मराठी साहित्याचं लोणचं

राजीव काळे

यापुढे आपल्या शहरात कुठेही नवी बिझनेस गाळेवाली बिल्डिंग उभारली तर त्यातल्या एका गाळ्यात फक्त मराठी साहित्याचं लोणचंच विकायला ठेवायचं, असा नियम करणार आहे सरकार. आता विचार करा, आपल्या शहरात केवढ्या बिल्डिंगा उभ्या राहतायत. किमान अडीच ते तीन हजार. तशा प्रत्येक बिल्डिंगमध्ये एक एक गाळा मराठी साहित्याच्या लोणच्यासाठी ठेवणार म्हणजे लोणच्याचा केवढा प्रसार होणार...

..................

नमस्कार नमस्कार नमस्कार...

आजच्या आमच्या किचन कॅबिनेट कार्यक्रमात आपणा सर्व रसिकांचे खूप खूप स्वागत. आता तुम्ही म्हणाल की कार्यक्रम मराठी आणि त्याचं नाव हे असं इंग्रजी कशाला? तर हल्ली स्वयंपाकघर म्हटलं की थोड्याच लोकांना कळतं. किचन म्हटलं की सगळ्यांनाच कळतं. आणि मुळात स्वयंपाकघर म्हणजे कसं ओल्ड फॅशन्ड वाटतं, कुठल्यातरी जुन्यापुराण्या वाड्यातल्या काळोख्या खोलीसारखं. मसाले आणि फोडणीचा वास गच्च भरून राहिल्यासारखा वाटतो. जुनी पितळ्याची भांडी डोळ्यांसमोर येतात. किचन म्हणजे कसं एकदम खूप उजेड वगैरे. आणि स्टीलच्या चकाचक भांड्यांनी उजेड वाढणार. आणि शिवाय एक्झॉस्ट फॅन असल्याने वास भरून उरणार नाही. तर असो. किचनचं कौतुक पुरे झालं. आता मुख्य विषयाकडे वळू. आजच्या आपल्या रेसिपीकडे. आणि हो नेहमीसारखे तुम्ही फोनही करू शकता आम्हाला कार्यक्रमादरम्यान काही शंका असल्यास.

तर आजची आपली खास रेसिपी आहे मराठी साहित्याचं लोणचं. आता आम्ही आणि तुम्ही सारेच ते नेहमी घालत असतो. प्रत्येकाची त्याची कृती

निरनिराळी असते. त्याच्या साहित्यातील समान धागा म्हणजे साहित्य. हा काय शब्दच्छल? तर तो शब्दच्छल नाही, हे आधी जाणून घ्या. साहित्याचं लोणचं घालायचं तर मुख्य साहित्य साहित्यच असणार ना?

आता तुम्ही म्हणाल की, मराठी साहित्याचं लोणचं हा पदार्थ किचन कॅबिनेटमध्ये आत्ता घेण्याचं कारण काय? तर या पदार्थाची खासियत अशी की तो कधीही घालता येतो आणि त्यासाठी कुठलंही कारण पुरतं. त्यासाठीचं ताजं कारण तुम्हाला ठाऊक असेलच. काय? माहिती नाही म्हणता? ऐका तर मग.

मराठी साहित्याच्या लोणच्यासाठी आपल्या मायबाप सरकारने रिझवेर्शन ठेवण्याचं मान्य केलं आहे नुकतंच. रिझवेर्शन म्हणजे काय? तर यापुढे आपल्या शहरात कुठेही नवी बिझनेस गाळेवाली बिल्डिंग उभारली तर त्यातल्या एका गाळ्यात फक्त मराठी साहित्याचं लोणचंच विकायला ठेवायचं, असा नियम करणार आहे सरकार. आता विचार करा, आपल्या शहरात केवढ्या बिल्डिंगा उभ्या राहतायत. किमान अडीच ते तीन हजार. तशा प्रत्येक बिल्डिंगमध्ये एक एक गाळा मराठी साहित्याच्या लोणच्यासाठी ठेवणार म्हणजे लोणच्याचा केवढा प्रसार होणार. केवढी दुकानं लोणच्याची. लोणचं मिळत नाही... लोणचं मिळत नाही, अशी आजवरची लोकांची तक्रार असायची, ती दूर होणार. घराघरांत हे लोणचं पोहोचणार. लोणची तयार करणाऱ्यांचं कल्याण होणार. तर अशी ही विलक्षण योजना कमालीची दूरदृष्टी असलेल्या, बुद्धिमान, विचारवंत, लोणचंप्रेमी सरकारनं जाहीर केली आहे. त्यानिमित्तानं आजचा हा रेसिपीचा प्रपंच.

