रुतलेल्या पावलांना सदिच्छा!

राजीव काळे

इथे मुद्दा जुन्यांना सरसकट मोडीत काढण्याचाही नाही. त्यांनी त्यांच्या काळी, त्यांच्या काळाशी सांधा जोडून जे लिहिले ते त्या काळात उत्कृष्ट असेलही. शिवाय त्यातले काही लिखाण आजच्याही काळाशी सांधा जोडत असेल तर ते टिकून राहणारच. पण असे सांधे जोडणारे साहित्य नसेल तर ते मागे सोडणेच श्रेयस्कर. केवळ विभूतिपूजा करण्यात आणि जुन्याचे उमाळे काढण्यात काही हशील नाही. आजच्या पिढीला 'आज'चा साहित्यिक वाचायला मिळायलाच हवा...

.............

एक पिढी म्हणजे किती वषेर्? याचा हिशेब मांडायचा तर त्याचा संदर्भ कुठला हे आधी लक्षात घेणे गरजेचे. त्यानुसार काळाचा हिशेब मांडता येणे शक्य. साहित्य व्यवहारात तर त्याबाबत काळाचे ठोकताळे मांडता येणे कठीणच. म्हणजे अमुक एक वर्षांमागे जन्मलेला किंवा दिवंगत झालेला लेखक वा कवी त्या पिढीचा असू शकतो. किंवा त्या पिढीचा न झाला तर पुढल्या पिढीचा असू शकतो. आणि त्याच्या बरोबर उलटही. म्हणजे आपल्या अवतीभवती 'आज' वावरणारा आणि लिहिणारा लेखक वा कवी 'काल'चा असू शकतो. आणि कालच्याच गोष्टी तो पुन्हापुन्हा सांगत असतो. याची उदाहरणे आपल्या मराठीत कैक. ती कालही होती आणि आजही आहेत.

साहित्यिक शिळ्या वा ताज्या वा उद्याच्या पिढीतला असू शकतो. या पिढ्यांच्या परिमाणांबाहेरचाही असू शकतो. तर मग या पिढ्यांना समांतर, खरे तर त्या पिढीशी जोडलेली अशी वाचकांची पिढी असते का? ढोबळमानाने अशी पिढी दिसतेच. ही रचनाही तशीच. म्हणजे त्यांतील कुणी आदल्यांशी जोडले गेलेले, कुणी आजच्यांशी, कुणी पुढल्यांशी.

या सगळ्या रचनेत लहान मुलांचं स्थान कुठे? तर ते स्थान स्वयंसिद्ध असणे खूपच कठीण. घरातील लोक जे वाचणार, शाळांच्या वाचनालयांत जी पुस्तक असणार त्यावरच त्यांचे स्थान ठरणार. त्यात केवळ फॅशन म्हणून नव्हे, तर खरोखरच्या आस्थेने पुस्तक घरी बाळगणारी मंडळी कमीच. आणि शाळांमध्ये मुलांना कुठली पुस्तकं वाचायला मिळणार?

श्यामची आई, स्वामी, मृत्युंजय, व्यक्ती आणि वल्ली, बटाट्याची चाळ, राजा शिवछत्रपती, माझी जन्मठेप, एक होता कार्व्हर...

ही यादी मनची नाही. 'जिज्ञासा ट्रस्ट' आणि 'मराठी अभ्यास केंद' यांनी ठाण्यात काही महिन्यांपूवीर् लेखन शिबिर आयोजित केले होते. त्यात सहभागी झाले होते इयत्ता सातवी ते नववीतील विद्याथीर्. तुम्हाला आवडलेली पुस्तकं कुठली? या प्रश्नाला या विद्यार्थ्यांनी दिलेली उत्तरे म्हणजे ही पुस्तकांच्या नावांची यादी. आणि त्यांच्या आवडत्या लेखक वा कवींच्या यादीत स्थान पु. ल. देशपांडे, कुसुमाग्रज, गोविंद विनायक म्हणजेच विंदा करंदीकर आदींना.

आणि आता आणखी एक यादी बघू. सुमारे १२ ते १५ वर्षांमागे जे विद्याथीर्दशेत होते, त्यांच्याकडूनही अशा प्रकारची यादी मागवण्यात आली. त्या यादीत स्थान राजा शिवछत्रपती, माणदेशी माणसं, गोट्या आदी पुस्तकांना. त्या पिढीचे आवडते लेखक पु. ल., भा. रा. भागवत, व्यंकटेश माडगूळकर.

थोडा विचार करू या की, साहित्यिकांच्या या यादीतील मंडळींची पिढी कुठली आणि आजच्या, किंबहुना 'आज'चा होण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या वाचकाची पिढी कुठली? केवळ काळाचा मापदंड लावला तर या बहुतांश साहित्यिकांची पिढी मागची. आणि कालनिरपेक्षतेचा मापदंड हाती धरला तर त्यातील काहींची पिढी कालची आणि काहींची आजची. त्यातील काहींचे काही लिखाण आज शिळे वाटणारे तर काही आजही ताजे वाटणारे.

या सगळ्यात एक शंका येते ती अशी की, आपण आजच्या मुलांना आजच्या पिढीच्या वर्गात बसवत आहोत की नाही? इथे प्रश्न मराठी वा इंग्रजी माध्यमाचा नाही. इंग्रजी माध्यमातील मुलगा जर 'बटाट्याची चाळ' वाचू शकतो तर त्याला 'आज'चेही एखादे पुस्तक वाचता येईलच की. ते पुस्तक आपण त्याच्या हाती देतो की नाही, हा प्रश्न आहे. इथे मुद्दा जुन्यांना सरसकट मोडीत काढण्याचाही नाही. त्यांनी त्यांच्या काळी, त्यांच्या काळाशी सांधा जोडून जे लिहिले ते त्या काळात उत्कृष्ट असेलही. त्याबाबत संशयाला जागाच नाही. शिवाय त्यातले काही लिखाण आजच्याही काळाशी सांधा जोडत असेल तर ते टिकून राहणारच. पण असे सांधे जोडणारे साहित्य नसेल तर ते मागे सोडणेच श्रेयस्कर. केवळ विभूतिपूजा करण्यात आणि जुन्याचे उमाळे काढण्यात काही हशील नाही. विभूतिपूजेत मेंदू गहाण ठेवला जातो आणि जुन्याचे उमाळे काढून केवळ मन कातरहळवे होते. मेंदू गहाण ठेवून मन कातरहळवे करण्याने काय साध्य होणार?

गोष्ट साधीसोपी आहे. आजच्या वाचकाला 'आज'चा साहित्यिकही वाचायला मिळायला हवा. आणि येथे 'आज'चा वाचक म्हणजे शाळेतील मुले अभिप्रेत आहेत. आता, या छोट्यांच्या हाती एकदम श्याम मनोहरांचे किंवा अरुण कोलटकरांचे (हे दोघेही तसे 'काल'चे असूनही 'आज'चेच!) पुस्तक सोपवा, असे सांगण्याचा हेतू नाही. पण त्या दिशेने प्रवास तरी करता येईल ना! आणि ती जबाबदारी निविर्वाद मोठ्यांचीच. अर्थात, प्रवास करण्यासाठी पावले उचलावी लागतात. रुतलेली पावले पुढे जाऊ शकत नाहीत.

पावले रुतलेली असतील तर ती निघोत आणि प्रवासाला लागोत, हीच सदिच्छा...

0 comments:

Post a Comment