श्री. नरेन्द्र मोदी

श्री. नरेन्द्र मोदी यांनी विश्वास दिला की त्यांची भारताबद्दलची संकल्पना म्हणजे असा देश जेथे सत्य आणि शांती याला सर्वाधिक प्राधान्य असेल, जेथे विचारांनामुक्त स्वातंत्र्य असेल आणि जेथे सर्व धर्मांना समभाव असेल.

जागतिक पातळीवर मान्यता मिळालेला आणि आदरणीय असा 'ब्रँड इंडिया' हा ५ गोष्टींच्या पायावर उभा असेल - बुद्धिमत्ता, परंपरा, पर्यटन, व्यापार आणि तंत्रज्ञान.
श्री. नरेन्द्र मोदी यांचे राष्ट्रीय कौन्सिल परिषदेतील भाषण आता मराठी भाषेत देखील ऐकता येईल.

दिल्ली येथे नुकत्याच झालेल्या बीजेपीच्या राष्ट्रीय कौन्सिल परिषदेत श्री. नरेन्द्र मोदी यांनी सर्वसमावेशक, विकासाभिमुख, सर्वांचा समावेश असलेला आणि भविष्याचा वेध घेणारा दृष्टीकोन सादर केला.

ह्या परिषदेत श्री. नरेन्द्र मोदी यांनी विश्वास दिला की त्यांची भारताबद्दलची संकल्पना म्हणजे असा देश जेथे सत्य आणि शांती याला सर्वाधिक प्राधान्य असेल, जेथे विचारांना मुक्त स्वातंत्र्य असेल आणि जेथे सर्व धर्मांना समभाव असेल. त्यांनी जागतिक पातळीवर मान्यता मिळालेला आणि आदरणीय असा 'ब्रँड इंडिया' निर्माण करण्याचे महत्त्व सांगताना तो बुद्धिमत्ता, परंपरा, पर्यटन, व्यापार आणि तंत्रज्ञान ह्या ५ गोष्टींच्या पायावर उभा असेल असे सांगितले.
राजकीय आघाडीवर, श्री. मोदी यांनी काँग्रेस पक्षाची जनतेच्या विरूद्ध असलेली धोरणे आणि त्यांचे नेते सातत्याने करत असलेली विधाने यावर मर्मभेदी टिका केली आणि ते पुढे म्हणाले की २०१४च्या निवडणुका ह्या म्हणजे सरकार बदलणे नव्हे तर लाखो भारतीयांसाठी तो आशेचा किरण आहे.
श्री. नरेन्द्र मोदी यांचे राष्ट्रीय कौन्सिल परिषदेतील भाषण आता मराठी भाषेत देखील ऐकता येईल.

चरित्र

लक्षावधी लोकांच्या हृदयात स्वप्ने रुजवणारे आणि त्या स्वप्नांची महती त्यांना पटवून देणारे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी गुजरातच्या अखंड विकासयात्रेचे शिल्पकार आहेत.

मुख्यमंत्री... अर्थात 'CM' (कॉमन मॅन)

गुजरातच्या उत्तर भागातील मेहसाणा जिल्ह्यातल्या वाडनगर या लहानशा गावात सप्टेंबर १९५० मध्ये श्री. नरेंद्र मोदी यांचा जन्म झाला.