तर, या रेसिपीचं साहित्य आणि कृती आहे... अरे, लगेच पहिला फोन आला. हां, हां विचारा. हं. हं. हो गाळा रिझर्व ठेवणार आहेत. म्हणजे आरक्षित. आता ते कसंय, की तो कुठल्या मजल्यावर ठेवायचा, ओपनिगंला ठेवायचा की नाही, किती स्क्वेअर फुटांचा ठेवायचा ते अद्याप ठरलेलं नाही. पण हे प्रश्न फिजूल आहेत, असं नाही वाटत तुम्हाला? लोणच्याला गाळा मिळणं महत्त्वाचं.

तर, रेसिपीचं साहित्य आहे... अरे, दुसरा फोन आला. हं. बोला. तुमच्या घरातील टीव्हीचा आवाज कृपया कमी करा. हं. हं. नाही नाही. ते गाळे कुणाला आणि कसे द्यायचे ते ठरलेलं नाही अजून. काय म्हणता? गाळेवाटपात भ्रष्टाचार? हॅलो. हॅलो. संपर्क तुटला वाटतं.

तर रेसिपीचं साहित्य आहे... अरे पुन्हा फोन. अच्छा. हं. कळला तुमचा प्रश्न. आता इतके गाळे निघाल्यानंतर साहित्याचं लोणचं खपणार कसं? या तुमच्या प्रश्नाला उत्तर तुम्हीच द्यायचं आहे. म्हणजे तुम्हीच ते खरेदी करायचं आहे. सामाजिक आणि सांस्कृतिक कर्तव्यच आहे ते तुमचं. ते पार पाडण तुमच्याच हाती आहे.

तर, साहित्य आहे... अरे पुन्हा फोन. मराठीत विचारा. मराठी नाही तुम्ही? बरं हिंदीत विचारा. गुजराती? बरं गुजरातीत विचारा. पण उत्तर मराठीतच मिळेल तुम्हाला. हं. विचारा. हो हो. नाही नाही. अच्छा. लोणच्यासोबत पापड, खाकरा, ढोकळा, समोसा, शेव, गाठी विकता येतील का? वा. फार छान प्रश्न आहे. तर मराठी साहित्याच्या लोणच्याचा खप किती आहे, हे पहिल्या तीन महिन्यांत बघितलं जाईल. त्यासाठी खास सर्वपक्षीय समिती स्थापन केली जाणार आहे. खप समाधानकारक असेल तर त्याचा अर्थ लोकांना असं काहीतरी हवं आहे, असा काढला जाईल. असं काहीतरी म्हणजे पापड, ढोकळा, शेव वगैरे. त्यामुळे त्याच्या विक्रीची परवानगी मिळेल. आणि खप समाधानकारक नसेल तर लोणच्याचा सोबतीला काहीतरी गाळ्यात ठेवायलाच लागेल. हे काहीतरी म्हणजे पापड, ढोकळा, शेव वगैरे.त्याशिवाय गाळेवाल्याचं घर कसं चालणार? त्यामुळे त्यांच्या विक्रीस परवानगी दिली जाईल. मला वाटतं तुमच्या मनाचं समाधान झालं असेल.

तर, रेसिपीचं साहित्य आहे... अरे अरे अरे. कार्यक्रमाची वेळच संपली वाटतं. सिग्नल दाखवतायत. यावेळी आपला कार्यक्रम अर्धवटच राहिला. साहित्य आणि कृती सांगताच आली नाही. हरकत नाही. उद्या याच वेळी, याच चॅनेलवर पुन्हा भेटू. किचन कॅबिनेटच्या पुढच्या भागात. तोपर्यंत सगळ्यांना नमस्कार. जय महाराष्ट्र...

0 comments:

Post a Comment