अक्षरसाक्ष
म्हणजे ही जबाबदारी दुहेरी झाली. लिहिण्याची आणि ते जपण्याची. या जबाबदारीची आजची स्थिती काय आहे?संतसाहित्य राहू द्यात जरा बाजूला. आजच्या काळाला प्रतिसाद देणारी, आजच्या काळाचा शब्द होणारी किती मंडळी आहेत सभोवती? खऱ्याखुऱ्या कळवळ्याचे, काळाचे भान राखून लोकांमध्ये जाणारे कितीजण आहेत आपल्या मराठीच्या छोट्याशा परिघात? आणि असलीच अशी दुमिर्ळ मंडळी तर त्यांना प्रतिसाद देण्यात, त्यांचा मानमरातब राखण्यात पुरे पडतोय का आपण लोक?
......
दिवस वारीचे आहेत. पालख्यांचे आहेत. अभंगाचे आहेत. ओव्यांचे आहेत. ज्ञानेश्वरांपासून तुकारामांपर्यंत... नामदेवांपासून चोखोबांपर्यंत... मुक्ताबाईंपासून कान्होपात्रांपर्यंत... अशा कितीतरी मंडळींचे आहेत. ही सारी संतमंडळी. सारे उत्तम साहित्यिक. त्यांच्या शब्दसृष्टीच्या, भावसृष्टीच्या केंदस्थानी बहुतांशवेळा सावळे विठ्ठलतत्व भले असेल, त्यांचा आत्मधर्म हा नि:शंकपणे सृजनतेचा. अभंग, ओव्या हे त्या सृजनत्वाच्या फांदीवर झुलणारे नितांतसुंदर फूल. या फुलाच्या पाकळ्या झुबकेदार लयीच्या. या लयींतील एक लय आत्मनिष्ठेची आणि तिच्या सोबतीची दुसरी लय समष्टीशीही निष्ठा सांगणारी. या समष्टीत काय काय आले? तर भोवतालचे सारेच. भोवतीचा निसर्ग, माणसे, त्यांची सुखदु:खे. त्यांची आयुष्ये. त्यांच्या आशानिराशा. त्यांचे पुण्य, त्यांचे प्रमाद. थोडक्यात म्हणजे एकाच वेळी विविध सारण्यांतून चालत असलेली त्यांची जीवनरहाटी. हीच जीवनरहाटी संतमंडळींच्या शब्दांमध्ये अनेकवार उतरलेली. ही उतरण कधी केवळ आरशाप्रमाणे बिंबाचे प्रतिबिंब दाखवणारी, तर कधी मूळ बिंबावर टिप्पणी करणारी. भरभक्कम अर्थाच्या पायावरची ही टिप्पणी इतकी चपखल, की शतके लोटली तरी तिची समयोचितता कायम उरलेली.
रुणुझुणु रुणुझुणु रे भ्रमरा... सांडी तू अवगुणू रे भ्रमरा...
तुका म्हणे ऐशा नरा, मोजुनी माराव्या पैजारा...
तुटे वाद, संवाद तो हितकारी...
ही अगदी वानगीदाखलची उदाहरणे. अशी उदाहरणे संतसाहित्यात कैक सापडतील. सोयीसाठी त्यांना वचने म्हणू यात. कित्येक शतकांचे उंबरे ओलांडूनही ही वचने त्यानंतरच्या माणसांच्या बोलण्यालिहिण्यात कायम चालत राहिली. मुख्य म्हणजे आधुनिक अर्थाने समाज साक्षर नसताना, मुदितपरंपरा रुजली नसताना बहुतांश प्रमाणात मौखिक परंपरेतूनच साहित्याचे चलन एका पिढीकडून पुढच्या पिढीकडे चालू राहिले, ही मोठ्या उल्लेखाची बाब. त्यामागचे कारण काय? त्यावर, आहेच मुळी संतसाहित्य मोठ्या ताकदीचे, असे साधेसोपे उत्तर देऊन नाही भागायचे. तर, त्या ताकदीमागचे कारण अजमावून बघायला हवे.
