटीचे ते कठोर
टीकाकार होते. दोन मारेकऱ्यांनी त्यांना क्रेमलिन प्रासादाजवळ गोळ्या
घालून ठार केले. या हत्येनंतर निषेध करण्यात तसेच चौकशी समिती नेमण्यात
पुतिन यांनी वेगाने पुढाकार घेतला. 'मारेकऱ्यांची गय करणार नाही' अशी
गर्जनाही सरकारी टीव्हीवर केली. मात्र, त्यांच्या या गर्जनेवर रशियन
नागरिकांचा कितपत विश्वास आहे, हे मॉस्कोतील महाकाय पण शिस्तबद्ध मोर्चातून
दिसले. 'मी घाबरणार नाही' असे फलक या निदर्शकांच्या हाती होते. ते कुणाला
उद्देशून होते, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. भयाचा अंमल बसविण्याचा
प्रयत्न होतो, तेव्हा जगभरची सामान्य माणसे कशी समान प्रतिसाद देतात, हे
मॉस्कोच्या रस्त्यावर दिसले. तेथील निदर्शकांनी 'मीही बोरिस नेमत्सोव' असे
फलक उंचावले होते. 'शार्ली हेब्दो'वरील हल्ल्यानंतरही पॅरिसमध्ये थेट असेच
झाले. महाराष्ट्रातील दोन्ही उदाहरणे तर सर्वज्ञातच आहेत. काही
निदर्शकांनी तर कारवाईची पर्वा न करता 'या हत्येमागे पुतिन आणि त्यांची
आवडती केजीबी आहे,' असा सरळच आरोप केला. पुतिन हे केजीबी या गुप्तहेर
यंत्रणेचे प्रमुख होते. केजीबीने जगभर काय काय केले, हे आता उघड झाले आहे.
तेव्हा बोरिस यांच्या हत्येचा ठपका संतप्त निदर्शकांनी केजीबीवर ठेवावा,
यात नवल नाही. गेल्या काही वर्षांत पुतिन यांनी अनेक विरोधकांना देशाबाहेर
घालविले. अनेकांना खटल्यांमध्ये गुंतवून तुरुंगात टाकले. मात्र, बोरिस
यांना तसे काहीच करता आले नव्हते. बोरिस नेमत्सोव ही फार मोठी राजकीय ताकद
नव्हती. पण सतत प्रश्न विचारून त्यांनी पुतिन यांना हैराण केले. त्यात
युक्रेन युद्धावरचे प्रश्न होते तसे लोकशाहीचेही होते. गोर्बाचोव यांनी
'ग्लासनोस्त' व 'पेरेस्रोयका' आणून नवा प्रवास सुरू केला होता. ती काळाची
चाके उलटी फिरून शीतयुद्धकालीन भयपर्वाकडे चालली आहेत.
0 comments:
Post a Comment