लहानपणापासूनच त्यांच्यावर औदार्य, शौर्य आणि समाजसेवेचे संस्कार झाले. भारत-पाकिस्तान युद्धाच्या काळात, अगदी तरुण वयाचे असताना त्यांनी रेल्वे स्टेशनवर जाणार्या -येणार्याक जखमी जवानांची शुश्रुषा केली होती. १९६७ साली गुजरातमध्ये पुराने थैमान घातले होते. त्यावेळीही पूरग्रस्तांच्या सेवेत ते अग्रभागी होते. अप्रतिम संघटनकौशल्य आणि मानवी मानसशास्त्राची उत्तम समज असणार्याप श्री. मोदी यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्य केले आणि गुजरातमधील अनेक सामाजिक-राजकीय चळवळींमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली
अगदी लहान वयापासूनच त्यांना अनेक अडचणी व बिकट परिस्थितीचा सामना करावा लागला. पण आपले अतुलनीय धैर्य आणि मनःशक्ती यांच्या बळावर त्यांनी आव्हानांचे परिवर्तन संधीमध्ये केले. विशेषतः उच्चशिक्षणासाठी जेव्हा त्यांनी कॉलेज व त्यानंतर विद्यापीठात प्रवेश घेतला, त्यावेळी त्यांच्यासमोर अनेक आव्हाने उभी ठाकली होती; पण जीवनाच्या या युद्धात ते नेहमीच लढवय्ये होते... एक सच्चा सैनिक! एकदा पाऊल पुढे टाकले की मागे फिरणे त्यांना ठाऊकच नव्हते. हाती घेतलेले काम मध्येच सोडून देणे किंवा पराभव स्वीकारणे हे त्यांच्या रक्तातच नव्हते. त्यांच्या या दृढनिश्चयी स्वभावामुळेच त्यांनी राज्यशास्त्रात (Political Science) पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या सामाजिक- सांस्कृतिक संघटनेतर्फे त्यांनी कार्य करण्यास आरंभ केला. भारताचा सामाजिक आणि सांस्कृतिक विकास करणे आणि निःस्वार्थ भावना, सामाजिक जबाबदारी, समर्पित वृत्ती आणि राष्ट्रीय भावना येथे रुजवणे या उद्देशाने त्यांनी कार्याला सुरुवात केली. RSS मध्ये काम करीत असताना श्री. नरेंद्र मोदी यांनी विविध उपक्रमांप्रसंगी अनेकदा महत्त्वाची भूमिका बजावली. त्यापैकी १९७४ ची नवनिर्माण भ्रष्टाचारविरोधी मोहीम आणि जून १९७५ ते जानेवारी १९७७ या काळातली १९ महिने चाललेली- भारतीय नागरिकांच्या मूलभूत हक्कांवर गदा आणणारी आणीबाणी या दोन महत्त्वाच्या घटनांमधील त्यांच्या कार्याचा उल्लेख करता येईल. या कालावधीत पूर्ण वेळ भूमिगत राहून केंद्र सरकारच्या जुलमी धोरणांविरुद्ध जाज्वल्य लढा देत त्यांनी लोकशाहीचा मंत्र जागृत ठेवला.
१९८७ साली भारतीय जनता पार्टी (भाजपा) मध्ये प्रवेश करून त्यांनी राजकारणाच्या मुख्य प्रवाहात प्रवेश केला. त्यानंतर अवघ्या वर्षभरातच गुजरातमध्ये भाजपाच्या सरचिटणीस पदाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली. तोवर एक अतिशय प्रभावी संघटक म्हणून त्यांची ख्याती झाली होती. पक्षाच्या कार्यकर्त्यांत नवचैतन्य आणण्याचे आव्हान त्यांनी स्वीकारले. पक्षाचा डंका सर्वत्र दुमदुमू लागला. भाजपाने १९९० साली मित्रपक्षांच्या साथीने केंद्रात सरकार स्थापन केले. हे सरकार काही महिन्यांत कोसळले. पण नंतर लगेच १९९५ साली दोन तृतीयांश बहुमत सिद्ध करत, स्वबळावर गुजरातमध्ये भाजपा सत्तेवर आली. तेव्हापासून आजपर्यंत गुजरातमध्ये भाजपाचे शासन आहे.
गुजरातमध्ये भाजपाची सत्ता येण्यासाठी १९८८ ते १९९५ या काळात आवश्यक ते मूलभूत काम यशस्वीपणे करणारे मुख्य धोरणकर्ते अशी श्री. नरेंद्र मोदी यांची ख्याती झाली. याच काळात दोन अतिशय महत्त्वाच्या राष्ट्रीय उपक्रमांच्या आयोजनाची जबाबदारी श्री. मोदी यांच्यावर सुपूर्द करण्यात आली होती. त्यापैकी पहिली होती ती लालकृष्ण अडवाणी यांची सोमनाथ ते अयोध्या ही भव्य रथयात्रा आणि दुसरी अशीच कन्याकुमारी ते काश्मीर ही (भारताचे दक्षिण ते उत्तर टोक) यात्रा! यातला महत्त्वाचा भाग म्हणजे १९९८ साली भाजपाने केंद्रात सत्ता काबीज केली, त्याचे मुख्य श्रेय नरेंद्र मोदींनी आयोजन सांभाळलेल्या या दोन महत्त्वाच्या यशस्वी यात्रांकडे जाते.
