खुर्ची आणि लेखणी

- राजीव काळे

सत्तेच्या उठवळ बाजारात, खुर्ची टिकवण्याच्या किंवा मिळवण्याच्या धावपळीत आपल्याकडील राजकारण्यांमधील संवेदनशीलता पार गोठून गेली आहे का? नवा काही विचार करण्याची, तो लोकांसमोर मांडण्याची उमीर्च त्यांच्यात नाही का? कविता वगैरे जाऊ देत, जे भोवताली दिसतं आहे, ज्या भोवतालात आपण जगत आहोत आणि आपली जनता जगत आहे, त्यावर गद्यातून व्यक्त होण्याची, आपले अनुभव लोकांपर्यंत पोहोचवण्याची, त्यांच्याशी संवाद साधण्याची इच्छाच त्यांना नाही का?
.....................

बातमी पुस्तकांच्या खपाची. ती तशी आपल्या कुणासाठीच नवी नाही.

अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा भारतदौरा आटपून पुढच्या मुक्कामी निघून गेले. त्यांनी भारतात पाऊल टाकण्याआधीपासूनच त्यांच्या पुस्तकांचा खप एकदम वाढला होता. मग ते 'ड्रीम्स फ्रॉम माय फादर' असो, 'ऑडेसिटी ऑफ होप' असो वा इतर कुठलं.

प्रसंगपरत्वे विशिष्ट व्यक्तीने लिहिलेल्या, विशिष्ट व्यक्तीवरील वा विशिष्ट विषयाशी संबंधित पुस्तकांना मागणी वाढते, हा आपला नेहमीचा अनुभव. मग एखाद्या लेखक वा कवीला मिळालेला एखादा प्रतिष्ठित पुरस्कार असो, एखाद्या ताज्या विषयावरचं लिखाण असो, एखादा वाद असो, अशी पुस्तकं वाचण्यास लोक उत्सुक असतात, असं अनेकदा दिसतं.

इथला विषय आहे ओबामांचा. ओबामा जर युगांडाचे किंवा कंबोडियाचे अध्यक्ष असते तर त्यांनी काय लिहिलं आहे, किंवा त्यांच्यावर कुणी काय लिहिलंय याकडे लोकांनी किती लक्ष दिलं असतं? कल्पना नाही. प्रतिकूलतेशी झुंजत यश मिळवणाऱ्याबाबत जनमानसात एक आदिम कुतूहल असतं. त्यामुळे कदाचित ते कुठल्याही देशाचे असते तरी लोकांनी त्यांची वा त्यांच्यावरची पुस्तकं वाचलीही असती. हा झाला कल्पनाविलास. या कल्पनाविलासाचा परिघ थोडा वाढवू या. ओबामा समजा आपल्या देशाचे राष्ट्रपती वा पंतप्रधान असते तर त्यांच्या पुस्तकांना अशी मागणी आली असती?

इथे एक शंका येते ती अशी की, ओबामा भारताचे पंतप्रधान वा राष्ट्रपती असते तर त्यांनी मुळात पुस्तकं लिहिली असती का अशी. आणि अशी पुस्तकं समजा लिहिली असती तरी लोकांनी ती वाचली असती का, ही पहिल्या शंकेला जोडशंका.

आणि समजा ओबामा महाराष्ट्रातील पुढारी असते तर? हा तर कल्पनाविलासाचा वेडा विस्तार झाला. पण या वेड्या विस्ताराच्या अनुषंगाने विचारलेल्या प्रश्नाचं सहज येणारं उत्तर - तर मग ओबामांनी पुस्तकं लिहिलीच नसती!

या उत्तरामागील तर्कट भूतकाळाशी नव्हे, तर वर्तमानकाळाशी सांधा साधणारं.

