पत्रकारितेत यायचे तर स्मरणशक्ती आणि कुतूहल या दोन्ही गोष्टी सदैव जाग्या
असणे आवश्यक. या दोन्ही गोष्टी इसाक मुजावर यांच्या अंगी ठासून भरल्या
होत्या. मुजावर यांच्या निधनाने मोठा ठेवा कायमचा हरवला आहे. भालजी
पेंढारकर आजारी असताना 'माझी माहिती हवी तर इसाकशी बोला' असे सांगत. इतकेच
नव्हे, तर तो जे सांगेल ते खुशाल छापा, अशी पुस्ती जोडत. हीच कथा अशोककुमार
यांची. त्यांना भेटायला गेल्यावर अशोककुमार यांना वयामुळे फार काही
आठवेना. त्यावेळी मुजावरांनी त्यांना अनेक संदर्भ देत त्यांच्याकडून माहिती
काढून घेतली. मुजावर यांनी १९५५ पासूनच लिखाणाला सुरुवात केली. पुढे ७०
च्या दशकात 'रसरंग' या साप्ताहिकात मुजावरांचा 'फ्लॅशबॅक' नावाचे स्तंभलेखन
सुरू झाले. तो अमाप लोकप्रिय झाला. पुढे हाच फ्लॅशबॅक त्यांचा स्वभाव
बनला. सिनेसृष्टीतल्या कोणाही कलाकाराला भेटल्यानंतर त्याच्याविषयी
लिहिताना ते आपल्या बटव्यातून आठवणींचा खजिना उलगडत. लिखाणाच्या निमित्ताने
शरद पिळगावकर, मधुसूदन कालेलकर, बाळासाहेब सरपोतदार, भालजी पेंढारकर,
चंद्रकांत, सूर्यकांत, सुलोचना, जयश्री गडकर, दादा कोंडके अशा अनेकांशी
त्यांचा स्नेह वाढला. त्यांच्या गप्पांमधून येणाऱ्या किश्श्यांना त्यांनी
स्मरणात तर ठेवलेच. शिवाय, पुस्तकरुपाने या आठवणी रसिकांसमोर आणल्या. मराठी
रसिक इतिहासात रमतो, हे त्यांनी ताडले होते. अर्थात, यामुळे 'इतिहासात
रमणारा पत्रकार' म्हणून टीकाही झाली. पण यापलिकडे लिखाणाला मिळणारा
उत्स्फूर्त प्रतिसाद त्यांना दिसत होता. त्यांचे लेखन केवळ व्यवसाय म्हणून
नव्हते, तर त्यातून त्यांची बांधिलकी दिसे. एखाद्या कलाकाराचे अचानक निधन
झाल्यास संपूर्ण अंकाचे स्वरूप बदलून तो अंक ते कलाकाराला समर्पित करायचे.
'चित्रानंद'ने असे अनेक अंक दिले. त्यांना जी माणसे भेटली ती त्यांच्या
स्मरणगुंफेत कायमची मुक्कामाला जात. त्यातूनच, ४० पेक्षा जास्त पुस्तकांचे
लेखन त्यांनी केले. 'गाथा मराठी सिनेमाची' या ग्रंथातून त्यांनी १००
वर्षांचा मराठी सिनेमाचा इतिहास लोकांसमोर ठेवला. या शंभर वर्षांपैकी
मुजावर पहिल्या ५० वर्षांतच खऱ्या अर्थाने रमले. त्यांनी सिनेसमीक्षा केली.
परंतु, आपल्या लिखाणातून त्यांनी कधी कुणावर टीका केली नाही वा युक्तीच्या
चार गोष्टी सांगितल्या नाहीत. प्रत्येकाशी स्नेह जपत पडद्यामागच्या
सकारात्मक गोष्टी टिपण्याकडे त्यांचा कल होता. कालांतराने त्यांनी
'महाराष्ट्र टाइम्स'सह अनेक वृत्तपत्रांत लेखन केले. पाच दशकांच्या अमूल्य
योगदानाबद्दल चित्रपट महामंडळाने त्यांना 'चित्रभूषण' पुरस्कार दिला. आताशा
लेखन कमी झाले होते. मुजावर यांच्या निधनाने चित्रसृष्टीचा रसाळ कथेकरी
हरपला आहे. परंतु, त्यांनी लिहिलेली 'सिनेमाची गाथा' अनेक पिढ्यांना
सिनेमाची वाट दाखवत राहील.
0 comments:
Post a Comment