१९९५ मध्ये पक्षाचे राष्ट्रीय सचिव म्हणून त्यांची नेमणूक झाली. एका युवा नेत्यासाठी हे फार मोठे यश होते. १९९८ मध्ये संघटनेच्या सरचिटणीसपदी त्यांना बढती देण्यात आली. २००१ मध्ये भारतातील सर्वांत समृद्ध आणि प्रागतिक राज्य असणार्याफ गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून निवडून येईपर्यंत हा पदभार ते सांभाळत होते. राष्ट्रीय स्तरावर काम करत असताना श्री. मोदी यांच्याकडे अनेक राज्यस्तरीय विभागांच्या कामकाजाची जबाबदारी देण्यात आली होती. त्यामध्ये अतिशय संवेदनशील अशा जम्मू-काश्मीर व ईशान्येकडील राज्यांचाही समावेश होता. राष्ट्रीय स्तरावर कार्य करीत असतानाच, श्री. मोदी पक्षाचे महत्त्वाचे प्रवक्ते बनले. अनेक महत्त्वाच्या प्रसंगी त्यांनी मोठी जबाबदारी सांभाळली
याच काळात त्यांनी जगभर प्रवास केला, अनेक देशांतील महत्त्वाच्या नेत्यांबरोबर संवाद साधला. या अनुभवांमुळे एक वैश्विशक दृष्टिकोन विकसित व्हायला तर मदत झालीच; पण त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे भारतभूमीची सेवा करून सर्व राष्ट्रांमध्ये भारताला सामाजिक-आर्थिक दृष्ट्या सर्वोत्तम बनवण्याची त्यांच्या मनातली तळमळ अधिकच प्रखर झाली.
२००१ साली त्यांना पक्षाने गुजरात सरकारची धुरा सांभाळण्यास सांगितले. ७ ऑक्टोबर २००१ रोजी श्री. मोदी यांच्या सरकारने शपथ घेतली. गुजरातची अर्थव्यवस्था त्यावेळी अनेक प्रकारच्या नैसर्गिक आपत्तींमुळे हादरून गेली होती. २००१ सालच्या जानेवारी महिन्यात झालेल्या भूकंपाचाही त्यात समावेश होता. मात्र, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरचे अनुभव गाठीशी असणार्या व उत्तम धोरणकर्ता असणार्या श्री. नरेंद्र मोदी यांनी या सार्या् आव्हानांचा थेट सामना करायचे ठरवले.
जानेवारी २००१ च्या भीषण भूकंपाने झालेली उलथापालथ बघता, भूकंपग्रस्त भागातील पुनर्निर्माण आणि पुनर्वसन हे सर्वांत मोठे आव्हान मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर श्री. नरेंद्र मोदी यांच्या समोर होते. भूजमध्ये पूर्णपणे विध्वंस झाला होता. हजारो लोक तात्पुरत्या उभारलेल्या घरांतून राहत होते. कोणत्याही मूलभूत सुविधा नव्हत्या. पण आज भूज हे श्री. नरेंद्र मोदी यांनी अडचणींचे रूपांतर सर्वसमावेशक विकासाच्या संधीत कसे केले, याचे मूर्तिमंत उदाहरण बनले आहे.
एकीकडे पुनर्निर्माण आणि पुनर्वसनाचे काम सुरू असतानाही, श्री. नरेंद्र मोदी यांनी भव्य विकासाचा पाठपुरावा सोडला नाही. गुजरातचे लक्ष आजवर औद्योगिक विकासावर केंद्रित झाले होते. एकात्मिक सामाजिक-आर्थिक विकासासाठी सामाजिक क्षेत्रांच्या विकासावरही लक्ष केंद्रित करायचे ठरवून श्री. मोदी यांनी विकासप्रक्रियेत समतोल आणण्याचे ध्येय ठेवले. राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी पाच स्तरांवर काम करणारी 'पंचामृत योजना' त्यांनी आखली. त्यांच्या नेतृत्वाखाली शिक्षण, कृषी, आरोग्य आणि इतर विविध क्षेत्रांत केलेल्या मोठ्या परिवर्तनाचा गुजरात साक्षीदार आहे. राज्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांनी एक पारदर्शक दृष्टी विकसित केली आहे, धोरणाधिष्ठित सुधार कार्यक्रम सुरू केले आहेत, शासनाच्या प्रशासकीय रचनेला नवे रूप दिले आहे आणि गुजरातला यशस्वीपणे समृद्धीच्या पथावर नेले आहे. सत्तेवर आल्यानंतर अवघ्या १०० दिवसांतच त्यांची उद्दिष्टे आणि क्षमता यांची चुणूक दिसली. त्यांच्या या कौशल्यांना त्यांची प्रशासकीय बाबींमधली तीक्ष्ण समज, स्वच्छ दूरदृष्टी आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील सचोटी, प्रामाणिकपणा या सर्वच गोष्टींची जोड मिळाली व २००२ च्या डिसेंबरमधील सार्वत्रिक निवडणुकांमध्ये त्यांनी झंझावाती विजय संपादन केला, यात काहीच आश्चर्य नाही. १८२ पैकी १२८ जागा पटकावून मोदीशासन बहुमत नोंदवत पुन्हा सत्तेवर आले. २००७ मध्ये पुन्हा एकदा विजयाची पुनरावृत्ती झाली. आणखी एकदा निवडणूक जिंकून श्री. मोदी यांनी भाजपाला विक्रमी विजय मिळवून दिला. १७ सप्टेंबर २०१२ ला श्री. नरेंद्र मोदी यांनी गुजराती जनतेच्या सेवेचे ४००० दिवस पूर्ण करून विक्रम नोंदवला. सलग तीन वेळा निवडणुकीत श्री. नरेंद्र मोदी यांना विजय प्राप्त करून देत गुजराती जनतेने त्यांना आशीर्वाद व शुभेच्छा दिल्या आहेत. २००२ आणि २००७ (११७ जागा) च्या निवडणुकांतील विजयानंतर २०१२ च्या गुजरात विधान परिषदेच्या निवडणुकांत पुन्हा एकदा विजय संपादन करून श्री. मोदी यांनी पक्षाला यश मिळवून दिले.