ही ताकद कशात? तर, अगदी पहिलेछूट डोळ्यापुढे येणारे कारण म्हणजे संतांचा शब्द हा त्या काळाचा आवाज होता. काळ म्हणजे काय? व्यक्ती आणि भोवताल. कधी थेट, कधी रूपकांच्या बुंथीआडून, कधी कूटरचनांच्या माध्यमातून ही मंडळी स्वत:च्या आणि इतरांच्याही आतल्या आवाजाला प्रकट आवाज देत होती. कधी लोकांवर मायेचे, करुणेचे पांघरूण घालत होती, कधी त्यांना दटावत होती, कधी स्वत:वर चरपडत होती, कधी लोकांना दूषणे देत होती, कधी सगुण-निर्गुणाला आर्ततेने हाक देत होती, कधी सावळे तत्व हाती गवसल्याच्या आनंदात बेभान होत होती, कधी गुह्य असे काही उघड करीत होती, माणसाच्या मनातील सत् आणि असत् यांच्यातील झगडा समजून व समजावून देत होती, वास्तवाचे भान देत होती. हा असा आपल्या काळाचा आवाज ऐकणे कुणाला नाही भावणार? टाळ-मृदंग-झांजांचा भान हरपून लावणारा तालाचा पडदा जरा दूर सारून निखळ शब्दांकडे पाहिले की त्यातील ताकद अधिक जोखता येते, त्यातून काळाचा आवाज अधिक चांगल्या रीतीने ऐकता येतो.
या साहित्यातील थेट हृदयाला भिडणारी भाषा, हे या वचनांच्या अमरत्वाचे आणखी एक कारण नमूद करता येईल. या अशा भाषेचा उद्भव होणार कधी? मुळात लिहिणाऱ्याच्या हृदयात खराखुरा कळवळा असेल तर. हा कळवळा कशाहीविषयीचा. स्वत:विषयीचा, दुसऱ्याविषयीचा, आनंदाविषयीचा, दु:खाविषयीचा. अशा कळवळ्यातून निर्माण झालेल्या शब्दांचे नाते भोवतीच्या माणसांशी जोडले गेले नाही तरच नवल. आणि ही नातेसांधणी केवळ आपल्या गुहेत, आश्रमात राहून शब्द प्रसवण्यापुरती नव्हती, आत्म्याचे तत्वज्ञान सांगणारे हे लोक काळाचे भान राखून प्रत्यक्ष देहाने समाजात मिसळत होते, हे लक्षात ठेवण्याजोगे.
आणि वचनांच्या अमरत्वाचे एक न विसरता येणारे कारण म्हणजे सर्वसामान्य लोकांनी या संतांच्या अभंगांना, ओव्यांना, विविध रचनांना दिलेला प्रतिसाद. एका रीतीने बघितले तर साहित्यिक आणि त्यांचे चाहते यांच्यातील अद्वैताचे हे एक अद्भुत उदाहरण आहे. त्यामुळे, संतसाहित्य टिकून राहण्याचे श्रेय जसे संतमंडळींच्या ताकदीला, तसेच त्या ताकदीचा योग्य तो मानमरातब राखणाऱ्या लोकांनाही.
म्हणजे ही जबाबदारी दुहेरी झाली. लिहिण्याची आणि ते जपण्याची. ती दोन्ही बाजूंनी यथास्थित पार पाडायला हवी.
या जबाबदारीची आजची स्थिती काय आहे? संत साहित्य राहू द्यात जरा बाजूला. आजच्या काळाला प्रतिसाद देणारी, आजच्या काळाचा शब्द होणारी किती मंडळी आहेत सभोवती? शब्दांतून लोकांशी नाते सांधणारे किती लोक आहेत भोवताली. खऱ्याखुऱ्या कळवळ्याचे, काळाचे भान राखून लोकांमध्ये जाणारे कितीजण आहेत आपल्या मराठीच्या छोट्याशा परिघात? टिकून राहतील का त्यांचे शब्द शतकांचे जाऊ देत, दशकांचे तरी उंबरे ओलांडून? आणि असलीच अशी दुमिर्ळ मंडळी तर त्यांना प्रतिसाद देण्यात, त्यांचा मानमरातब राखण्यात पुरे पडतोय का आपण लोक? कुठल्याही माध्यमाने घेऊन जाणार आहोत का आपण त्यांचे साहित्य पुढे पुढे?
या प्रश्नांची उत्तरे द्यायला हवीत दोन्ही बाजूंनी. तीही खरीखुरी. संतांच्या साहित्याला साक्षी ठेवून आणि त्यांच्याच शब्दांत सांगायचे तर सत्य असत्यासी मन ग्वाही करून. आणि त्यासाठी वारीखेरीज अन्य चांगला मुहूर्त कुठला सापडणार?
राजीव काळे

0 comments:
Post a Comment