भूतकाळात डोकावलं आणि स्वातंत्र्यानंतरचा काळ लक्षात घेतला तर अशी लिहिती राजकारणी मंडळी अनेक दिसतात. पार अगदी जवाहरलाल नेहरू, यशवंतराव चव्हाण, श्रीपाद अमृत डांगे, एसेम जोशी यांच्यापासून ते अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, जसवंतसिंह यांच्यापर्यंतचे दाखले त्यासाठी देता येतील. (वाजपेयी, अडवाणी, जसवंत यांची कारकीर्द हा 'भूतकाळा'त जमा झालेला ऐवज आहे, अशी मांडणी, कित्येकांना नाही आवडली तरी सरळ सरळ समोर दिसतेच आहे!) या व त्यांच्यासारख्या इतर काही राजकारणी मंडळींनी आपापल्या प्रवृत्ती व प्रकृतीनुसार लिखाण केलं. त्यास कधी लालित्याचा स्पर्श होता, कधी इतिहासाचा अर्थ नव्याने लावण्याचा प्रयत्न होता, कधी वर्तमानावर केलेलं अभ्यासपूर्ण भाष्य होतं, कधी भविष्याचा वेध घेणारी नजर त्यात दिसून आली. त्यातील काही अभ्यासू मंडळींनी वेगवेगळ्या विषयांवर सैद्धांतिक स्वरूपाचं लेखनही केलं.

पण हे झालं भूतकाळाचं. वर्तमानकाळात त्या दृष्टीनं पहायला गेलं तर फारसं काही नजरेला पडत नाही. आपल्या महाराष्ट्रात तर नाहीच नाही. राजकारण्यांवरची पुस्तकं बाजारात नसतात असं नाही; पण त्यांचं स्वरूप मुख्यत्वे भाटगिरीचं. अमका अमका माणूस कसा मोठा झाला... त्याचं कर्तृत्व कसं आभाळाएवढं आहे... तो महाराष्ट्राचं कसं आशास्थान आहे... तो देशाचं कसं आशास्थान आहे (अद्याप कुणी एखाद्याला विश्वाचं आशास्थान म्हटलेलं नाही, हे नशीब!) असल्याच मजकुराची भरताड त्यात दिसते. पुढाऱ्यांनाही ते कदाचित आवडत असावं. मग लिहिणाऱ्याची काहीतरी सोय लावली जाते. छद्मी हास्य ही असल्या भाटगिरीच्या लिखाणावरची सामान्य वाचकाची पहिलीठोक प्रतिक्रिया असणं हे ओघानं आलंच.

प्रश्न असा पडतो की आजच्या आपल्या पुढाऱ्यांना लेखणी हातात घ्यावीशी वाटतच नाही का? लिहून लिहून काय लिहिणार, असा प्रश्न त्यांना सतावतो आहे का? सत्तेच्या उठवळ बाजारात, खुचीर् टिकवण्याच्या किंवा मिळवण्याच्या धावपळीत त्यांच्यातील संवेदनशीलता पार गोठून गेली आहे का? नवा काही विचार करण्याची, तो लोकांसमोर मांडण्याची उमीर्च त्यांच्यात नाही का? कविता वगैरे जाऊ देत; जे भोवताली दिसतं आहे, ज्या भोवतालात आपण जगत आहोत आणि आपली जनता जगत आहे, त्यावर गद्यातून व्यक्त होण्याची, आपले अनुभव लोकांपर्यंत पोहोचवण्याची, त्यांच्याशी संवाद साधण्याची इच्छाच त्यांना नाही का? की, लिखाण हे आपलं क्षेत्रच नाही, अशी खूणगाठ त्यांनी मनाशी बांधली आहे? की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या मनावरचे मुलामे खरवडून काढून आत डोकावण्याची त्यांच्यात ताकदच उरलेली नाही?

कारणं काहीही असोत; ही मंडळी लेखणी उचलताना फारशी दिसत नाहीत, हे खरं. लोकाभिमुख असणं ही राजकारण्यांसाठीची एक आवश्यक अट असायला हवी. या लोकाभिमुखतेकडे घेऊन जाणारा एक मार्ग लेखनाचाही आहे, हे या मंडळींना माहिती नसेल, असं शक्यच नाही. तेवढी हुशार ती नक्कीच आहेत.

ही हुशारी दिसू दे, एवढीच अपेक्षा.

0 comments:

Post a Comment