लोकांची आज अपेक्षापूर्ती झाली आहे. इ-गव्हर्नन्स, गुंतवणूक, दारिद्र्य निर्मूलन, ऊर्जा, SEZ, रस्ते-विकास, आर्थिक सुनियोजन वा इतर कोणतेही क्षेत्र असो, आज गुजरातने देशापुढे मोठा आदर्श ठेवला आहे. गुजरातची विकासगाथा कोणत्याही एकाच क्षेत्राच्या विकासावर अवलंबून नाही. ती तीनही क्षेत्रांच्या (शेती, उद्योग, सेवा) विकासाच्या भक्कम पायावर आधारलेली आहे. या भव्यदिव्य विकासाचा श्री. मोदींचा मूलमंत्र होता- सबका साथ, सबका विकास! आणि त्यांचा भर होता तो लोकाभिमुख, कार्याभिमुख-कृतिशील उत्तम प्रशासन (Pro-people, Pro- active Good governance - P2G2)! या दोन प्रवाहांच्या आधारे, त्यांनी गुजरातच्या जनतेला राज्याच्या प्रगतीमध्ये सक्रिय भागीदार म्हणून सामावून घेतले.
अनेक स्वरूपाच्या विरोधाचा सक्षमपणे सामना करत त्यांनी नर्मदेवरील धरणाची उंची १२१.९ मीटर करून घेतली. या बांधकामाला होणार्याच विरोधाला त्यांनी स्वतः उपोषण करून प्रत्युत्तर दिले. पाण्याचा योग्य तो वापर आणि पाणी वाचवणे या संदर्भात त्यांनी 'सुजलाम् सुफलाम्' ही योजना राबवली. त्याद्वारे गुजरातमध्ये पाण्याच्या स्रोतांचे जाळेच त्यांनी तयार केले. राज्यातील सामान्यातल्या सामान्य माणसाच्या हिताविषयी ते किती जागरुक आहेत, हे सॉईल हेल्थ कार्ड्स, रोमिंग रेशन कार्ड्स आणि रोमिंग स्कूल कार्ड्स अशा त्यांच्या नावीन्यपूर्ण कल्पनांमुळे दिसून येते. कृषिमहोत्सव, चिरंजीवी योजना, मातृवंदना, बेटी बचाओ मोहीम (Save the Girl Child), ज्योतिग्राम योजना आणि कर्मयोगी अभियान, इ-ममता (E-Mamta), इ-एम्पॉवर (E-MPower), स्कोप (SCOPE), आयक्रिएट (iCreate) अशा उपक्रमांच्या संदर्भातील त्यांच्या पुढाकाराचे कारण गुजरातचा बहुपेढी विकास हेच आहे. अशा उपक्रमांमागील दूरदृष्टी, संकल्पना आणि उपक्रमांची सुनियोजित वेळापत्रकानुसार करण्यात आलेली अंमलबजावणी या गोष्टींमुळेच श्री. नरेंद्र मोदी यांची प्रतिमा सच्च्या राज्यकर्त्याची बनली. असे राज्यकर्ते इतर राजकारण्यांप्रमाणे फक्त आगामी निवडणुकांचाच विचार करत नाहीत, तर आगामी... भावी पिढीच्या हिताचा विचार करतात.
अतिशय उत्साही आणि चैतन्यदायी व नावीन्यपूर्ण विचार देणारे नेते म्हणून सर्वत्र प्रसिद्ध असलेल्या नरेंद्र मोदी यांनी आपली दूरदृष्टी गुजरातच्या जनतेच्या मनात रुजवली आहेच, पण त्याचबरोबर ६ कोटी गुजराती नागरिकांच्या मनात श्रद्धा, विश्वास आणि आशा या गोष्टीही यशस्वीपणे बिंबवल्या आहेत. श्री. नरेंद्र मोदींना तीक्ष्ण स्मरणशक्तीचे वरदान लाभले आहे. त्यामुळे कोणाही व्यक्तीला थेट नावाने हाक मारून तिच्याशी जवळचे नाते जोडणारे श्री. मोदी लोकांच्या गळ्यातला ताईत बनले आहेत. धार्मिक नेत्यांविषयी त्यांना मनोमन असणार्या अतीव आदरामुळे धर्माधर्मांत सौहार्दाचा पूल त्यांनी बांधला आहे. गुजरातमधील विविध स्तरांतले, आर्थिक परिस्थितीतले, वेगवेगळ्या धर्मांचे... अगदी विविध पक्षांचे लोकही श्री. मोदी यांच्याकडे पारदर्शी प्रशासन करत नागरिकांचं जीवनमान उंचावणारा एक सक्षम, द्रष्टा नेता म्हणूनच पाहतात आणि म्हणूनच श्री. मोदी त्यांना प्रिय आहेत. प्रभावशाली वक्ता असणारे आणि कुशलतेने संवाद साधणारे श्री. मोदी शहरी व ग्रामीण भागात सारखेच लोकप्रिय आहेत. म्हणूनच त्यांचे चाहते विविध धर्मांचे, विविध श्रद्धा जोपासणारे आणि समाजाच्या सर्व आर्थिक स्तरांतले आहेत.
त्यांच्याच समर्थ नेतृत्वाखाली गुजरात हा जगभरातील अनेक पुरस्कार व सन्मानांचा मानकरी ठरला आहे. त्यामध्ये आपत्ती निर्मूलनासाठीचा संयुक्त राष्ट्रसंघाचा 'सासाकावा पुरस्कार', प्रशासनातील नावीन्यपूर्ण व कल्पक गोष्टींसाठींचा 'कॉमनवेल्थ असोसिएशन फॉर पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन अँड मॅनेजमेंट' (CAPAM) चा पुरस्कार, 'युनेस्को पुरस्कार', इ-गव्हर्नन्ससाठीचा CSI चा सन्मान इत्यादीचा समावेश आहे.
जनतेने सलग तीन वर्षे त्यांना प्रथम क्रमांकाचे मुख्यमंत्री म्हणून पसंती दिली, यातच त्यांचे यश दडले आहे. गुजरातला जागतिक स्तरावर सन्मानाने घेऊन जाण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे, ती त्यांच्या 'व्हायब्रण्ट गुजरात' या उपक्रमाने ! या उपक्रमाने गुजरात हे सर्वांच्या प्राधान्याचे गुंतवणुकीचे एक केंद्र बनले आहे. सन २०१३ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या 'व्हायब्रण्ट गुजरात परिषदे'त जगभरातील तब्बल १२० देश सहभागी झाले, हे एक उल्लेखनीय यश आहे.
गेली अनेक वर्षे गुजरातने दोन अंकी विकासदर नोंदवला आहे. विकास आणि वृद्धीच्या मार्गावर गुजरात झपाट्याने पुढे चाललेला असताना, या पथिकाची वाटचालही अविरत सुरू आहे. काळाच्या वालुकामय पटलावर त्याच्या पाऊलखुणा उमटल्या आहेत. प्रत्येक पावलापावलावर परिवर्तनाचा जयघोष दुमदुमतो आहे. पायापासून आरंभ झालेली पण कळसापर्यंत पोहोचलेली त्यांची वाटचाल एक प्रेरणादायी नेतृत्व कसे आकाराला आले त्याची साक्षीदार आहे. नेतृत्वाच्या कल्पना व आदर्श यांचा विचार होत असेल तर श्री. मोदींकडे एक अभिजात आदर्श म्हणून निर्देश करता येईल. एखाद्या युवकाकडे सचोटी, धैर्य, समर्पण वृत्ती आणि दूरदृष्टी असेल तर त्यातून सृजनशील नेतृत्व कसे बहरते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे श्री. मोदी ! सार्वजनिक आयुष्यात त्यांच्यासारखी तीव्र सेवावृत्ती, अतीव ध्येयनिष्ठा असणारी आणि इतकी लोकप्रिय व जिचे लोकांवर तेवढेच उत्कट प्रेम आहे, अशी व्यक्ती विरळाच! अल्पावधीतच श्री. मोदी नियतीचेही लाडके व्यक्तिमत्त्व बनले आहेत.